agriculture stories in marathi agrowon special article on pandurang fundkar | Agrowon

कार्यकर्त्यांना पाठबळ देणारा ‘पांडुरंग’
GOPAL HAGE
शनिवार, 2 जून 2018

राज्याचे कृषिमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांचे ३१ मे २०१८ रोजी निधन झाले. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या नेत्याने शेती-मातीची नाळ कधीही तुटू दिली नाही. त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न... 

अाज विदर्भात भाजपचे जे काही प्राबल्य बघायला मिळते ते निर्माण करण्यात पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर यांचा मोठा हातभार अाहे. जेव्हा भाजपच्या विरोधात सर्वकाही होते, अशा परिस्थितीत नेटाने पक्षकार्य व कार्यकर्ते वाढवित वऱ्हाडात फुंडकरांनी नेतृत्व उभे केले. कार्यकर्त्यांना दिलासा देत कायम टिकवून ठेवले. ते स्वतः दोनदा विधानसभा सदस्य, तीनवेळा लोकसभेत अाणि त्यानंतर सातत्याने गेली अनेक वर्षे विधान परिषदेत अामदार, विरोधी पक्षनेता म्हणून काम करीत होते. अाता जवळपास दोन वर्षांपासून ते कृषिमंत्री म्हणून आपला दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होते. 

मुरब्बी राजकारणी
फुंडकर हे जुन्या पिढीतील नेतृत्व करणारे नेते होते. त्यांनी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी यांच्यासोबत जसे काम केले त्याच ताकदीने ते अाताच्या नवीन नेतृत्वाला पाठबळ देत होते. त्यांच्या निधनामुळे भाजपची मोठी हानी झाली. तसेच वऱ्हाडातील एक मोठा नेता गेल्याने अनेकांचे राजकीय नुकसानही झाले. राजकारणात कुठले समीकरण यशस्वी होऊ शकते हे फुंडकर चांगले जाणत होते. यासाठी अनेकदा त्यांनी अाश्चर्यकारक निर्णय घेत धक्केही दिले होते. फुंडकर हे मुळातच शेतकरी कुटुंबात जन्मलेले होते. बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात नारखेड या छोट्याशा गावामध्ये त्यांचा जन्म झाला. गुगल मॅपवर हे गाव शोधले तर कदाचित तुम्हाला दिसणारही नाही. पण आपल्या कर्तृत्वाने या छोट्याशा खेड्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे; तर देशाला करून देणारे पांडुरंग फुंडकर हे याच गावातील होते.

शेतकरी सुखी करण्याचाच ध्यास
फुंडकरांच्या राजकीय जीवनात अनेक चढउतार अाले. त्यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरवात एक सामान्य कार्यकर्ता म्हणून केली. आमदार, खासदार, प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेता ही पदे भूषवल्यानंतर ते राज्याचे कृषिमंत्री बनले होते. भाऊसाहेब हे जन्मजात शेतकरी असल्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या प्रत्येक अडीअडचणी माहीत होत्या. त्या समजून घेण्यासाठी त्यांना कोणती पुस्तके वाचावी लागली ना कुणाचा सल्ला घ्यावा लागत असे. राज्यातील शेतकरी कसा सुखी होईल, हेच ध्येय व हाच ध्यास असल्याचे ते वेळोवेळी सांगत होते. २०१६ मध्ये जुलै महिन्यात कृषिमंत्री पदाचा पदभार स्वीकारला व तेव्हापासून त्यांनी शेतकरी हिताचे निर्णय घेण्यास सुरवात केली. शेतकरी हा राज्याच्या विकासाचा कणा आहे. राज्यातील शेतकरी सुखी आणि समाधानी असेल तर ते राज्य सुखी मानले जाते. शेतकऱ्याला पाणी अाणि मुबलक वीज मिळाली तर तो कुणापुढेही हात पसरत नाही, हे फुंडकर नेहमी भाषणातून मांडत. त्यासाठीच सिंचनासाठी शेततळी बनविण्यापासून ते ठिबक सिंचनापर्यंत तसेच बियाणे, अवजारेपुरवठा, हवामानाच्या माहितीसाठी आधुनिक योजना, विमा योजनेपासून ते कर्जमाफीपर्यंत विविध प्रकारे शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक निर्णय घेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. 
कृषिमंत्री म्हणून राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या दृष्टीने आवश्यक निर्णय घेतले. विदर्भ मराठवाड्यातील चार हजार दुष्काळग्रस्त गावांमध्ये तसेच विदर्भातील पूर्णा नदीच्या खोऱ्यातील खारपाण पट्यातील सुमारे एक हजार गावांमध्ये जागतिक बँकेच्या अर्थ साह्याने हवामान अनुकूल कृषी प्रकल्प राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पास नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्प असे नाव देण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना मुद्दल व व्याजासह दीड लाख या मर्यादेत कर्जमाफी देण्यात अाली. राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये कृषी महोत्सव सुरू करण्यात अाले. कृषी यांत्रिकीकरण योजनेचे अनुदान शेतकऱ्यांना थेट देण्याचा धाडसी निर्णय त्यांच्याच पुढाकाराने झाला. यामुळे वर्षानुवर्षे सुरू असलेला महामंडळातील अनागोंदी कारभार या निर्णयाने ताळ्यावर अाणता आला. शेतकऱ्यांना त्याच्या गरजेनुसार व पसंतीने कुठल्याही कंपनीचे यंत्र घेण्याची मुभा मिळाली. यामुळे चिरीमिरी थांबवण्यात मोठे यश अाले अाहे.

