आपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो पुढे या...!

टेक्सासमधील कृषीचे विद्यार्थी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या अडीअडचणी जाणून त्यावर आधारित प्रकल्प तयार करतात. भारतीय कृषी क्षेत्र आज अनेक समस्यांनी ग्रासलेले असताना कृषीच्या विद्यार्थ्यांनी त्यावर मात करण्यासाठी पुढे यायला हवे.
संपादकीय
संपादकीय

अमेरिकेमधील टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत कृषी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी टेक्सास राज्याच्या शाश्वत कृषी विकासासाठी सुरू असलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास पात्र आहेत. एका परिषदेनिमित्त मी २०१४ मध्ये तेथे गेलो असता, एका शेतास भेट देण्याचे ठरविले. प्रचंड मोठे शेत एका दिवसात फिरून पाहणे शक्य नव्हते म्हणून फक्त शेतमालकास भेटलो. त्या वेळी तेथे कृषी शिक्षण घेणारा एक विद्यार्थीसुद्धा होता. टेक्सासमधील कृषीचे विद्यार्थी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या अडीअडचणी जाणून तसेच त्यांची पीक पद्धती, पाण्याचे नियोजन आणि उत्पादन यावर आधारित त्यांचा प्रकल्प तयार करतात. प्रकल्प निवडीच्या वेळी प्रोफेसर आणि सर्व विद्यार्थी एकत्र येतात.

प्रत्येक विद्यार्थी त्याच्या शेतभेटीचा वृत्तांत देतो आणि त्यावर आधारीत प्रकल्पाची नोंदणी होते. कोठेही पुनरावृत्ती होत नाही. विद्यार्थ्याचे कृषी महाविद्यालयाच्या संशोधन क्षेत्रावर झालेल्या प्रयोगाचे शेतकऱ्यांच्या गटाकडूनच अवलोकन केले जाते. राज्याची गरज आणि त्याच्या आवश्यकतेनुसारच कृषी संशोधन असावयास हवे आणि त्यात शिक्षण घेणाऱ्या कृषी विद्यार्थ्यांचा सुरवातीपासूनच पूर्ण सहभाग असावा यावर विद्यापीठ आणि कृषी महाविद्यालयाचे संपूर्ण लक्ष असते. आपल्याकडे असे घडते का? विद्यार्थ्याच्या संशोधनाचे हजारो प्रबंध ग्रंथालयात असतात. हे प्रबंध शेतकऱ्यांना उपयोगी पडण्याऐवजी विद्यार्थ्यांनाच पुन्हा उपयोगी पडतात याचे दु:ख वाटते. व्यावसायिक क्षेत्रात पदवी घेतलेला विद्यार्थी पुन्हा त्याच क्षेत्रात गेला पाहिजे यावर विकसित राष्ट्रात भर दिला जातो. त्यासाठी रोजगार निर्मिती होते, एवढेच काय पण किती रोजगार निर्मिती होणार तेवढेच विद्यार्थी प्रतिवर्षी प्रशिक्षित करण्यावर विद्यापीठे आणि महाविद्यालयांचा भर असतो.  

भारतात आज ६७ कृषी विद्यापीठे आहेत. त्यातील चार महाराष्ट्रातच आहेत आणि त्याअंतर्गत विविध कृषी महाविद्यालयांच्या संस्था तब्बल १७३ आहेत. २०१७ मध्ये ५१ हजार ८२२ विद्यार्थ्यांनी कृषी शाखेसाठी अर्ज केले. या वर्षी हीच संख्या ६४ हजार ६१९ एवढी म्हणजेच २५ टक्के वाढ दर्शविते. म्हणजेच एकूण उपलब्ध १४ हजार ५५७ जागासाठी एकास चार ही अशी गर्दी आहे. राज्यातील एकंदरीत कृषी क्षेत्राची शोकांतिका, अपुरा पाऊस, दुष्काळ आणि कुठेही शेतीसाठी योग्य पोषक वातावरण नसताना कृषी विद्याशाखेकडे मुलामुलींचा एवढा ओढा का वाढलाय? यावर मंथन होणे गरजेचे आहे. खरेच एवढे कृषी विद्यार्थी पदवीधर झाल्यावर शेतीकडे अथवा कृषी निगडित व्यवसायाकडे येतात का? आणि आले असते तर आज आपण शेतीचे जे चित्र पाहतो असे राहिले असते का?

गेल्या दीड दशकापासून सर्वत्र स्पर्धा परीक्षांचे पेव फुटले आहे. उत्तरेकडील अनेक कृषी विद्यापीठांत मुले पदव्युत्तर आणि संशोधन अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. मात्र तयारी स्पर्धा परीक्षेची चालू असते. प्रयत्न करून त्यात ते उत्तीर्ण होतात आणि कृषी शिक्षण अर्धवट सोडून ज्याचा कृषी क्षेत्राशी काडीचाही संबंध नाही, अशा जागेवर रुजू होतात. आपल्याकडेसुद्धा परिस्थिती फार वेगळी नाही. कृषी, वैद्यकीय, अभियांत्रिकीची मुले जिथे त्यांची गरज आहे तेथे न जाता स्पर्धा परीक्षांना बसतात आणि यशसुद्धा मिळवतात. विविध क्षेत्रांतील या मुलांनी प्रशासन सेवेत जरुर यावे. परंतु एवढ्या कष्टाने मिळवलेले त्यांचे व्यावसायिक ज्ञान आणि त्याचा समाजाला होणारा फायदा वाया जातो. विद्यार्जनाची ही फार मोठी राष्ट्रीय हानी आहे. 

