Agriculture stories in Marathi, agrowon special article on ravi devang | Agrowon

शेतकऱ्यांसाठी आयुष्य वेचलेले ध्यानयोगी
अनंत देशपांडे
सोमवार, 25 डिसेंबर 2017

१२ डिसेंबर २०१७ या दिवशी रवी देवांग 
अगदी अनपेक्षितरीत्या अनंतात विलीन झाले. आपले आयुष्य शेतकऱ्यांसाठी समर्पित करणाऱ्या या ध्यानयोग्याने त्यांना गुरुस्थानी असणाऱ्या शरद जोशी यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या दिवशीच निर्वाणाचा योग साधला. 

विज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळे जन्म कधी होणार याची वेळ ठरवता येणं शक्य झालं आहे; पण मरणाची वेळ ठरवणं अजूनतरी शक्य झाल्याचं दिसत नाही. अगणित संपत्ती, जगभरातली नावाजलेली तज्ज्ञ डॉक्टर मंडळी हाताशी असली, तरी मरण चुकवता येत नाही आणि उशाला बसून वर्षानुवर्षे मरणाची वाट बघावी लागते. ''अरे, असं कसं शक्य आहे? मी आत्ताच तर त्यांच्याशी बोललो. असे कसे गेले?'' असं चुटपूट लावणारं मरणही काही जणांना प्राप्त होतं. रवी देवांग (रवीभाऊ) यांच्या मरणाने अशीच चुटपूट लागली आहे. 

१२ डिसेंबर २०१७ रोजी म्हणजे शरद जोशी गेल्यानंतर बरोबर दोन वर्षांनी शेगावला शेतकरी संघटनेने स्वातंत्र्य मेळावा आयोजित केला होता. स्वामिनाथन आयोगाने सुचवलेल्या शिफारशींप्रमाणे उत्पादन खर्चावर अधिक पन्नास टक्के नफा आकारून हमीभाव मिळावा, ही मागणी घेऊन देशभरातील वेगवेगळ्या संघटना रान उठवत अाहेत. अशा काळात ''शेतकऱ्यांसाठी बाजारपेठेचे, शेती व्यवसाय करण्याचे, तंत्रज्ञान वापरण्याचे स्वातंत्र्य आवश्यक आहे.’ ‘स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी हे मृगजळ आहे, त्यामागे धावू नका'' असा स्वच्छ संदेश देण्यासाठी असंख्य शेतकरी एकत्र आले होते. त्यामुळे सगळेच कार्यकर्तेही उत्साहात होते. मेळावा अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी झाला होता. रवीभाऊ यांचा उत्साह जाणवण्याइतपत होता. याच आनंदी वातावरणात मेळावा पार पडला आणि जो तो आपापल्या गावी परतू लागला.

मला रात्री नऊ वाजता पुण्यासाठी गाडी होती. निघताना रेस्ट हाउसवर रवीभाऊ यांची भेट झाली. म्हणाले, ‘मला आंबेठाणला यायचंय, म्हात्रेसरांना भेटायला''. मी म्हणालो, ‘मी किती दिवसापासून तुम्हाला चार दिवसांसाठी या निवांत असं म्हणतोय, तुम्हीच येत नाही भाऊ’. तर म्हणाले, ‘आता नक्की येतो, सरांना सांगा.’ निरोप घेऊन मी निघालो. थोड्याच वेळात त्यांचाच फोन आला. म्हणाले, ‘भाऊ, तुमचं जॅकेट राहिलं इथं’. मी म्हणालो, ‘नाही रवीभाऊ, माझं जॅकेट तर माझ्यासोबत आहे.’ आणि बरोबर बावीस मिनिटांनी मला गोविंद जोशी यांचा फोन आला, ‘कुठे आहात?’ मी म्हणालो, ‘गाडीत बसतोय.’ माझी गाडी समोरच उभी होती. म्हणाले, ‘नका बसू, इकडे या.’ मी म्हणालो, ‘का?’ म्हणाले, ‘रवी देवांग यांना आम्ही दवाखान्यात घेऊन आलोय, बहुतेक ते गेले.’ मृत्यूच्या अगोदर पाच-दहा मिनिटांपूर्वी ललित बहाळे निघाले म्हणून रवीभाऊ यांनी, ‘शेतकरी संघटनेचा विजय असो’ अशा मोठमोठ्याने घोषणा दिल्या आणि खोलीत येऊन सोफ्यावर बसून बोलता बोलता जीवनप्रवास संपवला. ‘शेतकरी संघटनेच्या कुटुंबात मला मरण यावे’ ही इच्छा त्यांनी शब्दशः खरी केली.

माझा त्यांच्याशी परिचय अलीकडे गडद झाला. ते १८ जुलै २०१० रोजी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष झाले आणि शरद जोशी यांच्याकडे त्यांचे जाणे-येणे वाढले. बहुतेक वेळी मी तिथे हजर असायचो. आमचे अनेक वेळा विविध विषयांवर बोलणे व्हायचे. त्यात विपश्यना हा विषय प्रत्येक वेळी असायचाच. एकदा झांसीजवळ बांदा इथे केसीसीची एक बैठक होती. निवांतपणात मला रवीभाऊ म्हणाले, ‘काय सांगू भाऊ, शरद जोशी यांनी अहंकार सोडला तर हा पुण्यात्मा बुद्धत्वाच्या जवळ पोचलेला आहे.’ एकदा शरद जोशी यांना विपश्यनेसाठी तयार करायचा ते प्रयत्न करत होते. ‘साहेब, तुम्ही माझ्यासाठीतरी एकवेळा विपश्यना करा, बघा तुम्हाला समाधान वाटेल.’ शरद जोशी यांना मात्र दहा दिवस मेंदूला बांधून ठेवणं म्हणजे निसर्ग विपरीत कृती आहे, असं वाटायचं. ‘सतत भिरभिरणे, नावीन्याचा शोध घेणे, त्याचा अन्वयार्थ लावणे, त्याप्रमाणे प्रतिक्रिया करणे हा मेंदूचा नैसर्गिक गुणधर्म. वेगवेगळी माहिती संकलित करणं, त्यावर चिंतन करणं, त्यातून आपली मांडणी तयार करणं, तिची बाहेरील परिस्थितीशी संगती लावून तपासून पाहणं, जुळली तर ठीक नाही तर मोडून टाकून पुन्हा नव्याने मांडणी तयार करणं, ती बाहेरील परिस्थितीशी जुळतेय असा विश्वास तयार झाला की धाडसाने व्यक्त करणं आपलं काम असतं, हे सारं निसर्गसिद्ध असतं. रवीभाऊ आणि तुम्ही तर मला दहा दिवस मेंदूला बांधून टाकायला सांगता आहात.''

