आंतरराष्ट्रीय सुबाभूळ परिषदेच्या निमित्ताने...

२९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०१८ या काळात ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनमध्ये या वर्षीची आंतरराष्ट्रीय सुबाभूळ परिषद होणार आहे. या परिषदेनंतर पूर्व इंडोनेशियातील गुरांचा व्यवसाय करणाऱ्या छोट्या शेतकऱ्यांच्या शेतांचा दौराही आयोजित केला आहे. शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घ्यायला हवा.
संपादकीय
संपादकीय

पोषण हा पशुपालनातील सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. जर पोषण सुधारले तर पशूंची आणि त्यांच्यापासून मिळणाऱ्या दुधासारख्या उत्पादनांची विक्री वाढू शकते. ग्रामीण भागातील उपजीविका सुधारण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. चाऱ्यासाठी शिंबीवर्गीय (leguminous) झाडे वापरल्यास पोषण आश्चर्यकारकरीत्या सुधारून पशूंच्या उत्पादकतेत वाढ होत असल्याचा अनुभव जगभरात अनेक ठिकाणी आलेला आहे. यातही सुबाभूळ (Leucaena leucocephala) या मध्य अमेरिकेतून आणलेल्या झाडाचा अनेक देशांत मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्यात येत आहे.  २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०१८ या काळात ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनजवळच्या युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलंडच्या सेंट लुशिया विद्यापीठ क्षेत्राच्या रम्य परिसरात या वर्षीची आंतरराष्ट्रीय सुबाभूळ परिषद होणार आहे. याबद्दलची अधिक माहिती www.leucaenaconference2018.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. परिषदेचे पहिले तीन दिवस सुबाभळीचा चारा म्हणून मोठ्या प्रमाणावर उपयोग करणाऱ्या ऑस्ट्रेलियन गोपालकांच्या शेतांचा दौरा काढण्यात येईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष परिषदेचे आयोजन केलेले आहे. परिषदेत सुबाभळीशी संबंधित परिचय आणि पार्श्वभूमी, सुबाभळीचे जर्मप्लाझम आणि विविधता, झाडांचे व्यवस्थापन, जनावरांचे व्यवस्थापन, सुबाभळीचे पर्यायी उपयोग, पर्यावरण आणि सुबाभूळ, सुबाभळीचा जनावरांच्या जलद वाढीसाठी अंगिकार आणि त्याचे अर्थशास्त्र, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, कोलंबिया, मेक्सिको आणि इतरत्र सुबाभूळ खाद्यप्रणालीच्या वापराची विशिष्ट उदाहरणे, सुबाभूळ उत्पादनाच्या जैवऊर्जा आणि इतर उपयोगांसाठी भावी काळातील व्यवस्था, पुढे काय? प्राधान्यक्रम आणि भविष्यातील उपक्रम आदी विषयांवर ऊहापोह करण्यात येईल. या परिषदेसाठी जगभरातून अनुभवी शास्त्रज्ञ, विस्तार कार्यकर्ते आणि शेतकरी यांना व्याख्यानासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. सुबाभळीची लागण दरवर्षी करण्याची गरज नसते आणि एकदा कापल्यावर झाडांची परत झपाट्याने वाढ होते. तीन ते चार महिन्यांच्या कालांतराने पाला कापता येत असल्यामुळे वर्षाला ३ ते ४ कापण्या मिळतात. पाला सहजपणे कापून त्याची वाहतूक करता येते. शिवाय चाऱ्याबरोबर सरपण आणि लाकूडही मिळते. सुबाभूळ हे झाड असल्यामुळे त्याची मुळे जमिनीत खोलवर जातात आणि गवताचे दुर्भिक्ष्य असताना कोरड्या हंगामातही ती हिरवा चारा पुरवतात. महत्त्वाचे म्हणजे जनावरांना खायला दिल्यावर या पाल्यामुळे त्यांच्या वजनात लक्षणीय वाढ होऊन त्यांचे आरोग्यही सुधारते.

