agriculture stories in marathi agrowon special article on world agro tourism day. | Agrowon

कृषी पर्यटनाला संधी अमर्याद
विलास शिंदे
गुरुवार, 16 मे 2019

ज्या भागात कृषी पर्यटनाला संधी आणि पूरक स्थिती आहे, अशा ठिकाणी कृषी पर्यटनाची अनेक केंद्रे सुरू होऊ शकतील. शेतकऱ्यांना या पूरक व्यवसायातून अतिरिक्त उत्पन्न मिळू शकेल. सह्याद्री फार्म प्रोड्यूसर कंपनीने त्या दृष्टीने तयारी आरंभली आहे. कंपनीचा संपूर्ण परिसर कृषी पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याचा मानस आहे.
 

कृषी पर्यटन अर्थात ‘अ‍ॅग्रो टुरिझम’ हे ग्रामीण भारताचे रोजगार निर्मितीचे महत्त्वाचे साधन असून, या माध्यमातून छोट्या शेतकऱ्यांचे उत्थान आणि शाश्‍वत विकास शक्य आहे. कृषी पर्यटनाची उपयुक्तता अजून म्हणावी तितकी आपल्या ध्यानात आलेली नाही. किंबहुना प्रचंड क्षमता असलेले हे क्षेत्र भारतात अजूनही बाल्यावस्थेत आहे. वर्षाकाठी २० ते २२ हजार कोटींची उलाढाल या व्यवसायातून शक्य आहे. ही अतिशयोक्ती नाही. अर्थात, यासाठी मोठ्या प्रयत्नांची गरज आहे.

कृषी पर्यटन एक लोकप्रिय उद्योग
भारतात गेल्या काही वर्षांपासून वाढलेला आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा ओढा आणि परदेशातील पर्यटकांच्या आवडी-निवडी व चोखंदळपणा पाहता कृषी पर्यटनाला खूप चांगले भवितव्य आहे. अ‍ॅग्रो टुरिझम जागतिक पातळीवर एक लोकप्रिय उद्योग म्हणून विकसित झाला आहे. भारतातील जवळजवळ प्रत्येक राज्यातदेखील हा उद्योग लोकप्रिय ठरून कृषिपूरक नव्हे, तर मुख्य व्यवसाय म्हणूनही स्थापित होऊ शकतो. शेतकऱ्यांपुढे ही मोठी संधी असून, तिचे सोने कसे करायला हवे. कृषी पर्यटन म्हणजे खेड्यात किंवा शेतात जाऊन राहणे व तिथल्या अन्नावर ताव मारणे एवढेच मर्यादित अर्थाने घेऊ नका. भारताची सर्वाधिक लोकसंख्या ज्या क्षेत्रावर अवलंबून आहे, तो व्यवसाय समजून घेण्याची संधी आपल्याला या पर्यटनातून मिळू शकते. याशिवाय, पर्यटनाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता, स्थानिक हस्तकला आणि सांस्कृतिक उपक्रमांना चालना देता येऊ शकते. शेतात जाऊन राहण्यातल्या सर्वोत्कृष्ट गोष्टींपैकी एक म्हणजे पर्यटक/अतिथी आपल्या सहभागातून त्या ठिकाणी आपले योगदान देऊ शकतात. पर्यटक ग्रामीण जीवन अनुभवू शकतात. दुधाच्या धारा काढण्यापासून ते हंगामी मशागतीचे कामे, विहिरीत पोहणे आणि फळे तोडणे, याचा आनंद घेऊ शकतात. 

निसर्ग म्हणजे भव्य टेलिव्हिजन स्क्रीनच
निसर्ग आणि शेती म्हणजे दगड-मातीच्या विटा नसलेली जणू शाळा आहे. असंख्य गोष्टी या ठिकाणी शिकता येऊ शकतात. भारत हा कृषिप्रधान देश असे आपण म्हणत असू तर या देशातील प्रत्येक नागरिकांना कृषिक्षेत्राबद्दल प्राथमिक माहिती असली पाहिजे. शहरी मुलांचं जग हल्ली शाळा, कोचिंग क्लास, मोबाईल फोन, टीव्हीवरील कार्टून प्रोग्रॅम्स, व्हिडिओ गेम, चॉकलेट्स, सॉफ्ट ड्रिंक्स, मसालेदार फास्ट फूड, कंम्प्युटर एवढ्यापुरतेच सीमित झाले आहे. निसर्ग हा एखाद्या भव्य टेलिव्हिजन स्क्रीनसारखा आहे. नव्या पिढीला त्याच्या सान्निध्यात नेण्यासाठी कृषी पर्यटनासारखा दुसरा चांगला मार्ग नाही. 

