मराठवाड्याच्या तहानेवर इस्रायली उपाय!

‘तहान’ हा मराठवाड्याचा यक्षप्रश्‍न असून, तो हाताबाहेर गेला आहे. इलाज होत नसलेला रोगी मरायला सोडून द्यावा, तशी तहान आपण वाऱ्यावर सोडून दिली आहे. म्हणजे त्यात वेगळे काही करता येईल असा विचार करणेही बंद केले आहे.
संपादकीय
संपादकीय

७००-८०० मि.मी पाऊस पडणाऱ्या मराठवाड्यात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष हा इथल्या लोकांचा असमंजसपणा आहे. लोकांची बेफिकिरी, सामाजिक जाणिवांचा अभाव, दारिद्य्रात समाधान मानण्याची वृत्ती, विकासाची दृष्टी नसलेले लोकनेते, अशा अनेक सामाजिक दुर्गुणांमुळे आम्ही पाणी असते, तेव्हा सोडून देतो आणि तुटवडा झाल्यावर वणवण फिरतो. फाटक्‍या झोळीत भीक मागणारा उपाशी मरतो; पण सुई-दोऱ्याने झोळीला दोन टाके मारत नाही. दोन टाके मारण्यापुरता ज्याचा आळस सुटत नाही, त्याला वैभव कधीच भेटत नाही. ‘तहान’ हा मराठवाड्याचा यक्षप्रश्‍न असून, तो हाताबाहेर गेला आहे. इलाज होत नसलेला रोगी मरायला सोडून द्यावा, तशी तहान आपण वाऱ्यावर सोडून दिली आहे. म्हणजे त्यात वेगळे काही करता येईल, असा विचार करणेही बंद केले आहे. तूट झाली की रानोमाळ फिरायचे, पाण्यासाठी वाट्टेल तेवढा पैसा खर्च करायचा, या गोष्टी पुरत्या अंगवळणी पडल्या आहेत. डोक्‍यावर, बैलगाडीत, टॅंकरने पाणी आणण्यात कमीपणा वाटेनासा झाला आहे. 

‘मेकोरोट’ कंपनी इस्राईलला पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणी पुरवते. एका उजाड, वाळवंटी देशाला सुजलाम करण्याचा चमत्कार कंपनीने केला आहे. भारताच्या सरासरीच्या ३० टक्के पाऊस असलेल्या इस्राईलमध्ये घरगुती वापर, शेती, कारखानदारी, मनोरंजन व पोहण्यासाठी पुरेसे पाणी आहे. नळाला पाणी येणे हा प्रकारच तिथे नाही. बारा महिने चोवीस तास नळाला पाणी असते. डोक्‍यावरची घागर किंवा पाण्याचा टॅंकर त्यांना माहीत नाहीत. शहराप्रमाणे प्रत्येक खेड्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे पोहण्याचे तलाव आहेत. मेकोरेट कंपनीने ते नवल केलेय. जे इस्राईलमध्ये घडते ते मराठवाड्यात घडणार म्हणजे मज्जाच मज्जा!

गणती करता येणार नाहीत येवढे आपले प्रश्‍न आहेत. ते नुसते गंभीर नाहीत तर आवाक्‍याबाहेर गेलेले आहेत. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, लोकसंख्या, जाती, धर्म, अंधश्रद्धा, रुढी, प्रथा, अडाणीपणा, बेकारी, बेशिस्त, गुंडगिरी, खोटे शिष्टाचार, भ्रष्टाचार, बेइमानी, स्वार्थ, व्यसने, देशद्रोह वगैरे... अनंत. टांझानिया, युगांडापासून ब्रिटन, अमेरिकेपर्यंत जगातल्या सर्व देशांनी आपले प्रश्‍न वाटून घेऊन ते सोडवायचे करार केले तर आपला देश खरोखर सुखी होईल! सर्व देश एकत्र येऊन आपले कल्याण करतील, अशी वेळ कधीतरी निश्‍चित येईल म्हणून युगायुगापासून आपण विश्‍वबंधुत्वाचा मंत्र जपत आहोत आणि हे करणे आता अवघड राहिलेले नाही. एका राष्ट्राध्याक्षाला मिठी मारली की तो आपले दहावीस प्रश्‍न सहज सोडवतो. घरी आला तरी मिठ्या, दारी गेला तरी मिठ्या, अशा रीतीने संपूर्ण जग मिठीत घ्यायला कितीसा वेळ लागणार? या अजब मिठी तंत्रामुळे देश महाशक्ती बनण्याच्या दिशेने वेगाने झेपावतो आहे.

