Agriculture stories in Marathi, agrowon special article on study tour | Agrowon

अभ्यास दौरे कसे असावेत?
कांचन परुळेकर
मंगळवार, 9 जानेवारी 2018

फालतू चर्चेत वेळ न घालविता मला सर्व दिसले पाहिजे, समजले पाहिजे, या जिज्ञासू वृत्तीने निरीक्षण करा. विचारपूर्वक प्रश्‍न विचारा. जरूर तेथे टिपणे घ्या, लिखित साहित्य मिळवा.

महिलांचे खऱ्या अर्थाने सक्षमीकरण व्हावे असे वाटत असेल तर तिला घराबाहेर, गावाबाहेर घेऊन जगात काय चालले आहे दाखवावे लागेल. रांधा वाढा, उष्टी काढा या कामांना विशिष्ट वेळेत संपवून जग पाहण्यासाठी महिलांनी वेळ काढायलाच हवा. अभ्यास भेटीला गटाने गेल्यामुळे संघभावना वाढीस लागेल. सरावाने घर, कुटुंब, शेती, गाव सुधारण्यास आवश्‍यक व्यक्तिमत्त्व घडेल. माहिती, ज्ञान प्राप्त होईल. अनेक शेती प्रयोग, शेती प्रदर्शने, बाजारपेठा, शेतकरी प्रशिक्षण केंद्रे, शासकीय कार्यालये, कृषी विज्ञान केंद्रे, संशोधन केंद्रे पाहायला हवीत. शेती तज्ज्ञ, उत्तम कार्यासाठी आयुष्य वेचलेल्या ज्येष्ठ व्यक्तींशी बातचीत, शासकीय अधिकाऱ्यांशी सुसंवाद साधला पाहिजे. आपली तीर्थयात्रा ज्ञानयात्रा व्हायला हवी. 

स्वयंसिद्धा, स्वयंप्रेरिका, डॉ. व्ही. टी. पाटील फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्या आणि लाभार्थींना आम्ही प्रथमपासूनच अभ्यास दौऱ्याची सवय लावली आहे. आजवर अनेक उद्योगांना, सेवाभावी प्रकल्पांना, प्रदर्शनांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. शेतकऱ्यांना दापोली कृषी विद्यापीठ, शेती प्रदर्शन, पाडेगाव ऊस संशोधन केंद्रे, नारायणगाव शेळीपालन प्रयोग, बारामती कृषी विज्ञान केंद्र, वारणा उद्योग समूह, ॲग्रोवन प्रदर्शने, चर्चासत्र अशा ठिकाणी नेले आहे. ग्रामपंचायत सदस्यांना राळेगणसिद्धी, हिवरे बाजार, पाबळ विज्ञान केंद्र, युसूफ मेहेर अली सेंटर, आरती फलटण अशा अनेक ठिकाणी घेऊन गेलो. अण्णा हजारे, पोपटराव पवार, कै. अप्पासाहेब पवार, जव्हार संशोधन केंद्रातले शास्त्रज्ञ अशा अनेक तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

प्रवासात कुणीही घरगुती गप्पा, एकमेकांची उणीदुणी, नसलेल्या व्यक्तीबद्दल चर्चा करायची नाही. महिलांनी तुझी साडी, माझी साडी, तुझा नवरा, माझा नवरा आणि पुरुषांनी गावचे राजकारण याबाबत प्रवासात शब्दसुद्धा काढायचा नाही, ही कडक ताकीद. फालतू चर्चेत वेळ न घालविता मला सर्व दिसले पाहिजे, समजले पाहिजे, या जिज्ञासू वृत्तीने निरीक्षण करा. विचारपूर्वक प्रश्‍न विचारा. जरूर तेथे टिपणे घ्या, लिखित साहित्य मिळवा. सहभोजन, सहविचार, स्फूर्तिदायी गीते व घोषणा, सहगायन, दर्जेदार विनोद याची मजा चाखा, शक्‍य असल्यास प्रवासात व्यक्तिमत्त्व विकास, उद्योग, शेतीविषयक सीडी पाहा. मुक्कामाच्या ठिकाणी वा सहल समाप्तीनंतर जे पाहिले, ऐकले याची उजळणी करा. दौऱ्यातील ७५ टक्के वेळ या गोष्टींसाठी अन्‌ २५ टक्के वेळ निसर्गाचा मेवा अन्‌ ठेवा चाखणे, देवदर्शन, खरेदी यासाठी द्या, अशी शिकवण दिली. साहजिकच अभ्यास दौऱ्यामुळे, भेटीमुळे लाभार्थ्यांमध्ये संघभावना, उद्योजकता, सेवाभाव, विकासाची जाणीव, शेतकऱ्यांबाबत आस्था, उत्तम कार्य करणाऱ्यांबाबत आदरभाव, सामाजिक भान, याबाबतच्या जाणिवा रुजत आहेत. स्वयंसिद्ध बनविण्याच्या वाटेने ते मार्गक्रमण करत आहेत.

अभ्यास दौऱ्यासाठी शासनानेही विविध योजनांत भरपूर निधी ठेवला आहे. पण उद्दिष्टपूर्तीकडे दुर्लक्ष करत परदेश दौऱ्यावर मंत्री, आमदार यांच्या नातेवाइकांची वर्णी लावली जाते. कधी कधी मंत्र्यांच्या मुला-मुलींच्या लॉचिंगसाठी भव्य प्रदर्शन आयोजित करून सर्व योजनांतील अभ्यास दौऱ्याचा पैसा विशिष्ट स्थळी दौरा आयोजित करण्यासाठी खर्च केला जातो. योजनांतील काही दौरे कागदावरच आखलेले असतात अन्‌ काही वेळेला महिला लाभार्थीऐवजी पुरुष लाभार्थींना स्वीकारले जाते.

