Agriculture stories in Marathi, agrowon special article on mukta and yukta | Agrowon

‘मुक्त आणि युक्त’ घेऊया समजून
डॉ. नागेश टेकाळे
सोमवार, 8 जानेवारी 2018

मुक्त आणि युक्त या दोन शब्दांची आज येथे आठवण येण्याचे कारण म्हणजे काही महिन्यांपूर्वी ऐकलेले प्रवचन तर आहेच; त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार हा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची घोषणा केली. याची यशस्वी अंमलबजावणी झाली तर शेती समृद्ध होईल.

काही महिन्यांपूर्वी मी मुंबईमधील उपनगरामध्ये एका दाक्षिणात्य स्वामींच्या प्रवचनासाठी गेलो होतो. संपूर्ण प्रवचन इंग्रजीमध्ये आणि विषय होता, ‘मुक्त आणि युक्त’. अर्थात स्वामींच्या दोन इंग्रजी शब्दांचे हे मराठी भाषांतर. आपल्या ओघवत्या प्रासादिक वाणीमध्ये त्यांनी मानवी मनास युक्त आणि मुक्त या शब्दांशी जोडून अनेक उदाहरणे देऊन प्रवचनाची समाप्ती केली. शाब्दिक फोड करताना ते म्हणाले, ‘‘मानवी मन, अंतःकरण सगुणांनी युक्त म्हणजे भरलेले, परिपूर्ण असेल आणि दुर्गुणांनी मुक्त, निर्मळ असेल तर त्याला मंदिरामध्ये जाऊन भगवंताकडे याचना करण्याची, काहीतरी मागण्याची गरजच पडत नाही. उलट भगवंतच त्याच्याकडे वेगवेगळ्या रूपात येतो.’’ अनेक संतांना प्राप्त झालेले विठुमाउलीचे दर्शन त्यांनी काव्यात्मक भाषेत श्रोत्यांसमोर उभे केले. मानवी मनास पाण्याच्या डोहाची उपमा देताना त्यांनी राग, लोभ, मोह, असुया, अपेक्षा, क्रोध, मद, मत्सर, अनादर या दुर्गंधयुक्त गाळापासून डोहास मुक्त करण्याचे व त्याजागी आदर, प्रेम, भक्ती, सन्मान, निरपेक्षता, सज्जनता, तृप्तता या सद्‌गुणांनी त्यास युक्त करण्याचे आवाहन केले. प्रवचन ऐकून समाधान वाटले. एका प्रवचनाने माणसात बदल होणे केवळ अशक्‍य आहे; पण चार चांगले शब्द कानावर पडले याचे चीज झाले.

मुक्त आणि युक्त हे दोन शब्द आपल्या दैनंदिन जीवनाशी, शेतकरी आणि शेती यांच्याशी जवळून जोडलेले आहेत. रासायनिक खते आणि कीडनाशकांनी आपण जमिनीस युक्त करतो; पण त्या बदल्यात अब्जावधी उपयोगी जिवाणूंना मुक्तही करत असतो. अपेक्षेचे ओझे डोक्‍यावर घेऊन आम्ही काही मोजक्‍या संकरित वाणांची पिके घेऊन शेती युक्त करत असतो; पण त्याचबरोबर आपल्या कुटुंबास अन्नसुरक्षा देणाऱ्या कितीतरी पारंपरिक पिकांना प्रतिवर्षी मुक्ती देत असतो. आजचा शेतकरी या मुक्त आणि युक्तमध्ये अडकलेला आहे. कपाशीने शिवार युक्त झाले; पण बोंड अळीपासून मात्र मुक्त होऊ शकले नाही. शेतीचे गणित चुकत गेले आणि बळिराजा कर्जयुक्त झाला, मात्र अजूनही मुक्त झाला नाही.

राज्यात लवकरच गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार हा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी चंद्रपूरच्या दौऱ्यावर असताना मूल येथे केली. याची यशस्वी अंमलबजावणी झाली, तर पाणीसाठ्यात वाढ होऊन शेती समृद्ध होईल. राज्यात आज लहान, मोठी आणि मध्यम आकाराची अनेक धरणे आहेत. या सर्व धरणांची निर्मिती आणि सिंचनासाठी योग्य वेळी योग्य ठिकाणी आवश्‍यक तेवढे पाणी मिळावे यासाठी झाली असली, तरी आज तो उद्देश पूर्णपणे साध्य झाला आहे, असे वाटत नाही. धरण क्षेत्रापासून सर्व बाजूंनी कमीत कमी शंभर मीटर अंतर ठेवून शेती करावी आणि तीसुद्धा सेंद्रिय पद्धतीची असावी, असे असतानाही धरणाच्या पाण्यास चिकटून शेती केली जाते आणि तीही रासायनिक.

रासायनिक शेतीने माती हलकी होते आणि जोरात आलेल्या पावसाने सहजपणे धरणामध्ये वाहून जाते. राज्यातील हजारो धरणे आज गाळांनी भरलेली आहेत. पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडतो आणि ही धरणे ओसंडून वाहू लागतात, मात्र जानेवारीतच पाण्याची समस्या सुरू होते आणि एप्रिल - मेमध्ये ती शिगेला पोचते. ओसंडून वाहणाऱ्या या धरणांच्या बाबतीत पाणीटंचाईची ही समस्या धरणात भरलेल्या गाळाशी निगडित आहे. आज अनेक धरणांत ३० ते ४० टक्के गाळ आहे.

