agriculture stories in marathi agrowon special article on monsoon and sowing | Agrowon

मॉन्सूनचे आगमन आणि पेरणीचे नियोजन
डॉ. रंजन केळकर
बुधवार, 13 जून 2018

येणाऱ्या काही दिवसांत एकंदरीत मॉन्सून काहीसा दुर्बल राहण्याची शक्यता हवामान खात्याने आता वर्तवली आहे. या परिस्थितीत पेरण्या करायच्या की नाही, हा निर्णय शेतकऱ्यांनी विचारपूर्वक आणि सर्व गोष्टींच्या आढाव्याअंतीच घेणे अगत्याचे आहे.

यंदाच्या मॉन्सूनच्या संदर्भात भारतीय हवामानशास्त्र विभागाने आम जनतेसाठी आणि विशेषतः शेतकऱ्यांसाठी आनंददायी असे दोन अंदाज वर्तवले. पहिला हा की, २०१८ सालच्या नैर्ऋत्य मॉन्सूनचा एकंदर पाऊस समाधानकारक म्हणजे सरासरीच्या ९७ टक्के राहील. दुसरा हा की, नैर्ऋत्य मॉन्सूनचे केरळवरील आगमन एक जून या सामान्य तारखेपेक्षा काहीसे लवकर होईल. यापैकी दुसरा अंदाज खरा ठरलेला आपण नुकताच पाहिला आहे; पण पहिला अंदाजही असाच खरा ठरेल, अशी यावेळी आपण फक्त आशा बाळगू शकतो.

मॉन्सूनचे आगमन
मॉन्सून एकदा केरळवर दाखल झाला की, आपल्या सर्वांना हायसे वाटते. कारण हे की, अरबी समुद्रावरून वाहत येणारे वारे मॉन्सूनसाठी अतिशय महत्त्वाचे असले, तरी मॉन्सून अरबी समुद्रावरून थेट महाराष्ट्रात शिरकाव करू शकत नाही. केरळ हे नैर्ऋत्य मॉन्सूनचे प्रवेशद्वार आहे. सर्वांत आधी तो केरळवर येणे गरजेचे असते. त्यानंतर तो कर्नाटकात, मग गोव्यात आणि मग कोकणपट्टीत दाखल होतो. शेवटी महाराष्ट्राच्या उर्वरित भागात मॉन्सूनचे आगमन होते. हा क्रम कधी बदलत नाही; पण त्याच्या तारखा मात्र बदलत असतात, त्या दर वर्षी निराळ्या असतात. मॉन्सून कधी येईल, याचे जे कुतूहल प्रत्येक वर्षी नव्याने जागे होते ते यामुळेच.
सामान्यपणे नैर्ऋत्य मॉन्सून एक जूनला केरळवर पोचतो. ही सरासरी तारीख आहे; पण प्रत्यक्षात ती मागेपुढे होऊ शकते. मॉन्सून उशिरा आल्याने शेतीवर, पाणीपुरवठ्यावर आणि एकूण अर्थव्यवस्थेवर ताण पडतो. मॉन्सून वेळेवर किंवा वेळेपूर्वी आला तर शेतकरी पेरण्या लवकर करू शकतात. रिकामी झालेली धरणे लवकर भरतात आणि एकंदर आशादायक परिस्थिती निर्माण होते. महाराष्ट्रात मॉन्सूनचा पाऊस सुरू व्हायला सरासरी १० जूनची तारीख येते. येथे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, केरळवर मॉन्सून काही दिवस लवकर पोचला, तर महाराष्ट्रावर तो तितकेच दिवस लवकर पोचेल, असा त्यातून अर्थ लावता येत नाही. मॉन्सूनचे आगमन ही एका तारखेशी जोडलेली अशी घटना समजू नये, कारण प्रत्यक्षात ती एक दीर्घ प्रक्रिया असते आणि आपण फक्त तिचा परिणाम बघत असतो.