मागील वर्षी सिव्हिल सर्व्हीस परीक्षेच्या ९९० जागा भरल्या गेल्या. त्यासाठी तब्बल दहा लाख मुले त्या परीक्षेला बसली. उरलेल्या ९ लाख ९० हजार मुलांचे काय झाले माहीत नाही. देशामधील बुद्धिमान तरुणांनी देशाच्या प्रगतीसाठी त्यांचे योगदान द्यावे, पेंटट मिळवावेत, कृषी, विज्ञान, वैद्यकीय, अभियांत्रिकी, संरक्षण क्षेत्रात नवीन शोध लावावेत, ज्ञानाचा उपयोग नाविन्यपूर्ण संशोधन आणि ते प्रत्यक्ष राबविण्यासाठी करावा हे अपेक्षित आहे; पण तसे घडतच नाही. हिरोसिमा, नागासाकीसह अर्धा जपान दुसऱ्या महायुद्धात उद्ध्वस्त झाला. नवीन जपान नव्या उमेदीने घडविण्यासाठी त्या देशाने तरुणांना आवाहन केले. त्यामध्ये कृषी आणि अभियांत्रिकी पदवीधर आघाडीवर होते. जपानमधील आजची कृषी, यांत्रिकी आणि वाहतूक क्षेत्रामधील प्रगती डोळे दिपून टाकणारी आहे. सर्व जगाने जपानला युद्धप्रेरित राष्ट्र म्हणून बाजूस टाकले असताना हे सर्व घडले आणि यास जबाबदार होते ते राष्ट्रप्रेमाने भारलेले तेथील व्यावसायिक क्षेत्रामधील पदवीधर तरुण. 

आज आपल्या देशाला कृषी, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्रामधील उच्च प्रगतीसाठी त्या क्षेत्रामधील हुशार पदवीधरांची नितांत गरज आहे. स्वातंत्र्यप्राप्ती होऊन ७० वर्ष झाली, पण आजही दुर्गम आदिवासी भागात तज्ज्ञ डॉक्टर नाहीत. आयआयटीमधून पीएच.डी झालेले तरुण परदेशात जातात, तेथेच स्थायिक होतात, हे चित्र कुठेतरी बदलावयास हवे. शासन, प्रशासन कमी पडतेय हे मान्य असले तरी परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी तरुण शिक्षित पिढी समर्थ आहे.

भारतीय कृषी क्षेत्र आज अनेक समस्यांनी ग्रासलेले आहे. भूगर्भातील आटलेले पाणी, कोरड्या नद्या आणि जलाशये, जमिनीचे खालावलेले आरोग्य, वाढलेले क्षार, शेतांचे होत असलेले वाळवंट, रासायनिक खते, किडीचा प्रभाव, शेतकऱ्यांचा कर्जबाजरीपणा आणि आत्महत्या यावर शाश्वत उपाय हवा असेल तर फक्त शासनाला पुढे ढकलून काम होणार नाही, यासाठी कृषी पदवीधरांनी या क्षेत्रातच येऊन शेतकऱ्यांना धीर आणि आत्मविश्वास देण्याची गरज आहे. दुष्काळाचे निर्मूलन अशा लोकचळवळीमधूनच होऊ शकते. सततच्या गारपिटीमुळे फ्रान्समधील द्राक्ष शेती धोक्यात आली तेव्हा तेथील कृषी विद्यार्थ्यांनी द्राक्ष क्षेत्राला संरक्षण देण्यासाठी पॉली फिल्मचे उघड झाप करणारे स्वयंचलित आवरण तयार केले आणि प्रत्येक शेतावर जाऊन शेतकऱ्यांना ते समजावून दिले. द्राक्ष शेतीचा गारपिटीपासून बचाव झाला आणि तेथील ‘वाइन’ व्यवसाय पूर्णपणे सावरला गेला. 

सध्याचा दुष्काळ हा सर्वांसाठीच अत्यंत कठीण काळ असल्यामुळे त्याची जबाबदारी शासनावर ढकलून चालणार नाही. या आपत्ती निर्मूलनामध्ये प्रत्येकाचा सहभाग हवा, विशेषत: कृषी विद्यार्थ्यांचा जास्त; कारण ही सर्व शेतकऱ्यांची मुले आहेत. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्नांची उकल लवकर होते हे मी पाहिलेले आणि अनुभवलेलेसुद्धा आहे. त्र्यंबकेश्वर जवळच्या ब्रह्मगिरी पर्वतावर गोदावरीच्या उगमापासून ते पायथ्यापर्यंत नदीचा गुप्त प्रवाह शाश्वत करण्यासाठी नाशिकमधील हजारो विद्यार्थ्यांनी केलेले कार्य अतिशय मोलाचे आहे. ठाणे शहरामधील अस्तंगत होणारा मासुंदा तलाव वाचवून तो सुंदर करण्याचे कार्यसुद्धा तेथील शाळेतील विद्यार्थ्यांनीच केले. ज्या उद्देशाने विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतला आहे त्या ज्ञानाचा उपयोग त्याच क्षेत्रासाठी आणि समाजासाठी झाला तरच त्याचे चीज होते. अन्यथा तो राष्ट्रीय संपत्तीचा नाश ठरतो. म्हणूनच सध्याचा दुष्काळ ही कृषी विद्यार्थ्यांसाठी अनमोल संधी आहे. अशा संधीमधून विद्यार्थ्यांस व्यावसायिक शाश्वत शिक्षण मिळत असते.

डॉ. नागेश टेकाळे : ९८६९६१२५३१ (लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com