agriculture stories in marathi agrowon special article on poverty in state part 1 | Agrowon

शेतीतील दारिद्र्याचे भीषण वास्तव
हेरंब कुलकर्णी
मंगळवार, 26 मार्च 2019

महाराष्ट्रातील गरिबीचा अभ्यास करण्यासाठी हेरंब कुलकर्णी यांनी २४ जिल्ह्यांतील १२५ गावांना भेटी दिल्या व लोक काय खातात इथपासून तर रोजगार, कर्ज, शिक्षण, योजना, आरोग्य अशा सर्वच विषयांचा अभ्यास केला. या निरीक्षणांचा अहवाल ‘दारिद्र्याची शोधयात्रा’ (समकालीन प्रकाशन) म्हणून प्रसिद्ध झाला असून, या अहवालातील शेतीविषयक काही निवडक निरीक्षणे या ठिकाणी देत आहोत.
 

भारताने खुली व्यवस्था स्वीकारल्याला २०१६ मध्ये २५ वर्षे पूर्ण झाली. त्या वेळी दारिद्र्य कमी झाले का? यावर माध्यमांमध्ये परस्परविरोधी मते व्यक्त झाली. तेव्हा दारिद्र्याची स्थिती नेमकी काय आहे? याचा मला अभ्यास करावासा वाटला. त्यासाठी जून २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या काळात मी नोकरीतून ५ महिने रजा घेतली व राज्याच्या ग्रामीण २४ जिल्ह्यांतील १२५ गावांना भेट देऊन दारिद्र्याच्या स्थितीचा अभ्यास केला. शेती हेच दारिद्र्याचे मूळ आहे असे शरद जोशी मांडणी करीत. त्यामुळे गरिबीचा अभ्यास करताना प्रत्येक गावातील शेती, सिंचन आणि शेतीचे प्रश्न यावर शेतकरी, गावकरी यांच्याशी चर्चा केली. त्यातून पुढे आलेली शेतीविषयक निरीक्षणे अशी आहेत. 

बदलती पीकपद्धती
जालना, बुलढाणा, अकोला व विदर्भाच्या इतर जिल्ह्यात सोयाबीन पिकावर अवलंबित्व खूप वाढले आहे. विदर्भ, मराठवाड्याचे ‘राष्ट्रीय पीक’ असे वर्णन करावे इतके सोयाबीन वाढले आहे. कापूस उत्पादकांच्या आत्महत्या वाढल्यावर कापूस लागवड कमी होत गेली आणि त्याची जागा सोयाबीनने घेतली आहे. १० वर्षापूर्वी सोयाबीन कोणी पेरत नव्हते, पण आता तेच पीक सर्वत्र दिसते आहे. कमी काळात येणारे, कमी पाण्यावर येणारे, खूप निगराणी न करावे लागणारे व न घसरणारा भाव हे कारण सोयाबीनचे प्रमाण वाढण्याचे आहे. सोयाबीनची काढणी दसऱ्यापर्यंत होत असल्याने ते कापून त्या पैशावर दिवाळी साजरी करता येते आणि पीक उरकल्याने त्यानंतर ऊसतोड वीटभट्टी किंवा इतर व्यवसाय करायला गाव सोडून जाता येते. हाही एक फायदा सोयाबीन लागवडीचा आहे. याउलट कापूस लावला तर जानेवारीपर्यंत गावातच अडकून पडावे लागते. त्याचप्रमाणे शेती ज्या प्रमाणात अस्थिर होत गेली, त्या प्रमाणात नगदी पिकावर अवलंबित्व वाढत गेले. त्याचाच एक परिणाम सोयाबीन लागवड वाढण्यावर झाला आहे. 

कमी उत्पादकता
 सोयाबीनचे एकरी उत्पन्न ३ ते ७ पोते (एक पोते जवळपास एक क्विंटल) असे ठिकठिकाणी आढळले. कमी पाऊस व खराब जमीन यामुळे उतारा कमी येतो, असे कारण शेतकरी सांगतात. दोन ते अडीच हजार रुपये भाव मात्र टिकून राहतो. जालना जिल्ह्यातील एका गावात जमीन चिकट असल्याने व चार फुटावर मुरूम लागत असल्याने कष्ट करूनही पीक नीट येत नाही. अशा जमिनी आणखीही काही गावात आढळल्या. पण तरी येथे सात पोते एकरी सोयाबीनचे उत्पन्न येते. बीड जिल्ह्यात एकरी उत्पादन किती याचा अंदाज घेतला. पाच एकरात चार बॅग बाजरी पेरली तर सहा पोते बाजरी झाली. एक बॅग कापूस पेरला तर तीन क्विंटल कापूस झाला. एक किलो मूग पेरला तर चार पायली झाला आणि १० किलो उडीद पेरला तर पाच पोते झाले, असा हिशेब शेतकरी सांगतात. विदर्भात एकरी सात पोते सोयाबीन होते. त्यातून खर्च वजा जाता चांगले पिकले तर तीन एकरात ४५ हजार ते ५० हजार रुपये मिळतात. नाशिक जिल्ह्यात पेठ तालुक्यात दोन एकर जमिनीत सात ते आठ पोते भात होतो. ५० किलो नागली होते, दोन क्विंटल वरई होते. ही वरई २४ रुपये किलोने विकली जाते. ज्या घरात काजूची झाडे आहेत, त्या झाडांना दीड किलो काजू निघतात आणि ते ८० रुपये किलोने विकले जातात. आंब्याला २५ रुपये किलोने खरेदी करतात. पण आंबा असो की काजू? शेतकऱ्यांना नीट मार्गदर्शनच मिळत नाही. त्यामुळे तो मुख्य व्यवसाय होण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत नाहीत असे दिसून आले. सिंचन कमी असल्याने शेतीची अवस्था खूप बिकट आहे, फक्त भात आणि विशिष्ट पिकेच होतात. दिवाळी झाली की लोक आपली जनावरे मोकाट सोडून देतात, त्याचाही परिणाम होतो आहे. त्यामुळे हिवाळी हंगामात कोणीच शेती पेरण्याची हिंमत करीत नाही. त्यातील काहीजण गवंडी काम करायला, नागपूर जिल्ह्यात तूर कापायला, अमरावतीला खोदकाम करायला जातात. पुण्यात काहीजण रोजगारासाठी जातात. 

