Agriculture stories in Marathi, agrowon special article on greenrevolution success-failure | Agrowon

हरितक्रांतीचे यशापयश
प्र. र. चिपळूणकर
बुधवार, 29 नोव्हेंबर 2017
दोन ते पाच वर्षांत हरितक्रांतीचे तंत्र जगभर पसरले, त्या काळात आजच्यासारखी प्रसार माध्यमे नव्हती. गेल्या २५ वर्षांत सेंद्रिय शेतीचा प्रसार एकूण शेतीच्या ९ टक्केही होऊ शकलेला नाही. सेंद्रिय शेती चांगली की वाईट, रासायनिक शेती चांगली की वाईट, कोणी कोणत्या पद्धतीकडे जावे हा ज्याच्या त्याचा अभ्यासाचा विषय आहे. आजही काही फसवणुकीचे प्रकार होऊनही सुधारित बियाण्यांची मागणी कमी झालेली नाही. कीटकनाशक व बुरशीनाशकांची विक्री सालोसाल वाढत आहे.

भारतात तसेच जगभरातील अनेक देशांत १९६०-६५ मध्ये हरितक्रांतीस सुरवात झाली. मेक्‍सिकोमधून नवीन गव्हाचे व फिलिपिन्समधून भाताच्या कमी उंचीच्या जातींची आयात करून त्या भारतात लावण्यास सुरवात केली गेली. या जातींची उत्पादनक्षमता आपल्या जुन्या जातींच्या तुलनेत जास्त होती. अर्थात ही उत्पादन क्षमता गाठण्यासाठी त्यांना त्यामानाने पोषण देण्याची गरज होती. त्यासाठी रासायनिक खते उपलब्ध केली गेली. त्यावर कीडरोगांचाही स्थानिक वाणांच्या तुलनेत जास्त प्रादुर्भावाची शक्‍यता असल्याने त्याच्या नियंत्रणासाठी कीडनाशकांचेही बाजारात आगमन झाले. त्या काळात या जातींनी शेतकऱ्यांना भरभरून उत्पादन दिले. उत्पादनक्षमता पाहून फारसा प्रचार न होताही अल्पावधीत या जातींचा प्रसार सार्वत्रिक झाला. या जातींचा स्थानिक जातींशी संकर करून भारतात पुढे नवनवीन वाणांची निर्मिती होऊ लागली. अन्नधान्याच्या उत्पादनाचे नवनवे उच्चांक शेतकऱ्यांनी प्रस्थापित केले. या यशकथेला हरितक्रांती असे संबोधले गेले. हे परिवर्तन जगभरात झाले.

त्या काळात कृषी महाविद्यालयात आम्ही विद्यार्थी शेतीशास्त्राचे शिक्षण घेत होतो. कृषी पदवी घेऊन आम्ही शेती करण्यास सुरवात केली. नेमक्‍या याच काळात या हरितक्रांतीच्या तंत्राचाही प्रवेश झाला होता. या प्रवेशापूर्वीचे चित्र असे होते, की भारतात अन्नधान्याची प्रचंड टंचाई होती. अमेरिकेतून पीएल-४८० कराराखालील धान्याची जहाजे बंदराला लागण्याची चातकाप्रमाणे वाट पाहावी लागत होती. अमेरिका आपल्याला जे धान्य पाठवित असे तो पिवळी मिलो ज्वारी व तेथील डुकरांसाठी तयार केलेला अत्यंत हलक्‍या प्रतीचा गहू होता; परंतु तोही त्या वेळी पोटाची आग विझविण्यासाठी भारतीय जनतेने गोड मानून खाल्ला. त्या वेळी पोट भरणे याला महत्त्व होते. प्रत वगैरे विचारात घेण्यास कोणाला सवड नव्हती. पंजाबात गहू व तांदूळ तर इतर भागात नवीन वाणांचा प्रसार इतक्‍या झपाट्याने झाला, की शेतकरी परंपरावादी आहे, तेथे परिवर्तन कासव गतीने चालते ही विशेषणे पुसली जावीत.

२-५ वर्षांत पारंपरिक उंच कमी उत्पादनक्षमता असणारे वाण शेतकऱ्यांनी बाजूला टाकले व सर्वत्र या सुधारित वाणांच्या शेतीला सुरवात झाली. परिणाम असा झाला की जो भारत भुकेने तडफडत होता तो आता अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण झालाच, पुढे जाऊन अन्नधान्याची निर्यातही करू लागला. याच काळात देशात अनेक लहान-मोठ्या पाटबंधारे योजना राबविल्या गेल्या. बागायतीची सोय झाल्याने उत्पादनाचे उच्चांक गाठले गेले.

