फिलिपिन्सच्या शाश्वत शेतीचे गमक

संपादकीय
संपादकीय

फिलिपिन्स हा शेतीप्रधान देश आहे. येथील शेतकरी कष्टाळू आणि निसर्गाचा सन्मान करणारा आहे. या राष्ट्रात भूकंप, त्सुनामी, वादळे, ज्वालामुखी अशा नैसर्गिक आपत्ती सातत्याने येतात. तरीही येथील शेतकरी धीराने त्यांचा सामना करतात. आजही या देशात वीस जागृत ज्वालामुखी आहेत. जैवविविधतेने संपन्न असलेल्या या देशात ६० टक्के पेक्षाही जास्त जंगल आहे हे विशेष. 

या देशामधील शेतकरी भात, मका, ऊस आणि भाजीपाला पिकवतात. त्याचबरोबर केळी, अननस, आंबा, नारळ आणि कॉफीचे मुबलक उत्पादन घेतात. प्रत्येक शेतकरी कुठला तरी एक जोडधंदा करतोच. त्यामध्ये मत्स्यशेती, शेळीपालन, कुक्कुटपालन, वराहपालन याचबरोबर गोपालनामधून दुग्धव्यवसायसुद्धा तेजीत आहे. या देशाला मी चार वर्षांपूर्वी भेट दिली होती. उद्देश दोन होते ते म्हणजे तलाव व इतर जलसाठ्यामध्ये या देशाने केलेले काम आणि त्यास जोडून बालकांमधील कुपोषणनिर्मूलन. माझ्या भेटीत अशाच एका रविवारी मी मनिला या राजधानीच्या शहरामधील एका मध्यवर्ती मॉलमध्ये सहज गेलो होतो. रविवार असूनही गर्दी नाही, याचे मला आश्‍चर्य वाटले. सहज चौकशी केली असता, व्यवस्थापकाने सर्व गर्दी सेंद्रिय उत्पादन कक्षामध्ये आहे, असे सांगितले. उत्सुकतेपोटी मी तिथे गेलो तेव्हा जत्रा भरल्याचा अनुभव आला.

गेल्या एक दशकापासून या राष्ट्राने सेंद्रिय शेतीस प्राधान्य दिले आहे. शासनातर्फे शेतकऱ्यांना विविध सवलती देऊन प्रोत्साहित केले जाते. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या सर्व सेंद्रिय पदार्थांना, धान्य-फळे-मसाले यांना मॉलमध्ये वेगळी जागा देऊन खरेदीदारांना सेंद्रिय वस्तू खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. प्रत्येक रविवारी त्या मालावर विशेष सवलतसुद्धा दिली जाते. येथील मॉलमध्ये अप्रतिम उसाचा रस आकर्षक वेष्टनामध्ये मिळतो; पण त्यापेक्षाही मला येथील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले नारळपाणी आणि पाम शुगर यांचे मिश्रण आवडले. येथील सेंद्रिय उत्पादकांनी निर्माण केलेले हे चवदार पेय आज अमेरिकेत सर्वात जास्त विकले जाते. या देशामधील ८० टक्के सेंद्रिय उत्पादने अमेरिका आणि युरोपमध्ये निर्यात होतात आणि देशास बहुमोल परकी चलन मिळवून देतात. सेंद्रिय शेती करार पद्धतीने केली जाते व शेतकऱ्यांना शेळी-मेंढीपालन, गोपालन, वराहपालन आणि कुक्कुटपालनासाठी शासनातर्फे भरपूर सवलती दिल्या जातात.

आज या देशात ५५ हजार हेक्‍टरवर सेंद्रिय शेती केली जाते आणि यामध्ये सत्तर हजार शेतकऱ्यांचा सहभाग आहे. सेंद्रिय उत्पादनात भाजीपाला, ऊस, नारळ, केळी, अननस, कॉफी याचबरोबर भाताच्या काही वाणांचा समावेश आहे. फिलिपिन्सच्या सेंद्रिय शेतीमध्ये भाताचे काड आणि तूस यांना सोन्यासारखी किंमत आहे. या जैविक टाकाऊ पदार्थांचे येथे उत्कृष्ट प्रकारे खत तयार करून ते जमिनीत वापरतात. त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहून कर्बाचे प्रमाण व उपयोगी जिवाणूंची श्रीमंती वाढतच जाते. त्यामुळे कमी पाण्यामध्येही येथील शेतकरी मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय उत्पादने घेतात. या देशामध्ये भाताच्या काडाबरोबर ॲझोलाचे उत्पादनही घेतले जाते. पाणी भरपूर असल्यामुळे ‘ढेंचा’सारखे हरित खत शेतकरी मोठ्या प्रमाणावर वापरतात. या देशात सेंद्रिय पद्धतीने नारळ शेती करतात. या नारळ वृक्षावर विंग बिन्स म्हणजे चौधारी वालची वेल चढवितात. या दुहेरी उत्पादनामधून शेतकऱ्यांना भरपूर फायदा होतो. चौधारी वालाचा उपयोग बालकांच्या कुपोषणनिर्मूलनामध्ये होतो आणि हाच प्रयोग मी ठाण्याच्या आदिवासी भागात करून सहजपणे बालकांचे कुपोषण दूर केले. आजही या भागात अनेक आदिवासी कुटुंबांत ही अमृतवेल लावलेली आढळते.

