Agriculture stories in Marathi, agrowon special article on import-export policy | Agrowon

कसे असावे आयात-निर्यात धोरण?
विजय जावंधिया ः
सोमवार, 4 डिसेंबर 2017

देशांतर्गत बाजारपेठेत घसरत चाललेल्या भावांच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकार शेतमालाच्या आयात-निर्यात धोरणात अलीकडे काही बदल करीत आहे, ते आवश्‍यकच आहेत. कारण सरकारच्या हस्तक्षेपाशिवाय आयातीला आळा आणि निर्यातीला चालना मिळणार नाही.

देशातील तेलबिया व कडधान्य पिकांचे बाजारभाव किमान आधारभूत दरापेक्षाही खाली जात असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कडधान्यांची निर्यात खुली करून तेलबियांच्या आयात शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. या निर्णयाला उशिरा झाला म्हणावा लागेल. आज सोयाबीनचे भाव हमीभावापेक्षाही कमी म्हणजे प्रतिक्विंटल २५०० रुपये, भुईमूग ३६०० रुपये तसेच मोहरीचे भावदेखील खाली आले आहेत. देशाला २३० लाख टन खाद्यतेलाची गरज असून, १६० लाख टन आयात करावी लागते. त्यातही खाद्यतेल आयातीत पुन्हा ६० टक्के वाटा पामतेलाचा आहे. म्हणजेच पामतेलावर जादा आयातकर लादल्याशिवाय देशी तेलबिया पिकांचे बाजार सुधारणार नसल्याचे स्पष्ट आहे.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खाद्यतेलाच्या भावावर सोयाबीनचे भाव अवलंबून नसतात. सोयाबीनची ढेप किंवा पेंड निर्यात होते. त्या निर्यातीच्या भावावरच सोयाबीनचे भाव अवलंबून असतात. जगभरात जर सोयाबीनचे भाव घसरले असतील तर ढेपेला भाव कमी मिळतो. मात्र साखर निर्यातीला अनुदान किंवा सबसिडी मिळते तशी सोयाबीनला मिळत नाही. कापसाच्या निर्यातीबाबतही तीच स्थिती आहे. आज जगभरात साखरेचे भाव कोसळले आहेत. सर्वसाधारणपणे जागतिक बाजारात २४ रुपये किलो असे साखरेचे दर आहेत. मात्र आपल्याकडे खुल्या बाजारात ४२ रुपयांनी ती विकत घेत आहोत. याचाच अर्थ जागतिक बाजारपेठेत भाव घसरलेले असूनही आपल्याकडे मात्र भाव कायम आहेत. त्याला विरोध असल्याचे कारण नाही. मात्र साखरेच्या भावात जो हस्तक्षेप केला जातो. तोच इतर धान्यांच्या बाबतीत, निर्यातीच्या धोरणामध्ये केला जात नाही. यामध्ये बदल होणार का? जागतिक बाजारात साखर स्वस्त असते तेव्हा साखर निर्यातीला ५००० रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. आयातीवर ५० ते ६० टक्के आयातकर लावला जातो. साखरेचा बफरस्टॉक करण्यासाठी कारखान्यांना बिनव्याजी कर्ज दिले जाते. म्हणजे साखरेकरिता योग्य वेळी हस्तक्षेप केला जातो; मग इतर पिकांसाठी का केला जात नाही?

शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करायचे असेल तर निर्यातीचे धोरण बदलावे लागेल. कोणत्याही शेतमालाला बाजारात जी किंमत मिळावी अशी सरकारची अपेक्षा आहे, त्यापेक्षा कमी किमतीत त्या शेतमालाची आयात होता कामा नये. दुसऱ्या भाषेत सांगायचे तर उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा मिळून येणारी किंमत ही हमी किंमत असली पाहिजे आणि त्यापेक्षा कमी किमतीत आयात होणार नाही, असे धोरण असले पाहिजे. याकरिता कांद्याच्या निर्यातीवर निर्बंध आणण्यासाठी किमान निर्यात किंमत ठरवली जाते. त्या किमतीपेक्षा कमी किमतीत कांदा निर्यात करता येऊ शकत नाही. तशीच किमान आयात किंमत इतर पिकांबद्दल जाहीर केली गेली पाहिजे. जेणेकरून त्यापेक्षा कमी किमतीत शेतमाल आयात होणार नाही. असे आयात-निर्यातीचे धोरण आपण ठरवले तर ते शेतकरी हिताचे होईल. अर्थात त्यासाठी जागतिक व्यापार संघटनेत आपल्याला संघर्ष करावा लागेल. त्याची तयारी सरकारने करायला हवी. हा संघर्ष यशस्वी झाला तर त्याचे शेतकऱ्यांकडून स्वागतच होईल.

