संपादकीय
संपादकीय

जपानमधील शहरी शेती

जपानच्या शहरी शेतीमध्ये मोठ्या शहरामधील उंच इमारतीबरोबरच उपनगरात आणि गाव परिसरामध्येही शेती आढळते. घरापुढील अंगण आणि पाठीमागे परसदारी शेती असणे हे येथील घरमालकासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
जपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित राष्ट्र असले, तरी त्याची ९७ टक्के लोकसंख्या ही चार मुख्य बेटावरच विसावलेली आहे. टोकिओसारखी महानगरे असलेल्या या देशात मुद्दाम विकसित केलेली शेकडो हरित शहरे, उपनगरे आणि गावे आढळतात. या सर्वांना नितळ सुंदर रस्त्यांनी एकमेकांशी जोडलेले आहे. त्यात ५०० कि. मी. प्रतितास वेगाने धावणाऱ्या ट्युब रेल्वेचे विणलेले सुंदर जाळे पाहिल्यावर शेतीसारखा सन्माननिय व्यवसाय करणारे येथील श्रीमंत शेतकरी खूष का नाही होणार? आपल्याकडे पूर्वी शेती ही गावाला जोडूनच असे आणि तिला बारमाही वाहत्या नद्यांचा आधार होता. गावे वाढू लागली तशा नद्या आटल्या. मूळ मातीची घरे गावातच राहिली आणि नव्या बंगल्यांनी गावाभोवती फेर धरला. जपानमध्येसुद्धा असेच काहीसे असेल या विचारानेच या देशाला मी काही दिवसांपूर्वी भेट दिली आणि माझा भ्रमनिरास झाला. जपानमध्ये डोंगर उतार तसेच सपाट भागावर असलेल्या शेतीबरोबरच अनेक शहरांना जोडून असलेल्या उपनगरात, गावामधील दोन घरांच्या मधील मोकळ्या जागेतसुद्धा तेथील लोक शेती करतात. आपल्या घराच्या पुढील अंगणात आणि पाठीमागच्या परसदारी शेती असणे हे येथील घरमालकासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आपल्याकडे नवीन घर बांधल्यावर पाहुण्यांना घरातील सर्व एैसपैस खोल्या, टाईल्स, मजले, झोपाळे, अद्ययावत स्वयंपाकघर पाय दुखेपर्यंत दाखवितात; पण जपानमधील शहरी भागामधील शेतकरी तुम्हास सर्व प्रथम त्यांची अंगणामधील आणि घरामागची शेती दाखवितो. उपनगरात, गावागावात फिरताना तुम्हाला अनेक हरितगृहे, स्वत:च्या मालकीचे भाजीपाल्यांचे छोटे मळे, सोबत स्वच्छता आणि सेंद्रिय मातीचा सुगंध अनुभवण्यास मिळतो. उपनगरामधील दोन गृहसंकुलामधील रस्त्याचा अपवाद वगळता एक इंचही जागा तुम्हाला मोकळी दिसणार नाही. जपानमध्ये सुपीक मातीच्या प्रत्येक कणाला शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून अतिशय किंमत आहे म्हणूनच या देशात आपणास कुठेही थोडीसुद्धा जमीन पडीक आढळणार नाही. जपानच्या शहरी शेतीमध्ये टोकिओ, क्वेटो, ओकलामासारख्या मोठ्या शहरामधील उंच इमारतीबरोबरच उपनगरात आणि गावांच्या परिसरामध्येही शेती आढळते. यामध्ये प्रामुख्याने भाजीपाला रोपनिर्मिती, रताळी, मुळा, गाजर, कांदा, कमळकंद, टोमॅटो, मिरच्या, दुधी भोपळा, हिरव्या भाज्या, कोबीचे प्रकार सगळीकडे आढळतात. हरितगृहातील भाजीपाला लागवड अद्ययावत असते. शहरी शेतीमध्ये मला संत्री, तुती आणि किवी फळांची झाडेही मुबलक दिसली. हजारो फळे अंगाखांद्यावर कुरवाळत ‘किवी’ची वेल दोन बंगल्याच्यामध्ये रस्त्याच्या कडेला मांडवाच्या आधाराने शांत सुरक्षित उभी असल्याचे पाहून आर्श्चयाचा धक्काच बसला. भाजीच्या पानाला अथवा फळांना मालकाशिवाय कोणीही हात लावत नाही. लाखो रुपयांचा शेतमाल येथे उघड्यावरच असतो. जपानमध्ये उपनगरामधील मोकळ्या जमिनीवरील शहरी शेती हा तेथील घरमालकांसाठी शाश्वत उत्पन्नांचा एक भाग असून तो संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने केला जातो. ज्यांना भाजीपाला