धार्मिक पर्यटनाला पूरक कृषी पर्यटन
भारतात धार्मिक पर्यटन करणारा प्रचंड मोठा वर्ग आहे. दळणवळणाची साधने वाढल्यामुळे, तसेच स्वतःची वाहने बाळगणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे वर्षातून एक-दोन वेळा तरी कुटुंबात धार्मिक पर्यटन केले जाते. या पर्यटनाला जोडूनच अन्य स्थलदर्शन हे ठरलेले असते. महाराष्ट्रात शिर्डी, पंढरपूर, कोल्हापूर, तुळजापूर, माहूर, शेगाव, गणपतीपुळे, अष्टविनायक अशी असंख्य धार्मिक पर्यटनस्थळे आहेत. विशिष्ट काळात या ठिकाणी भाविकांची गर्दी उसळते. तिथल्या सोयीसुविधांवर ताण येतो. अशा धार्मिक पर्यटनस्थळांना कृषी पर्यटनाची चांगली जोड मिळू शकते. उदा. शिर्डी हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील आघाडीचे धार्मिक पर्यटनस्थळ आहे. प्रामुख्याने उत्तर भारत, पूर्व भारत, मुंबई, गुजरातमधून हजारो भाविक नाशिक जिल्ह्यातून शिर्डीला जातात. नाशिक जिल्ह्यातील कृषी पर्यटनाला यातील काही हजार भाविक जोडले जाऊ शकतात.    

कॉस्ट इफेक्टीव्ह कृषी पर्यटन 
कृषी पर्यटनाला निकटच्या भविष्यात फार मोठी संधी आहे. कृषी पर्यटनात अन्न, निवास व्यवस्था, मनोरंजन आणि प्रवास यांच्यावरील खर्च तुलनेने खूप कमी आहे. हीच बाब कृषी पर्यटनाचा पाया विस्तारण्यास पुरेशी आहे. नियमितपणे प्रवास आणि पर्यटनाची सध्याची संकल्पना शहरी उच्चमध्यमवर्गीय आणि श्रीमंतांपर्यंतच मर्यादित आहे. हा वर्ग लोकसंख्येचा लहान हिस्सा आहे. कृषी पर्यटनाच्या संकल्पनेत मोठ्या लोकसंख्येचा भाग सामावला जाऊ शकतो. कृषी पर्यटन हे ‘कॉस्ट इफेक्टिव्ह’ अर्थात खिशाला परवडणारे असल्याने या क्षेत्राचा विस्तार वाढण्याची शक्यता मोठी आहे. व्यवसायाचे मार्केटिंग आणि प्रचार, विस्तारासाठी भांडवल पुरवठा, योग्य कुशल कर्मचारी या बाबी जुळून आल्या तर कृषी पर्यटनाच्या क्षेत्रात क्रांती घडू शकते.

कृषी पर्यटन कसे होईल लोकप्रिय?
सध्याच्या कृषी पर्यटन क्षेत्रांच्या काही मर्यादा आहेत. संपूर्ण कुटुंबाला सामावून घेता येईल अशा प्रकारच्या कृषी पर्यटन केंद्रांची संख्या अतिशय मर्यादित आहे. छोटी मुले, तरुण, मध्यमवयीन आणि ज्येष्ठ, महिला आणि पुरुष या सर्वांना गुंतवून ठेवणाऱ्या बाबी पर्यटन केंद्रात असायला पाहिजे. पर्यटकांना तिथं पाहण्यासारखं वेगळं काहीतरी असलं पाहिजे. उदा. पाळीव जनावरे, पक्षी, निसर्गरम्य स्थळे आदी. पर्यटक स्वतः सहभाग घेऊ शकतील, अशा बाबी हमखास असल्याच पाहिजे. उदा. शेतीची कामे, पोहणे, बैलगाडी फेरी, सायकलिंग, ट्रेकिंग, घोडेस्वारी, कुकिंग, दुधाच्या धारा काढणे, झाडावर चढणे, ग्रामीण खेळ. महत्त्वाचे म्हणजे खरेदी हा स्त्रियांचा आवडता विषय आहे. पर्यटकांना खरेदीसाठी ताजी फळे, भाज्या, धान्य, घरगुती ग्रामीण पदार्थ, खेळणी आदी काही हटके बाबी असल्या पाहिजेत. पाश्‍चिमात्य देशांमध्ये कृषी पर्यटन मोठा उद्योग म्हणून स्थिर झाला कारण वर उल्लेखलेल्या सर्व बाबी त्या ठिकाणी हमखास असतात. 

