प्रत्येक डोळ्यातील अश्रू मिटवू या...

२ ऑक्टोबर २०१८ पासून गांधीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्ताने सरकार, सार्वजनिक - शैक्षणिक संस्था व लोक अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन करणार आहेत. तथापि, हे एक नित्याचे सोपस्कार न होता बापूंच्या स्वप्नाच्या भारताकडे आगेकूच करण्याचा एक कृतिशील उपक्रम असावयास हवा.
संपादकीय
संपादकीय

३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधी यांच्या हत्येच्या भीषण घटनेनंतर राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान जवाहरलाल नेहरू म्हणाले, ‘आमच्या जीवनातून प्रकाश गेला आहे.’ लगोलग ते म्हणाले, ‘प्रत्येक डोळ्यातील अश्रू मिटवणं हे त्यांचे स्वप्न होते. या स्वप्नाची पूर्ती करणे हे अवघड काम आहे. मात्र, आपण अश्रू मिटवण्याचं हे काम करू या... हीच बापूला खरी आदराजंली होईल.’ २१ व्या शतकात अवघ्या मानवसमाजाला भेडसावणारी सर्वोच्च समस्या हवामान बदल, जलवायू परिवर्तन आहे. याचे मुख्य कारण जीवाश्म इंधन हे आहे. याचा अर्थ ऊर्जा, वाहतूक, शेती व औद्योगिक उत्पादन, वस्तू व सेवासुविधांसाठी पेट्रोलियम पदार्थ व खनिज इंधनाचा जो बेसुमार वापर होत आहे, त्यामुळे कार्बन डायऑक्साईड सह अन्य विषारी वायूंचे अफाट उत्सर्जन होत असल्यामुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ होत आहे. ४६६ कोटी वर्षे आयुर्मानाच्या या पृथ्वी गृहाला गत ३०० वर्षांतील औद्योगिक क्रांतीनंतर आणि विशेष करून गत शंभरेक वर्षांत विनाशाच्या कडेलोटावर आणून ठेवले आहे. याचा गांभीर्याने विचार केल्याखेरीज एकएक व्यक्ती, कुटुंब, समाज, देश व जगातील ७५० कोटी लोकांच्या भरणपोषण व योगक्षेमाची सूतराम शक्यता नाही. 

तात्पर्य, विकासाच्या गोंडसनावाने नैसर्गिक संसाधनांची जी बरबादी चालली आहे त्याला आवर घालणे हे तातडीचे आव्हान आहे. एकतर मुळातच आज संपूर्ण जग पृथ्वीच्या धारणक्षमतेच्या जवळपास दीड दोन पट संसाधने दरवर्षी वापरतात. सोबतच निम्म्या लोकसंख्येला मानवी जीवनाला आवश्यक गरजांपासून वंचित राहावे लागते ! अर्थातच ही एक अन्याय विसंगती असून त्याचे समाजावर प्रतिकूल परिणाम होत आहेत. प्रचलित विकास प्रकल्पांच्या परिणामी जगामध्ये विषमता, विसंवाद व निसर्गव्यवस्थेचा विध्वंस होत आहे. मानव हक्कांचे हनन होत असून हिंसा, उद्रेक, दहशतीमुळे स्थलांतर, प्रतिरोध, प्रतिशोधामुळे जग तणावग्रस्त बनले आहे.  खरं तर वाढवृद्धीप्रवण, चैनचंगळवादी, निसर्गाची ओरबाड करणाऱ्या विकासप्रणालीला गांधीजींनी निःसंदिग्ध शब्दात विरोध दर्शविला होता. ‘हिन्द स्वराज’ या तत्त्वचिंतनात्मक परिवर्तनकारी पुस्तकात त्यांनी याकडे जगाचे लक्ष वेधले होते.

निसर्ग, मानव व समाज या त्रयीच्या परस्परावलंबनाविषयी मूलगामी विश्लेषण त्यांनी संपादक व वाचक याच्या संवाद स्वरूपात केले आहे. अर्थात गांधीजींच्या विश्वदृष्टीचे हे मौलिक चिंतन समजणे, त्याचे नीट व नेमके आकलन होणे हे एक आव्हानात्मक काम आहे. त्यांच्या या जेमतेम शंभरेक पानी छोटेखानी पुस्तिकेवर गत शंभर वर्षांत अनेकविध विचारव्यूह, राजकीय विचारसरणीच्या कोनातून पंडितचर्चा व राजकीय मंथन झाले आहे. उत्तरोत्तर त्यांचे युगप्रवर्तक विचार दिशादर्शक होत आहेत.  सांप्रतकाळी भारत व जगासमोरील जीवनमरणाच्या प्रश्नांच्या संदर्भात गांधीजींच्या जीवनकार्य व तत्त्वज्ञानाचा विचार केल्यास हे स्पष्ट जाणवते की ते निसर्गवादी आहे. समता, सादगी व स्वावलंबन यावर त्यांचा विशेष भर आहे. याचे महत्त्व जगाला १९६० च्या दशकानंतर अधिक प्रकर्षाने जाणवू लागले. १९७२ मध्ये प्रसिद्ध झालेला क्लब ऑफ रोमचा अहवाल ‘लिमिटस टू ग्रोथ’ आणि त्याचवर्षी स्टॉकहोम येथे संपन्न, झालेली ‘ह्यूमन डेव्हलपमेंट कॉन्फरन्स’ यात जगाचे लक्ष गांधीच्या पर्यावरणस्नेही जीवनशैलीकडे वेधले गेले. १९९२ च्या वसुंधरा शिखर सम्मेलनांने गांधी विचारसरणीला वैश्विक परिमान लाभले. सारांश, गांधी हे नाव आज जगात चिरस्थायी विकासाचे मूर्तिमंत प्रतीक मानले जाते. 

