Agriculture stories in Marathi, agrowon special article on rural language problems | Agrowon

अहो यालाच डोका म्हणतात
कांचन परुळेकर
शुक्रवार, 29 डिसेंबर 2017
दहावी बाई तपासणीला आली अन्‌ डॉक्‍टरांची सहनशीलता संपली. ती उलटी झोपताच डॉक्‍टरांनी तिच्या गुडघ्यावर चापट मारून जोराने विचारले, ‘अगं याला डोकं म्हणतात काय?’ तिने डॉक्‍टरांपेक्षा मोठ्या सुरात उत्तर दिलं, ‘अहो यालाच डोका म्हणतात.’

ग्रामीण भागात जाऊन विकासकामे करायची तर प्रथम त्यांची भाषा, वेशभूषा, संस्कृतीची चांगली जाण करून घ्यायला हवी. त्यांच्याच सहकार्याने त्यांच्या गरजांची पूर्तता करताना आपण त्यांच्यातीलच एक वाटावे यासाठीचा हा खटाटोप. परिस्थितीनुसार त्यांच्या भाषेत शिरलेल्या इंग्रजी शब्दांचीही आपण वेळीच दखल घ्यायला हवी.

प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ सी. रा. तावडे यांच्या कन्या डॉ. शोभना अमेरिकेत प्रथितयश मानसोपचार तज्ज्ञ होत्या. साठीनंतर आपल्या जन्मगावी कोल्हापुरात येऊन इथल्या जनतेला आरोग्यसेवा द्यायची, असा त्यांचा मानस होता. त्यासाठी कोल्हापुरात एक टुमदार बंगलाही त्यांनी बांधला होता. दुर्दैवाने वयाच्या ५४ व्या वर्षी कर्करोगाने अमेरिकेतच त्यांचे निधन झाले. त्यांच्या मुलांनी ठरविले, आईला कोल्हापुरात आरोग्यसेवा द्यायची होती, तर कोल्हापुरातील एक उत्तम संस्थेलाच हे काम सांगूया. १९९४ पासूनच आम्ही राधानगरी, चंदगड, शाहूवाडी असे दुर्गम तालुके आणि शहरातील वंचित लोक यांच्यासाठी आरोग्यसेवा देत होतो. ‘आशा’ संकल्पनेचा जन्म होण्यापूर्वीच दुर्गम भागातील महिलांना आरोग्य दूत बनवून आरोग्यविषयक जाणिवा लोकांच्यात निर्माण केल्या होत्या. आमचे हे काम जवळून पाहणाऱ्या प्रा. सुनंदा झोपे, चित्रकार शैलजा काटकर या शोभनाताईंच्या भगिनी आणि शिवाजीराव तावडे हे बंधू यांनी शोभनाताईंचा बंगला विकून आलेली रक्कम विश्‍वासाने डॉ. व्ही. टी. पाटील फाउंडेशनला दिली. डॉ. शोभना तावडे-मेहता आरोग्यम धनसंपदा प्रकल्पाचा जन्म झाला.

शहरातील मोलकरणी, भाजीवाल्या, रिक्षामामा, बांधकाम कामगार, हमाल यांना तसेच वाड्यावस्तीवरील स्त्री-पुरुष, शालेय मुले यांना या प्रकल्पांतर्गत मोफत आरोग्यसेवा पुरवली जाते. कर्नल आनंदराव जाधव यांच्या कन्या रोहिणी डांगे, गोवा यांच्या देणगीतून जननी आरोग्य जागृती प्रकल्पांतर्गत महिलांना पॅपस्मिअर टेस्ट पर्यंतच्या सेवा मोफत दिल्या जातात. ॲनिमिया निर्मूलन, दंत आरोग्य प्रकल्प राबविले जातात. यासाठी अनेक सेवाभावी डॉक्‍टर्स आपल्या सेवा देत असतात.

एकदा मुंबईसारख्या शहरात शिक्षण, सतत इंग्रजी शब्दांचा वापर, शहरात पॉश सोसायटीत बंगला आणि अत्याधुनिक पोशाख असा एक तरुण डॉक्‍टर ‘मला तुमच्याबरोबर खेड्यात घेऊन चाल. ग्रामीण रुग्णांची मला सेवा करायची आहे’ असा आग्रहच करू लागली. तुम्हाला प्रथम तुमचा वेश बदलावा लागेल, त्यांची भाषा समजून घ्यावीच लागेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याशी संवाद साधताना संयम राखावा लागेल वगैरे बाबी मी त्यांना समजून सांगितल्या. एके दिवशी दूरच्या धनगरवाड्यावरील कॅंपसाठी त्यांना घेऊन गेलो. डॉक्‍टरांनी पहिल्या बाईला सांगितले, ‘डोके इकडे करून झोपा’ ती उलटच झोपली. सर्वांना डॉक्‍टर अशीच सूचना देत होत्या. सगळ्या बरोबर डोक्‍याऐवजी पायच त्या दिशेला करून झोपायच्या. प्रत्येकीला पुन्हा उठवून सुलट झोपवायचे अन्‌ तपासायचे. डॉक्‍टरांचा पारा हळूहळू चढायला लागला. दहावी बाई तपासणीला आली अन्‌ डॉक्‍टरांची सहनशीलता संपली. ती उलटी झोपताच डॉक्‍टरांनी तिच्या गुडघ्यावर चापट मारून जोराने विचारले, ‘अगं याला डोकं म्हणतात काय?’ तिने डॉक्‍टरांपेक्षा मोठ्या सुरात उत्तर दिलं, ‘अहो यालाच डोका म्हणतात.’ डॉक्‍टरांनी कपाळाला हात लावून विचारलं, मग याला काय म्हणतात? जोरात हसून ती बोलली, ‘अहो डोचकं म्हणत्यात कळत नव्हतं तर मगादरनं ईचारायचं तरी.’