फिलिपिन्सची सेंद्रिय केळी फळ टोपलीत दोन आठवडे टिकून राहतात. येथील सेंद्रिय कॉफीची चव सुद्धा अप्रतिम आहे. बालीमधील एका छानशा हॉटेलमध्ये मी जेवणास गेलो होतो. बसायला सुंदर पाट, समोर चौरंग, सभोवती रांगोळी आणि चौरंगावर केळीचे पान व त्यावर सुग्रास जेवण. सर्व पदार्थ सेंद्रिय. माझ्या बाजूस आणि समोरही अनेक विदेशी पर्यटक या भोजनाचा आस्वाद घेत होते. ही सर्व केळीची पाने सेंद्रिय पद्धतीने वाढवलेली असून ती फिलिपिन्समधून आणली जातात असे मला कळले. फिलिपिन्समधील सेंद्रिय केळीची पाने आज अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर निर्यात होतात आणि त्याचे ग्राहक आहेत भारतीय दाक्षिणात्य लोक. 

पूर्वी फिलिपिन्समधील अनेक नैसर्गिक तलावांच्या काठावर रासायनिक शेती होत असे. खतांचे अंश तलावात जाऊन तेथे प्रचंड प्रमाणावर शेवाळ वाढू लागले आणि तलावांना उतरती कळा लागली. तलाव परिसरात राहणाऱ्या शेतकरी कुटुंबात बालकांच्या कुपोषणाचे प्रमाणही वाढले होते. रासायनिक खतापासून वाढवलेल्या भातास आणि भाजीपाल्यास चव नव्हती. शासन आणि सामाजिक संस्थांनी एकत्रित येऊन तलाव परिसरात सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन दिले. तलाव स्वच्छ झाले, मुलांच्या आहारात ताजे सेंद्रिय पदार्थ, भात, मासे आले आणि कुपोषण दूर झाले. या देशामधील हजारो जलसाठे आज स्वच्छ आणि संरक्षित आहेत ते केवळ शासन आणि लोकसहभागामुळेच. 

आज मला फिलिपिन्स या देशाची आठवण झाली त्यास मुख्य कारण म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशाला नुकतीच भेट दिली. या वेळी ते आवर्जून मनिलामधील भात संशोधन केंद्रात गेले, तेथील नवीन भातांच्या वाणांची पाहणी केली. वातावरण बदलाचा भारतीय भात शेतीवर गेल्या दशकापासून प्रभाव जाणवत असून, आदिवासी क्षेत्रात भात उत्पादन झपाट्याने कमी होत आहे. आज आपल्या देशास वातावरण बदलास सामोरी जाणारी भाताची वाणे हवी आहेत. मनिला भात संशोधन केंद्रात याच विषयावर भरपूर संशोधन चालू आहे. या केंद्रामधील भात संशोधनाचा खरा पाया थोर भारतीय कृषी संशोधक आणि कल्याण सोनाचे जन्मदाता डॉ. अटवाल यांनी घातला आहे. 

आपले पंतप्रधान फिलिपिन्सला रवाना होण्याआधी त्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठकीत भारत आणि फिलिपिन्स या दोन्ही देशांदरम्यान कृषी क्षेत्रात सहकार्य वाढविण्यासाठी द्विपक्षीय करारावर चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने भात उत्पादन, अन्न प्रक्रिया, बहुपीक पद्धती, सेंद्रिय शेती, जलसंवर्धन आणि व्यवस्थापन, मातीची सुपीकता या क्षेत्रात सहकार्य केले जाणार आहे. फिलिपिन्स या देशाचे भात उत्पादन, केळी, अनननस, ऊस, पाम शुगर या क्षेत्रामधील अन्न प्रक्रिया, त्यांची सेंद्रिय शेतीची पद्धत त्यासाठी त्यांनी मातीची सुपीकता वाढविण्यासाठी शेतामधील पिकांच्या अवशेषांचा केलेला वापर आणि महत्त्वाचे म्हणजे जलसंवर्धन आणि व्यवस्थापनात त्यांनी केलेली प्रगती डोळे दिपवणारी आहे. जलस्रोतांना जिवंत करून पुन्हा कार्यरत करण्याचे त्यांचे व्यवस्थापन वाखाणण्यासारखे आहे. सेंद्रिय कृषी उत्पादनांच्या निर्यातीमधील या देशाची झेप अचंबित करणारी आहे.

फिलिपिन्स या देशाने शेतीत तंत्रज्ञानाचा वापर, सेंद्रिय शेती, शेतीसाठी शासनाच्या सवलती यांच्या बळावर अनेक संकटाच्या माऱ्यातून शेती वाचवून आपली उत्पादने जगाच्या बाजारपेठेत पाठवित आहेत. वातावरण बदलाच्या काळातील आपल्या देशातील शेती संकटात असून, या देशापासून आपल्याला बरेच काही शिकता येईल. डॉ. नागेश टेकाळे : ९८६९६१२५३१ (लेखक शेती प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com