‘कृषी क्षेत्रात महिलांचा अधिक कार्यक्षम सहभाग वाढविणे’ अशी शासकीय योजना राबविली जात होती. कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रशिक्षणाची धुरा आमच्याकडे होती. बाजारपेठ सर्वेक्षण यासाठी निधी योजनेत होते. आम्ही महिला गटांना मार्केट यार्ड, गूळ संशोधन केंद्र, कपिलतीर्थ मार्केट आणि जे जे शेतमाल खरेदी करतात ती ठिकाणे दाखवत असू. स्वयंसिद्धाच्या महिलांचा आठवडी बाजार, उर्वरित वेळेत महालक्ष्मी दर्शन, तनिष्का शोरूम दाखविली जाई. वाटेत एखादा यशस्वी शेती, पशुपक्षीपालन प्रयोग दाखविला जाई. पण हे सर्व टाळून सर्वांना परभणीला घेऊन या, बाजारपेठ सर्वेक्षण निधी त्यावर खर्च करा, असे आदेश येताच सर्वप्रथम या गोष्टीला मी तीव्र विरोध केला. गगनबावडा, पन्हाळा या दुर्गम भागातल्या महिला परभणीला जाऊन काय शिकणार? कोणत्या प्रकारची बाजारपेठ विकसित करणार? का दीर्घ प्रवास, अतिरिक्त पैसा खर्च यासाठी महिलांना वेठीला धरता, असा सवाल उपस्थित केला. दावणीला बांधलेल्या अधिकाऱ्यांनी तुमच्या संस्थेला  काळ्या यादीत टाकू, अशी धमकी दिली. कोणाच्याही धमकीला भीक न घालता आम्ही महिलांना परभणीला पाठवले नाही. ज्या संस्था वरिष्ठांच्या दबावाला घाबरून महिलांना घेऊन गेल्या त्यांचे हाल पाहून वाईट वाटले.

१९९४ चा एक मजेदार किस्सा आठवतो. व्याख्यानासाठी मला कुठेही निमंत्रित केले, की मी बरोबर चार-पाच कार्यकर्त्यांना घेते. अन्‌ एखादी अभ्यासभेट घडविते. त्या दिवशी व्याख्यानानंतर जवळच्या सेवाभावी संस्थेस भेट देण्यास गेले. सोबत स्वयंसिद्धाच्या कार्यकर्त्या होत्या. प्रवेशद्वारातून आत जाताच महत्‌प्रयासाने एका तरुणीने स्वागत केले. संपूर्ण प्रकल्प दाखवेपर्यंत ती नकारार्थीच बोलत होती. तक्रारीचा पाढा, व्यवस्थापनाबद्दलची नाराजी आणि गतिहीन उपक्रम बंद पडत चालल्याची माहिती ती देत राहिली. शेवटी ९५ वर्षे वयाच्या संस्थापिकांचे दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो. प्रसिद्धी माध्यमांनी उदो उदो केलेली संस्था, त्यामुळे पाहायला गेलो, पण पदरी प्रेरणेऐवजी घोर निराशा आली. मनुष्यबळ विकसन, उत्तम कार्यकर्त्यांची घडण यावर लक्ष न देता फक्त इमारती, जागा, प्रकल्प विस्तारत राहिलो तर कालांतराने संस्थेची अन्‌ ध्येयवादी संस्थापकांची अवस्था काय होते, हे ‘याची डोळा याची देही’ पाहिले.

शासकीय अनुदाने संस्था व कर्मचाऱ्यांना पंगू बनवितात. अनुदानाविना संस्थेची अवस्था दिनवाणी, वैफल्यग्रस्त, नकारार्थी कशी बनते याचे प्रत्यंतर आले. आपल्या संस्था कधीही कोणावरही अवलंबून ठेवता कामा नयेत, कार्यकर्ता कायम उत्साहाचा अखंड झरा बनला पाहिजे. यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहायचे हे ठरवून टाकले. परतीचा प्रवास सुरू झाला अन्‌ माझ्या कार्यकर्त्यांनी हल्लाबोल सुरू केला. ‘ताई काय दाखवायला आणले तुम्ही?’ या भेटीने कसली प्रेरणा मिळणार आम्हाला?’’ मी पण पटकन त्यांना उत्तर दिले, ‘‘अगं संस्था कशी चालवू नये, पुढची पिढी घडविली नाही, ती कार्यक्षम नसेल तर ध्येयवादी संस्थेची कशी विकलांग अवस्था होते ते आज तुम्ही पाहिलेत. आपली संस्था कशी नसावी हे आपल्याला कधी समजले असते का?’ असे म्हणताच सगळ्याजणी चपापल्या. त्या दिवसापासून आमच्या तीनही संस्थांत दर्जेदार काम, त्यांची सुयोग्य संघभावना या गोष्टींना प्रारंभ झाला अन्‌ आजवर या गोष्टी जपल्या जातात.     
कांचन परुळेकर : ०२३१- २५२५१२९
(लेखिका स्वयंसिद्धाच्या संचालिका आहेत.)

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...