तेंव्हा रवीभाऊ म्हणाले, ''बरोबर आहे सर तुमचं, पण आम्ही मेंदूला बांधायला थोडंच सांगतो. विपश्यनेच्या काळात बाहेर भिरभिरणाऱ्या मेंदूला आपण स्वतःचाच शोध घ्यायच्या कामाला लावत असतो, विपश्यना तटस्थपणे स्वतःकडे पाहायला शिकवते, आपल्यामध्ये अहंकार, द्वेष, राग, मत्सर इत्यादी विकार तयार झालेले असतात आणि तेच विकार आपल्या प्रतिक्रिया तयार करतात. विपश्यना वर्तमानकाळाचा साक्षी भावाने, तटस्थपणे विचार करायला शिकवते.'' अशा वेळी रवीभाऊमधला बुद्ध जागा व्हायचा. या वेळीही असंच झालं. शरद जोशी आणि रवीभाऊ यांची बुद्ध तत्त्वज्ञानावरील चर्चा बराच वेळ रंगली. माझ्यासाठी ती पर्वणीच होती. शेवटी शरद जोशी विपश्यनेला तयार झाले; पण माझ्याच काही अडचणीमुळे बेत फसला. रवीभाऊ रागावतील असं मला वाटत राहिलं; पण ते एवढंच म्हणाले, ''अनंतभाऊ, शरद जोशी यांना बुद्धत्वाच्या जवळ जायला अजून जन्म घ्यावा लागेल.'' 

रवीभाऊ शेतकरी संघटनेचे अध्यक्ष असतानाचा एक प्रसंग आजही मन कुरतडून टाकतो. मूळ घटनेला जवाहरलाल नेहरू यांनी परिशिष्ट ९ जोडले. या परिशिष्ट ९ मध्ये जे कायदे घातले आहेत त्यांना कोर्टात आव्हान देता येऊ नये, अशी तरतूदही त्यांनीच करून ठेवली. विशेष म्हणजे यातील बहुसंख्य कायदे शेतकऱ्यांना गुलाम करणारे आहेत आणि शेतकरीविरोधी आहेत. मग त्यानंतर येणाऱ्या सगळ्याच राजकीय पक्षांच्या सरकारांनी त्यांच्या ''सोयीचे'' कायदे याच परिशिष्टात टाकून शेतकऱ्यांना कोर्टात जाता येऊ नये, असे अधिकाधिक भक्कम सुरक्षाकवच तयार करून घेतले आणि लायसन्स, परमीट, कोटाराज मजबूत करीत राहिले. आज शेतकरी जो अडचणीत आहे, आत्महत्येचं दार ठोठावतो आहे, ते याच जीवघेण्या परिशिष्टातील कायद्यांमुळे.

रवीभाऊ यांनी निर्णय घेतला हे जीवघेणे परिशिष्ट ९ जाळून निषेध व्यक्त करायचा. मूळ घटनेने व्यवसाय स्वातंत्र्याचा दिलेला अधिकार नेहरूंनी परिशिष्ट ९ घटनाबाह्य मार्गाने जोडून हिरावून घेतला तो पुन्हा प्रस्थापित करण्याचं हे आंदोलन होतं. ठरल्याप्रमाणे धुळ्यात काही कार्यकर्ते मंडळी एकत्र आली आणि परिशिष्ट ९ जाळण्यात आले. लगेच काही राजकीय पुढाऱ्यांनी भोळ्याभाबड्या दलित कार्यकर्त्यांना भडकवून हा ‘घटनेवरील हल्ला’ आहे असा भास निर्माण केला. काही लोकांनी नंतर रवीभाऊ यांच्या कार्यालयात जाऊन हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यातून ते कसेबसे बचावले; पण त्यानंतर त्यांची झालेली आर्थिक आणि शारीरिक हानी कशी भरून निघणार? आपले सारे आयुष्य बुद्धाची शिकवण लोकांना सांगणे, विपश्यना शिकवणे, धुळ्यात एक विपश्यना केंद्र उभे करणे, स्वत:ला शेतकरी चळवळीला समर्पित करण्यासाठी या ध्यानयोग्याने खर्ची घातले आहे. त्यांच्या कार्यास सलाम!
अनंत देशपांडे : ९४०३५४१८४१
(लेखक शेतकरी संघटनेचे विश्‍वस्त आहेत.)

इतर अॅग्रो विशेष
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...
साखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...
कांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...
देशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...
किमान तापमानात चढ-उतार शक्य;...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे...
शेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...
पोकळ घोषणा, की भक्कम आधार  पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...
दुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...
मराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...
महिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...
द्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...
राज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...
देशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...