शालेय जीवनातच नेतृत्वाचे गुण
फुंडकर यांच्यातील नेतृत्वगुण हा शालेय जीवनातच विकसित झाला. विद्यार्थी परिषद, युवा मोर्चात त्यांनी सातत्याने काम केले. अाणीबाणीच्या काळात तुरुंगवासही भोगला. नंतर ते भाजपमध्ये सक्रिय झाले. जिल्हा स्तरापासून हा नेता राज्याच्या नकाशावर पोचला. त्यांच्यातील नेतृत्व गुणाला भाजपने हेरत त्यांना सातत्याने मोठमोठी पदे दिली. या पदांना त्यांनीही न्याय दिला. लोकांमध्ये ते ‘भाऊसाहेब’ याच नावाने प्रसिद्ध झाले. त्यांची शेती आणि माती या दोघांशी नाळ घट्ट टिकून होती. उतारवयाची जाणीव होत असताना त्यांनी अापल्या मुलाच्या (ॲड. अाकाश) रुपाने राजकीय नेतृत्व तयार करण्याचे काम सुरू केले होते. २०१४ च्या निवडणुकीत खामगाव मतदारसंघात तेव्हाच्या प्रस्थापित अामदारांना पराजित करून मुलाचा झालेला विजय हा त्यांना सर्वाधिक सुखावणारा होता.   

दांडगा जनसंपर्क
फुंडकरांना राजकीय जीवनात सातत्याने विधानसभा, लोकसभा, विधान परिषदेत काम करण्याची संधी मिळाली. या काळात त्यांना विविध समित्यांवर, पदांवर काम करता अाले. हे सर्व होत असताना त्यांचा सामान्य कार्यकर्त्यांसोबतचा संपर्क तुटलेला नव्हता. गावागावात ते सामान्य कार्यकर्त्यांना नावानिशी अोळखत. विदर्भातील कापूस, सोयाबीन या प्रश्नांवर नेहमीच आक्रमक राहत होते. कृषिमंत्री झाल्यानंतर त्यांना सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत जाणीव व्हायची. शेतीमालाला भाव नसल्याची बाब शेतकरी बोलला की ते त्याचे समाधान करण्याचा प्रयत्न करीत. सरकार काय उपाययोजना करीत अाहे हे सांगत. शेतकऱ्यांमधील निराशेचे चित्र बदलायचे अाहे, तुमची शेती परवडणारी करायची असल्याचे पटवून देत. सुरवातीच्या काळात त्यांनी कापसाला भाव मिळाला पाहिजे यासाठी विदर्भ दणाणून सोडला. खामगाव ते नागपूर अशी ३५० किलोमीटरची पायी दिंडी काढून तेव्हाच्या सरकारविरुद्ध जनअाक्रोश पेटवला. ही यात्रा त्यांच्या राजकीय जीवनात मैलाचा दगड ठरली. कापूस पणन महासंघावर असताना त्यांनी कापूस उत्पादकाला भाव मिळाला पाहिजे यासाठी ठोस भूमिका घेतली. कृषिमंत्री म्हणून त्यांनी विदर्भ, मराठवाड्यात काही प्रकल्पांना प्रोत्साहन देण्याचे ठरवले. प्रामुख्याने बोलायचे झाल्यास खामगाव येथे टेक्सस्टाइल पार्क उभा करण्याचे त्यांचे स्वप्न होते. या कामासाठी खामगाव (जि. बुलडाणा) जवळ १०० हेक्टर जागाही त्यांनी निवडली होती. जालना जिल्ह्यात सीड हबचे काम पुढे जाण्यासाठीही त्यांचा पाठपुरावा सुरु होता.

GOPAL HAGE
(लेखक ॲग्रोवनचे प्रतिनिधी आहेत.)

इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
बचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
शेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...
देशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...
देशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...
मराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...
सुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...
पाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...
राज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...
उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...
अकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
राज्यातील १७ जिल्हे दुष्काळाच्या छायेतमुंबई ः राज्यात मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर अनेक...
प्रयत्नवादातून उभारलेला बेकर्स वेव्ह...वडगाव मावळ तालुक्यातील (जि. पुणे) दिवड येथील...