किनारपट्टी शेतीत रुजवतोय नवं तंत्र

डॉ. एकनाथ चाकूरकर
डॉ. एकनाथ चाकूरकर

किनारपट्टी भागातील शेती, पशूपालन आणि पूरक उद्योगासाठी गोवा राज्यातील केंद्रीय किनारपट्टी कृषी संशोधन संस्था ही महत्त्वाची संस्था आहे. संस्थेने एकात्मिक शेती तंत्रज्ञानावर भर दिला आहे. संशोधन प्रसारासाठी माहिती तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. संस्थेच्या विविध उपक्रमांबाबत संस्थेचे संचालक डॉ. एकनाथ चाकूरकर यांच्याशी साधलेला संवाद.

संस्थेची प्रमुख उद्दिष्टे कोणती आहेत ?  गोवा राज्यातील पीक पद्धती, फळबाग, पूरक उद्योगातील संशोधन आणि तंत्रज्ञान प्रसारासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेने ओल्ड गोवा येथे संशोधन केंद्राची सुरवात केली. याठिकाणी झालेल्या संशोधनाचा प्रसार आणि देशभरातील किनारपट्टीतील पीक पद्धतीबाबत संशोधनाला गती देण्यासाठी १ एप्रिल, २०१४ रोजी या केंद्राचे रूपांतर केंद्रीय किनारपट्टी कृषी संशोधन संस्थेमध्ये करण्यात आले. गुजरातपासून ते पश्चिम बंगाल राज्यातील समुद्रकिनाऱ्यापासून ५० किलोमीटर आतपर्यंतच्या भागातील पीक पद्धतीबाबत संशोधन करण्यात येते. इतर विभागापेक्षा किनारपट्टी भागातील पाऊस, जमीन, पीक पद्धती, पूरक उद्योग आणि शेतकऱ्यांच्या समस्याही वेगळ्या आहेत. कार्यक्षेत्राचा विचार करता पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम किनारपट्टी असे दोन भाग आहेत. सध्या आम्ही पश्चिम किनारपट्टीच्या दृष्टीने विशेष संशोधन करत आहोत. पूर्व किनारपट्टीवरील तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांसाठी स्वतंत्र उप केंद्र भारतीय कृषी संशोधन परिषदेमार्फत सुरू करण्याचा विचार आहे.

