agriculture stories in marathi agrowon special article on kerale flood part 2 | Agrowon

विनाशकारी विकास नकोच
डॉ, नागेश टेकाळे
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

ऑगस्टमध्ये केरळात अतिवृष्टी झाली. परंतु, असाच पाऊस या राज्यात मागील १०० वर्षांपासून पडत असताना या वर्षीचा पाऊस दरडी घेऊन खाली नद्यांमध्ये का आला, याची चौकशी होणे गरजेचे आहे आणि यापासून आपण काहीच धडा घेतला नाही तर विनाश अटळ आहे.   

इस्त्रोचे माजी अध्यक्ष डॉ. माधवन नायर सुद्धा केरळच्या महापुरासाठी वातावरण बदलाबरोबरच पडलेला पाऊस आणि विकासाच्या नावाखाली पश्चिम घाटावर सतत चालू असलेला ओरखड्यांना जबाबदार धरतात. केरळमध्ये सर्वात जास्त हानी ही दरडी कोसळून झाली आहे. कोसळलेल्या दरडीमुळे अनेक लहान मोठ्या नद्यांचे प्रवाह अकस्मात बदलले आणि ‘पाणीच पाणी चोहीकडे’ अशी स्थिती झाली. नदीमधील वाळूचे थर स्पंजाप्रमाणे पाणी शोषून घेतात पण अनधिकृत वाळू उपश्यामुळे नद्यांची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता संपली आणि त्या जोरात वाहू लागल्या. डॉ. माधवन म्हणतात, डोंगर उतारावरील वृक्ष दरडी कोसळण्यापासून रोखू शकतात पण असे वृक्ष तोडल्यामुळेच ही आपत्ती आली. नद्यांकाठी वाढत असलेल्या मानवी वस्तींमुळे सुद्धा हानीमध्ये भर पडली. केरळमधील पश्चिम घाटातील संवेदनशील क्षेत्रे फक्त नकाशावर नकोत तर ती प्रत्यक्षपणे संरक्षित करणे गरजेचे आहे याबद्दलसुद्धा ते आग्रही आहेत.
८ ऑगस्टपासून पडणाऱ्या संततधार पावसाने आज या राज्याच्या राजधानीचे शहर वगळता संपूर्ण वाताहात झाली आहे. राज्यामधील सर्व ८० धरणांचे दरवाजे उघडले आहेत. ‘इडुकी’ हे आशियामधील सर्वात मोठे धरण गेल्या ८० वर्षात प्रथमच भरले आणि त्याचे ही दरवाजे उघडले गेले. २०१३ मध्ये सुद्धा केरळमध्ये अतिवृष्टी झाली होती; पण त्या वेळी ही सर्व धरणे अशी भरली गेली नव्हती. ४० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडूनही सर्व व्यवस्थित होते. तसाच पाऊस या वर्षी पडला पण एवढी अपरिमित हानी का झाली यावर मंथन होणे गरजेचे आहे. केरळच्या या आपत्तीमध्ये तेथील शेतकरी संपूर्ण उद्‌ध्वस्त झाला आहे. झालेल्या ३० हजार कोटी रुपयांच्या हानीमध्ये शेतीचा हिस्सा सध्या ११०० कोटींचा आहे आणि हानीचा हा आकडा वाढतच जाणार आहे. रबर, अननस, भात, वेलची, मिरी, नारळ, सुपारी, कॉफी, कोको, केळी या ४६ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तेथील शेतकऱ्यांना सावरणे हे मोठे आव्हान आहे. 

