मातीच्या आरोग्याची-सतावते चिंता

संपादकीय
संपादकीय

मुळात मातीची निर्मितीच खडकापासून झालेली आहे. ऊन, पाऊस, वारा, प्राणी यांच्या घर्षणातून खडकाची झीज हजारो वर्षे झाल्यावर एक इंचाचा मातीचा थर तयार होतो. पृथ्वीची निर्मिती झाल्यानंतर तप्त लाव्हा थंड व्हायला लाखो वर्षे जावी लागली. त्या काळात झालेल्या भूकंपामुळेच व लाव्ह्यामुळे जागोजागी डोंगर, टेकड्या, दऱ्या, खोरे निर्माण झाले. तीन चतुर्थांश समुद्रातील पाण्याची वाफ होऊन पाऊस पडतो. त्यामुळे जीवांची निर्मिती झाली. कीटक, वनस्पती, प्राणीही निर्माण झाले. मातीच्या भागावर वनस्पती, जंगले वाढली. मानवाच्या उत्पत्तीनंतर पिकांचा शोध त्यांना लागला. जसजशी लोकसंख्या वाढत गेली तसतशी उपजाऊ शेती वाढत गेली. पुढे लोकसंख्येच्या माऱ्यामुळे जंगले तोडून शेती विस्तारत गेली. पृथ्वीवरच्या एकूण उपजाऊ क्षेत्रावर एक ते दीड अब्ज लोकसंख्येला पुरतील एवढीच निसर्गात संसाधने आहेत, पण आज लोकसंख्या नऊ अब्जच्या आसपास गेल्याने मातीवरचा पर्यायाने पृथ्वीवरील बोजा वाढला आहे.

प्रगतीच्या नावाखाली उपलब्ध उपजाऊ जमिनीवर अतिक्रमणे वाढत गेली. वस्त्या, शहरीकरण, औद्योगीकरण, रेल्वे, रस्ते, धरणे, कालवे, खाणी, नद्या यामुळे दहा टक्‍यांपर्यंतचा भूभाग व्यापत चालला आहे. दिवसेंदिवस वाढत्या लोकसंख्येमुळे विविध अतिक्रमणात ही वाढ होते आहे. त्यातून प्रदूषण नावाचा राक्षस जन्माला नाही आला तरच नवल! बेसुमार लोकसंख्येला पुरवणारे अन्नधान्य उत्पादित करण्यासाठी दुबार, तिबार पिके घेणे गरजेचे झाले. त्यामुळे मातीचे शोषण वाढले. सुपीकता कमी होऊन उत्पादनात घट येऊ नये म्हणून रासायनिक खते, कीडनाशके, तृणनाशके फवारणे क्रमप्राप्त झाले. त्यामुळे मातीच्या वरच्या थरात असणारी उपयुक्त जीवाणूंची संख्या घटली. 

अति पाण्यावरची पिके घेतल्याने जमिनी खराब होऊ लागल्या. चिबड व खारफुटीच्या जमिनीचे क्षेत्र वाढले. जमिनीतील हवेचे प्रमाण घटल्याने त्या घट्ट झाल्या. या सर्वांमुळे जीवाणूंचा नाश होऊन त्या अनउपजाऊ बनल्या तर काही मृत झाल्या.  मातीच्या आरोग्याची - सतावते चिंता। वाढलेला गुंता - टकुऱ्यात।। खालावला कसा - मातीचा या पोत। कुठे गेले गणगोत - परदेशी ।। योग्य बांधबंदिस्ती नसल्याने व अति उतारामुळे पृष्ठभागावरील लाखो टन सकस माती पावसाच्या तीव्रतेने दरवर्षी वाहून जात आहे. सोबत जमिनीतील पिकाच्या पोषणासाठीचा उपयुक्त सेंद्रिय कर्बही वाहून गेल्याने जमिनीची उत्पादकता घटत चालली आहे. शेतकऱ्यांचा त्यातून उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. सेंद्रिय कर्ब ४.०० टक्‍क्‍यांवरून ०.२० ते ०.५० टक्‍क्‍यापर्यंत खाली आला. म्हणजे लागवड खर्च वाढला आणि शेती धंदा तोट्यात गेला. सर्व प्रकारे मातीचा ऱ्हास सुरू झाला. वाढत्या नागरीकरणाच्या बांधकामासाठी लागणारी वीट बनवायला वीटभट्टीद्वारे लाखो एकरावरची सुपीक माती विकली चालली. त्या जमिनीही अनुत्पादक बनल्या. जंगलातील वृक्षतोडीने व जनावरांच्या चरण्याने छत्र हरवलेल्या उघड्या बोडक्‍या रानावरली माती पाऊस, वाऱ्याने धुपून चालली आहे. मोठमोठ्या वादळांमुळे वरचा थरातले हलके कण उडून गेल्याने तो उघडा पडत आहे. अशा तऱ्हेने मातीच्या ऱ्हासाचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. चराऊ कुरणे कमी झाल्याने पर्यायाने प्राण्यांची संख्या घटत चालली आहे. त्यामुळे सेंद्रिय खतांची कमतरता वाढत चालली आहे. जंगलांच्या ऱ्हासाने वन्यप्राण्यांचे अधिवास धोक्‍यात आले आहेत. त्यांच्या शिकारी वाढल्या आहेत. मानव वस्त्यात ती शिरतानाची अनेक उदाहरणे सध्याच्या काळात घडताहेत. त्यामागची कारणेही स्पष्ट आहेत.