कृषी पर्यटनासाठी सह्याद्री सज्ज
महाराष्ट्रात सुमारे १७०० च्या वर कृषी उत्पादक कंपन्या आहेत. ज्या भागात कृषी पर्यटनाला संधी आणि पूरक स्थिती आहे अशा ठिकाणी कृषी पर्यटनाची अनेक केंद्र सुरू होऊ शकतील. शेतकऱ्यांना या पूरक व्यवसायातून अतिरिक्त उत्पन्न मिळू शकेल. सह्याद्री फार्म प्रोड्यूसर कंपनीने त्या दृष्टीने तयारी आरंभली आहे. कंपनीचा संपूर्ण परिसर कृषी पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याचा मानस आहे. याचसोबत जे द्राक्ष उत्पादक शेतकरी आपल्या कृषिक्षेत्रावर कृषी पर्यटनासाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून देतील ती ठिकाणेही पर्यटन केंद्र म्हणून पुढे येतील. यातून हा व्यवसाय अधिक शाश्‍वत करण्याचा आमचा मानस आहे. 

विलास शिंदे
(लेखक मोहाडी जि. नाशिक येथील 
सह्याद्री फार्म्सचे चेअरमन आहेत.)
( ः सुरेश नखाते, जनसंपर्क अधिकारी, 
सह्याद्री फार्म्स ः ७०३०९४७०२२)

इतर संपादकीय
मोदी लाटेचे गारुडसतराव्या लोकसभेचे भवितव्य स्पष्ट झालेले आहे. खरे...
हरवले जलभान कोनाड्यात‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’...
पांढऱ्या सोन्याची काळी कहाणीजागतिक पातळीवर कापसाखाली असलेल्या क्षेत्राच्या एक...
जलदारिद्र्य निर्देशांकातही आपली पिछाडीचएखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे मूल्यमापन करणार...
आगीपासून वन वाचविण्याचा करूया निर्धारजंगलातील वाळलेला पालापाचोळा हा ज्वलनशील पदार्थ...
आया मौसम बदली कामार्च ते मे हे तीन महिने शासकीय अधिकारी-...
उद्योगाला साखर कडूचमहाराष्ट्रातील गळीत हंगामाची सांगता नुकतीच झाली...
निवडणूक आयोगाला घरचा आहेर! सतरावी लोकसभा निवडण्यासाठीची मतदान प्रक्रिया कालच...
पूरक धोरणानेच वाढेल निर्यातकें द्रातील मोदी सरकारच्या सुरवातीच्या काळात...
कृषी पतपुरवठ्याची घडी बसवा नीटराज्यातील सहकाराचा कणा राज्य बॅंकेला मानले जाते....
व्यापक जनहितालाच हवे नव्या सरकारचे...आता साऱ्या देशाचे लक्ष १७ व्या लोकसभा निवडणूक...
व्यंकट अय्यरची कहाणीशेतीतील वाढत्या समस्यांना तोंड देत उत्पादन...
जललेखा अहवाल : अर्धवट आणि अवास्तवहीथेंब थेब पाण्याचा हिशेब लागावा, असा आग्रह सध्या...
कृषी पर्यटनाला संधी अमर्यादकृषी पर्यटन अर्थात ‘अ‍ॅग्रो टुरिझम’ हे ग्रामीण...
घातक किडींविरुद्ध लढा एकत्रको ल्हापूर जिल्ह्यात या वर्षीपासून कृषी विभाग व...
मुक्त शिक्षण एक मंथनयशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची पीएच.डी. ‘...
प्रशासनाच्या हलगर्जीपणाने केले अनेकांचे...एकीकडे आम्ही लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे...
तंत्रज्ञानाचे ‘भरीत’ किती दिवस? हरियाना राज्यात अवैध बीटी वांग्याची लागवड नुकतीच...
अशी ही (आर्थिक) बनवाबनवी!लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात...
भूलभुलैया नव्हे तर शेतकऱ्यांचा दीपस्तंभडॉ. अंकुश चोरमुले यांनी ॲग्रोवनच्या ५ मे २०१९...