अतिखोल भूजलाचा उपसा घातकच

कायमस्वरूपी पाणी लागावे म्हणून विंधन विहीर हजार फूट किंवा त्याखाली जेव्हा घेतली जाते तेव्हा फक्त धुरळा आणि गरम वाफ बाहेर येते. पृथ्वीच्या भूगर्भाशी पाण्याच्या आशेने अशी छेडछाड करणे अतिशय चुकीचे आहे.
संपादकीय
संपादकीय

पर्यावरणाचा नाश कोणी केला? या एका प्रश्नाला अनेक उत्तरांची भेंडोळी जोडलेली आहेत. कुणी म्हणेल विकासाची गंगा, कुणास वाटेल वृक्षतोड, वाढती लोकसंख्या आणि त्यास जोडलेली अपुऱ्या नागरीव्यवस्थेचा बोजवारा; तर अजून कुणीतरी प्लॅस्टिकचा वापर, वाहनांची गर्दी, अंधश्रद्धेची वावटळ म्हणत जोरात आक्रोश करेल. मात्र, माझ्यासारखा स्वच्छ सुदृढ पर्यावरणावर नितांत प्रेम करणारा म्हणेल, की पर्यावरणाची सर्वांत जास्त हानी ही ‘मी’ म्हणजेच आपणच केली आहे. ‘धरणाकाठी सगळेच रासायनिक शेती करतात, मग मी का करू नये.’ ‘त्याने ५०० फुटांवर बोअरवेल घेतले, मग मी ६०० फुटांच्या पुढे जाईल!’ शेवटी या ‘मी’ला उत्तर नाही. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ त्याप्रमाणे अनेक ‘मी’ एकत्र आले, की त्यांचा महासागर तयार होतो. या महासागराच्या लाटाच सुदृढ पर्यावरणाचे स्वच्छ किनारे अगदी सहजपणे उद्ध्वस्त करून टाकतात. पदव्युतर पर्यावरण अभ्यासक्रम शिकविणाऱ्या एका प्रतिष्ठित महाविद्यालयात मला ‘पाणी’ या विषयावर व्याख्यानास बोलावले होते. सभागृहात सर्व पर्यावरणाचेच विद्यार्थी होते; कारण माझ्या मानधनापेक्षाही माझी हीच अट महत्त्वाची होती. उपस्थितांची शंभरची संख्या, त्यात प्राचार्य आणि प्राध्यापक दहा बारा. कार्यक्रम सुरू झाला. बाहेर ‘हॅन्ड वॉश स्टेशन’चा नळ चालूच होता. विनंती केल्यावर थांबवण्याचा प्रयत्न झाला, पण थेंबाचे संगीत शेवटपर्यत चालूच राहिले. खिडकीतून दिसणाऱ्या त्या नैसर्गिक स्त्रोतांच्या नाशाने मी सारखा विचलित होत होतो. भाषण सुरू झाले.

‘‘वातावरण, जलावरण आणि भूस्तर हे आपल्या पृथ्वीचे तीन मुख्य भाग आहेत. या तिन्ही भागांच्या विस्तारामध्ये पाण्याचे प्रमाण ७१ टक्के एवढे आहे. पृथ्वीची आंतररचना पाहताना तिचे तीन भाग पडतात. आतला गाभा, मध्य भाग आणि बाह्य भाग जो अंदाजे ३० ते ६० कि.मी. जाडीचा असतो. आपण पृथ्वीचे जे रूप पाहतो, तो तिचा बाह्य भाग असतो, या बाह्य भागाचे पुन्हा ‘सायल’ आणि ‘सायमा’ असे दोन उपभाग पडतात. शेतकरीवर्ग जो शेती करतो तो पृथ्वीचा सर्वांत बाहेरचा भाग म्हणजेच ‘सायल’ असतो. आपणास हवा असणारा जलसंचय हा बाह्य सायलमध्ये जास्त असतो. हा भाग अंदाचे १५ कि.मी. जाडीचा आहे. या भागात आपण जसजसे खोलीवर जातो, तसतसे तापमान वाढत जाते. संशोधनाअंती असे सिद्ध झाले आहे, की सायलच्या शेवटच्या थरामध्ये तापमान १००० अंश सेंटिग्रेडच्याही वर असू शकते. जमिनीत एवढ्या खोलीवर पाणी द्रवरूप अवस्थेत असणे, हे केवळ अशक्य आहे, म्हणजेच जेवढी विंधन विहीर खोल घेणार तेवढे शाश्वत पाणी तेथे मिळणार, हेच मुळी चुकीचे आहे. कायमस्वरूपी पाणी लागावे म्हणून विंधन विहीर हजार फूट किंवा त्याखाली जेव्हा घेतली जाते तेव्हा फक्त धुरळा आणि गरम वाफ बाहेर येते. पृथ्वीच्या भूगर्भाशी पाण्याच्या आशेने अशी छेडछाड करणे चुकीचे आहे.