मॉन्सूनचा देशातील प्रवास
मॉन्सूनला संपूर्ण देश व्यापायला महाराष्ट्रानंतर आणखी एक महिना लागतो. राजधानी दिल्लीत तो जूनच्या अखेरीस पोचतो आणि राजस्थानच्या वाळवंटी भागात पोचायला १५ जुलैची तारीख उजाडते. अशा प्रकारे केरळपासून राजस्थानपर्यंतच्या मॉन्सूनचा प्रवास संपन्न व्हायला दीड महिना लागतो. या दीड महिन्याच्या काळात वातावरणात आणि भारताच्या निकटच्या दोन समुद्रांवर अनेक घटना घडत राहतात ज्यांचा मॉन्सूनच्या पावसावर दैनंदिन प्रभाव पडत राहतो. अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन्हींवर मॉन्सूनच्या दोन शाखा आगेकूच करीत असतात आणि त्या दोन्ही जणू एकमेकींशी स्पर्धा करीत असतात. जेव्हा अरबी समुद्रावरील मॉन्सूनची शाखा प्रबळ असते तेव्हा कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस चांगला पडतो; पण जेव्हा बंगालच्या उपसागरावरील मॉन्सूनची शाखा सक्रिय होते तेव्हा पूर्वोत्तर भारत आणि पश्चिम बंगालवर जोरदार पाऊस बरसतो. विदर्भाची भौगोलिक परिस्थिती अशी आहे की, त्याला मॉन्सूनच्या दोन्ही शाखांपासून पाऊस मिळतो; पण त्याउलट मराठवाड्याची परिस्थिती अशी आहे की, तो अनेकदा या दोन्ही शाखांपासून दुरावलेला राहतो आणि तेथे पाऊस कमीच पडतो. 

पेरणीसाठी लागतो दमदार पाऊस
शेतकऱ्यांचा अनुभव आणि ज्ञान अगदी पणास लागते ते पेरणीच्या वेळी. कधी कधी मॉन्सूनपूर्व पाऊस चांगला पडतो, जमीन ओली असते आणि मॉन्सून वेळेवर येईल, ही आशा बाळगून पेरण्या उरकून टाकायचा मोह होतो. कधी कधी मे महिना अगदी पूर्णपणे कोरडा जातो. मग मॉन्सूनच्या पहिल्या पहिल्या सरींची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नसते. हवामानशास्त्रज्ञ जेव्हा मॉन्सून आल्याचे जाहीर करतात तेव्हा ते काही विशिष्ट निकष लावतात. उदाहरणार्थ, वातावरणाच्या खालच्या स्तरातील वारे पश्चिमेकडून वाहत येणारे असावेत; पण वरच्या स्तरातील वारे पूर्व दिशेकडून वाहणारे असावेत. त्याशिवाय पाऊस कुठे कुठे पडला, पावसाचे प्रमाण किती होते, ढगांचे स्वरूप काय होते, ते कोणत्या प्रकारचे होते, अशा कित्येक गोष्टी हवामानशास्त्रज्ञ लक्षात घेत असतात. त्यासाठी ते उपग्रह आणि रडारसारख्या अत्याधुनिक उपकरणांचा वापर करतात. असे विभिन्न घटक जेव्हा अनुकूल ठरतात, तेव्हाच हवामानशास्त्र विभाग मॉन्सूनचे आगमन झाल्याचे जाहीर करतो. हवामानशास्त्रीय दृष्टिकोनातून मॉन्सूनचे आगमन जाहीर झाले की, लगेच पेरण्या हाती घेता येतील असे मात्र नाही. शेतकऱ्यांना पेरणीसाठी दमदार पाऊस लागतो; पण त्यानंतर थोडीशी उघडीपही असावी लागते. जर पेरणीनंतर अतिवृष्टी होतच राहिली, तर नाजूक रोपे वाहून जातात आणि पेरणीनंतर वातावरण खूप दिवस कोरडे राहिले तर रोपे सुकून जातात. अशा दोन्ही टोकाच्या परिस्थितीत दुबार पेरण्या करायची गरज उद्भवू शकते. 