केरळमध्ये गेल्या दोन दशकामध्ये पर्यटन खूपच वाढले आहे. या देवभूमीकडे लाखो देशी विदेशी पर्यटकांचा ओढा असतो. प्रतिवर्षी ३० हजार कोटी रुपयांचे उत्पन्न राज्य सरकारला मिळवून देणाऱ्या या व्यवसायाने पश्चिम घाटामधील घनदाट जंगलात चांगलेच बस्तान बसवले आहे. रस्ते बांधणीत हजारो वृक्षांचा बळी गेला. फक्त मॉन्सूनचे तीन महिने सोडता उर्वरित नऊ महिने या राज्यात पर्यटक येत असतात आणि यामध्ये प्रतिवर्षी १० टक्के सातत्याने वाढ होत आहे. या सर्वांच्या सुखसोयीची निर्मिती पश्चिम घाटातच होत असते. रिसॉर्टचे बांधकाम होताना किती वृक्ष धारातीर्थ पडले माहीत नाही; पण एक जरी वृक्ष खाली पडला तरी त्यास निगडित असलेली सर्व जैवविविधता सैरभैर होते. 

केरळच्या पश्चिम घाट म्हणजे औषधी वनस्पतींचे आगारच. यामध्ये कंदमुळे जास्त महत्त्वाची. आज या भागात मोठ्या प्रमाणात ही नैसर्गिक कंदमुळे उपटून औषध निर्मितीसाठी वापरली जातात. यामुळे हजारो टन सुपीक माती पावसात वाहून जाते. पश्चिम घाटाच्या वनसंपदेचा हा ऱ्हासच आहे. येथे बंधन येणे आवश्यक आहे. पश्चिम घाटात आज ६० टक्के भागात मानवी वर्दळ आहे आणि ४० टक्के भाग नैसर्गिकदृष्ट्या सुरक्षित आहे. हा सुरक्षित भाग वाढवण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. डॉ. कस्तुरीरंगन अहवालानुसार पश्चिम घाटामधील ५९ हजार ९४० चौ.कि.मी. भाग संवेदनशील म्हणून जाहीर झाला होता पण २०१७ साली केंद्र सरकारने तो ५६ हजार २८५ चौ.कि.मी. केला. केरळ राज्यामधील पश्चिम घाटात डॉ. कस्तुरीरंगन यांनी १३ हजार १०८ कि.मी. भाग सुरक्षित केला होता तो तेथील शासनाने ९९९३ कि. मी. पर्यंत खाली आणला. या दोन आकड्यांची वजाबाकी आपणास सध्याच्या परिस्थितीचे वैज्ञानिक उत्तर देऊ शकते. 

केरळमध्ये सर्वात जास्त हानी रस्ते, पूल, शेती, फळबागा, विद्युतपुरवठा, मनुष्य आणि पशुधनाची झाली आहे. मदतीचा ओघ सुरू झाला आहे. केरळ हे नैसर्गिक आपत्तीमधून अल्पावधित सावरणारे जगामधील एक आदर्श उदाहरण ठरेल असे तेथील मुख्यमंत्री म्हणतात. मात्र, यामध्ये या आपत्तीच्या अनेक कारणांपैकी मूळ कारण असलेल्या पश्चिम घाटाच्या संवर्धनाचा कुठेही उल्लेख नाही. वनखात्याच्या जमिनीवरचे आक्रमण आणि दगड खाणी वर नियंत्रण या गोष्टी अत्यावश्यक आहेत. डॉ. गाडगीळ यांचा निसर्ग आणि माणूस यांना एकत्र जोडण्याच्या प्रयत्नाचे आपल्याकडे अजून तरी चीज झाले नाही. अमेरिकेमधील पर्यावरण क्षेत्रामधील प्रतिष्ठित असा ‘टायलर’ पुरस्कार डॉ. गाडगीळ यांना देताना ती समिती म्हणते, ‘‘कुठल्याही भूभागाचा विकास करण्यापूर्वी आपण तेथील पर्यावरण, जैवविविधता आणि त्याच्याशी निगडित मनुष्य वस्ती यांचा विचार करणे आवश्यक आहे. विकास करत असताना या घटकांचे सुदृढ अवस्थेत एकमेकांवर अवलंबून असणे हेच निसर्गाचे लोभस रूप आहे. विकासाच्या नावाखाली त्यांना उद्‌ध्वस्त करू नका, अशी कळकळीची विनंती त्यांनी त्यांच्या पश्चिम घाटावरील अहवालात केली आहे. म्हणूनच डॉ. गाडगीळ यांना हा पर्यावरण क्षेत्रामधील उच्च पुरस्कार देताना आज आम्हास आनंद होत आहे.’’ 

