agriculture stories in marathi agrowon special article on greenhouses in kathmandu | Agrowon

हरितगृहांची राजधानी ‘काठमांडू’
DR. NAGESH TEKALE
शनिवार, 9 जून 2018

आठ दिवसांपूर्वीच एका परिषदेच्या निमित्ताने मी हिमालयाच्या कुशीमध्ये वसलेल्या काठमांडू शहरास भेट दिली. या शहराच्या चारीही बाजूने डोंगररांगा व मध्ये सपाट भाग म्हणून त्यास ‘काठमांडू व्हॅली’ म्हणतात. या व्हॅलीत तसेच डोंगर उतारावर (व्हॅली) शेकडो हरितगृहे आहेत. 

हरितगृहे हे शहरापासून दूर, मोकळ्या सपाट जागी, मोठ्या रस्त्यास जोडून थोडी आत आणि भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी असावीत हा नियम आहे. पण शहरात हरितगृहे असू शकतात का? या प्रश्नाचे उत्तरसुद्धा ‘हो’ आहे. अमेरिका, कॅनडा यांसारख्या विकसित देशांत मोठमोठ्या मॉलच्या पाठीमागे मॉलच्याच भिंतीचा आधार घेऊन छोटी हरितगृहे बांधली जातात. यांचा उपयोग मॉलमध्ये विक्रीसाठी आलेली फुले, भाजीपाला ताज्या अवस्थेत साठविण्यासाठी होतो. पुणे शहराच्या बाहेरच्या उपनगरामध्ये एका कृषी पदवीधर मुलीने काकडी उत्पादनासाठी एक लहान हरितगृह बांधलेले मी प्रत्यक्ष जाऊन पाहिले होते. पण ही मर्यादा एकापर्यंत सीमित होती. मात्र, जेव्हा मी नेपाळ या राष्ट्राच्या काठमांडू या राजधानीच्या मध्यवर्ती भागात हजारोंच्या संख्येने हरितगृहे पाहिली तेव्हा माझ्या आश्चर्यास पारावार उरला नाही. शहराच्या पश्चिम भागामधून ‘चितवन’ अभयारण्याकडे जाताना ‘पृथ्वीराज’ हा नेपाळमधील सर्वांत मोठा राष्ट्रीय मार्ग लागतो. या महामार्गास लागण्यापूर्वी डोंगरकड्याच्या रस्त्यावरून जाणाऱ्या तुमच्या चारचाकी वाहनाच्या खिडकीमधून तुम्ही खाली नजर टाकली असता तुम्हाला हरितगृहे दाटीवाटीने तेथील सखल भागात पसरलेली दिसतात. मी मुद्दाम खाली उतरून त्यांची पाहणी केली, तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि मिळालेली माहिती आश्चर्यजनक होती.

काठमांडूमध्ये किराणा दुकानामध्येच भाजीपाला विकत मिळतो. मात्र, तो बाहेरच्या बाजूस असतो. ग्राहक रांगेत उभा राहूनच माल घेतात. भाजीपाल्यात सर्वांत जास्त मागणी टोमॅटोला आहे. प्रत्येक ग्राहक प्रतिदिनी १ ते ५ किलो टोमॅटो घेऊन जातोच. नेपाळमध्ये टोमॅटोची आयात भारत आणि चीन या देशांमधून होते. भारताचा क्रमांक अर्थात प्रथम आहे. टोमॅटो हे नाशवंत फळ असल्याने अनेक वेळा भारत नेपाळच्या सीमा प्रवासात त्याच बरोबर सीमेवर कधीकधी अस्थिर वातावरणामुळेसुद्धा त्यांची भरपूर हानी होते. चीनचे टोमॅटो जास्त कडक तेवढेच टिकाऊ व आकर्षक रंगाचे मात्र किंमत जास्त असणारे असतात. नेपाळमध्ये घरोघरी तुम्हास टोपलीभर तरी ही फळभाजी दिसणारच. येथील लहान मुलांना सकाळीच ताजा टोमॅटो हमखास दिला जातो. 