धरणामधील पाण्याचा शाश्‍वत साठा वाढवावयाचा असेल तर ती गाळमुक्त होणे गरजेचे आहे. गाळमुक्त धरण हे शासनासमोर मोठे आव्हान आहे आणि यामध्ये शेकडो कोटी रुपयांचा खर्च आहे. धरण गाळमुक्त करण्याचे काम एकटे शासन करू शकत नाही. यामध्ये लोकसहभाग महत्त्वाचा आहे. धरणावर अवलंबून असणाऱ्या लाभार्थींनी याकरिता पुढे येणे आवश्‍यक आहे. गाळमुक्त धोरण राबविताना तेथे अनुभवी खंबीर आणि कार्यक्षम प्रशासकीय अधिकारी आवश्‍यक आहेत. 

आपल्या राज्यात काही जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात गाळमुक्त धरणाचे प्रयोग यशस्वीपणे राबविले आहेत. या अनुभवांचा येथे विचार होणे गरजेचे आहे. प्रत्यक्ष कृती करण्यापूर्वी सभोवतीची शेती रसायनमुक्त असावी आणि तिच्यामधील मातीचा कणही धरणात येणार नाही याची हमी हवी. धरणामधील गाळ ही उच्च दर्जाचे सेंद्रिय खतच म्हणावे लागेल. हा गाळ लाभार्थी शेतकऱ्यांनी उचलून त्यांच्या शेतात योग्य पद्धतीने मिसळणे गरजेचे आहे. गाळ पसरताना त्यातील पाण्याचे प्रमाण ४० टक्‍क्‍यांच्या खाली आणले तर तो मातीत एकजीव होऊन जाईल. यालाच गाळयुक्त शिवार असे म्हणतात.

रासायनिक खतामुळे जमिनीची झालेली हानी गाळयुक्त शिवाराने सहजपणे भरून निघते आणि जमीन सुपीक बनते. धरणामधील गाळास अनेक ठिकाणी काळे सोने म्हणतात. धरणालगतचे लाभार्थी सर्वप्रथम आणि त्यानंतर ज्यास हवा त्याने जागेवर येऊन गाळ उचलून घेऊन जा, हे धोरण राबविल्यास धरणे लवकर गाळमुक्त होऊन शिवार गाळयुक्त होऊ शकते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राबवलेली जलयुक्त शिवार योजना आज चांगलीच यशस्वी झाली आहे. अनेक ठिकाणी भूगर्भामधील पाणीसाठा वाढला आहे. ही योजना शासनाची असली तरी जनसहभागामुळेच यशस्वी झाली आहे. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवारासाठीसुद्धा लोकसहभाग अपेक्षित आहे. 

योग्य पद्धतीने जनजागृती, वृत्तपत्रे, रेडिओ, टीव्हीवरून जाहिरात, शास्त्रीय माहितीपट, तज्ज्ञांची व्याख्याने, काही जिल्ह्यांमधील यशोगाथा, त्यांच्या चित्रफिती या माध्यमांतूनच हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकतो. जलयुक्त शिवार योजना गावांना वाटून दिल्या होत्या, येथे मात्र अनेक गावांना एकत्र येऊन काम करावे लागणार आहे. प्रायोगिक तत्त्वांवर काही लहान धरणांची निवड करून लोकसहभाग आणि खर्चाचा अंदाज घेऊनच या यशोगाथा इतर धरणांसाठी रूपांतरीत करावयास हव्यात.

धरण गाळमुक्त झाले तर त्याच्या पाणीसाठ्यात ४० ते ५० टक्के वाढ तर होईलच; परंतु भूगर्भातील पाणीसाठा वाढून परिसरामधील नद्या, विहिरींना शाश्‍वत पाणी येऊ शकते. गाळयुक्त शिवार हीसुद्धा शाश्‍वत सेंद्रिय शेतीची पहिली यशस्वी पायरी ठरावी. जलयुक्त शिवार योजनेप्रमाणेच आज आपल्या राज्यास गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवाराची गरज आहे. कृषी क्षेत्राच्या यशस्वी वाटचालीमध्ये या तीन महत्त्वाच्या टप्प्यांचा सहभाग मोलाचा आहे. एक पायरी आपण यशस्वीपणे चढलो आहोत, पुढील दोन चढणे फार अवघड नाही.
डॉ. नागेश टेकाळे : ९८६९६१२५३१
(लेखक शेतीप्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

इतर अॅग्रो विशेष
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...
राजकीय उपद्रव्य मूल्य घटल्याने...मुंबई: मर्यादित जनाधार आणि राजकीय उपद्रव मूल्य...
सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावांची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ११४५...
विदेश अभ्यास दौऱ्याच्या शेतकरी यादीत...पुणे : विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेल्या...
क्रांती कारखाना हुमणीचे भुंगेरे खरेदी...कुंडल, जि. सांगली : एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
परवानाधारक व्यापाऱ्यांनीच केळीची खरेदी...जळगाव : चोपडा बाजार समिती दरवर्षी १४...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर...पणजी : देशाचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे...
आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? दुष्काळ पडल्याने पाण्यासाठी बोअर घेण्याची अक्षरशा...
कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नती मिळाली, पण...पुणे : राज्यातील कृषी पर्यवेक्षकांना शासनाने मंडळ...
दुष्काळी मराठवाड्यात मार्चमध्येच ‘केसर'...केज, जि. बीड ः फळांचा राजा आंबा बाजारात...
मिरची पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार (प्रतिनिधी) ः खानदेशातील मिरचीचे आगार...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...
परभणी ठरले देशात उष्णपुणे : राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३७ अंशांच्या...