आगीपासून वन वाचविण्याचा करूया निर्धार

वनाला आग लागल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आल्यास त्याची माहिती तत्काळ नजीकच्या वनाधिकाऱ्याला कळवावी व गावकऱ्यांना जमा करून आग विझविण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी उपलब्ध स्थानिक साधनांचा वापर करावा. अनेक वेळा डहाळ्यांनी झोडपूनही आग विझवता येते.
संपादकीय
संपादकीय

जंगलातील वाळलेला पालापाचोळा हा ज्वलनशील पदार्थ   असल्याने त्यावर कोणत्याही कारणाने ठिणगी पडल्यास जंगलाला आग (वणवा) लागते. जंगलात क्वचितच नैसर्गिक कारणांमुळे आगी लागतात. जंगल क्षेत्रातील ज्वालामुखी, वादळ, पाण्याच्या थेंबातून जाणारे सूर्यकिरण तसेच वीज पडल्याने लागणारी आग ही सर्व वणव्याची नैसर्गिक कारणे आहेत. तर अनैसर्गिक कारणांमध्ये गवताच्या वाढीसाठी, अकाष्ठ वनोपज गोळा करण्यासाठी,  शेती करण्यासाठी, वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी, वन गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्यासाठी जंगलाला आग लावली जाते. तसेच राब जाळतांना योग्य दक्षता न घेतल्याने आग जंगलात पसरते. वन्यप्राण्याना हाकलून लावताना आगी लावल्या जातात. अशी आग नंतर जंगलात पसरते. जंगलातील रस्त्याने माणसे जातांना जळती विडी, सिगारेट न विझवता तशीच जंगलात टाकतात किंवा माचिसची जळती काडी निष्काळजीपणे फेकतात. त्यामुळे जंगलाला आग लागते. जंगलात स्वयंपाक करताना विस्तव विझवण्याची दक्षता घेतली जात नाहीत. आणि जंगलाला आग लागते. तर कधी हाय टेन्शन विजेच्या तारांमधून पडणाऱ्या ठिणग्यांमुळेही जंगलाला आग लागते.  

वणव्याचे दुष्परिणाम  वणव्यामध्ये वनातील अनेक प्रकारचे गवत, झुडुपे, वेली, छोटे-मोठे वृक्ष आगीच्या भक्षस्थानी पडतात. एकाच क्षेत्रात सातत्याने वणवे लागल्यास वनस्पतींच्या स्थानिक प्रजाती नष्ट होतात. वणवा लागलेल्या क्षेत्रात वनीकरणाची कामे झाली असल्यास कोवळी रोपे जळून जातात आणि वनीकरणाच्या कामावर झालेला खर्च वाया जातो. वनस्पतीं प्रमाणेच वणव्यामुळे जंगलाच्या आश्रयाने राहणाऱ्या असंख्य वन्यजीवांची हानी होते. जंगलातील वन्य प्राण्यांची संख्या आणि जैवविविधताही घटते, त्यांच्या पुनरुत्पादनावरही परिणाम होतो. वणव्यामध्ये जमिनीतील आर्द्रता घटते, वनांची उत्पादनक्षमताही घटते. सातत्याने आगी लागल्यास वनांपासून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये मोठी घट होते. वणव्यामुळे जमिनीवरील वनस्पतींचे आच्छादन नष्ट होते. जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होते.

वनांचे आगीपासून संरक्षण अ) प्रतिबंधात्मक उपाययोजना   आग संरक्षण आराखडा तयार करणे - आग लागल्यावर ती नियंत्रीत करण्यासाठी धावपळ करण्यापेक्षा आग लागू नये यासाठी अगोदरच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यासाठी आग संरक्षण आराखडा वेळीच तयार करून त्याची अंमलबजावणी केल्यास आग लागण्याचे प्रमाण कमी करता येते. 

 जनजागृती करणे - वणव्यामुळे वनांचे होणारे नुकसान व त्याचा आपल्या जीवनावर होणारे दुष्परिणाम याची माहिती, याबाबतच्या कायद्यातील तरतुदी, स्थानिक लोकांनी करावयाच्या उपाययोजना, लोकांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये या बाबतची माहिती रेडिओ, दूरदर्शन, ग्रामसभा, छापील साहित्य याद्वारे लोकांना सांगून त्यांचे प्रबोधन करावे. कामासाठी प्रवृत्त करावे.