आपला देश भाग्यवान आहे. आपणाकडे पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा हे तीन ऋतू आहेत. अमेरिका, कॅनडा आणि युरोपियन देशात पावसाळा हा ऋतू नाहीच. हिवाळा, उन्हाळा, फॉल आणि स्प्रिंग या चार ऋतूंचे सौंदर्य सोहळे साजरे करीत हे देश निसर्गावर मुबलक प्रेम करीत असतात. जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर म्हणजे परतीच्या मॉन्सूनचा आनंद आपण पाऊसधारांनी घेत असतो. या चार महिन्यांत पडणाऱ्या एकूण पावसापैकी २० टक्के पर्जन्यच आपण वापरतो. यातील आठ टक्के वरच्या भूस्तरात म्हणजे माती मिश्रित मुरुम थरामध्ये मुरते, हा स्तर जलमय म्हणजेच सम्प्रुक्त झाला की या थरामधून पाणी खाली जाऊ लागते. याचे प्रमाण १२ टक्के असते आणि यालाच आपण भूजल असे म्हणतो. भूजलाचे प्रमाण वाढवण्यासाठी पाऊस हा सतत न थांबता रिमझिम स्वरूपात पडावा लागतो, यालाच शेतकरी ‘झड’ लागणे, असे म्हणतात. नदीला पूर येतो तो यामुळेच.  

सध्या जमिनीखालील उपसा वाढल्यामुळे, तसेच झडीचा पाऊस थांबल्यामुळे भूजलाचे संचित झपाट्याने कमी होत आहे. भूजल कमी झाल्याने या स्तरामधील माती कोरडी पडते आणि त्यामुळे ‘सायमा’मधील उष्णता वरच्या बाजूस म्हणजे भूस्तराकडे वाटचाल करते. जमीन लवकर कोरडी पडणे, पिके एक दोन आठवडे पाणी न दिल्यास कोमेजून जाणे, हे प्रकार यामुळेच सर्रास आढळतात. पूर्वी भूजलाचा उपसा अतिशय मर्यादित होता, तसेच सेंद्रिय शेती असल्यामुळे जमिनीत कायम ओलावा असे. त्यामुळे दुष्काळ सहज पचविले जात होते. विंधन विहिरीमुळे भूस्तराची होणारी चाळणी हे माणसांनी म्हणजेच शेतकऱ्यांनी स्वत:वर ओढावून घेतलेले संकट आहे. ‘सायल’ या पृथ्वीच्या सर्वांत बाह्य भूस्तरामध्ये सर्वांत वर म्हणजे पृष्ठभागावर काळ्या अथवा लाल मातीचा थर असतो, त्याखाली वालुका मिश्रित माती नंतर मुरुम, त्यापुढे खडक आणि नंतर मांजरा आणि काळा पाषाण यांचे एका आड एक थर असतात. ‘झडी’चा पाऊस असेल, तर जमिनीचा वरचा पाच-सहा फूट उंचीचा माती मुरुम स्तर सर्वप्रथम जलमय होतो आणि पाणी खाली झिरपू लागते. मांजरामधून झिरपणाऱ्या पाण्यापेक्षा पाषाणातून झिरपणारे पाणी अतिशय कमी असते. आपण जेव्हा या पाषाणास जमिनिच्या खोल ४०० ते ६०० फुटांपर्यंत छिद्र पाडतो तेव्हा आपणास तेथे मिळणारे पाणी हे हजारो वर्षांचे पृथ्वीच्या पोटामधील संचीत असते. अशा सुप्त आणि शाश्वत पाण्यास विंधन विहिरीमधून वर खेचणे म्हणजेच भविष्यामधील भूगर्भाच्या गाभ्यात असणाऱ्या तप्त लाव्हास आमंत्रण देण्यासारखे आहे. काळ्या पाषाणात साठवलेले पाणी हे आपल्या शेतजमिनीचे अप्रत्यक्षरीत्या संरक्षण करत आहे, हेच आम्ही विसरत आहोत.’’ 

भूजलाचे मी सांगत असलेले महत्त्व अनेक विद्यार्थी त्यांच्या वहीमध्ये नोंद करून घेत होते, व्याख्यान चालू असताना प्राचार्य केव्हा निघून गेले कळलेच नाही, त्यापाठोपाठ हातात पाण्याच्या बॉटल्स घेऊन पाच-सहा प्राध्यापकही गेले. पाणी आणि पर्यावरण याबद्दल आजही आपण फारच उदासीन आहोत. पर्यावरण म्हणजे वातावरण म्हणजेच थोडक्यात दूषित हवा, रस्त्यावरची वाहने, केरकचरा, फटाक्यांचे आवाज एवढेच आम्हास माहीत आहे. वास्तविक दूषित पर्यावरणाची सुरुवातच मुळात पाण्यापासून होते, याबद्दल आजही आमची युवापिढी अज्ञान आहे. समाजामधील हा घटक पाण्याबद्दल अज्ञानी असणे, यास त्यांना शिक्षण देणारी महाविद्यालये आणि प्राध्यापक काही मर्यादेपर्यंत जबाबदार नाहीत काय?

डॉ. नागेश टेकाळे  ः ९८६९६१२५३१  (लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)                                                                      

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com