पश्चिम घाटावरील त्यांचा अहवाल संवेदनक्षेत्रापुरता जरी स्विकारला असता तर आज केरळवर ही आपत्ती निश्चितच आली नसती. पश्चिम घाटाचे अंतिम टोक केरळ कन्याकुमारी नंतर श्रीलंकेत स्थिरावते. या चिमुकल्या देशास आज याच घाटाने केवढी श्रीमंती दिली आहे हे आपणास तेथे गेल्यावरच दिसते. पश्चिम घाटाच्या ओढीमुळेच मॉन्सून सर्वप्रथम तेथे जातो आणि नंतर केरळला येतो. यावर्षी नेहमीप्रमाणे एक जूनला मॉन्सून आला मात्र न थांबण्यासाठीच. अडीच महिने सतत कोसळत आहे आता त्याने विश्रांती घेतली आहे. मदतकार्य जोरात सुरू आहे. आलेल्या आपत्तीवर चर्चा होईल, नवीन अहवालसुद्धा येतील. त्यातील कारणे वेगळेसुद्धा असू शकतील. परंतु, केरळात आत्ता पडतो तसेच पाऊस मागील १०० वर्षांपासून पडत असून तो पश्चिम घाटामध्येच मुरत होता आणि नद्या स्फटिकाप्रमाणे वाहत होत्या. तोच पाऊस या वर्षी दरडींना खाली नद्यांमध्ये घेऊन का आला, याची चौकशी होणे गरजेचे आहे. स्वर्गभूमी उत्तराखंडापासून आम्ही काहीही धडा घेतला नाही. निदान देवभूमी केरळपासून तरी धडा घेऊ या...

डॉ, नागेश टेकाळे ः ९८६९६१२५३१
(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

इतर संपादकीय
उगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेतीह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे...
...तरच वाढेल डाळिंब निर्यातफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची...
उच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...
आर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...
ऊसदराबाबत हवे दीर्घकालीन धोरणऊसदराचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही...
मेळघाटातील शेती आणि समाजमेळघाटात अादिवासी शेतकरी बांधव अजूनही निसर्गाला...
थेट पणन उत्तम पर्याय दसरा, दिवाळी आणि लग्न-...
बँकिंग क्षेत्रावरील 'बुडीत' भार! बुडीत कर्जे ही सध्या बँकिग व्यवस्थेतील मोठी...
इडा पिडा टळो दिवाळीची धामधुम सर्वत्र चालू आहे. बळीच्या...
शेतीतील अंधार करुया दूर... माझ्या आईवडिलांना शेतीची खूपच आवड होती....
"आशा'कडून न होवो निराशा! "आशा' हे केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा...
बीजोत्पादनातून साधा आर्थिक उन्नती विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा...
साखरेचा वाढला गोडवाशेतीमध्ये रासायनिक खते आणि कीडनाशकांच्या वाढत्या...
धरणात गाळ आणि गाळात शेतकरीजगणं मुश्किल झालेल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात अजून...
झळा व्यापार युद्धाच्याअमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध जुंपल्यापासून...
धनत्रयोदशी : जीवनतत्त्वाच्या पूजनाचा...धनत्रयोदशी म्हणजे धनाची पूजा. अर्थात धन म्हणजे...
सर्वसंमतीनेच हवे पाणीवाटपनाशिक व नगर जिल्ह्यांतील गोदावरी नदीवरील धरणातून...
प्रबोधनातून वाढेल प्रतिसादकमी विमा हप्ता अधिक आणि हमखास नुकसानभरपाई, असा...
सरकार बदलले अन् परिस्थिती बिघडलीऑगस्ट २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकांच्या आधी...
ज्वारीचे श्रीमंती मूल्यमागील दोन दशकांत पीक पद्धतीत झालेला मोठा बदल,...