कांदळवन : शाश्‍वत उत्पन्नाचे साधन
डॉ. नागेश टेकाळे 
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

काही वर्षांपूर्वी माझ्या रत्नागिरीच्या भेटीमध्ये मी एका शेतकऱ्यास त्यांच्या बांधावरील कांदळवनाचा वापर करून मत्स्यशेती आणि खेकडापालन करण्यास सुचविले होते. त्याने तो यशस्वी प्रयोग केलासुद्धा. भातापेक्षाही कांदळवन आज मला जास्त उत्पन्न देत आहे, हे त्याचे दूरध्वनीवरील शब्द आजही मला आठवतात. 

काही वर्षांपूर्वी रत्नागिरीस भेट देण्याचा योग आला. उद्देश होता, मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरीस असलेल्या उपकेंद्रास भेट देऊन तेथील पर्यावरण विभाग पाहणे, त्याचबरोबर समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या कांदळवन म्हणजे खारफुटीच्या जंगलाचा अभ्यास करणे. माझ्या प्रत्येक अभ्यासदौऱ्यात या भागामधील शेती आणि तेथील शेतकरी हा नेहमीच केंद्रबिंदू राहिला आहे. त्या वेळी तसेच झाले.

समुद्रकिनाऱ्यापासून चार-पाच कि.मी. आत असलेली भातशेती पाहिली. कोकणामधील शेतकऱ्यांच्या तशा फार समस्या नसतात, कारण पाऊस मुबलक आणि रब्बीपेक्षा खरिपामधील भात उत्पन्न भरपूर मिळाले, की तेथील शेतकरी खूष. पुन्हा सोबत आंबा, नारळ, सुपारी, काजू, आमसूल आहेच. त्या शेतकऱ्यांची आज शेती पाहताना, सोबतच असलेल्या चार-पाच खारफुटीच्या वृक्षांनी माझे लक्ष वेधून घेतले.

‘‘आजोबांपासून ती झाडे आम्ही सांभाळलेली आहेत,’’ असे उत्तर ऐकून बरे वाटले. कोकणामधील अनेक नद्या पावसाळ्यात दुथडी भरून वहात अरबी समुद्रास मिळतात. याच नदी आणि समुद्र पट्ट्यांमध्ये आपणास कांदळवन आढळते. खाऱ्या गोड समिश्र पाण्यात म्हणजेच खाडीमध्ये वाढणारे खारफुटीचे जंगल आज कोकणामधील हजारो शेतकऱ्यांच्या शेतीचे रक्षण करत आहे. समुद्रास थोपवून ठेवणे, वारा वादळापासून पिकांचे रक्षण करणे, हे केवढे तरी मोलाचे काम हे खारफुटीचे जंगल सातत्याने करत असते. 

कांदळवनामधील प्रत्येक वृक्ष ही स्वतंत्रपणे शेतीचा एक भाग होऊ शकतो, याची अजूनही तेथील शेतकऱ्यांना कल्पना नाही. या वृक्षाच्या मुळाजवळ त्याची एक वेगळी जैविक परिसंस्था असते. या संरक्षित भागामध्येच माशांचे प्रजोत्पादन सातत्याने चालू असते. माशांची लाखो बाळे कांदळवनामधील वृक्षांच्या मुळाजवळ लहानाची मोठी होऊन नंतर खाडी आणि समुद्रात स्वतंत्र जीवन जगण्यास मोकळी होतात.

कांदळवनामधील प्रत्येक वृक्ष हा शेतीसाठी मत्स्यबीज उत्पादक केंद्र मानून त्याला लगतच मत्स्यपालन हा जोडधंदा सुरू करण्यास काय हरकत आहे? कांदळवनात तयात झालेले मत्स्यबीज जवळच मुद्दाम साठवलेल्या पाण्यात सहज येऊ शकते. त्यांच्या वाढीसाठी पूरक आहाराची योजना झाली, की मासे विक्रीमधून केवढेतरी शाश्‍वत उत्पन्न मिळू शकते. कांदळवनाचा परिसर हा खेकड्यासाठी, शिंपल्यासाठीसुद्धा सुरक्षित आहे. आहारामधील हे दोन मुख्य घटक कांदळवनास संरक्षण देऊन आपण सहज प्राप्त करू शकतो. प्रत्येक शेतकऱ्याने त्यांच्या समुद्रालगतच्या शेतामधील कांदळवनास अभय देणे, ही काळाची गरज आहे.

आज विकासाच्या नावाखाली आम्ही खारफुटीच्या जंगलाची होळी करत आहोत. मुंबई, ठाणे, वसई, पालघर आणि उर्वरित कोकण भागात पूर्वी खाडी परिसरात केवढे तरी कांदळवन होते. आज त्यातील जवळपास ५० टक्के नष्ट झाले आहे. या वृक्षांना क्रुरपणे तोडले जाते. मुंबई, ठाणे परिसरामधील कचरा, बांधकामाचे साहित्य त्यांच्यावर भरावाच्या रूपाने टाकले जाते. समुद्रामधील मासेमारी कमी होत आहे. यास मुख्य कारण म्हणजे नष्ट होत जाणारे खारफुटीचे जंगल.