राजमाचीचा अनुभव एकदम उलट. वस्तीवर स्वच्छ, सुंदर सारवलेलं अंगण, टुमदार कौलारू घरे. १५-१६ च घरे. साठीच्या पुढे वय असणाऱ्या तरतरीत कारभारणी गडावर ट्रेकिंगसाठी येणाऱ्यांच्या निवास, भोजनाची व्यवस्था करून स्वकमाई करतात. त्यामुळे प्रचंड आत्मविश्‍वास. पोरं, सुना, नातवंडे लोणावळ्यात वा अन्य शहरात. प्रत्येकीकडे स्वतःचे व्हिजिटिंग कार्ड. पर्यटकांसाठी पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी आम्ही गेलो होतो. खुर्चीत फतकल मारून त्या अनेक प्रश्‍न विचारून सारे समजून घेत होत्या. कौतुकाने आम्ही आश्‍चर्यचकित होऊन त्यांना न्याहाळीत होतो.

प्रशिक्षण संपल्यानंतर प्रशिक्षकांना नैसर्गिक विधीला जायचे होते. एकीने विचारले, ‘‘मावशी, बाथरूम कुठे आहे?’’ ‘अहो, तळ्यावर जाऊन तिथेच न्हायचं. इथवर पाणी आणणं महा कठीण. जरुरीपुरतं पाणी आणतो. तुम्ही अजून अंघोळी केला नाहीसा? पारोशाच आलाय?’ प्रशस्त वाटत नसलं तरी आमच्यातली एकजण म्हणाली, ‘अहो लघवीला जायचं होतं.’ ‘अहो मग टॉयलेट म्हणाकी’ असं म्हणत सगळ्याच हसल्या. ‘अहो, ते बांधावंच लागतं. प्रत्येकीच्या घरामागं हाय. रातीच्या वेळी बायाबापड्या कुठं बरं जातील. जावा घरामागं त्या बाजूला.’ त्यांची ही शाब्दिक चपराक आम्हाला इतक्‍या जोरात बसली की त्या दिवसापासून बाथरुम न म्हणता ‘टॉयलेट’ शब्द आपोआपच तोंडात अवतरला.

कांचन परुळेकर ः ०२३१-२५२५१२९
(लेखिका स्वयंसिद्धाच्या संचालिका आहेत.)

इतर अॅग्रो विशेष
अकोला जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना देणार...अकोला ः देशात राबवल्या जात असलेल्या प्रधानमंत्री...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांत ८०...सांगली/कोल्हापूर ः साखरेला दर नसल्याने निराश...
सीताफळाच्या योग्य जातींची करा लागवडमहाराष्ट्रात सीताफळाच्या झाडांचे काही नैसर्गिक...
उत्पादकांसाठी बेदाणा गोडसांगली ः यंदाच्या बेदाणा हंगामात बेदाण्याच्या...
केळी दरात किंचित सुधारणाजळगाव ः रावेर, यावलमध्ये केळीची आवक वाढलेली...
मका चार वर्षांतील नीचांकी पातळीवरनवी दिल्ली ः बजारात मका आवक वाढल्यांतर मागणी कमी...
कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पणन संचालक...पुणे ः पणन संचालकपदी पूर्णवेळ नियुक्ती असताना...
​​राज्य सरकार राबविणार मधुमक्षिका मित्र...पुणे : शहरी भागात मधुमक्षिकांचे पोळे दिसले, की ते...
ग्रामस्वच्छता अभियानात प्रभाग, गटातून...नगर ः ग्रामीण भागात स्वच्छतेची व्यापी...
केसर आंबा पाडाला आलाय...औरंगाबाद : आपली चव, गंध आणि रूपाने ग्राहकांना...
बदल्या समुपदेशनानेच...पुणे : राज्याच्या कृषी विभागात समुपदेशनाने बदल्या...
अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेतपुणे : ‘सागर’ चक्रीवादळापाठोपाठ अरबी समुद्रात...
पाणलोट, मृदसंधारण घोटाळ्याचा पर्दाफाशपुणे : कृषी खात्यातील पाणलोट व मृदसंधारण...
ब्राझील, थायलंडचा यंदा इथेनॉलकडे वाढता...कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वत्रच...
बारमाही भाजीपाला शेतीला नर्सरी...ब्राह्मणगाव (जि. नाशिक) येथील केवळ वाघ पूर्वी...
सुधारित तंत्राची मिळाली गुरुकिल्लीअकोला जिल्ह्याचे मुख्य उन्हाळी पीक कांद्याची...
भाराभर चिंध्या राज्यात १२७ वा पशुसंवर्धन दिन नुकताच साजरा...
मथुरेचं दूध का नासलं?राज्यात मे महिन्याचे तापमान यंदा नैसर्गिक आणि...
चिमुरड्याच्या कॅमेऱ्यात कैद आनंदी शेतकरीआपल्याकडील शेतकरी आनंदी असू शकतो का? उत्तर...
‘अ’तंत्र निकेतनपुरेसा अभ्यास आणि तयारीअभावी, यंत्रणेचा विरोध...