आम्ही कोण हे सांगितले तर, ऐकणाऱ्याची छाती फाटून जाईल. समुद्रावर तरंगत्या दगडांचा पूल बांधणारे आम्ही! पुष्पक विमान उडवणारे आम्ही! प्रचंड शिळा रचून हेमांडपंथी मंदिरे उभारणारे आम्ही! दगडांच्या मूर्तीत हुबेहूब जीव ओतणारे आम्ही! काड्याच्या पेटीत बसतील येवढे तलम शालू विणणारे आम्ही! देशभर पावला पावलावर तंत्रज्ञान महाविद्यालये, संशोधन संस्था, विद्यापीठातले ऋषितुल्य गाढे अभ्यासक, चंद्र आणि मंगळावरच्या पाण्याचा शोध घेणारे संशोधक, येवढ्या अद्वितीय सामर्थ्यांच्या देशाला स्वतःच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन करता येत नाही, असे म्हणणे आमच्या ज्ञान प्रगल्भतेचा घोर अपमान आहे. आमच्या तांत्रिक कौशल्याची अवहेलना, हे देशाचे विनाशाकडे संक्रमण होत असल्याचे अशुभ लक्षण आहे. घरी सर्व ठिकठाक असताना शेजारणीचे कौतुक वाटणे हा मानवी स्वभाव असू शकतो, पण शेजारणीचा पुळका फार वाढला तर संसार मोडतो.

इस्राईलविषयी मला खूप आदर आहे. त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात जी कामगिरी केलीय ती निश्‍चितच अनुकरणीय आहे. पण अनुकरण करणे सोपे नाही. ते करण्यासाठी आपली पात्रता वाढवावी लागते. हनुमानाचे अनुकरण करायचे असेल तर त्याच्या एवढे सामर्थ आणि शक्ती कमवावी लागेल. मरतुकड्या दारुड्याने ‘जय हनुमान, जय हनुमान’ म्हणून उड्या मारल्याने तो शक्तिशाली होत नाही. सचोटी, कष्ट, जबाबदारी, प्रामाणिकपणा, नीतिमत्ता, भ्रातृभाव, विज्ञाननिष्ठा, सहकार असे समाज सुदृढ करणारे गुण इस्राईलच्या लोकांनी विकसित केले. सार्वजनिक मालमत्ता स्वतःची समजून ती काळजीपूर्वक वापरावयाचे त्यांना कळते. अशा गुणसंपन्नतेमुळे प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी स्वर्ग उभा केला आहे; पण म्हणून आपले फाटलेले आभाळ ते शिवून दुरुस्त करून देतील हे केवळ असंभव आहे. आपले प्रश्‍न आपण सोडवायचे हे जोपर्यंत आपण ठरवत नाही, तोवर कुठलेही उपाय पालथ्या घड्यावर पाणी ओतण्यासारखे निरर्थक ठरतील. इस्राईलमध्ये कापसाची उत्पादकता जगात एक नंबर आहे. म्हणून त्यावेळच्या शिवसेना सरकारने तिथले तंत्रज्ञानच महाराष्ट्रात आणले. अकोला आणि परभणी येथील कृषी विद्यापीठात प्रत्येकी दोन वर्षे प्रयोग झाले. दोन्ही विद्यापीठांत महाराष्ट्राच्या सरासरीपेक्षा कापसाचे कमी उत्पादन मिळाले. याचा अर्थ आयात केलेले तंत्रज्ञान आपल्या मातीत रुजले नाही.

जायकवाडी प्रकल्प उभारताना जागितक बॅंकेचा भारतातला सल्लागार डॉ. कारमेली इस्राईलच्या आयआयटीतल्या कृषी अभियांत्रिकी विभागातला प्राध्यापक होता. जलतज्ज्ञ म्हणून जगात त्यांची ख्याती होती. त्यांच्या मार्गदर्शनासाठी जायकवाडी उभे राहिले. काय झाले जायकवाडीचे? कितीही प्रख्यात, विश्‍वविख्यात तज्ज्ञ बाहेरून आणले तरी ते त्यांच्या मतलबापुरते काम करतात. कामे निकृष्ट होत असली तरी ते तुम्हाला नीतिमत्तेचे धडे देत बसत नाहीत.  बुद्धीचे काम करण्यासाठी जगातले प्रगत देश भारतीय तंत्रज्ञांसाठी पायघड्या पसरतात आणि आपले राज्यकर्ते परकीयांचा अनुनय करतात, देशाची संपत्ती परकीयांवर उधळतात. पाणी नियोजनात आम्ही काय आहोत, त्याचे एक लहान उदाहरण सांगायला हरकत नाही. मराठवाडा शेतीसाह्य मंडळाने विजय अण्णा बोराडेंच्या मार्गदर्शनाखाली जालना जिल्ह्यात ‘कडवंची’ पाणलोट क्षेत्राचे काम केले आहे. पाणलोट क्षेत्राची व्याप्ती १५०० हेक्‍टर, सरासरी पाऊस ६२५ मिलिमीटर, विहिरींची संख्या ६००. पिण्याच्या पाण्याची गरज भागवून पाणलोटातल्या ४८ टक्के क्षेत्रावर बारमाही सिंचन होते. जगातल्या पाणी तज्ज्ञांनी कडवंचीला येऊन धडा घ्यावा, असे सूज्ञ नियोजन तिथे झाले आहे. मराठवाड्यासाठी शाश्वत पाणीपुरवठ्याच्या उपायांवरील चर्चा पुढे कधीतरी केली जाईल.

बापू अडकिने ः ९८२३२०६५२६  (लेखक कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com