गावची कुंडली मांडता आली पाहिजे

गावच्या पारावर किंवा देवळात बसून गावकऱ्यांच्या गप्पांचे शांतपणे श्रवण केले वा स्त्रियांच्या घोळक्‍यात वा भांगलताना होणाऱ्या गप्पांत ध्यान दिले, तर गावची कुंडली झकास मांडता येते, हे समजले. इरसाल भाषेत तिथे प्रत्येकाची मापे काढली जातात.
संपादकीय
संपादकीय

शहरी महिलांना साद घालून १९९२ ला कोल्हापुरात ‘स्वयंसिद्धा’ सुरू केली. महिलांचे आर्थिक सबलीकरण, आई उद्योजक बनली, तर पुढची पिढी उद्योजक बनेल, हे प्रमुख हेतू मनी बाळगून व्यक्तिमत्त्व विकास आणि व्यवसाय मार्गदर्शन सुरू केले. छोट्या उद्योजिका उभ्या राहू लागल्या. एक क्रांतिपर्व सुरू झाले. प्रकल्प सुरू करताना कोणीही पाठिंबा दिला नव्हता. महिला एकत्र येणार नाहीत, तुमचा प्रयोग फसणार, तुम्ही तोंडघशी पडणार म्हणणारे तोंड आ वासून पाहू लागले. पण, अशा चिंतातूर जंतूंना स्वस्थता लाभत नव्हती. ‘‘शहरात काम करणे सोपे, खेड्यात जाऊन तर दाखवा,’’ असे त्यांनी चॅलेंज दिले. आम्हीही चॅलेंज स्वीकारले, पण मन म्हणत होते, ‘‘आपण शहरात जन्मलो, शहरातच वाढलो, खेड्यातील माणसाची मानसिकता, तिथलं एकंदरीत समाजकारण आणि राजकारण, ग्रामीण अर्थशास्त्र कशाचीही आपल्याला ओळख नाही, मग कामाला प्रारंभ तरी कोणत्या आधारे करायचा?’’  लोकांची मानसिकता बदलणे, त्यांना कौशल्य प्रदान करणे आणि नंतर आधारसेवा देऊन पत आणि प्रतिष्ठा मिळवून देणे ही आमची कामाची पद्धत. त्यासाठी प्रथम गावची कुंडली मांडता आली पाहिजे. माणसांची पारख व्हायला हवी.

संसाधनांचा परिचय, गावच्या गरजा जाणून घेणे आवश्‍यक होते. सुदैवाने शिक्षकी पेशा यशस्वीपणे सांभाळत कोकणातील खेड्यात विधायक कामे उभे करणारे मधुकर सरनाईक आणि अप्पासाहेब पाटील हे गुरुवर्य भेटले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावभेट, शिवार फेरी, माहिती संकलन, गावचा सामाजिक नकाशा, गरजांना क्रम ठरविणे या गोष्टी आम्ही भराभर शिकलो. नागरिकशास्त्र, भूगोल माझ्या आवडीचे विषय. पैकीच्या पैकी गुण शाळेत मिळायचे. पण, गावचा एक आदर्श तक्ता असतो. त्यात गावची लोकसंख्या, घरे, मूलभूत साधने, व्यवसाय आदींची सांख्यिकी माहिती असते. अन्‌ ग्रामपंचायतीने ही माहिती सतत अद्ययावत करून प्रदर्शित करायची असते, हे १९९५ मध्ये सरांनी सांगितल्यावर समजले. सध्या अंगणवाडी, बालवाडीत, तसेच गुगलवरही ही माहिती मिळू शकते.

गावच्या पारावर किंवा देवळात बसून गावकऱ्यांच्या गप्पांचे शांतपणे श्रवण केले वा स्त्रियांच्या घोळक्‍यात वा भांगलताना होणाऱ्या गप्पांत ध्यान दिले, तर गावची कुंडली झकास मांडता येते, हे समजले. इरसाल भाषेत तिथे प्रत्येकाची मापे काढली जातात. ‘‘गणू तात्या देव माणूस, हणम्या मात्र एक नंबरचा टग्या, रामजीला राजकारणाच्या भूताने पछाडलंय, बेणं खुर्चीसाठी हपापलंय,’’ अशी वाक्‍ये गावांतील लोकांचा खरा परिचय करून देतात. ‘‘मास्तरचं बूड शाळेत टेकलं, तर पोरं शिकणारं किंवा चौगुले सर लई भारी, शाळेबरोबर गाव बी बदलला,’’ अशा उद्‌गारांनी गावच्या शाळेची, शिक्षणाची अवस्था ध्यानी येते. ‘‘बायकास्नी काय समजतं? अक्कल असती काय त्यायला? किंवा आमच्या गावच्या बायांनी बचत गट लई झ्याक चालवलाय, घर अन्‌ गावही बदलला त्यांनी’’ हे शब्द गावातील महिलांचा दर्जा स्पष्ट करतात. ‘‘सांजच्याला सगळी पुरुष मंडळी झाडून देवळात बघा, बायांचबी भजनी मंडळ हाय, अहो त्या बेवड्याचं काय मनावर घेऊ नका, सांजच्याला ते असंच बरळंतय,’’ असे उद्‌गार गावची धार्मिकता, निर्व्यसनीपणा अन्‌ व्यसनाधीनता यावर प्रकाश टाकते.

कोणत्याही योजनेची माहिती देताना, प्रश्‍नावली भरून घेताना ‘‘आधी काय घावणार सांगा, अनुदान किती? उगाच पायपीट करता का? तुमाला बी सरकारकडून काही तरी गावतच असणार,’’ असे स्वागत करणारी माणसे गावच्या कुंडलीतले कोणते ग्रह स्पष्ट करतात, हे सांगण्याची गरजच नाही. ‘‘पण येत जावा गावात, तुमच्यामुळं आमचा गाव सुधारंल,’’ असे म्हणत जोरदार स्वागतही काही ठिकाणी होते. एकूण काय अशा संवादातून गावची होकारार्थी, नकारार्थी प्रवृत्ती ध्यानी येते. घरोघरी गिरीराज कोंबडीपालन प्रयोग राबवताना, ‘‘गिरीराजा कोंबडी प्रयोग लई भारी, तुमच्यामुळं आमचं उत्पन्न वाढलं,’’ असे प्रामाणिकपणे, प्रसन्नतेने सांगणारे खेडूतही भेटतात. त्याचबरोबर ‘‘आले बघा कोंबडीवाले, आता चहाचा रतीब घाला’’ म्हणून टिंगलटवाळी करणारे रिकामटेकडेही पारावर भेटतात. पहिल्या एक-दोन महिन्यांतच अशा सरमिसळ अनुभवाने गावची कुंडली तयार होते. मानपान, अनुदाने, भेटवस्तू अन्‌ फुकटची वाहवा यासाठी चटावलेली गावे राहू, केतू ग्रस्त असतात. ती लवकर बदलणार नाहीत, याची खात्री बाळगावी. होकारार्थी मनोवृत्तीची छोट्या गावांतील गरीब माणसे कुंडलीतील उच्चग्रहांमुळे आपल्याला तिकडे खेचतात अन्‌ आपण कार्यप्रवण होतो. कांचन परुळेकर  ः ०२३१ - २५२५१२९ (लेखिका ‘स्वयंसिद्धा’च्या संचालिका आहेत.)  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com