agriculture stories in marathi agrowon special article on wada kolam rice | Agrowon

वाडा कोलमला हवा ‘जीआय टॅग’
सुरेश कोडीतकर
शनिवार, 5 जानेवारी 2019

वाडा आणि विक्रमगड तालुक्यांत भात पिकासाठी सुपीक जमीन आहे. कमी आर्द्रता असलेले कोरडे हवामान आहे. डोंगर पट्ट्यामुळे विशिष्ट अशी भौगोलिक आणि वातावरणीय स्थिती आहे. त्यामुळे तिथे वाडा कोलम या तांदळाची चांगली जोमदार वाढ होते. 
 

मुबलक पाऊस आणि काळी माती यांमुळे ठाणे जिल्ह्यात भात पिकाला ‘सुपीक’ वातावरण आहे. जवळपास एक लाख ३८ हजार हेक्टर जमीन भात पिकाखाली असून, जिल्ह्यातील सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टरी २१.६९ क्विंटल आहे. बासमती, आंबेमोहर आदी सुवासिक तांदूळ चाखलेल्या खवय्यांना आपली चव बदलायला भाग पाडेल असा अस्सल प्रतीचा तांदूळ ठाणे जिल्ह्यात पिकतो. 
वाडा तालुक्यातील कोलम आणि जिल्ह्यातील अन्य भागांमध्ये पिकणारा इंद्रायणी तांदूळही उत्तम प्रतीचा आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील मुख्य उत्पादन असलेल्या तांदळामध्ये जया, रत्ना, कर्जत, एमटीयू, एचएमटी, वाडा कोलम, मुरबाड झिणी, गुजराथ ११ या वाणांचा समावेश आहे. मुरबाड झिणी, इंद्रायणी आणि वाडा कोलम हा ठाण्याचा ‘फाइन क्वालिटी’ तांदूळ आहे. मुरबाड झिणी हा तांदूळ परंपरागतरित्या केवळ घरगुती वापरासाठीच पिकवण्याची पद्धत होती. तोसुद्धा सणासुदीलाच वापरला जायचा. मात्र, गेल्या काही वर्षांपासून तो विक्रीसाठीही उपलब्ध होत आहे. याबरोबरच सोनम, जिरा, मसुरी, राशी, रूपाली, कुडई, दप्तरी, रुबी हे वाणसुद्धा पालघरची ओळख आहेत. याशिवाय नागली, वरई, कडवे वाल, पांढरा कांदा, चिकू आणि भाजीपाला ठाणे आणि मुंबईला पुरवण्याचे काम पालघर जिल्हा करतो. सर्वसाधारणपणे तेथील तांदळाचे वाण आणि त्याच्या किंमती रुपाली (वाडा कोलम) ४५ रुपये, गुजरात ४० रुपये, सुपर कोलम ६० रुपये, वाडा झिणी ५५ रुपये, वाडा सुरती कोलम ६५ रुपये अशा आहेत. व्यापारी मात्र खोटा माल चढ्या भावाने विकत असल्याने वाडा कोलम महाग ठरतोय. आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटक येथील बनावट तांदळापुढे त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा ठाकला आहे.

बारीक दाणा, सुगंधित, चविष्ट, कसदार-पौष्टिक असलेल्या कोलम जातीची लागवड वाडा परिसरात गेले पाच ते सहा दशकापासून होत आहे. त्यात पूर्वी पनवेल (जाड), सुरती कोलम आणि झिणी या प्रजातीच्या कोलमची लागवड होत असे. १२५ दिवसांच्या झिणी आणि १३० ते १३५ दिवसांच्या सुरती कोलम या दोन जातींना १९८० च्या सुमारास ‘वाडा कोलम’ या नावाने ओळखले जाऊ लागले. या तांदळाचे वैशिष्ट्य म्हणजे भात शिजल्यावर मऊ आणि मुलायम होतो. तसेच पानात वाढल्यावर हा भात वरण अथवा रस्सा किंवा कालवण लागलीच शोषून घेतो. वाडा कोलम हा भात दोन वेळा पॉलिश केल्यावर तितकासा उजळत नाही. त्याची सफेदी कमी असते. पण शिजवल्यावर या भाताची चव आणि सुवास मोहित करतो. घटत्या उत्पादकतेने आणि वाढत्या खर्चाने शेतकऱ्याना चिंतित केले आहे. वाडा कोलमचा ६० रुपये उत्पादन खर्च आणि विक्री ९० रुपयाने होत असेल तर लोक सिल्क पॉलिशवाल्या आकर्षक पण बनावट तांदळाला भुलतात. शिवाय तो बनावट तांदूळ २० ते २५ रुपयांनी स्वस्त मिळतो. हा तांदूळ आंध्र प्रदेश आणि कर्नाटक येथून येतो. सुरती कोलम आणि वाडा कोलम या नावाने व्यापारी तो विकतात आणि ग्राहकांची फसवणूक करतात. त्यामुळे वाडा कोलम वाचवण्यासाठी त्याचे भौगोलिक मानांकन अर्थात जीआय टॅग होणे गरजेचे आहे. त्यासाठी वाडा आणि पालघरच्या भात उत्पादक शेतकऱ्यांनी संघटितपणे यथायोग्य पावले टाकायला सुरवात केली आहे.