२५ एप्रिल २०१५, सकाळी ११ वाजून ५६ मिनिट ही काठमांडूसाठी दुपार असूनही काळरात्र ठरली. आठ रिश्टर स्केलचा प्रचंड मोठा भूकंप झाला. काही मिनिटांत पाच लाख घरे भुईसपाट झाली. ८६९८ मृत्यू आणि २२,४८७ जखमी हा आकडा वेगळाच. सर्वांत जास्त हानी या पश्चिम भागामधील सपाट जागेवर झाली आणि येथे सर्व शेतकरीच होते. राहावयास घर नाही, कसावयास जमीन नाही. अशा परिस्थितीत जगायचे कसे? आणि यामधूनच हरितगृह शेतीच्या संकल्पनेचा उदय झाला. प्रायोगिक तत्त्वावर काही शेतकऱ्यांनी बांबूचा उपयोग करून कमी खर्चाची हरितगृहे बांधली. त्यामध्ये त्यांच्या आवडीचे टोमॅटोचे पीक घेण्यास सुरवात केली. आज २०१८ म्हणजे तीन वर्षांच्या कालखंडात या भागात हजारोंच्या संख्येने हरितगृहांच्या यशोगाथा तयार झाल्या. ही सर्व हरितगृहे बांबूचीच आहेत. बांबू सभोवतीच्या डोंगराळ भागामधून शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होतो. बाबूंची लागवड व पुरवठा यामधूनसुद्धा अनेकांना स्वतंत्र कृषी रोजगार उपलब्ध झाला आहे. १०० चौ.मी चे एक हरितगृह शेतकऱ्यास टोमॅटोचे एका हंगामाचे अंदाजे  ३५ हजार रुपये उत्पन्न देते. मे महिन्याचा अपवाद वगळता वर्षभर उत्पादन चालू असते. 

एका शेतकऱ्याची कमीत कमी चार-पाच तरी हरितगृहे असतातच. उन्हाळ्यात, मे महिन्यात नवीन हरितगृहांची बांधणी सुरू असते. चार माणसे एक दिवसात एक हरितगृह बांधून पूर्ण करतात आणि त्याच वेळी इतर दोन माणसे आतमध्ये स्फुरद आणि पालाशची मात्रा देऊन त्यात शेणखत टाकून गादी वाफे तयार करतात. रोपनिर्मितीसाठी काही हरितगृहे राखून ठेवलेली असतात. सेंद्रिय खतनिर्मिती, रोपनिर्मिती, हरितगृहांची उभारणी यामध्ये कुशल रोजगारनिर्मितीची एक सुदृढ साखळीच येथे आढळते. हरितगृह परिसरातच सेंद्रिय खत मोठ्या प्रमाणात तयार होते. टोमॅटोच्या प्रत्येक नवीन पिकास खत बदलले जाते. सध्या काठमांडूमध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकाम चालू असल्यामुळे धूळ भरपूर आहे. त्यामुळे चारही बाजूने हरितगृहे शेडनेटने झाकलेली दिसतात. या सर्व सपाट भागात पाऊस भरपूर असला तरी पाण्याचा निचरा त्वरित होतो. भूकंपात पूर्णपणे उद्‍ध्वस्त झाल्यानंतर स्वहिमतीवर सावरून टोमॅटोचे शाश्वत उत्पन्न घेणारा नेपाळी शेतकरी माझ्यासाठी आदर्श ठरला आहे. 

