गोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी!

ज्वारीच्या कणसांपासून धान्य; धाटातील गोड रसापासून काकवी किंवा इथेनॉल; चिपाड आणि पाला हे जनावरांसाठी उत्तम खाद्य म्हणून वापरता येते. थोडक्यात काय तर जमिनीच्या एकाच तुकड्यातून अन्न, इंधन आणि चारा यांची निर्मिती हे बहुगुणी पीक करते.
संपादकीय
संपादकीय
सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे. याची दोन कारणे सांगता येतील. एक म्हणजे खनिज तेलाच्या सातत्याने वाढणाऱ्या किमती आणि दुसरे म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी नसल्याने देशात अतिरिक्त झालेली साखर. यामुळेच सरकार इथेनॉल निर्मितीसाठी साखर उद्योगाकडे वळताना दिसत आहे. मात्र त्यासोबतच उसाव्यतिरिक्त असलेल्या साखरेच्या इतर स्राेतापासून इथेनॉल बनवण्यासाठीही सरकार प्रोत्साहन देत आहे. त्यातीलच एक महत्त्वाचा स्रोत म्हणजे स्वीट सोरगम किंवा गोड धाटाची ज्वारी. गोड धाटाची ज्वारी हे एक बहुपयोगी पीक आहे. ज्वारीच्या कणसांपासून धान्य मिळते; धाटातील गोड रसापासून काकवी किंवा इथेनॉल बनवता येऊ शकते आणि चिपाड आणि पाला हे जनावरांसाठी उत्तम खाद्य म्हणून वापरता येते. थोडक्यात काय तर जमिनीच्या एकाच तुकड्यातून अन्न, इंधन आणि चारा यांची निर्मिती हे बहुगुणी पीक करते. गोड धाटाची ज्वारी हे कोरडवाहू पीक असून उसापेक्षा ४० टक्के कमी पाण्यात शर्करेची निर्मिती करते. शिवाय ते तीन ते चारमाही असल्याने वर्षातून दोन वेळा तरी घेणे शक्य असते. निंबकर कृषी संशोधन संस्थेने (नारी) १९७० च्या दशकाच्या सुरवातीस गोड धाटाची ज्वारी प्रथम भारतात आणली. १९८७ मध्ये या ज्वारीच्या धाटापासून इथेनॉलनिर्मिती करण्यासाठी सौरशक्तीवर चालणारा जगातील पहिला पायलट प्लांट उभारला. १९९० मध्ये गोड धाटाच्या ज्वारीपासून काकवी बनवणारी नारी ही देशातील पहिली संस्था ठरली. इथेनॉल संबंधित संशोधन आणि विकासामागे नारीचा मुख्य उद्देश होता, ग्रामीण भागात स्वयंपाक आणि प्रकाशासाठी वापरण्यात येणाऱ्या रॉकेलला पर्याय मिळवून देणे. १९८० मध्ये इथेनॉल हे वाहनांसाठी इंधन म्हणून वापरायला कुणी तयार नव्हते आणि याचा परिणाम इथेनॉलचा घरगुती वापरासाठीचे इंधन म्हणून प्रसार होण्यावरही झाला. अर्थात वाहनांसाठी इथेनॉलचा वापर करणे म्हणजे या उच्च गुणवत्तेच्या इंधनाचा अपव्ययच म्हणावा लागेल. कारण, स्वयंचलित वाहनांची कार्यक्षमता अत्यल्प म्हणजे केवळ २ टक्के आहे. याचा अर्थ एखाद्या व्यक्तीला एका विशिष्ट अंतरावर एका विशिष्ट वेगाने नेण्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेला पेट्रोलच्या ऊर्जा निविष्ठेने (इनपुट) भागल्यास उत्तर केवळ २ टक्के येते आणि तरीही आपण त्यासाठी इथेनॉलसारखे उच्च दर्जाचे रसायन वापरण्याच्या मागे आहोत. जगभरातील देश इथेनॉलचा इंधन म्हणून वापर करण्यापासून दूर जात आहेत याचे महत्त्वाचे कारण म्हणजे जैवभाराचा (बायोमास) उपयोग इंधनाच्या निर्मितीसाठी केला तर अन्न निर्मितीला स्पर्धा उत्पन्न होणार. शिवाय इथेनॉल हे इंधन व्यवहार्य व शाश्वत दोन्ही नाही. गोड धाटाच्या ज्वारीचा अधिक चांगला उपयोग म्हणजे काकवी उत्पादन. १९९० च्या दशकाच्या सुरवातीस नारीने भारतामध्ये प्रथमच गोड धाटाच्या ज्वारीपासून काकवीचे उत्पादन केले आणि सध्या या काकवीचे उत्पादन व विक्री करणारी ही भारतातील एकमेव संस्था आहे. गोड धाटाच्या ज्वारीपासून बनवलेल्या काकवीमध्ये अँटिऑक्सिडंट्सची मात्रा अधिक असल्याने न्यूट्रासूटिकल उद्योगात तिचा वापर केला जातो. यामुळे या काकवीला चांगली किंमत मिळते आणि शेतकऱ्यांना चांगला मोबदला. कधीही खनिज तेलाचे भाव चढले की गोड ज्वारीपासून इथेनॉल हा कसा