उघडिपीचा अंदाज
१२ जून २०१८ रोजी महाराष्ट्रावरची परिस्थिती ही होती की, कोकणात व मुंबईत दमदार पाऊस झालेला असला तरी अजून महाराष्ट्राच्या अनेक भागात नैर्ऋत्य मॉन्सून दाखल झालेला नव्हता. येणाऱ्या काही दिवसांत एकंदरीत मॉन्सून काहीसा दुर्बल राहण्याची शक्यता हवामान खात्याने आता वर्तवली आहे. जवळजवळ २० जूनपर्यंत कोकण वगळता महाराष्ट्रावर पावसाचा जोर कमी राहील (आठवडाभर उघडीप) असे हवामान विभागाच्या संकेत स्थळावरील नकाशे स्पष्ट दर्शवत आहेत. मॉन्सूनची आगेकूच मंदावण्याचीही चिन्हे दिसत आहेत. सध्याच्या या परिस्थितीत पेरण्या करायच्या की नाही, हा निर्णय शेतकऱ्यांनी विचारपूर्वक आणि सर्व गोष्टींच्या आढाव्याअंतीच घेणे अगत्याचे आहे. शेतकऱ्यांनी स्थानिक कृषी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. हवामानशास्त्र विभाग आणि राज्य कृषी विभाग तसेच कृषी विद्यापीठांतील शास्त्रज्ज्ञ ह्यांच्या संयुक्त विद्यमाने आठवड्यात दोनदा जो कृषि हवामान सल्ला दिला जातो तो शेतकऱ्यांनी जरूर पाहावा. तो imdagrimet.gov.in ह्या संकेत स्थळावर उपलब्ध असतो आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाइल फोनवर एसएमएस द्वारेही मिळू 
शकतो. 
डॉ. रंजन केळकर  ः ९८५०१८३४७५
(लेखक भारतीय हवामानशास्त्र विभागाचे माजी संचालक आहेत.)

इतर अॅग्रो विशेष
मक्यावरील लष्करी अळीचे एकात्मिक नियंत्रणमहाराष्ट्रात फॉल आर्मी वर्म (स्पोडोप्टेरा...
राज्य अर्थसंकल्प : सर्वसमावेशक ‘निवडणूक...मुंबई : राज्यात मोसमी पाऊस लांबला असला तरी आगामी...
‘सबसरफेस ड्रीप’ तंत्राने  ऊस, टोमॅटोची...शेततळ्यातले जेमतेम पाणी आणि उपलब्ध पाण्याचा योग्य...
कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजपुणे   : राज्यातील मॉन्सूनचे आगमन...
जुनीच वाट की नवी दिशाप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ...
कोरड्या महाराष्ट्रावर घोषणांचा पाऊसराज्यात सत्तेत आल्यानंतर शेतीतील गुंतवणूक वाढविली...
लोकसहभागातून नागरी पर्जन्यजल संधारण शक्यप्रत्येक जलस्रोताचे पुनर्भरण करून त्याचं बळकटीकरण...
बोंडअळी निर्मूलन प्रकल्पात आठ राज्यांचा...नागपूर : देशात सर्वात आधी गुजरात त्यानंतर...
लांबलेला पाऊस आणि नियोजनशून्य कारभारजूनचा पहिला पंधरवाडा उलटून गेला तरी राज्यात...
पर्यावरणकेंद्री विकास ही जगाची गरच आजमितीला भारत व जगाला भेडसावणारी अव्वल समस्या आहे...
कृषी विकास दराची मोठी बुडीमुंबई  ः देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर...
कर्नाटकी बेंदराच्या निमित्ताने आज ...कोल्हापूर  : राज्यातील कर्नाटक सीमेलगतच्या...
उत्कृष्ट संत्रा व्यवस्थापनाचा युवा...वयाच्या विसाव्या वर्षीच शेतीत उतरलेल्या ऋषीकेश...
मॉन्सूनचे प्रवाह अजूनही मंदचपुणे  : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाजपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळ निवळल्यानंतर...
एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू...पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक...
‘जीएम’चा तिढामहिनाभरापूर्वी हरियाना राज्यात एका शेतकऱ्याच्या...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारापुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने...
करारावरील अश्‍वगंधा लागवड ठरली डोकेदुखीगडचिरोली ः अश्‍वगंधा लागवड आणि खरेदीचा करार करीत...