उगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेती

ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात एका संशोधन परिषदेनिमित्ताने जपानला जाणे झाले आणि टोकियोजवळच्या ‘नॅरिटा’ विमानतळावर उतरण्यापूर्वी विमानाच्या बंद पारदर्शक खिडकीमधून मला या प्रगत राष्ट्राची कृषी क्षेत्रामधील उत्तुंग झेप आढळली. विमान खाली उतरत असताना सर्वत्र दिसत होती ती भातशेती, हजारो शेततळी, २०-२५ घरांची छोटी छोटी गावे आणि त्यामध्ये विखुरलेली हजारो हरितगृहे.
संपादकीय
संपादकीय
ह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे विमानतळ पाहताना ते राष्ट्र कसे असेल याचा आपणास निश्चितच अंदाज बांधता येतो. युरोपमधील हॉलंडची राजधानी ‘अॅमस्टरडॅम’च्या विमानतळावर विमान उतरत असताना मला हजारो हरितगृहे दिसली. हॉलंड हा फुलांचाच देश आहे. या राजधानीच्या ठिकाणावरून सर्व जगाला फुलांची निर्यात होते. ‘हाँगकाँग’ च्या विमानतळावर उतरताना मला सर्वत्र उंच इमारतीच दिसत होत्या. कुठेही शेती अशी दिसलीच नाही, म्हणून शेतकरी नसलेला देश असा या देशावर ठपका मारून मी मोकळा झालो. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात एका संशोधन परिषदेनिमित्ताने जपानला जाणे झाले आणि टोकियोजवळच्या ‘नॅरिटा’ विमानतळावर उतरण्यापूर्वी विमानाच्या बंद पारदर्शक खिडकीमधून मला या प्रगत राष्ट्राची कृषी क्षेत्रामधील उत्तुंग झेप आढळली. विमान खाली उतरत असताना सर्वत्र दिसत होती ती भातशेती, हजारो शेततळी, २०-२५ घरांची छोटी छोटी गावे आणि त्यामध्ये विखुरलेली हजारो हरितगृहे. परिसरात कुठेही उंच इमारत अशी नव्हती. झोपडपट्टीचा तर अंशसुद्धा नव्हता. सुखद मनाने विमानतळावर उतरलो आणि दुसरा आश्चर्याचा धक्का बसला तो म्हणजे विमानतळाच्या आत असलेला स्थानिक भाजीपाला आणि फळांचा एक मोठा स्टॉल पाहून. दुकानात विविध प्रकारच्या ताज्या भाज्या, कंदमुळे, गाजर, मुळा, रताळी, शेंगा आणि फळे पाहून मन प्रसन्न झाले. भाव पाहून मात्र धक्काच बसला. चारशे ग्रॅम भेंडीची किंमत तब्बल दोनशे रुपये होती. भाषेची अडचण असूनही दुकानदार बाईनी मला हे सर्व नजीकच्याच एका हरितगृहामधील सेंद्रिय उत्पादने असल्याचे सांगितले. हरितगृहामधील भुईमुगाची शेंग आपल्याकडील शेंगेपेक्षा चार पट मोठी होती. त्या दिवशी २०० रुपयांच्या ओजंळभर शेंगा घेऊन मी दुपारच्या हजार रुपयांच्या महागड्या जेवणाला सुटी दिली. जपानमधील माझ्या दोन आठवड्याच्या वास्तव्यात मला तेथील शेतकरी कारखानदारापेक्षाही खूप श्रीमंत आढळला. घराजवळ असलेल्या एक दोन गुंठ्यांच्या हरितगृहात ते सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांचे, फळभाज्यांचे प्रचंड उत्पादन घेऊन लाखो रुपये सहज कमवितात. ५०० भेंडीची झाडे असलेल्या एका लहानशा हरितगृहास मी भेट दिली. एका झाडापासून अंदाजे १० किलो भेंडी, एक किलोची किंमत १५०० येन म्हणजे अंदाजे १२०० रुपये म्हणजेच भेंडीचे एक झाड शेतकऱ्याला १२ हजार रुपये उत्पन्न देते. त्या हरितगृहापासून त्या शेतकऱ्याला मिळणाऱ्या एका हंगामामध्ये भेंडीची किंमत काढण्यास मी धजावलो नाही. एवढे प्रचंड उत्पन्न मिळवून तो शेतकरी त्याला मिळालेल्या उत्पन्नावर ४० टक्के नियमित टॅक्स भरत होता, तोही एका मोठ्या उदयोजकाप्रमाणेच. जपानचा शेतकरी जरी कमी जमिनीचा मालक असला तरी श्रीमंत आहे तो यामुळेच! जपान हा आपल्या आशिया खंडामधील हजारो बेटांपासून तयार झालेला देश आहे. या देशाला उगवत्या सूर्याचा देशही म्हटले जाते. प्रत्येक बेटावरची भौगोलिक परिस्थिती वेगळी म्हणून निसर्गाला बरोबर घेऊन येथील शेतकरी