२०-२५ वर्षांच्या काळानंतर १९८५-९० च्या सुमारास उत्पादन पातळी घटू लागली. हरितक्रांतीतील यशकथेला उतरती कळा लागली. उत्पादनपातळी टिकविण्यासाठी शेतकऱ्यांनी संसाधनांचा वापर वाढविला. उत्पादन खर्च वाढला; परंतु हा पर्यायही जास्त काळ चालू शकला नाही. उत्पादन पातळीतील घट सावरण्यासाठी बाजारात नवनवीन उत्पादने आली. पीक पोषण, संरक्षण, पाणीपुरवठा, मशागत, कापणी-मळणी अशा शेती संबंधित तंत्रात अनेक सुधारणा करणारी नवनवीन तंत्रे बाजारात आली; परंतु उत्पादनाचा आलेख काही शाश्‍वतपणे त्यांना चढा करता आला नाही.

पुढे काही जणांना उपरती झाली, की हे हरितक्रांतीचे तंत्रच पूर्णपणे चुकीचे होते. आपली जुनी शेती पद्धती, जुने देशी पिकाचे वाण हेच चांगले होते. रासायनिक खते व विविध प्रकारची औषधे विषसमान आहेत. त्यांचा वापर करून होणारे उत्पादन विषारी आहे. त्याच्या सेवनाने जगभर आरोग्याचे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह यांच्याबरोबर कर्करोगाच्या सर्वत्र वाढत चाललेल्या प्रमाणास सर्वस्वी ही रासायनिक शेतीच कारणीभूत आहे. या सर्वांवर उपाच म्हणजे परत आपण सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे. मग १९४० मध्ये प्रकाशित झालेले अल्बर्ट हॉवर्ड यांचे ॲग्रिकल्चरल टेस्टामेंटस, फुकुओकाचे ‘एक काडातून क्रांती’, रॅचेल कार्सन यांचे ‘सायलेंट स्प्रिंग’ (१९६२) या पुस्तकांचा भाव वधारला.
१९९०-९२ च्या सुमारास सेंद्रिय शेतीवर प्रथम पुण्यात मोठी चर्चा सत्रे पार पडली. त्या वेळी सेंद्रिय शेती गांडुळाभोवती फिरत होती. रासायनिक शेतीत उत्पन्न व खर्चाचा मेळ घालत असता दमछाक होणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना या नवीन तंत्राचे आकर्षण वाटले. (मीही त्यातील एक) पुढे १-२ वर्षांत या पद्धतीकडे वळलेल्या शेतकऱ्यांची गत आगीतून फोफाट्यात पडल्यात गत झाली. अपवाद वगळता बहुतेकांनी सेंद्रिय शेतीला रामराम केला. (मीपण). दरम्यानच्या काळात काही साधू मंडळींनी गांडुळाची अंडीपुंज, गांडुळे व गांडुळ खत विकून चांगली कमाई करून घेतली. मध्यंतरीचा २-४ वर्षांचा काळ शांतपणे गेला. पुढे खासगी साधूंची जागा केंद्र सरकारने घेतली व सेंद्रिय शेतीवर संशोधन, प्रचार, प्रसाराची सूत्रे आपल्या हातात घेतली. आता सरकार, काही खासगी साधू मंडळींनी ही चळवळ जिवंत ठेवली. या सर्वांचा प्रत्यक्ष मी साक्षीदार आहे. प्रश्‍न असा निर्माण होतो, की दोन ते पाच वर्षांत हरितक्रांतीचे तंत्र जगभर पसरले, त्या काळात आजच्यासारखी प्रसार माध्यमे नव्हती. गेल्या २५ वर्षांत सेंद्रिय शेतीचा प्रसार एकूण शेतीच्या ९ टक्केही होऊ शकलेला नाही. सेंद्रिय शेती चांगली की वाईट, रासायनिक शेती चांगली की वाईट, कोणी कोणत्या पद्धतीकडे जावे हा ज्याच्या त्याचा अभ्यासाचा विषय आहे. आजही काही फसवणुकीचे प्रकार होऊनही सुधारित बियाण्यांची मागणी कमी झालेली नाही. कीटकनाशक व बुरशीनाशकांची विक्री सालोसाल वाढत आहे. तणनाशकांच्या वापराचे उच्चांक होत आहेत. गावात २५-५० दुकानदारांपैकी एखादा दुकानदार जैविक कीटक बुरशीनाशके विकतो. फक्त जैविक औषध विक्रीवर दुकानदारी चालविता येत नाही, म्हणून रसायनाचीही विक्री करावीच लागते, असे त्याचे मत. काळाच्या ओघात जे चांगले ते पुढे जाईल, ज्याने त्याने अभ्यासातून कोणत्या मार्गाने जायचे, हे ज्याला त्याला पूर्ण स्वातंत्र आहे. इथपर्यंत सर्व ठीक चालले आहे.