‘जो बदल आपणास हवा तो स्वतः बना’ आणि ‘पृथ्वी सर्वांच्या गरजा भागवू शकते, परंतु हाव नाही’ ही दोन प्रख्यात गांधीवचने आतातर जगभर उदधृत केली जातात. थोडक्यात, जगाला विनाशापासून वाचवण्यासाठी ज्या पर्यावरणीय नि परिस्थितीकी तत्त्वविचारांची गरज मानवतावादी शास्त्रज्ञ, समाजधुरिण, प्रग्लभ राजकीय नेते, सच्चे पत्रकार आग्रहाने प्रतिपादन करत आहे त्याचा बीजरूप ठेवा गांधीच्या जीवन दृष्टीत आहे. म्हणूनच त्यांनी सांगितले; माझे जीवन हाच माझा विचार आहे. येथे हे ध्यानी घ्यावे की गांधीजींनी ‘संदेश’ असे म्हटले नाही. खेदाची बाब म्हणजे ज्यांना ते शुद्ध जीवन नाही ते उठबस संदेश देण्यात गर्क आहे. मन की बात करत आहेत. जनांचे काही देणे घेणे नाही! असो. 

तथापि, गांधीला आपण आज केवळ ‘निर्यातवस्तू’ ‘वंदनीयमूर्ती’ बनवले आहे. होय, मोदीजींना परदेशात गांधी गुणगाण फार सोयीचे असते. देशात मात्र अदानी अंबानीचे भागीदार असतात. काल लखनौमध्ये त्यांनी याची चक्क कबुली दिली, हे ही नसे थोडके ! ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन भारतातील २०१८ सालच्या सामाजिक - आर्थिक  - सांस्कृतिक - राजकीय वास्तवाचा विचार केल्यास हे स्पष्ट जाणवते की, आपण आजघडीला यच्चयावत भारतीयांच्या शुद्ध हवा पाणी, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्यादी गरजा सहज भागवू शकतो. मुख्य म्हणजे आज देशात जेवढे उत्पादन व सेवासुविधा आहे त्यातच हे शक्य आहे. अधिक निरर्थक वाढ वृद्धीची अजिबात जरूर नाही.

सोबतच हे स्पष्टपणे बजावले पाहिजे की मोटारवाहने, पेट्रोलियम पदार्थ, रसायने, प्लॅस्टिक आदी पर्यावरणाला व समाज स्वास्थ्याला घातक उत्पादने तात्काळ बंद केली पाहिजे. ‘विनाशाखेरीज विकास’ हीच विकासाची मुख्य कसोटी असावयास हवी. याचा अर्थ विकासाला आंधळा विरोध नाही, तर आंधळ्या विकासाला ठाम विरोध हा आहे. २१ व्या शतकात जगाला अगदी वेगळ्या विकासप्रणालीची, साधन स्त्रोतांची गरज आहे. १९ व्या व २० व्या शतकातील विषारीवायूंचे बेछूट उत्सर्जन करणाऱ्या विकास मार्गाची सद्यी केव्हाच संपली असून जीवाश्म इंधनाच्या विळख्यातून जगाची सुटका केल्याखेरीज मानवाची व वसुंधरेची सुरक्षितता सूतराम शक्य नाही. 

तात्पर्य, स्वातंत्र्याच्या ७३ व्या वर्षांत भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेली समतावादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक व्यवस्था प्रग्लभ करण्यासाठी बुद्धांपासून गांधींपर्यंतचा पर्यावरणस्नेही अहिंसक मार्ग व फुले-आंबेडकरांनी विशेषत्वाने प्रतिपादन केलेला दलित-आदिवासी-शेतकरी-कष्टकऱ्यांच्या मानवतावादी, सत्याचा मार्ग याला आजच्या सत्ताधाऱ्यांकडून आव्हाने दिले जात आहे. या भारतीय राज्यघटनेचे संरक्षण करणे हे आज देशासमोरील प्रमुख आव्हान आहे, ही बाब विसरता कामा नये. 

प्रा, एच, एम. देसरडा ः ९४२१८८१६९५ ( लेखक ज्येष्ठ अर्थतज्‍ज्ञ आहेत. )

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com