शाश्वत शेती करतात. जपानमध्ये जंगल संपत्ती ७३ टक्के आहे. त्यामुळे जेमतेम १२ टक्के जमीनच शेतीसाठी उपयुक्त आहे. या देशामध्ये वृक्षांना फार मोठा सन्मान असल्यामुळे झाडे कापून विकास अथवा शेती करण्यावर कायद्याचे बंधन आहे. एवढे प्रचंड जंगल असल्यामुळेच या देशाचे हवामान थंड आहे. तापमान मर्यादित असते. पाऊस व्यवस्थित असून, जमिनीमध्ये बाराही महिने ओलावा असतो. जपान हा ज्वालामुखी, भूकंप, सुनामी यांस प्रतिवर्षी ताठ मानेने उत्तर देतो. अनेक वेळा शेतीची मोठी हानी होते. मात्र, शासनाच्या संपूर्ण सहकार्यामुळे शेतकरी पुन्हा उभा राहतो. येथील ६० टक्के जमीन भात लागवडीसाठी वापरली जाते व उरलेली फळे, भाजीपाला यासाठी प्रतिवर्षी राखून ठेवली जाते. जपानच्या साडेबारा कोटी लोकसंख्येपैकी जेमतेम ५ टक्के लोक शेतमजूर म्हणून काम करतात. शहरी स्थलांतरामुळे शेतमजूर ही येथील गंभीर समस्या आहे. म्हणूनच जपानी शेतकरी अतिशय कष्टाळू आणि आपल्या कुटुंबास बरोबर घेऊन घराजवळ अथवा थोड्या दरू अंतरावर अत्याधुनिक पद्धतीने स्वत:च शाश्वत शेती करतो. त्यामुळे मजुरीचा प्रश्न त्यास फारसा भेडसावत नाही. रस्त्याचे जाळे शेतापासून ते ग्राहकापर्यंत मजबूत असल्यामुळे या देशात नाशवंत माल कुठे आढळत नाही आणि विकलाही जात नाही. स्वत:ची जमीन, कमीत कमी भांडवल, आणि जास्तीत जास्त उत्पादन या तीन उद्दिष्टावर तेथील शेती चालते. वाहतुकीची साधने, ट्रॅक्टर आणि नांगरटीचे यांत्रिक अवजार ही त्यांची अत्याधुनिक शेती अवजारे, भाताचा अपवाद वगळता, रासायनिक खतांचा वापर तसा कमीच. जपानी लोक त्यांचा आहार अन्नाचे उष्मांक मोजूनच घेतात. यामध्ये वाफाळलेल्या वनस्पतिजन्य पदार्थांचा त्यांच्या आहारात मोठा वापर आहे. म्हणूनच फळे, भाजीपाल्यांना शक्यतो रासायनिक खतांपासून दूर ठेवले जाते. भातपिकाचा अपवाद वगळता एकच एका पिकाच्या मागे येथील शेतकरी कधीही नसतो. मासे हा येथील मुख्य आहार. शेततळ्यात दोन-तीन वर्षे मत्स उत्पादन घेतल्यावर तोच शेतकरी तेथे कमळ अथवा शिंगाड्याची शेती करतो. यांचे दोन-तीन उत्पादन घेतल्यावर भरपूर सेंद्रिय चिखल तयार झालेल्या त्या जमिनीत तो भातपीक अथवा रताळ्याचे उत्पादन घेतो. जपानमध्ये एक इंचसुद्धा जमीन आपणास मोकळी दिसत नाही. तिचा उपयोग शेतीसाठी अथवा हरित पट्टा निर्मितीसाठी हा होतोच. प्रत्येक गावातील आणि शहराच्या उपनगरातील जपानच्या शेतकऱ्यांची शेती ही पाहण्यासारखी असते. या प्रगतिशील राष्ट्रात सर्वांत जास्त सन्मान हा वैद्यकिय पेशा, प्राथमिक शिक्षक आणि शेतकऱ्यांना आहे. येथील भाजीपाला, फळभाज्या, कंदभाज्या यांचे भाव दररोज बदलतात. अनेक शेतकरी उदयोगधंद्याशी, हॉटेल, रेस्टॉरंट, प्रक्रिया उद्योगांशी स्वतंत्रपणे बांधलेले आहेत. मोठमोठ्या शहरात शेतकरी माल घेऊन येतात, मध्यस्त ते खरेदी करून इच्छित स्थळी पोचवितात. या प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांना सन्मान दिला जातो. दुसऱ्या महायुद्धात जवळपास बेचिराख झालेले हे राष्ट्र जपानी लोकांच्या राष्ट्रप्रेमातून पुन्हा उभे राहिले. राष्ट्रास सन्मानाने उभे करण्यासाठी समाजामधील प्रत्येक घटकाने आपला वाटा उचलला. शेतकरी हा त्यातीलच एक महत्त्वाचा घटक होता आणि आजही आहे. मातीच्या प्रत्येक सुपीक कणाची किंमत येथील शेतकऱ्यास दुसऱ्या महायुद्धानंतर समजली. म्हणूनच या देशात इंच इंच जागेवर हिरवे शिवार फुलले, त्यास रेल्वेच्या दोन पटरीमधील जागासुद्धा अपवाद ठरली नाही. राष्ट्र घडते ते असे. डॉ. नागेश टेकाळे : ९८६९६१२५३१ (लेखक शेतीप्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com