पुढच्या पिढीच्या हवाली करूया सुपीक जमीन

१९९० मध्येच आम्ही शेतातील धसकटे गोळा करणे बंद करून टाकले. धसकटे गोळा करण्याचा पैसा, मजूरबळ वाचले, रानाला सेंद्रिय खतही मिळाले.
sampadkiya
sampadkiya

अनुभवातून मला हे शिकावयास मिळाले, की जमिनीत वाढणारा भाग म्हणजे बुडखा व मुळांचे जाळे यांपासून सर्वांत उत्तम दर्जाचे खत तयार होते. जमिनीपासून जो-जो वर-वर जावे तसे हलक्‍या हलक्‍या दर्जाचे खत होते. पानाचे खत सर्वांत हलके. जनावरांच्या शेणाचे खत हेही प्रामुख्याने हलक्‍या दर्जाचे असते. आपली आज तरी सर्व भिस्त या शेणखत कंपोस्टच्या वापरावरच आहे. उत्तम दर्जाचे खत देणारे बुडखा व मुळाचे जाळे हे आज धसकटे म्हणून गोळा करून बाहेर टाकले अगर जाळले जातात. असे करणे ही आपली शास्त्रीय शिफारस आहे. १९९० मध्येच आम्ही धसकटे गोळा करणे बंद करून टाकले. धसकटे गोळा करण्याचा पैसा, मजूरबळ वाचले, रानाला सेंद्रिय खतही मिळाले.

ऊर्जास्रोत कर्ब कुजणाऱ्या पदार्थात एक नत्राच्या भागाला किती कर्बाचे भाग आहेत, यावर त्याचे कर्ब/नत्र गुणोत्तर ठरते. कमी गुणोत्तराचे पदार्थ लवकर कुजतात; तर जास्त गुणोत्तराचे पदार्थ उशिरा कुजतात. गुणोत्तर कितीही असूदे, खत तयार होत असता जिवाणू त्यातील कर्ब वापरून संपवितात व हे गुणोत्तर कमी कमी होत जाते. कुजण्याची क्रिया पूर्ण झाल्यानंतर हे गुणोत्तर २० च्या दरम्यान येते. याचा अर्थ १ नत्रास २० कर्ब. हा कर्ब ऊर्जास्रोत असतो व त्यावर जिवाणूंचे कार्य चालते. २० पाशी ही क्रिया का थांबते? याचे कारण २० पाशी कुजविणाऱ्या गटातील जिवाणूंचे काम संपते. पुढील शिल्लक २० ऊर्जा पीक पोषण गटातील जिवाणूसाठी राखून ठेवून पहिल्या गटातील जिवाणू आपले काम थांबवितात. हे खत ज्या वेळी शेतात जाते, त्यावेळी या २० कर्बाचा वापर अन्नपोषण गटातील जिवाणू करतात. ज्यावेळी संपूर्ण कर्बाचा वापर होऊन कर्ब संपतो त्यावेळी अन्नद्रव्याचे सेंद्रिय स्वरूप संपते व रासायनिक स्वरूपात अन्नद्रव्ये रूपांतरित होतात. पिके फक्त अशा रासायनिक स्वरूपातील अन्नद्रव्येच खातात. आपण सेंद्रिय खतातून दिलेला कर्ब हा फक्त जिवाणूंच्या कार्यासाठीच असतो. पिकाच्या अंगात ८० ते ८५ टक्के कर्बाचे प्रमाण असते. पीक जमिनीतून कधीही कर्ब घेत नाहीत. फक्त हवेतूनच प्रकाश संश्‍लेषणात घेतात. जो पर्यंत एखादे अन्नद्रव्य कर्बाशी जोडलेले असते त्याला सेंद्रिय म्हटले जाते. उदा. सेंद्रिय नत्र, स्फुरद वगैरे अशी सेंद्रिय अन्नद्रव्ये पाण्यात विरघळणाऱ्या अवस्थेत नसतात. म्हणून पिकाला उपलब्ध अवस्थेत नसतात. कर्ब संपल्यावर ती रासायनिक अवस्थेत म्हणजे पाण्यात विरघळणाऱ्या अवस्थेत म्हणजेच पिकाने खाण्याच्या अवस्थेत येतात. पाण्यात विरघळणाऱ्या अवस्थेतील खते सर्वांत नाशवंत असतात; तर सेंद्रिय स्वरूपातील अन्नद्रव्यांचा नाश होत नाही. पिकाची अन्नद्रव्ये नाश पावू नयेत म्हणून निसर्गात केलेली सोय केवळ थक्क करणारी आहे. 

