प्रवास त्रिशुळी नदीबरोबरचा

नेपाळमधील त्रिशुळी नदीचे पात्र शांत, स्वच्छ आणि वाहते आहे. नदीच्या दोन्हीही बाजूस शुभ्र वाळूचे रुपेरी किनारे आहेत. कुठेही वाळूउपसा नव्हता. नदीकाठी शेती केली जाते, तर त्यातील स्वच्छ, गोड्या पाण्यात शेतकरी मासेमारीसुद्धा करतात.
संपादकीय
संपादकीय

‘नेपाळ’ हा दक्षिण आशियामधील चीन, भारत आणि भूतान या तीन राष्ट्रांमध्ये विसावलेला एक देश. ८० टक्के शेतकरी असलेला हा देश कृषी क्षेत्रात पारंपरिक पद्धतीने गहू, ज्वारी, मका ही पिके प्रामुख्याने पिकवतो. गरिब राष्ट्र असल्यामुळे येथे रासायनिक खतांचा वापर फारच मोजून मापून होतो, म्हणूनच सेंिद्रय शेतीवर येथे जास्त भर आहे. भारतामधील प. बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेश ही तीन राज्ये नेपाळच्या सीमेशी जोडलेली आहेत. या राज्यांमधूनच नेपाळमध्ये भारतीय कृषी उत्पादनाची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. नेपाळ हा नद्यांचा देश आहे. या राष्ट्रास उत्तंग हिमालयाचे वरदान लाभल्यामुळे येथील बहुतांश नद्या बाराही महिने दुधडी भरून वाहत्या असतात. स्फटिकासारखे स्वच्छ पाणी हे येथील प्रत्येक नदीचे वैशिष्ट्य आहे. नेपाळमधून वाहणाऱ्या बहुतेक सर्व नद्या भारतामध्ये येऊन गंगेला मिळतात. काही ब्रह्मपुत्रा आणि सतलजलासुद्धा मिळतात तर इतर नद्या मानस सरोवर, कैलास सरोवर आणि तिबेट मधून उगम पावून नेपाळ मार्गे पुन्हा आपल्या देशातच येतात. नेपाळमधील काही महत्वाच्या मोठ्या नद्यांमध्ये कोसी, महाकाली, करमाली, नारायणी यांचा समावेश होतो. या सर्व नद्यांनी नेपाळमधील शेतीला समृद्ध केले आहे.  नेपाळच्या मुक्कामामध्ये मी कोसीचा अपवाद वगळता इतर सर्व नद्या पाहिल्या. वाहती नदी हा माझ्यासाठी जिव्हाळ्याचा विषय, म्हणून प्रत्येक ठिकाणी जिथे शक्य आहे तिथे मी नदीच्या पाण्यास स्पर्श करून त्या वंदनीय मातेचे दर्शन घेतले. या सर्व वाहत्या शुभ्र नद्यांमध्ये मला नेपाळच्या पहाडी भागामधील ‘नारायणी’ आणि ‘त्रिशुळी’ या दोन नद्यांनी वेडेपीसे केले. ‘काठमांडू’ या राजधानीच्या शहरामधून आमची गाडी ‘पृथ्वीराज’ या नेपाळमधील महामार्गावर आली आणि काही अंतर पुढे गेल्यावर आमच्या गाडीबरोबर अनोखा निसर्गाचा एक शुभ्र फेसाळ प्रवास सुरू झाला. ती होती ‘त्रिशुळी नदी’. ‘चितवन’ च्या ११४ कि.मी प्रवासातील बरेच अंतर ती आमच्या बरोबर वाहत होती. ‘चितवन’ च्या अलीकडे चार कि.मी अंतरावर ती नारायणी नदीस मिळते. या पवित्र संगमाचे नाव आहे ‘देवघाट’. दरवर्षी मकरसंक्रातीला या ठिकाणी शेतकरी आणि भाविकांचा मेळावा भरतो. प्रत्येक जण या दोन नद्यांचे पूजन करतात. त्रिशुळीला कवेत घेऊन नारायणी ‘चितवन’ शहरात प्रवेश करते. तिच्यावर बांधलेला पूल नजरेत भरत नाही ऐवढा मोठा आहे. माझ्या काठमांडू ते चितवन या चार तासांच्या प्रवासात मी खिडकी बाहेर फक्त त्रिशुळीचा प्रवाह आणि तिच्या काठावरील शेतीच पाहत होतो. 