वाडा आणि विक्रमगड या दोन तालुक्यांत साधारण २२ ते २५ हजार हेक्टरवर भाताची लागवड होते. वाड्यामध्ये साडेचार हजार क्विंटल आणि विक्रमगड येथे अडीच हजार क्विंटल इतक्या एकत्रित भात बियाणांची लागवड होते. वाड्यामधून फक्त दोन हजार क्विंटल झिणी पद्धतीचा वाडा कोलम उत्पादित होत असून बाजारातील चकचकाटात त्याचे आस्तित्व लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. कारण लोकांना पॉलिश केलेल्या तांदळाची आणि त्याच्या पॅकिंगची भुरळ पडलेली असते. शहरी भागात राहणारे दर्दी आणि खवय्ये मंडळी मात्र या तांदळाचा आवर्जून शोध घेतात. थेट शेतकरी बांधवांशी संपर्क साधून अथवा साळ कांडण कारखान्यात चौकशी करून ते अस्सल तांदूळ पदरात बांधून घेतात. ज्याला त्यातील माहिती आणि ज्ञान आहे ते लोक हा तांदूळ खायला चुकत नाहीत. काही भात उत्पादक शेतकरी वायएसआर, दप्तरी अशा इतर भात जातींची लागवड करतात आणि तोच वाडा कोलम म्हणून विकतात. वाडा कोलम व्यतिरिक्त जया, रत्ना, मसुरी, सुवर्णा, कर्जत या स्थानिक भाताच्या जातींनासुद्धा पालघर आणि वाडा परिसरातील वातावरणाचा चांगला लाभ होत असल्याचे दिसून आले आहे. परंतु मजुरीच्या वाढत्या खर्चामुळे आणि व्यापारी बाजारभाव पाडून नफा कमवू पाहत असल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. संशोधन करून उत्पादकता वाढवणे आणि यांत्रिकीकरण करणे, लागवड क्षेत्र वाढवणे असे उपाय आवश्यक झाले आहेत.

वाडा आणि विक्रमगड तालुक्यांत भात पिकासाठी सुपीक जमीन आहे. कमी आर्द्रता असलेले कोरडे हवामान आहे. डोंगर पट्ट्यामुळे विशिष्ट अशी भौगोलिक स्थिती आहे. त्यामुळे तिथे वाडा कोलम या तांदळाची चांगली जोमदार वाढ होते. तथापि भाताला ओंबी लागल्यानंतर तांदळाच्या दाण्याचे वजन जास्त असल्याने रोपं जमिनीकडे झुकू लागतात आणि भिजल्यावर भात खराब होतो. उत्पादकतेवर परिणाम होतो. एकरी जेमतेम सहा ते सात फारतर आठ क्विंटल उत्पादन प्राप्त होते. याउलट संकरित तांदळाचे उत्पादन रासायनिक खतांच्या वापराने एकरी वीस ते पंचवीस क्विंटलपर्यंत मिळते.

वाडा तालुक्यातील अनेक गावांमधून सध्या वाडा कोलमला जीआय टॅगिंग करण्याची मागणी पुढे येत आहे. तिथे का एकदा नोंदणी झाली की नंतर ‘पालघरचा वाडा’ असा कुणाला दावा करता येणार नाही. आणि केला तरी वाडा म्हणून नोंद न होता इतर कोणतीही होईल. वाडा येथील कोलम ही तांदळाची स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी ओळख आहे. त्याचे वेगळेपण जपणे ही आपली जबाबदारी आहे. शासन स्तरावर यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले असून कोलम तांदळाला पालघर जिल्ह्यातील वाडा हे भौगोलिक मानांकन मिळावे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे गरजेचे आहे.                                 

सुरेश कोडीतकर ः ९५४५५२५३७५
(लेखक शेतीप्रश्नांचे अभ्यासक आहेत)

इतर संपादकीय
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? दुष्काळ पडल्याने पाण्यासाठी बोअर घेण्याची अक्षरशा...
कायद्याचा धाक हवा; नको खडा पहारागे ल्या पाच वर्षांतील सर्वाधिक तीव्र दुष्काळ...
रेपो रेटघटीचा लाभ कोणाला?केंद्रीय अर्थसंकल्प, रिझर्व्ह बॅंकेचे द्वैमासिक...
यांत्रिकीकरण ः वास्तव आणि विपर्याससध्या राज्यभर विविध योजनांमधून अवजारे अनुदान...
काय आहेत देशातील जनतेच्या अपेक्षा?शेती, पाणी, रोजगार आदी निगडित प्रश्‍नांची जंत्री...
दावे, दर आणि दिशाआ  गामी हंगामात (२०१९-२०) बीटी कापूस बियाण्याच्या...
अनियंत्रित दर आणि असंतुलित वापर नि विष्ठा आणि मजुरीचे दर वाढत असल्याने पीक...
स्वातंत्र्याच्या सात दशकांचा लेखाजोखाजगाच्या पाठीवरील सर्वात मोठी लोकशाहीप्रणाली...
लोकाभिमुख विकासाचे अद्वितीय कार्यसंयुक्त महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि...
अनुदान की खिरापतरा  ज्यात मोठ्या प्रमाणावर गोभक्ती, गोमाया,...
संसर्गजन्य रोगांचा विळखाराज्यात आरोग्यसेवेच्या दृष्टीने मानवी आरोग्य...
एल-निनो समजून घेऊ याएल-निनो आणि ला-निना हे मुळात स्पॅनिश भाषेतले...
बंदीपूरची आग आणि आपली सामूहिक अनास्थाआं तरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड लोकसंख्या असणारा...
देर आए दुरुस्त आएराज्यातील अथवा देशभरातील शेतकऱ्यांसमोरील आजची...