शेणखत आणि गांडूळ खत २० कर्ब/नत्र गुणोत्तरापासी कुजून खत तयार होते. यापुढील कर्ब संपविण्याचे काम या गटातील जिवाणू करीत नाहीत. जिवाणू जगात त्यांना नेमून दिलेल्या कामापाशीच थांबावयाचे, हे संकेत तंतोतंत पाळले जातात. हे ही एक आश्‍चर्यच आहे. कर्ब/नत्र कमी कमी होणे म्हणजे अन्नद्रव्याची उपलब्धतेकडे वाटचाल. शेणखताऐवजी गांडूळ खत तयार केले तर हेच गुणोत्तर १२ पाशी येऊन थांबते. याचा अर्थ शेणखतातील अन्नद्रव्याच्या तुलनेत गांडूळ खतातील अन्नद्रव्ये लवकर उपलब्ध होतात. यामुळे गांडूळ खत टाकल्यानंतर त्याचे परिणाम जलद दिसतात. याचा अर्थ शेणखतापेक्षा गांडूळ खत भारी, असा होत नाही. काही काळानंतर शेणखताचेही परिणाम तितकेच दिसू शकतात.  आज सुपीकता कमी झाली, असे म्हटले जाते ते सेंद्रिय कर्बाच्या अभावी पीकवाढीसाठी जिवाणूंना योग्य पातळीवर काम करता येत नाही म्हणून उत्पादन घटते. इथे शेतकरी जास्त रसायनांचा वापर करण्याचा पर्याय निवडतो. सेंद्रिय कर्बाऐवजी जादा रासायनिक खते टाकणे हा चुकीचा पर्याय होतो. भू सूक्ष्म जीवशास्त्राच्या अभ्यासाविषयी अशा चुका चालू आहेत, यावर योग्य शास्त्रीय प्रबोधन होत नाही.

सेंद्रिय कर्ब का झाले कमी? सेंद्रिय कर्बाचा जितका वापर होऊ लागला त्यापेक्षा जास्त जमिनीला परत देणे गरजेचे होते. आपण तिकडे दुर्लक्ष केले. हळूहळू सेंद्रिय कर्बाची टक्केवारी धोक्‍याच्या पातळीच्या खाली गेली व उत्पादकता घटू लागली. हरितक्रांतीच्या काळात पीकवाढीसाठी सेंद्रिय कर्बाचा वापर होतो तो संपत जाऊन पुढे सुपीकतेचे प्रश्‍न निर्माण होतील, याती कल्पना शास्त्रज्ञानाच नव्हती. सेंद्रिय खत व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे हरितक्रांती बदनाम झाली, हे आजही मान्य केले जात नाही. यात कोणालाही वैयक्तिक दोष देता येणार नाही. तत्पूर्वी हा प्रश्‍नच मुळातून नव्हता. तो सहज लक्षात येणेही शक्‍य नव्हते. या काळात बैल गेले व यंत्रे आली. सेंद्रिय खताची उपलब्धता कमी झाली. यंत्रामुळे जास्त क्षेत्रात पेरणी होऊ लागली. दुसऱ्या बाजूला सुपीकता व उत्पादकता कमी होण्याचा वेग इतका मंद असतो की ते सहजासहजी ध्यानात येत नाही. सूक्ष्म जीवशास्त्र विषयाकडे दुर्लक्ष हे तर महत्त्वाचे कारण आहेच. उत्पादकता कमी झाल्यावर शेतकरी भांबावला. काही विचारवंतांनी शोध लावला ही सर्व रसायनांची किमया आहे. रसायनांचा वापर बंद करा. सेंद्रिय शेती करा. आज सेंद्रिय शेतीचा प्रसार व प्रचाराला २५ वर्षे होऊन गेली. ही पद्धत शेतकऱ्यांत फार लोकप्रिय होऊ शकली नाही. येथे कोणाला दोष देण्याची इच्छा नाही. ही एक स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. हरितक्रांतीच्या ४०-४५ वर्षांच्या काळात आपण सर्वांनी जमिनीची भरपूर वाट लावली आहे. 

जवळपास १.५ ते २ पिढ्यांतील हे काम आहे. सरकारी यंत्रणा आज सांगते, आम्ही कधीच फक्त रसायनांच्या वापराच्या शिफारशी केल्या नाहीत. त्याबरोबर सेंद्रिय खत वापराबाबतच्या शिफारशीकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले. फक्त शेणखत, कंपोस्ट, हिरवळीचे खत या मार्गातून जमीन कधीच सुपीक करता येणार नाही. याच्या वापराला अनेक मर्यादा आहेत. यावर स्वस्त सुलभ पर्याय शेतकऱ्यांना सुचविणे गरजेचे होते ते काम मात्र आजही झालेले नाही. वनस्पती अगर प्राण्यांनी निर्माण केलेला कोणताही पदार्थ खत म्हणून वापरता येतो, असे सांगितल्यास सेंद्रिय खतासाठीच्या कच्च्या मालात इतकी वाढ होते की सेंद्रिय पदार्थांची कमतरता हा प्रश्‍नच संपून जातो; परंतु यासाठी वेगवेगळ्या परिस्थितीसाठी वेगवेगळी तंत्रे विकसित करावी लागतात. तसे करण्याचे काम कुशलतेचे आहे, ते सर्वसामान्य शेतकऱ्याच्या बौद्धिक पातळी पलीकडचे आहे. यासाठी लागणाऱ्या सर्जनशीलतेचे शेती व शेतकऱ्यांत दुर्भिक्ष आहे ही खरी मर्यादा आहे. 

आपण उष्ण कटिबंधात शेती करतो यातून आणखी काही मर्यादा येतात. हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. विज्ञानाच्या अभ्यासामुळे मला नवीन मार्ग सापडले. खराब झालेल्या जमिनी पूर्ववत झाल्या. वडिलांकडून मला मिळालेली जमीन सुपीक होती. तशीच ती परत खराब होणार नाही, असे बिन खर्चिक तंत्रही दिले. हेच समाधान समस्त शेतकरी बंधूंना मिळावे व परत एकदा उत्तम शेतीच असावी केवळ याचसाठी हा लेखन प्रपंच.

P. R. CHIPLUNKAR (लेखक प्रगतिशील शेतकरी आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com