वर्ल्ड फूड इंडिया ः प्रक्रिया उद्योजकांसाठी पर्वणी

वर्ल्ड फूड इंडिया म्हणजे अन्न प्रक्रियेबाबत सर्व काही असे म्हणता येईल. खरे तर हा कार्यक्रम प्रक्रिया उद्योजकांसाठी पर्वणी तर ठरणार आहे. परंतु उत्पादक, किरकोळ-घाऊक विक्रेते आणि ग्राहकांच्या अनुषंगिक महत्त्वाच्या बाबींवरही या कार्यक्रमाद्वारे प्रकाश टाकला जाणार आहे.
संपादकीय
संपादकीय

तंत्रज्ञान व विपणनाबाबत उद्योन्मुख मार्केट  अन्नप्रक्रिया उद्योगांच्या वाढीबरोबरच प्रक्रियायुक्त पदार्थांची शुद्धता, दर्जा, सुरक्षितता याबाबतही ग्राहकांचा कल वाढत आहे. त्यामुळे त्याबाबत अत्याधुनिक तंत्रज्ञान व यंत्राच्या निर्मितीची मागणी वाढत आहे. सध्या भारत ही यंत्रे मोठ्या प्रमाणात आयात करतो. अशा यंत्रांची भारतातच निर्मिती व्हावी, साठीही प्रोत्साहनपर कार्यक्रम राबविण्याची गरज आहे. भारतीय उद्योजकांच्या मागणीनुसार अशी यंत्रे व तंत्रज्ञाननिर्मिती करण्याची गरज आहे. कमी खर्चात व विजेचा योग्य वापर करून कार्य करणारी यंत्रे उपलब्ध व्हायला हवीत. हे सर्व ‘मेक इन इंडिया’ धोरणानुसार भारतातच बनविले जाईल, यावरही वर्ल्ड फूड इंडियात विचार केला जाणार आहे.  

न्यूट्रासिटिकल्स अर्थात पोषक अन्न-औषधी जगामध्ये वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून (सध्या विकासदर खालावला आहे तरी) भारताकडे पाहिले जाते. या देशाला युवकांचा देशही मानले जाते. युवाशक्तीवरच आपण जागतिक आर्थिक महासत्तेचे स्वप्नही पाहत आहोत. असे असताना भारतात कुपोषणाची समस्या मोठी आहे. देशातील ग्रामीण आणि शहरी भारतीयांच्या खाण्यामध्ये पौष्टिक अन्नाचे प्रमाण कमी आहे. अन्नातून योग्य पोषण मिळावे याबाबत भारतीय लोकांमध्ये जागरूकता वाढत आहे. त्यामुळे या देशात न्यूट्रासिटिकल्स व फोर्टिफिकेशन क्षेत्रातही गुंतवणकीसाठी मोठा वाव आहे. या क्षेत्रातील जागतिक बाजाराच्या तुलनेत भारतीय बाजाराचा वाटा केवळ २ टक्के इतका आहे. २०२२ पर्यंत यामध्ये १५ टक्केवाढीच्या दराने या क्षेत्रातील उलाढाल दुपटीचे उद्दिष्ट आहे. अन्न, पूरक आहार, पेये यांचे उत्पादन आणि विक्रीतही उल्लेखनीय वाढ होत असल्याचे दिसून येते. या सर्व पार्श्‍वभूमीवर वर्ल्ड फूड इंडियामध्ये खालील बाबींवर चर्चा होणार आहे.  सद्यःस्थितीतील भारतीय न्यूट्रासिटिकल बाजाराचे चित्र व संधी  भारतात या क्षेत्राच्या वाढीची गरज  संबंधित क्षेत्रातील असलेल्या मोठ्या उद्योजकांचे अनुभव 