मुंबईसह कोकण किनारपट्टीवरील सुमारे ३० हजार हेक्‍टर क्षेत्रावरील कांदळवनाचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक खास योजना तयार केली असून, त्यामध्ये या वनावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांना आणि शेतकऱ्यांना उपजिविकेसाठी पर्यायी रोजगार-स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी कांदळवन आणि उपजीविका निर्माण योजनेस काही दिवसांपूर्वीच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या अंतर्गत ज्या गावांच्या परिसरात, शेतीक्षेत्रात कांदळवने आहेत, तेथे सामूहिक स्वरूपात सर्व गावास फायदा मिळण्यासाठी व्यवस्थापन समिती स्थापण्यात येईल व त्या भागामधील वनरक्षकांच्या माध्यमातून ही समिती तेथील कांदळवनाचा एक आराखडा तयार करून त्यामध्ये या वनाचे संरक्षण, संवर्धन, सीमांकन, कुंपण उभारणे, रोपवाटिका, नैसर्गिक पुनर्निर्मिती यावर भर देऊन तेथील शेतकऱ्यांना भातशेतीबरोबर खेकडापालन, कालवेपालन, शिंपलेपालन, मत्स्यशेती यासाठी आर्थिक साह्य प्रोत्साहन देईल.

या योजनेमधून कोकणामधील शेतकऱ्यांना फार मोठे आर्थिक बळ प्राप्त होणार आहे. २०१७-१८ या वर्षात या योजनेसाठी १५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, त्यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर आणि ठाणे या क्षेत्रामधील ५० गावे निवडण्यात आली आहेत. या गावांमधील हजारो शेतकरी कांदळवनावर आधारित शाश्‍वत शेतीची फार मोठी यशोगाथा लिहू शकतात. काही वर्षांपूर्वी माझ्या रत्नागिरीच्या भेटीमध्ये मी एका शेतकऱ्यास त्यांच्या बांधावरील कांदळवनाचा वापर करून मत्स्यशेती आणि खेकडापालन करण्यास सुचविले होते. त्याने तो यशस्वी प्रयोग केलासुद्धा. भातापेक्षाही कांदळवन आज मला जास्त उत्पन्न देत आहे, हे त्याचे दूरध्वनीवरील शब्द आजही मला आठवतात. 

वातावरण बदल, वाढते वैश्‍विक उष्णतामान आणि समुद्राचे रौद्र लाटांच्या रूपात सतत रागावणे यावर शांततेचा उपाय म्हणजे कांदळवननिर्मिती, संवर्धन आणि संरक्षण. समुद्रात भरपूर मासे हवी असतील तर कांदळवनाचे संरक्षण करावयास हवेच. मासे, खेकडे आणि शिंपले यांचे जन्मस्थान म्हणजे कांदळवनामधील प्रत्येक वृक्षाच्या मुळाभोवतालची जैविक परिसंस्था. ती सुदृढ आणि प्रदूषणमुक्त हवी तरच कोकणच्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने अन्नसुरक्षेचे श्रेय प्राप्त होईल; पण त्यापेक्षाही मला पर्यावरणाचा माझा शिलेदार कांदळवन आता माझ्या बळिराजाच्या हातात सुरक्षित आहे, याचा जास्त आनंद होईल.

डॉ. नागेश टेकाळे : ९८६९६१२५३१
(लेखक शेतीप्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

इतर संपादकीय
ज्ञानाचा प्रकाशदिवाळी... प्रकाशाचा, उत्साहाचा सण! सारी दुखं...
बीटी कापूस : गरज आत्मपरीक्षणाचीआपल्या राज्यात २००२ पासून बीटी कापसाच्या वाणांना...
‘जीवनसंगिनी’ची प्रकाशवाटनैसर्गिक आपत्तींचा कहर आणि अनिश्चित बाजार अशा...
नेताओं की दिवाली, किसानों का दिवालादोन दिवसांपूर्वी मला अमरावती जिल्ह्यातील शेतकरी...
मुहूर्तालाच खोडाकर्जमाफी शेतकऱ्यांच्या पदरात टाकण्यासाठीचा...
आधुनिक बळी जागा झालायदीपावली हा सण भारत वर्षात वेगवेगळ्या रूपात साजरा...
कीटकनाशकांचा वापर हवा नियंत्रितचदोनवर्षांपूर्वी पंजाबमधील ‘तरनतारन’ जिल्ह्यामध्ये...
भुकेचे भय संपणार कधी?देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आपण अन्नधान्यात...
सामूहिक प्रयत्न हीच संस्कृतीनक्षलप्रवण गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामस्थांनी...
व्यावसायिकांच्या मूलभूत स्वातंत्र्यावरच...वर्ष २०१० च्या शासनाच्या आदेशाविरुद्ध स्टे ऑर्डर...
जिरायती भागात यंदा चांगला मॉन्सूनयावर्षीच्या मॉन्सूनचे वैशिष्ट्य म्हणजे जिरायती...
गाभ्रीचा पाऊसयावर्षी पावसाबाबत आलेल्या हवामान विभागाच्या...
बिगर नोंदणीकृत उत्पादनांवर अन्यायआपल्या देशात कृषी निविष्ठा उत्पादन, साठवण व...
माझे गुरू : प्रा. रिचर्ड थॅलरवर्तनवादी वित्त विषयातील योगदानाबद्दल प्रा....
न्यायाच्या प्रतीक्षेत समन्यायी पाणीवाटपमागील एका दशकापासून अनिश्चित आणि असमान   ...
आता सत्याग्रह हाच पर्याय!महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांतील शेतकरी...
फिटो अंधाराचे जाळेऑक्टोबर हीटने राज्य पोळून निघत असताना शहरी आणि...
शेतीपूरक व्यवसायातून साधेल आर्थिक...सध्या महाराष्ट्रातील शेतकरी सर्व बाजूने संकटात...
वर्ल्ड फूड इंडिया ः प्रक्रिया...तंत्रज्ञान व विपणनाबाबत उद्योन्मुख मार्केट...
बफर स्टॉक विक्री ठरेल आगीत तेल‘बफर स्टॉक’मधील (राखीव साठा) सात लाख टन...