कायद्याची अंमलबजावणी करणे : महाराष्ट्र वन अधिनियमाच्या कलम २६ अन्वये वनांच्या हद्दीपासून एक कि. मी. अंतराच्या आत आग पेटवण्यास बंदी आहे. वनालगत राब भाजणे, राख तयार करणे ही कामे करताना जंगलाला आग लागणार नाही याची दक्षता बाळगणे कायद्याने बंधनकारक आहे. वनांपासून एक कि. मी. अंतरापुढे आग पेटवावयाची असल्यास ती जंगलात पसरू नये, यासाठी १० मी. रुंदीची आग प्रतिबंधक रेषा साफ करून ठेवावी. रखवालदार नेमून लक्ष ठेवावे. कोणत्याही व्यक्तीने वनापासून एक किलोमीटरच्या आत राबासाठी आग पेटविण्याअगोदर जवळच्या वनाधिकाऱ्यास निदान एक आठवडा पूर्वसूचना द्यावी व आग पसरू नये म्हणून १० मी. रुंदीची जाळ रेषा घ्यावी. वनालगत कुठेही ज्वलनशील पदार्थाचा साठा करण्यास कायद्याने बंदी आहे. वनांचे संरक्षण करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. जी गावे संयुक्त वन व्यवस्थापन योजना राबवितात त्या गावातील लोकांनी वनांचे आगीपासून संरक्षण करणे बंधनकारक आहे. त्यासाठी गावकऱ्यांनी स्वतः जंगलात गस्त घालणे अपेक्षित आहे. वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ नुसार संरक्षित क्षेत्रात म्हणजे अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान तसेच व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात आग लावणे गुन्हा आहे. त्यासाठी जबर शिक्षेची तरतूद आहे. तेंदूपानांचा विल्हेवाट तसेच महारष्ट्र वनोपज (व्यापाराचे नियमन) अधिनियम १९६९ या नुसारही तेंदूपत्यांसाठी जंगलाला आग लावणे निशिद्ध आहे.

  जाळ रेषा घेणे  : जंगलाबाहेरील आग जंगलात शिरू किंवा पसरू नये याकरिता जंगलाभोवताली ठराविक रुंदीचे पट्टे त्यावरील काडीकचरा साफ करून जाळले जातात. त्याला जाळ रेषा असे म्हणतात. हे काम आगीचा मोसम सुरू होण्याआधी पूर्ण केले जाते. त्याचे दोन प्रकार आहेत. जंगलाच्या बाहेरील सरहद्दीवरील जाळ रेषांना बाह्य जाळ रेषा म्हणतात. जंगलाच्या आतील रस्ते, नाले, ओढे, नद्या, रेल्वे लाईन यांचा उपयोगही जाळ रेषेसारखाच होतो. अशा बाबी नसल्यास तीन मी. रुंदीच्या जाळ रेषा मुद्दाम घेतल्या जातात. त्यामुळे जंगलातील एका भागातील आग दुसऱ्या भागात शिरत नाही. 

  गस्त घालणे - व णवे लागण्याच्या कालावधीत म्हणजे साधारणतः डिसेंबर, जानेवारी महिन्यापासून जंगलाची उंच ठिकाणे, मनोऱ्यावरून टेहळणी केल्यास तसेच जंगलात दिवस-रात्र टेहळणी केल्यास वनांचे आगीपासून प्रभावी संरक्षण करणे शक्य होते.

ब) उपचारात्मक उपाययोजना   आग विझविणे - गावाजवळच्या वनाला आग लागल्यानंतर ती तत्काळ विझविणे आवश्यक आहे. त्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मदत करणे गावकऱ्यांचे राष्ट्रीय कर्तव्यच नाही, तर वन कायद्यानुसार त्यांना बंधनकारकही आहे. तसे न करणाऱ्यास वन कायद्यातील तरतुदींनुसार एक महिना कैद किंवा दोनशे रुपये दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते. आग लागल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आल्यास त्याची माहिती तत्काळ नजीकच्या वनाधिकाऱ्याला कळवावी. व गावकऱ्यांना जमा करून आग विझविण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी उपलब्ध स्थानिक साधनांचा वापर करावा. अनेक वेळा डहाळ्यांनी झोडपूनही आग विझवता येते. मोठी आग विझविण्यासाठी अनुभवी व्यक्तींची गरज असते.

आग हे दुधारी अस्त्र आहे असे म्हणतात. एखादे क्षेत्र दोन तीन वर्षांतून एकदाच जाळले तर गवताचे उत्पन्न वाढण्यासाठी त्याची मदत होते. परंतु त्याच क्षेत्राला वांरवार आगी लागल्या तर जमिनीची मोठ्या प्रमाणावर धूप होऊन ती पडिक होते. त्यामुळे गावाजवळच्या वनाचे आगीपासून प्रभावी संरक्षण करणे हे आवश्यकच आहे. ‘सहकार्याची धरून कास, आगीपासून वाचवू वनास!’ असा आपण निर्धार करू यात.                                                                                   प्रभाकर कुकडोलकर : ९४२२५०६६७८ (लेखक वन, वन्यजीवांचे अभ्यासक आहेत.) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com