पाहिजे ते त्यांचे वाहन घेऊन येतात. शेतकऱ्यांकडे पालेभाजी अथवा फळभाजी तयार असल्यास स्थानिक वृत्तपत्रात एक छोटी जाहिरात येते अथवा घराबाहेर लहानसा बोर्ड लावला जातो. अनेकवेळा मध्यस्थसुद्धा हे काम करतात. सेंद्रिय चवदार भाजीपाला आणि तोही हाकेच्या अंतरावर उपलब्ध म्हणून जपानमधील शहरी शेतीस एक वेगळेच महत्त्व आहे. तेथील लोक हे सर्व अर्थाजनाबरोबर सुदृढ पर्यावरणाची सेवा करण्यासाठी करतात. शासन तेथील घरमालकांना अशा नावीन्यपूर्ण हरित प्रयोगासाठी सतत प्रेरणा देत असते. या मागचा उद्देश एकच तो म्हणजे स्थानिक निवासी लोकांना रासायनिक खते, कीडनाशके अंशमुक्त ताजा भाजीपाला व फळे मिळावीत, शहरांना हरित मानांकन मिळावे, शहरामधील लोकांना शेतीची ओळख होऊन शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल समजावे, रिकाम्या जागांचे योग्य नियोजन करून अर्थाजन व्हावे, सोबत कृषी शिक्षणाचा प्रसारही व्हावा आणि यासाठीच शाळेमधील मुले या अशा शहरी शेतीला भेट देऊन तेथे त्यांचा अभ्यास करतात. जपान सरकारच्या एका अहवालानुसार एकूण कृषी उत्पादनामध्ये एक तृतिअंश भाग हा शहरी शेतीचा आहे. अहवाल पुढे म्हणतो, की, या देशाच्या डोंगराळ उतारावरील शेतीपेक्षा शहरी शेती तुलनेने १० टक्के जास्त नफा देते. जपानमधील अनेक शहरामधील थंड तापमान, हरित वायुंचे घटलेले प्रमाण, निरोगी स्वच्छ हवा, जैवविविधता, पक्षांची श्रीमंती, पराग सिंचन करणारे कीटक, फुलपाखरे, मधमाशा या सर्वांचे शाश्वत संवर्धन करणे हे त्यांना या शहरी शेतीमुळेच साध्य झाले आहे. शहरी शेतीमुळे लोकांचा भाजीपाला, फळे खरेदी करण्याचा केवढा तरी प्रवास वाचू शकतो आणि सोबत इंधनाची बचत होते ती वेगळीच. शहर, गाव हे अर्थप्राप्तीमध्ये शाश्वत आणि स्वावलंबी व्हावे त्याचबरोबर ते संपूर्णपणे हरित दिसावे, त्याचा ‘इकॉलॉजिक फ्रुट प्रिंट’ वाढावा हा जपानचा शहरी शेतीकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन मला फारच आवडला. स्वावलंबी गावाची कल्पना खरे तर राष्ट्रपिता महात्मा गांधीची, मात्र खऱ्या अर्थाने ती उचलली जपानने आणि तिचा वापर करून आज हा देश प्रगतिपथावर पोचला आहे. आम्ही मात्र आहे तिथेच आहोत. इतर राष्ट्रांमधील शहरी शेती ही घरमालक आणि त्याच्या कुटुंबापुरतीच मर्यादित असते. जपानमध्ये मात्र त्यास व्यापारीकरण जोडलेले आढळते. इतर देशात स्वत:चे घर हे केंद्रबिंदू समजून शहरी शेती केली जाते. जपानमध्ये मात्र शहराला केंद्रस्थानी ठेऊन शासनाकडून घरमालकांना शहरी शेतीसाठी प्रोत्साहित केले जाते. जपानमधील या शहरी शेतीला कोणत्याही संरक्षणाची गरज भासत नाही. शहरी शेतीमधील पिकांची वाढ एवढी सुदृढ असते की कीडींचाही प्रभाव कमी आढळतो आणि आढळलाच तर तेथील पक्षी कीटकनाशकाचे काम करतात. शहरामधील हरित वायुंचे प्रमाण कमी करणे, पडणारा पाऊस आणि प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचे नियोजन करून परिसर हरित करणे, या उद्देशापोटी जपानमध्ये शहरी शेतीचे प्रमाण सतत वाढत आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यामुळे नागरिकांच्या आहारात स्थानिक कंदमुळे, फळे, भाज्या यांचा नियमित अंतर्भाव होतो, तसेच यातून होणारी अर्थप्राप्ती ही जमेची बाजू आहे. यांच कारणांमुळे जपान हा देश जगामधील अनेक राष्ट्रांना अनुकरणीय वाटतो. डॉ. नागेश टेकाळे ः ९८६९६१२५३१ (लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com