अनेक हरितगृहमालक त्यांचे उत्पादन जागेवरूनच विकतात. वर्षभर शाश्वत उत्पादन आणि योग्य भावातच विक्री व्हावी म्हणून शेतकरी हरितगृहांचे ठराविक संख्येमध्ये समूह करून रोपे लावण्यापासून ते टोमॅटो काढणीपर्यंतचे नियोजन करतात. म्हणून गेली अनेक महिने येथे ही फळभाजी ३० रुपये किलो दरानेच विकली जाते. या सखल भागामधील बरीच मोकळी जागा आता व्यवसायिकांनी करार पद्धतीवर घेऊन हरितगृहामधून टोमॅटो उत्पादन सुरू केले आहे. पहाटेच व्यापारी लोक येथील टोमॅटो काठमांडूच्या मध्यवर्ती भाजीबाजारात घाऊक विक्रीसाठी आणतात. काठमांडू हे पर्यटनस्थळ असल्यामुळे येथे उच्च दर्जाच्या हॉटेल्सची रेलचेल आहे. अनेक हॉटेल्स टोमॅटोची खरेदी सरळ हरितगृहामधूनच करतात. 

एका बांबूच्या हरितगृहाचा खर्च अत्यंत कमी आणि बांबू स्वत:चा त्यामुळे शेतकऱ्यांना कुणासमोरही कधी हात पसरण्याची वेळ आली नाही. जेथे मोकळी जागा तेथे हरितगृह या तत्त्वानुसार आता या परिसरात डोंगर उतारावरसुद्धा स्वत:च्या घरास खेटून एक छोटे का असेना; पण हरितगृह उभारण्याचा येथील शेतकऱ्यांचा उपक्रम मला स्तुत्य वाटला. एका राष्ट्राच्या राजधानीमधील शेतकऱ्याचे हे वेगळेपण मला मनापासून भावले. 

DR, NAGESH TEKALE : ९८६९६१२५३१
(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)
 

इतर अॅग्रो विशेष
दहशतवादी आणि त्यांच्या पाठिराख्यांना...पांढरकवडा : आपल्या लष्कराबद्दल आपल्याला गर्व आहे...
शेतीतूनच होते औद्योगिक विकासाची पायाभरणीची नमधील कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यकर्त्यांनी...
कसा टळेल मानव-वन्यप्राणी संघर्ष? अलीकडे वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान...
'मंडळात एकच छावणी'च्या निकषात बदल नगर  : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात...
पंधरा एकरांत उत्कृष्ठ हरभरा नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी (ता. शहादा)...
विविध प्रयोगांमधून वाढवले उत्पन्नाचे...यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील महेश व दीपक या...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर ः परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
किमान विक्री मूल्यवाढीने साखर उद्योगात...कोल्हापूर : साखरेचे किमान विक्री मूल्य २९००...
जन्मोजन्मी दास । व्हावे हेचि माझी आस ।।जन्मोजन्मी दास । व्हावे हेचि माझी आस ।। पंढरीचा...
शहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी...तासगाव, जि. सांगली ः छत्रपती शिवाजी महाराज, डॉ....
दीड हजार कोटींचा दुसरा हप्ता...मुंबई  ः गेल्या वर्षी खरीप हंगामात अपुऱ्या...
राज्यात गारठा पुन्हा वाढण्याची शक्यतापुणे : उत्तरेकडून थंड वाऱ्याचे प्रवाह येऊ...
पंतप्रधान मोदी आज करणार महिला बचत...यवतमाळ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (ता...
पदव्युत्तर कृषी अभ्यासक्रमात पुढील...नागपूर ः कृषी अभ्यासक्रमात आजची परिस्थिती आणि...
दुष्काळात पीकविम्याचा आधारमुंबई ः यंदाच्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...
पाकच्या मुस्क्या आवळणार; विशेष राष्ट्र...नवी दिल्ली: पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ...
चीनमधील शेतीची विस्मयकारक प्रगतीविसाव्या शतकाच्या मध्यावर भारताला स्वातंत्र्य...
सेस, सेवाशुल्क आणि संभ्रमप्रक्रियायुक्त शेतमाल, फळे-भाजीपाला आणि शेवटी...
कृषी पथदर्शक राज्य साकारण्याची संधी :...पुणे : “शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक शेती तंत्र...
डिजिटल परवान्यासाठी लढा देणार : राजू...पुणे : कृषी आयुक्तालयाच्या गुणनियंत्रण विभागाकडून...