शेती समस्या 
ज्या गावात गरीब शेतकरी व शेतमजूर राहतात तिथे शेतमजुराचे जास्त हाल होतात. बिलोली जागीर येथील शेतमजूर म्हणाला की शेतकऱ्यालाच काही मिळेना तर शेतमजुराला तरी काय मिळणार? शेतकऱ्याला माल साठवायला काहीच सुविधा नसते. त्यामुळे भावाची वाट बघता येत नाही. माल खराब होईल म्हणून असेल त्या भावात विकून टाकावा लागतो. पशुवैद्यकीय अधिकारी हे ग्रामीण भागात प्रभावीपणे काम करीत नसल्याने पशुधनाची काळजी घेणे कठीण होते आहे. पशुधन खेड्यात खूप कमी झाले आहे. ५५ घरांच्या छोट्या गावात ३०० जनावरे होती, आज शेळीही मुश्किलीने सापडेल असे यवतमाळमधील एका शेतकऱ्याने सांगितले. चारा नाही, पाणी नाही आणि गावाचे गायरान कमी होणे, वन विभागाचे नियम कडक होणे ही कारणे सांगितली. वीज मंडळ हे नीट काम करीत नसल्याने शेतकरी खूप नाराज दिसले. एकतर लाईट नसते आणि लाईट असली तरी ती खूप कमी दाबाने असते. वीज कर्मचारी दुरुस्तीत लक्ष घालत नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकरी ती कामे शिकून घेतात आणि दुरुस्ती करतात. त्यातून अनेकदा अपघातही झालेत. पण नुकसान भरपाई मिळत नाही.  शेती फायद्यात नाही पण शेतीकडे शेतकरी ‘बँकेत ठेवलेली ठेव’ म्हणून पाहतो. गडचिरोलीत भामरागडचे शेतकरी म्हणाले की, प्रत्येकाची किमान पाच जनावरे आहेत. धान काढून झाले की जनावरे मोकळी सोडतात. त्यामुळे रब्बी पीक कुणीच घेत नाही.

- हेरंब कुलकर्णी : ८२०८५८९१९५

(लेखातील निरीक्षणे ‘दारिद्र्याची शोधयात्रा’ या समकालीन प्रकाशनने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून घेतली आहेत. या अहवालासाठी संपर्क ः ९९२२४३३६०६)

इतर संपादकीय
‘कॅप्सूल’ सुधारणार मातीचे आरोग्यमहाराष्ट्र राज्यासाठी या वर्षी रासायनिक खतांची...
हमीभाव वाढीचा बागुलबुवा आणि वास्तवलोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
सूर्य तळपताना छत करा दुरुस्तआठवड्यापूर्वी आलेल्या चांगल्या पावसाच्या अंदाजाने...
आयोगाचा कारभार प्रश्‍नचिन्हांकितप्रत्येक निवडणुकीची रीत न्यारी असते,...
समन्यायी जल-व्यवस्थापनाला पर्याय नाही जलव्यवस्थापन हा केव्हापासूनच कळीचा बनलेला प्रश्न...
जलव्यवस्थापनासाठी हवी लोकचळवळपेयजल, सिंचन व औद्योगिक पाणी वापर हे...
पुढचं पाऊलप्र बोधन आणि संघर्षाच्या माध्यमातून गेली चौदा...
जलदगती मार्गाने निर्जलपर्वाकडे...‘‘पाण्याची उपलब्धता कमी होत जाणे हे हवामान बदलाचे...
परंपरागत जल व्यवस्थांचा संपन्न वारसा :...परंपरागत जल व्यवस्थांमधून घेण्याजोग्या आणि आजही...
ठिबक सिंचनातील आधुनिक तंत्रज्ञान : अरुण...राज्यात लागवडीखालील २२५ लाख हेक्टर क्षेत्रांपैकी...
नोकरशहांच्या दुर्लक्षामुळे जल...राज्यात दुष्काळग्रस्त गावे वाढत असून, जलाशयांची...
समन्यायी जल व्यवस्थापनाला पर्याय नाही...लोकशाहीकरण वा पुनर्संजीवक विकास ही फुकाफुकी...
फड पद्धतीमुळे झाला कायापालट : दत्ता...फड या जल व्यवस्थापन पद्धतीचे तंत्र अगदी सोपे आहे...
कोरडवाहूचे जल व्यवस्थापन : चिपळूणकर,...पाण्याचे व्यवस्थापन हे केवळ बागायती पिकांसाठी...
जल व्यवस्थापन हाच कळीचा मुद्दा... :...पर्यावरणातील बदल, दुष्काळ, मातीचे बिघडणारे आरोग्य...
जल व्यवस्थापनाची सप्तपदी : नागेश टेकाळेनिसर्गदेवतेने दिलेला जलरूपी प्रसाद आज आपण तिने...
डोळ्यांत अंजन घालणारी नागलीची कहाणी :...योग्य पीकपद्धती विकसित केली नाही तर जल व्यवस्थापन...
जल व्यवस्थापनासाठी हवी लोकचळवळलक्षावधी हेक्टर जमीन, हजारो टीएमसी पाणी आणि...