ईशान्य भारतातही गुंतवणूकच्या संधी :  ईशान्य भाईाची वैविध्यपूर्ण भौगोलिक रचना तेथील आल्हाददायक वातावरण अनेक प्रकारचे अन्नधान्ये, फळे-फुले-भाजीपाला आणि वनशेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्रिपुरा हे राज्य दुसरे रबर कॅपिटल म्हणून नावारूपाला येत आहे. बांबू उत्पादनात मिझोरामचा वाटा ४० टक्के आहे. सिक्कीमला सेंद्रिय शेतमाल उत्पादक राज्य म्हणून ख्याती मिळाली आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये सरकारच्या पाठिंब्यामुळे विविध फळांचे उत्पादन वाढत आहे. शिवाय एकूणच ईशान्य भारतात औषधी वनस्पती तसेच फुलांचे उत्पादन अधिक होते. या वैशिष्ट्यांचा विचार करता शेतमालावरील विविध प्रक्रिया उद्योगांच्या गुंतवणुकीला या भागात खूप वाव आहे. वराहपालन व मत्स्यपालनसाठाही या भागात मोठी संधी आहे. मोठी गुंतवणूक न करता ‘बांधा वापरा व हस्तांतरित करा’ या धोरणानुसार या भागात अनेक प्रकल्प उभारता येतील. वर्ल्ड फूड इंडियामध्ये याबाबींवरही विचारविमर्ष केला जाणार आहे.   

सुरक्षित अन्नाविषयी विचार नव्या बाबींचा :  अन्नामध्ये घातक ‘फूड ॲडिटिव्हज’चा वापर नियंत्रित करण्यासाठी भारतीय अन्नसुरक्षा प्रमाणके संस्था ( एफएसएसएसआय) यांनी बरेच कार्य केले आहे. कुपोषणावर मात करण्यासाठी ही संस्था ‘फूड फोर्टिफिकेशन’वरही नावीन्यपूर्ण कार्य करीत आहे. मुलांचे वाढते वजन ही समस्याही देशात गंभीर रूप धारण करीत असताना खाद्यामध्ये मीठ, साखर यांच्या प्रमाणावरही काम होते आहे. देशांतर्गत प्रक्रियायुक्त पदार्थ तसेच आयात केलेल्या अन्नपदार्थांच्या योग्य तपासणीसाठी प्रयोगशाला सशक्त केल्या जात आहेत. या अनुषंगिक खालील मुद्द्यांवर वर्ल्ड फूड इंडियामध्ये भर देण्यात येणार आहे.  अन्नसुरक्षेसाठी शास्त्रीय आधारांवर व जागतिक पातळीवर अनुकूल अशा मानकांची निर्मिती  सुरक्षित अन्न मानकांचाच अवलंब होईल अशा संस्कृतीची देशात निर्मिती  अन्नप्रक्रिया उद्योगातील गुंतवणुकीबाबत योग्य वातावरण निर्मिती   