जागतिक व्यापार संघटनेच्या नव्या ट्रेड फॅसिलिटेशन ॲग्रीमेंटची सध्या चर्चा होत आहे. यामध्ये आयातीवरील निर्बंध कमी करण्याकडे कल आहे. एका पद्धतीने शेतीवरील अनुदानांवर निर्बंध आणले जात आहेत. आज जागतिक व्यापार संघटना भारतात शेतीला अधिक अनुदान दिले जाते म्हणून ओरड करत असते. त्यातून सरकारने उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा गृहीत धरून हमीभाव जाहीर केला तर त्यावर या संघटनेकडून टीकाच होईल. मुळातच सध्या निर्यातीवर बंधने घालण्यासाठी नवे निकष तयार करण्यात येत आहेत.

उदाहरणच द्यायचे झाल्यास बासमती तांदळामध्ये कुठल्या रसायनाचे प्रमाण किती असले पाहिजे याविषयी काही निकष ठरवले जात आहेत. मागील काळात आपण निर्धारित प्रमाणापेक्षा रसायनांचे प्रमाण अधिक असल्यामुळे द्राक्ष आणि डाळिंब परत पाठवल्याचे पाहिले आहे. थोडक्‍यात निर्यातीच्या निकषांमुळे आपण पूर्णतः बांधले गेलेलो आहोत. त्यामुळे आज आपली आयात वाढत आहे; तर निर्यात कमी होत आहे. ‘डाउन टू अर्थ’ या नियतकालिकाने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार गेल्या चार वर्षांच्या काळात शेतमालाच्या आयातीत तब्बल १५० टक्के वाढ करण्यात आली आहे. तर निर्यात घटली आहे. या धोरणबदलामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. आयात खर्चात वाढ होऊन २०१४-१५ मध्ये १३४ कोटी असलेला आयात खर्च २०१६-१७ मध्ये तब्बल ९९०० कोटी झाला आहे. कॅनडा, रशिया व युक्रेनमधून प्रतिक्विंटल २००० रुपयांनी पिवळ्या वाटाण्याची आयात होते. त्याचा वापर हरभराडाळीच्या पिठात मिसळण्यासाठी होतो. तेच मिश्रित चनाडाळ पीठ ५०-६० रुपये प्रतिकिलोने भारतात विकले जाते. भारतात २००३-०४ मध्ये १२ लाख टन पिवळ्या वाटाण्याचे उत्पादन आणि ४.५ लाख टन आयात झाली; मात्र आता उत्पादन पाच लाख टन तर आयात २९ लाख टनावर गेली आहे. यंदा चांगल्या मॉन्सूनमुळे हरभरा पेरा वाढला आहे. त्यामुळे तुरीसारखीच हरभऱ्याची स्थिती होऊ द्यायची नसेल, तर पिवळ्या वाटाण्याच्या आयातीवर बंदी आणणे अथवा आयातकर वाढवणे आवश्‍यक आहे. नुकताच वाटाण्यावर ५० टक्के आयातकर लावण्यात आला आहे. परंतु जागतिक बाजारात वाटाण्याचे भाव २००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत घसललेले आहेत. ५० टक्के आयातकर लावल्यानंतर आयातकर लावलेल्या वाटाण्याचा भाव ३००० रुपये प्रतिक्विंटल होईल. त्यामुळे हरभऱ्यालासुद्धा हमीभाव मिळणार नाहीत, हे सत्य नाकारता येणार नाही.