इंडोनेशिया या देशाने सुबाभळीसारख्या शिंबीवर्गीय झाडांचा उपयोग स्वतःच्या जनावरांना उच्च प्रतीचा प्रथिनयुक्त चारा पुरवण्यासाठी विशेषतः लहान शेतकऱ्यांना कसा करून घेता येईल, हे दाखवून दिले आहे. इंडोनेशियातील १.५ कोटी मांसासाठी पाळलेल्या गुरांपैकी ६० टक्के लहान शेतकऱ्यांकडे आहेत आणि त्यासाठीची १४ टक्के बाजारपेठ न्युसा टेन्गारा येथे आहे. याचप्रमाणे संबावा बेटावर बालीच्या शेतकऱ्यांनीही अनेक वर्षांपासून सुबाभळीवर गुरे वाढवण्याची पद्धत अंगिकारली आहे. उदाहरणार्थ, येथील जतीसरी या खेड्यात अनेक शेतकरी आपल्या गुरांना १०० टक्के सुबाभूळ खाऊ घालतात आणि या खुराकावर बैल अतिशय वेगाने धष्टपुष्ट होत असल्यामुळे त्यांची विक्री करणे सुलभ होते. सुबाभळीचा पाला खाऊ घातल्याने गुरे ठेवण्यासाठी लागणाऱ्या मजुरांच्या संख्येत निम्म्याने कपात होऊन गुरांच्या वजनात नेहमीच्या मानाने दुप्पट किंवा तिप्पट वाढ दिसून आली आहे. सगळ्यात यशस्वी शेतकऱ्यांना काही काळासाठी जनावरांच्या वजनात रोज एक कि.ग्रॅ. इतकी वाढ मिळाली आहे. 

संबावा जिल्ह्यात गेल्या दोन दशकापेक्षा अधिक काळापासून खेड्यातील गुरांना सुबाभूळ खायला देण्यात येत आहे. येथील वार्षिक पाऊस ८६५ + २४६ मिमी इतका असून तो नोव्हेंबर ते मे या काळात पडतो. जनावरांना साध्या गोठ्यात बांधून ठेवतात. या गोठ्यांमध्ये सिमेंटची फरशी, छप्पर आणि गव्हाण असते, मात्र बाजू मोकळ्याच असतात. मे ते जुलै या तीन महिन्यात १०० टक्के सुबाभळीचा पाला देण्यात येतो तर ऑक्टोबर महिन्यात तो ५० टक्क्यांवर येतो. वर्षभराची सरासरी काढली तर सुबाभळीचा पाला ८० टक्के, मकवण १३ टक्के आणि स्थानिक गवत ७ टक्के असे खाद्यातील प्रमाण येते.

जनावरांना कुरणात गवत चारण्यापेक्षा सुबाभळीचा पाला कापून टाकणे हे जास्त फायदेशीर असल्याचे इंडोनेशियात आढळून आले आहे. कोरड्या काळात असे होणे हे विशेष आश्चर्याचे नाही. परंतु पावसाळ्यात कुरणात भरपूर हिरवे गवत उपलब्ध असूनही चारण्यापेक्षा सुबाभळीचा पाला कापून खायला घालण्याने जनावरांच्या वजनात कितीतरी जास्त वाढ झाल्याचे आढळून आले आहे. शिवाय चराऊ कुरणांची क्षमता सतत मोठ्या प्रमाणावर गुरे चारल्यामुळे कमी होत चालली आहे. तेव्हा सुबाभूळ व तत्सम झाडांचा पाला गुरांचे खाद्य म्हणून वापरण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत चालला आहे.        

ऑस्ट्रेलियातील सुबाभूळ परिषदेनंतर पूर्व इंडोनेशियातील गुरांचा व्यवसाय करणाऱ्या छोट्या शेतकऱ्यांच्या शेतांचा दौरा ‘Consortium for Large Ruminant Research’ या युनिव्हर्सिटी ऑफ मातारमशी संलग्नित संस्थेने आयोजित केला आहे. हा दौरा ६ ते ८ नोव्हेंबर या काळात होईल. ब्रिस्बेनहून लाम्बाकाला विमानाने आल्यानंतर विद्यापीठाचे लोक पुढील तीन दिवसात प्रवास व राहण्या-खाण्याची सर्व व्यवस्था करणार आहेत. इंडोनेशियाला येण्याचे विमान तिकीट सोडून या दौऱ्याचा खर्च अंदाजे ऑस्ट्रेलियन डॉलर ५०० (सुमारे रु. २५५००) इतका येईल. या दौऱ्यात इंडोनेशियातील सनायान, लाम्बाका, लांगम, जतीसरी, लिंगसार आदी गावांतील शेतकऱ्यांच्या शेतांना भेट देण्यात येईल. ऑस्ट्रेलियातील सुबाभूळ परिषदेला न जाता फक्त इंडोनेशियाला भेट देणेही शक्य आहे. तेव्हा नवीन काहीतरी करून पाहण्याची इच्छा असणाऱ्या शेतकऱ्यांनी या संधीचा जरूर फायदा घ्यावा, असे मला वाटते.  

बॉन निंबकर ः ०२१६६ - २६२१०६ (लेखक निंबकर कृषी संशोधन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.)      (शब्दांकन ः डॉ. नंदिनी निंबकर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com