या संकटावर मात करण्यासाठी पर्याय असू शकतो अशा आशयाच्या लेखांचा महापूर येतो. पण गेल्या ४० ते ५० वर्षांपासून या पर्यायावर जगभर पुन्हा पुन्हा केले गेलेले प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत, हा विचार कुणी करत नाही. अगदी भारतातही गोड ज्वारीपासून इथेनॉल तयार करणे व्यवहार्य नसल्याचे तेलंगणातील रुसनी डिस्टिलरीसारख्या उदाहरणांतून पुढे आले आहे. उत्तम प्रतीच्या चाऱ्याची कमतरता आपल्याकडे नेहमीच दिसून येते. त्यामुळे शेतकऱ्यांना चारा विक्रीतून चांगला मोबदला मिळतो. गोड ज्वारीपासून इथेनॉल तयार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतातील बऱ्याच डिस्टिलरीजच्या अयशस्वी होण्याचे मुख्य कारण म्हणजे त्या शेतकऱ्यांना त्या तोडीचा मोबदला देऊ शकल्या नाहीत. दुसरे एक कारण म्हणजे चांगल्या प्रतीचे बियाणे उपलब्ध होण्यामधील अडचण. भारतात आतापर्यंत विकसित झालेल्या गोड धाटाच्या ज्वारीच्या बारा एक जातींपैकी कुठल्याच जातीच्या बियाण्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन एखाद्या कंपनीने केलेले नाही. गोड धाटाच्या ज्वारीची उसासोबत तुलना करताना आपली माध्यमे उसाच्या १२ ते १८ महिन्यांच्या पीक कालावधीच्या तुलनेत ज्वारीच्या ३ ते ४ महिन्यांच्या पीक कालावधीचे फायदे दर्शवतात. गोड धाटाची ज्वारी वर्षातून तीन वेळा घेता येते असे यातून प्रतीत होते हे जरी सैद्धांतिकदृष्ट्या खरे असले तरी प्रत्यक्षात वर्षातून दोनच वेळा हे पीक घेणे शक्य होते. त्याचप्रमाणे काही अहवालांमध्ये गोड धाटाच्या ज्वारीपासून एका हंगामात मिळणारा जैवभार हेक्टरी ७०-८० मेट्रिक टन असल्याचे सांगितले आहे, ते वास्तववादी नाही. काही हंगामांमध्ये काही विशिष्ट जातींसाठी ही आकडेवारी खरी असू शकते मात्र सामान्यतः हे प्रमाण सरासरी ३० ते ४० मेट्रिक टन प्रतिहेक्टरपेक्षा अधिक नसते. तसेच इथेनॉलचे उत्पादन एका हंगामात हेक्टरी ४००० ते ५००० लिटर इतके अधिक असल्याचा दावाही खरा नाही. नारीच्या गेल्या २५ वर्षांच्या आकडेवारीनुसार वर्षभरात दोन वेळा घेतलेल्या गोड धाटाच्या ज्वारीपासून ३००० ते ४००० लिटर एवढे इथेनॉल मिळू शकते. दुसरे म्हणजे गोड धाटाची ज्वारी ही पावसाची हमी असलेल्या कोरडवाहू क्षेत्रात घेता येत असली तरीही सिंचित क्षेत्राच्या तुलनेत उत्पादन कमीच मिळते. अनेकदा असे म्हटले जाते की, गोड धाटाच्या ज्वारीपासून जास्त धान्य मिळत नाही. परंतु नारी संस्थेने उत्पादित केलेली ‘मधुरा’ ही गोड धाटाच्या ज्वारीची संकरित जात उत्तम धान्य तर देतेच शिवाय तिच्या धाटातून मिळणाऱ्या शर्करेचे प्रमाणही खूप आहे. वास्तविक पाहता आर्थिक विश्लेषणातून दिसून येते की, चांगल्या धान्य उत्पादनाशिवाय गोड धाटाच्या ज्वारीची लागवड आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाही. ऊर्जा आणि अन्न उत्पादन यांची स्पर्धा न होता दोन्ही गोष्टी एकत्रितपणे एकाच क्षेत्रातून मिळवायच्या असतील तर गोड धाटाची ज्वारी हा एकमेव मार्ग आहे. म्हणूनच गोड धाटाच्या ज्वारीचा सर्वोत्तम उपयोग म्हणजे जनावरांसाठी चारा म्हणून किंवा काकवीच्या उत्पादनासाठी. दोन्हींपासून माणसाच्या खाद्यपदार्थाचे उत्पादन होते. तिच्यापासून इथेनॉल बनवून मग ते अतिशय अकार्यक्षम अशा स्वयंचलित वाहनांमध्ये जाळणे म्हणजे एका मौल्यवान रसायनाचा अपव्ययच म्हणावा लागेल. इथेनॉल जर तयार करायचे असेलच तर त्याचा वापर रसायन उद्योगांमध्ये कच्चा माल म्हणून केला जाणेच सर्वाधिक व्यवहार्य ठरेल. अनिल राजवंशी, नंदिनी निंबकर ( ९२२२४०२३२६ अनिल राजवंशी) (लेखक निंबकर कृषी संशोधन संस्थेत कार्यरत आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com