मातीचे आरोग्य अनेक कारणांनी बिघडत गेले. म्हणजे वनस्पतीचे व त्यावर जगणाऱ्या मानव प्राण्यांचेही आरोग्य सध्याच्या काळात धोक्‍यात आल्याची अनेक उदाहरणे वेगवेगळ्या संस्थांच्या सर्वेक्षणातून पुढे येताहेत. ते आरोग्य टिकावे, मातीचे संवर्धन व संरक्षण व्हावे, यासाठी सर्वांचे लक्ष या प्रश्‍नांच्या सोडवणुकीकडे लागले पाहिजे. आजकाल मातीचे आरोग्य व कमी उत्पादकतेमुळे सर्वच स्थरातील अभ्यासक, शास्त्रज्ञ, तज्ज्ञ चिंतेत आहेत. या निमित्ताने आपल्यासारख्या जगभरातील हितचिंतकांनी उपाययोजनेसाठी कटिबद्ध झाले पाहिजे. जिच्यावर जगतोय, तीच मृदा आजारी पडली तर आपण कसले सुदृढ राहणार? तेव्हा जंगलतोड थांबवून वृक्ष लागवड वाढवावी लागेल. कुरणे सांभाळावी लागतील. वाहून जाणाऱ्या मातीला जागीच आडविण्यासाठी शेतीचे लहान लहान तुकड्यांत बांधबंदिस्ती करून योग्य उतार देऊन विशिष्ट उंचीवरून पाणी बाहेर काढून द्यावे लागेल. त्यामुळे पावसाच्या पाण्यासोबत सकस माती वाहून जाणेही थांबेल. नाल्यावर वेगवेगळी बांध घालावी लागतील. माथा ते पायथा सर्व उपाययोजना करणे क्रमप्राप्त ठरते आहे. मातीऐवजी थर्मलची राख (फ्लाय ॲश), दगडाची कच, सिमेंटच्या विटांचा वापर वाढवावा लागेल. रासायनिक कीडनाशके, तृणनाशके न फवारता सेंद्रिय, जैविक पद्धतीने पिके घेतली तरच मातीतील जीवाणूंची वाढ होऊन ती सजीव होईल.

मोकाट व पाट पाण्याऐवजी सूक्ष्म सिंचनाचा वापर करावा लागेल. योग्य निचरा पद्धती वापरून जमिनीत हवा खेळती राहील जेणेकरून जीवाणू वाढतील. वेगवेगळ्या मार्गाने होणारी मातीची धूप रोखावी लागेल. जसे कुरणे, गवत, वृक्ष, झुडुपे, गुरांना चराऊ बंदी, औद्योगिक कारखान्यातून विषारी घटक नदी-नाल्यांत सोडणे रोखून त्याची योग्य विल्हेवाट लावावी लागेल. तरच माती सशक्त व सुदृढ होईल. मातीची आरोग्य तपासणी दरवर्षी करावी लागेल. मातीतील कमतरतेनुसार हिरवळीची खते, पिकांची फेरपालट, सेंद्रिय खतांचा वापर, जैविक आच्छादन, द्विदल पिकांचे अवशेष न जाळता योग्यवेळी मातीत गाडले तर तिचे भरण पोषण होईल. त्यामुळे निघणारे अन्नधान्य, फळे, भाजीपाला जास्तीची व निरोगी निघेल. त्यावरच मानव प्राण्याचे आरोग्य अवलंबून आहे हे विसरून चालणार नाही. पिकांचे कुठलेच अवशेष, गवत काडी कचरा न जाळता त्यापासून गांडूळखत, सेंद्रिय खते बनवून शेतीत फेरवापर वाढवावा लागेल. त्यामुळे पाणी धारणा क्षमता वाढेल व जीवाणू वाढून घसरलेल्या सेंद्रिय कर्बाची टक्केवारी वाढेल. रमेश चिल्ले :  ९४२२६१०७७५ (लेखक शेती व पर्यावरणाचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com