त्रिशुळीचा उगम तिबेटमध्ये ‘गोसावीकुंड’ येथे झाला आहे. श्रीशंकराने त्यांच्या हातामधील त्रिशुळ जमिनीत खुपसला आणि तिथे तीन वाहते झरे निर्माण झाले. हे तीन झरे एकत्र येऊन ‘त्रिशुळी नदी’ तयार झाली अशी पौराणिक कथा आहे. तिबेटमधून ती नेपाळमध्ये येते आणि नारायणी मार्गे गंगा नदीस मिळते. त्रिशुळीचे पात्र शांत, स्वच्छ आणि वाहते आहे. नेपाळमध्ये येणारे सर्व पर्यटक या वाहत्या नदीमध्ये पोहण्याचा आनंद लुटतात; तसेच रॅफ्टींगची मजा ही अनुभवतात. नदीच्या दोन्हीही बाजूस शुभ्र वाळुचे रुपेरी किनारे आहेत. कुठेही वाळू उपसा नव्हता. शासनातर्फे वाळू काढण्याचा परवाना दिला जातो. वाळू काढण्यापूर्वी वाहत्या नदीचे पात्र दोन बाजूस लहान पाटासारखे थोड्या अंतरासाठी वळविले जाते. वाहत्या नदीमधील वाळू या दोन्ही बाजूस आपोआप सरकते. काही महिन्यांनी दोन्हीही वळणे बंद केली जातात आणि जमा झालेली वाळू गोळा केली जाते. वाळू गोळा करण्याचे हे तंत्र त्रिशुळासारखे दिसते म्हणून या नदीला त्रिशुळी म्हणतात असे मला सांगण्यात आले. नदीच्या अलीकडच्या किनाऱ्यास लागूनच ‘पृथ्वीराज’ मार्ग असल्यामुळे शेती फक्त त्रिशुळीच्या विरुद्ध किनाऱ्यावरच आढळते आणि कृषी उत्पादनाची विक्री मात्र महामार्गावर होते.  नदीच्या पाण्याचा वापर करून येथील शेतकरी बटाटा, मका आणि भाजीपाला पिकवतात. त्याच्या जोडीस केळीचे उत्पन्नही घेतले जाते. नदीमधून पाणी घेण्यासाठी शासन मोटार पंपासाठी ५० टक्के अनुदान देते. नेपाळ मध्ये त्रिशूळी नदीच्या काठी ‘स्टेप्स’ म्हणजे पायरी पद्धतीने उतरती शेती केली जाते. मोटारीने पाणी उंचावर नेऊन खालपर्यंत सिंचन केले जाते. सर्व सेंद्रिय शेती असल्यामुळे मातीचा एक कणसुद्धा नदीपात्रात येत नाही. या भागात रासायनिक शेती नसल्यामुळे या नदीमध्ये जैवविविधता विपुल आहे. स्थानिक शेतकरी वर्ग नदीच्या गोड्या पाण्यात मासेमारी करतो. हे मासे पृथ्वीराज महामार्गावर असलेल्या ‘बेनीघाट बाजार’ मध्ये विकण्यास येतात.

त्रिशुळीमधील मासे चवीला उत्कृष्ट असल्यामुळे त्यांना मागणी खूप आहे. याच महामार्गावर ‘धादिंड’ म्हणून छोटे गाव आहे. येथे केळीचा मोठा बाजार भरतो. येथील छोटी वेलची केळी चवीला गोड असतात. नदीचे वाहते पाणी वर्षभर उपलब्ध असल्यामुळे नदीकाठावरील शेतकरी मुख्य पिकांबरोबर शेतीव्यवसायावर आधारित अनेक जोडधंदे करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाले आहेत. नदीच्या दोन्हीही किनाऱ्यावर अनेक छोटी गावे आढळतात. एका गावाचा दुसऱ्या किनाऱ्यावरील गावाबरोबर संपर्क राहावा म्हणून शासनाने त्रिशुळी नदीच्या पात्रावर अनेक झुलते पुल बांधले आहेत. नदीमुळे शेतकरी संपन्न झाल्यामुळे आणि सोबत महामार्गाची साथ मिळाल्यामुळे त्यांची मुले खासगी इंग्रजी शाळामध्ये शिकण्यास जातात. या झुलत्या पुलावरून मुला मुलींचे शाळेला जाणेयेणे मला खुपच कौतुकाचे वाटले. या पुलांवरून चालण्याचा मीसुद्धा आनंद घेतला. मध्यावर मला एक सातवीमधील मुलगी तिच्या मैत्रिणीसह भेटली. सहज माहिती घेताना मी तिला प्रश्न विचारला, ‘‘शाळेचे शिक्षण तुला कोण देते?’’  क्षणार्धात तिने उत्तर दिले, ‘‘ही आमची नदी त्रिशुळी. आम्ही तिच्यावर माया करतो, ती आमच्या शेतीला पाणी देते, वडिलांचे उत्पन्न वाढते, इंग्रजी शाळेमधील शिक्षणास पैसा उपलब्ध होतो आणि या पुलावरून चालत जाऊन मी महामार्गावर उभी असलेली शाळेची बस पकडते, आता तुम्हीच सांगा! मला शिक्षण कोण देते? ही नदीच नव्हे का?’’ एका स्वच्छ स्फटिकासारख्या वाहणाऱ्या त्रिशुळी नदीचे त्या बालमनावर झालेले संस्कार पाहून मी किंचित हळवा झालो. प्रत्येकाने नदीकडे अशाच बोलक्या नेत्राने पाहिले तर ती का नाही वाहणार! ती शेतकरी कन्या एव्हाना त्या झुलत्या पुलाच्या टोकास जाऊन शाळेच्या बस जवळ पोचलीसुद्धा होती आणि मी मात्र पुलावरून नदीच्या विशाल पात्राकडे नजर लावून तिच्या दोन्हीही तीरावरील रुपेरी वाळूत प्रवासामधील अशा गोड आठवणीच्या रेघोट्या ओढत होतो.                

डॉ. नागेश टेकाळे : ९८६९६१२५३१ (लेखक शेतीप्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com