याबाबत धोरण एकच आहे, ते म्हणजे ज्या वस्तू स्वस्त आहेत, त्याकडे आपण जातो आहोत. आज जागतिक बाजारात पामतेल स्वस्त झाले आहे. या तेलाचा भाव १४०० डॉलर्स होता, तेव्हा आपण आयातकर शून्य केला होता; पण आता जेव्हा त्याचे भाव ६००-७०० डॉलरपर्यंत घसरले असताना त्यावर नुकतेच लावण्यात आलेले आयातशुल्क अत्यंत कमी आहे. पूर्वी ते ८५ ते ९० टक्‍क्‍यांपर्यंत होते, आता ते २५ टक्‍क्‍यांपर्यंत आहेत. कारण तेल महाग झाल्यावर जनतेतून आक्रोश होईल ही भीती शासनाला आहे. तूर, हरभराडाळींचेही तेच आहे. आज जागतिक बाजारात या धान्यांचे भाव घसरले आहेत. पण त्यावरील आयातकर कमी आहे. 

जागतिक व्यापार संघटनेचा आपण भाग झाल्यानंतर गेल्या २५ वर्षांमध्ये सरकारने साखर सोडून शेतकऱ्यांच्या हितासाठी आयात-निर्यातीच्या धोरणात कधी (अपवाद अलीकडचे एक-दोन निर्णय) हस्तक्षेप केला नाही. याचा फटका शेतकऱ्यांना वेळोवेळी बसला आहे. शेतकऱ्यांच्या या अवस्थेला सर्वच पक्ष जबाबदार आहेत. शेतमाल आयातीमागे बऱ्याचदा देशांतर्गत महागाईचे कारणही असते. महागाईचा थेट परिणाम जनतेवर होतो आणि त्यातून जनता प्रक्षुब्ध होऊन जनमत सरकारविरोधी बनते. त्यामुळे जनतेचा रोष पत्करावा लागू नये, यासाठीही सरकारे आयातीला चालना देताना दिसतात. मात्र त्याऐवजी बळिराजाला त्याच्या कष्टाचे मोल म्हणून योग्य हमीभाव दिला, तर आयातीचे संकटच ओढावणार नाही. त्यामुळे आयात-निर्यात धोरणात जरूर बदल करावा; पण तो करत असतानाच मोदी शासनाने २०१४ ला सत्तेत येताना दिलेले हमीभावाचे आश्‍वासनही प्रत्यक्षात आणावे.                         

विजय जावंधिया ः ९४२१७२७९९८
(लेखक शेती प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

इतर अॅग्रो विशेष
दक्षिण अशियात मॉन्सूनचा पाऊस सरासरी...पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...
राज्यात उरले अवघे ३०५ टीएमसी पाणीपुणे (प्रतिनिधी) : उन्हाच्या झळांना होरपळ वाढून...
केंद्राकडून यंदा खरिपात १२ टक्के अधिक...पुणे : राज्यासाठी गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत...
उन्हाचा चटका पुन्हा वाढण्याची शक्यतापुणे : मागील आठवड्यात झालेला पूर्वमोसमी वादळी...
सूर्य तळपताना छत करा दुरुस्तआठवड्यापूर्वी आलेल्या चांगल्या पावसाच्या अंदाजाने...
आयोगाचा कारभार प्रश्‍नचिन्हांकितप्रत्येक निवडणुकीची रीत न्यारी असते,...
पाणी व्यवस्थापनातून वाढविली कापसाची...आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता....
पाणी व्यवस्थापनातून नळावणे गावाची...अनेक वर्षांच्या पाणीटंचाईतून मुक्त होण्यासाठी...
डेरे यांनी उभारली अत्याधुनिक सिंचन...सातारा जिल्ह्यातील कवठे येथील अतुल डेरे यांनी...
‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’कडे आयटी...‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ हेच येत्या काळातील...
पाणी व्यवस्थापनातून ग्रामविकासपाण्यासाठी कायम संघर्ष करीत असलेल्या कान्होळ (जि...
अवघी कारभारवाडी झाली ठिबकमयकोल्हापूर जिल्ह्यातील कारभारवाडी (ता. करवीर) येथे...
सर्वाधिक ६५० शेततळ्यांचं अजनाळेसोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका दरवर्षीच...
अल्पभूधारकांच्या आयुष्यात जलश्रीमंती बुलडाणा जिल्ह्यात जानेफळ परिसरात शासनाच्या...
सत्तावीस गटांच्या बळातून घडली किमयासंगमनेर (जि. नगर) तालुक्यातील सावरगाव तळ...