नुकताच व्हॉट्‌सॲपवर हरितक्रांतीबाबत डॉ. स्वामिनाथन यांच्यावरच टिका करणारा एक संदेश वाचला. हा संदेश वाचून दुःख झाले. आपले कसे चांगले आहे ते पटवून देण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, याबाबत वाद नाही; परंतु त्यासाठी स्वामिनाथन यांच्यावर टीका करण्याची काही गरज नव्हती. ६०-७० कोटी लोकसंख्येला गरजेइतके धान्य पुरविण्यासाठी अमेरिका अगर ऑस्ट्रेलियासारख्या देशांपुढे अत्यंत मानहानीकारकरीत्या झोळी पसरून अन्नधान्याची भीक मागावी लागत होती. ही परिस्थिती आता आपण विसरून गेलो काय? आता १२५ ते १३० कोटी लोकसंख्येला पुरून उरेलइतके अन्नधान्य आपण पैदा करत आहोत. कडधान्य व तेलबियांची आयात यामागे वेगळी कारणे आहेत. बऱ्याच वेळा अन्नधान्य, साखर आयात करण्यामागे राजकारण असेत. तो आपल्या चर्चेचा विषय नाही.
प्र. र. चिपळूणकर ः ८२७५४५००८८
(लेखक शेती प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

इतर अॅग्रो विशेष
अटलबिहारी वाजपेयींची प्रकृती चिंताजनकनवी दिल्ली : गेल्या दोन महिन्यांपासून एम्स...
देशाचा विकास वेगाने होतोय : राष्ट्रपतीनवी दिल्ली : ''देशातील परिस्थिती झपाट्याने...
स्वातंत्र्य संग्रामातील ग्रामीण सहभागब्रिटिश सत्तेविरोधी स्वातंत्र्य चळवळीत केवळ शहरी...
सापळ्यात अडकलाय शेतकरीयावर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात बीटी कापसावर एक...
नाशिक विभागातील नुकसानग्रस्तांना चाळीस...नाशिक : गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत...
पुणे जिल्ह्यातील दहा धरणे शंभर टक्के पुणे ः गेल्या तीन ते चार दिवसांपासून धरणाच्या...
राज्यात अनेक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊसपुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी...
शेतीपूरक व्यवसायाला विदर्भात चालना...नागपूर ः सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न...
इथेनॉलनिर्मितीसाठीच्या कर्जासाठीचे निकष...नवी दिल्ली: केंद्र सरकार साखर कारखान्यांना...
सूक्ष्म सिंचन अनुदानाचे ९० कोटी अखर्चितमुंबई ः २०१७-१८ या वर्षातील सूक्ष्म सिंचन...
सोयाबीन लागवडीत ९ टक्के वाढनवी दिल्ली: कृषी विभागाच्या ९ ऑगस्टपर्यंतच्या...
तेलकट डाग रोगाने डाळिंबाला घेरलेसांगली ः राज्यात डाळिंबाचे सुमारे दोन लाखांहून...
‘नाफेड’समोर कांदा खरेदीचा पेचनाशिक : कांद्याचा घसरता दर थांबविण्यासाठी, तसेच...
अभ्यासू, प्रयोगशील युवकाची एकात्मिक,...‘बीएस्सी ॲग्री’ची पदवी, त्यानंतर सुमारे १० वर्षे...
समविचारी पक्षांना सोबत घेणार ः चव्हाणनाशिक : विरोधक एकत्र येऊ नयेत म्हणून भाजप...
स्वतःची विक्री व्यवस्था, मूल्यवर्धनातून...एकेकाळी भूमिहीन असलेल्या काजळी रोहिणा (जि. परभणी...
झळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...
पाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...
नाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...
कृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...