पुरवठा साखळी व्यवस्थापनातील संधी  अद्ययावत काढणीपश्‍यात सुविधांअभावी देशात शेतमालाची मोठ्या प्रमाणात नासाडी होते. एकूण उत्पादित शेतमालापैकी केवळ १० टक्के मालावर प्रक्रिया होते. प्रक्रियेसह शीतगृह व साठवणूकगृहांची कमतरता या मोठ्या समस्या असून, या क्षेत्रातही गुंतवणुकीसाठी चांगलाच वाव आहे. शेतमाल प्रक्रिया, पुरवठा साखळी विकसित करण्यासाठी देशात मेगा फूडपार्क, शीतगृहांची उभारणी, गुणवत्तापूर्ण अन्नप्रक्रिया पदार्थनिर्मिती आदींबाबत योजना राबवून भर दिला जात आहे. देशात २३८ एकीकृत शीतगृह साखळी प्रकल्प प्रस्तावित केले असून, त्यापैकी गेल्या तीन वर्षांत १०३ प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहेत. ४२ मेगा फूडपार्कना मंजुरी दिली असून, ९ प्रकल्पांचे प्रत्यक्ष कार्य सुरू झाले आहे. ३३ प्रकल्पांचे कार्यही लवकरच हाती घेतले जाणार आहे. ॲग्रो-सागरी प्रक्रियेसाठी ‘संपदा’ ही नवीनच योजन केंद्र शासनाने सुरू केली असून, त्याकरिता ६ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. येत्या काही वर्षांत या क्षेत्रात ३१ हजार ४०० कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. या क्षेत्रातील शेतकरी, छोटे-मोठे उत्पादक, प्रक्रियादार, वितरक यांना एकत्र आणून नासाडीचे प्रमाण कमी करणे, तसेच उच्च गुणवतापूर्ण उत्पादनांची निर्मिती करणे याबाबत प्रयत्न केले जात आहेत.  शीतगृहांच्या उभारणाबाबतही मोठी गुंतवणूक प्रस्तावित आहे. शीतगृह साखळीच्या वाढीचा देशातील वेग २०१२-१७ या काळात २८ टक्के इतका आहे. त्याची उलाढाल ६ हजार ४०० कोटी इतकी आहे. सरकारच्या प्रयत्नांमुळे या क्षेत्रातील लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्‍समध्ये भारताने २०१६ सालात १९ अंकांची प्रगती करीत जागतिक तुलनेत ३५ वा क्रमांक प्राप्त केला. या क्षेत्रातील गुंतवणूक, सरकारची ध्येयधोरणे, आर्थिक साह्य, मेगा फूडपार्कची उभारणी आदी विषयांवर वर्ल्ड फूड इंडियामध्ये प्रकाश टाकला जाईल.

रिटेल व्यवसाय  अन्नप्रक्रिया क्षेत्रातील भारतातील रिटेल (घाऊक) व्यवसाय २०१५ मध्ये ६६० अब्ज डॉलर्स होता. या क्षेत्राचा वार्षिक वाढ दर साडेसात टक्के आहे. एकूण रिटेल क्षेत्रात अन्न क्षेत्राचा वाटा ६० टक्के आहे. यावरून या क्षेत्राची व्याप्ती आणि त्यातील संधी लक्षात घ्यायला हव्यात. ऑनलाइन विक्री सेवा देशात हळूहळू विस्तारत चालली आहे. त्यामुळे २०२५ पर्यंत ५३० दशलक्ष दुकानदारांची यात वाढ अपेक्षित आहे. तर २०२० पर्यंत केवळ ई-कॉमर्स क्षेत्र १२० अब्ज डॉलर्सवर पोचण्याची शक्‍यता आहे. रिटेल क्षेत्राबाबत यातील प्रचंड संधींची उपलब्धता, या संबंधित कायद्यांचे सुलभीकरण, पूरक साखळीच्या समन्वयासाठी योग्य प्रयत्न, तसेच या क्षेत्रात कार्यरत देशी-विदेशी कंपन्यांच्या अनुभवाचे विश्‍लेषण वर्ल्ड फूड इंडियामध्ये केले जाईल. 

पारंपरिक पदार्थांचे जागतिकीकरण  भारतीय पारंपरिक खाद्यपदार्थ जागतिक पातळीवर लोकप्रिय होत आहेत. त्यांचे योग्य पॅकेजिंग, विपणन, स्वच्छ उत्पादन यांचा वापर करून जागतिक पातळीवर त्यांचा पुरवठा वाढविला पाहिजे. रेडी-टू-ईट प्रकारातील भारतीय खाद्यपदार्थांनाही मागणी वाढत आहे. उत्पादन सुधारणा व ब्रॅंडनिर्मितीला प्रोत्साहन देऊन त्यांच्या विक्रीवाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत.

विजयकुमार चोले, सुमेधा जालगावकर ः ९६८९८८७२३१. (विजयकुमार चोले सातारा मेगा फूड पार्कचे उपाध्यक्ष, तर सुमेधा जालगावकर फुडीसीसच्या संचालिका आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com