कृषी विकासाच्या दृष्टीने कोणत्या प्रकल्पांवर भर दिला आहे ? संस्थेने भात, नारळ, काजू, आंबा, फणस, सुपारी, भाजीपाला पिकांच्याबरोबरीने पूरक उद्योगांच्यादृष्टीने संशोधन आणि विविध जातींचा प्रसार केला. हवामान बदलात शेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होण्यासाठी किनारपट्टी भागासाठी एकात्मिक शेती पद्धतीवर भर दिला. या भागातील पिके तसेच जनावरांच्या स्थानिक जातींमध्ये जैवविविधता आहे. यांचे संवर्धन करून संशोधनाला चालना दिली. हवामान बदलात तग धरणाऱ्या, अधिक उत्पादन देणाऱ्या जाती विकसित होत आहेत. किनारपट्टीच्या सखल भागात भात शेती, नारळ लागवड आहे. नारळामध्ये फुल पिके, जायफळ, मिरी, दालचिनी लागवडीवर भर दिला आहे. डोंगराळ भागात काजू लागवडीत हळद, अननस आंतरपीक पद्धतीचे मॉडेल विकसित केले आहे. सखल भागात भात लागवडीनंतर चवळी घेतली जाते. याचबरोबरीने मिरची, भाजीपाला किंवा भुईमूग लागवडीला चांगली संधी आहे. त्यादृष्टीने सखल भागासाठी मॉडेल तयार केले. पावसाचे प्रमाण, जमिनीची प्रत लक्षात घेऊन विविध हंगामातील पीक पद्धती बसविलेली आहे.  एकात्मिक शेती पद्धतीची मॉडेल्स कशी फायदेशीर ठरतील ?   किनारपट्टी भागातील शेतकऱ्यांची जमीन धारणक्षमता ही सरासरी दीड ते दोन एकर आहे. हे लक्षात घेऊन आंतरपीक पद्धती, एकात्मिक शेती आणि पूरक उद्योगाची जोड असलेली मॉडेल्स तयार केली. नारळ बागेत आंतरपीक म्हणून हेलिकोनीयाची लागवड आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे. आमच्या प्रक्षेत्रावरील नारळ बागेत हेलिकोनियाच्या चाळीस जातींची लागवड आहे. नारळ बागेत सीओ-३,सीओ-४  या चारा जातींचे आंतरपीक पशूपालकांना उपयुक्त ठरते. त्यामुळे वर्षभर चारा उपलब्धता आणि जमिनीचा योग्य वापर होतो. शेतीबांधावर विविध फळझाडे, वेलवर्गीय भाजीपाला, औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी मार्गदर्शन करतो. उपलब्ध लागवड क्षेत्रानुसार वर्षभर विविध पिकांच्या लागवडीवर भर दिला आहे. जेणेकरून शेतकऱ्यांला वर्षभर काही ना काही उत्पन्न मिळत राहील. संस्थेची अद्ययावत प्रयोगशाळा आहे. येथे माती परीक्षणाची सोय आहे. दरवर्षी तीन हजार जमीन आरोग्यपत्रिका तयार करून देण्याचे नियोजन आहे. सेंद्रिय शेतीच्यादृष्टीने जैविक कीडनाशके, जीवाणू संवर्धके तयार केली आहेत. पूरक उद्योगाचा विचार करता  प्रत्येक शेतकऱ्यांकडे गाय किंवा शेळीपालन, परसबागेतील कोंबडीपालन, मधमाशीपालन, वराहपालन, ससेपालनाची मॉडेल्स विकसित केली आहेत. त्यामुळे वर्षभर शेतीव्यतिरिक्त आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत सुरू राहील. संस्थेच्या कृषी विज्ञान केंद्रात प्रशिक्षणाची सोय आहे. गरजेनुसार शिवारफेरीचे आयोजन केले जाते. संशोधनामध्ये जैव तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला आहे. विविध पिकांच्या जातींचा जनुकीय नकाशा तयार करत आहोत.

शेती जोडधंद्याच्या दृष्टीने आपल्या संस्थेतर्फे कोणते मार्गदर्शन केले जाते ? शेतीला मुऱ्हा म्हैस तसेच गीर, साहिवाल, रेडसिंधी या देशी गाईंच्या संगोपनाची जोड देता येईल. गीर गाय चांगल्या व्यवस्थापनात प्रति दिन दहा लिटर दूध देते. त्यांची रोग प्रतिकारशक्ती चांगली आहे. हवामान बदलात दूध उत्पादनात सातत्य आहे. शेण, गोमुत्रापासून सेंद्रीय खत शेतीला उपलब्ध होते. पशूखाद्यात बायपास फॅटचा वापर,हायड्रोपोनिक्स पद्धतीने चारा निर्मिती, फिड ब्लॉक वापरण्याचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचविले आहे.    प्रत्येक शेतकऱ्याने किमान पाच शेळ्यांचे संगोपन केले तर अडचणीच्या काळात शेळ्यांची विक्रीकरून लगेच पैसा उपलब्ध होतो. कोकण कन्याळ ही शेळीची स्थानिक जात किनारपट्टी भागात चांगल्याप्रकारे वाढते. साधारणपणे ६ ते ८ महिन्यांत या शेळ्यांचे वजन ३४ ते ३८ किलोपर्यंत जाते. आम्ही शेतकऱ्यांना जातिवंत शेळी, बोकड उपलब्ध करून देतो. मका चुणी, भात कोंडा, सोयाबीन पेंड, खनिज मिश्रण यांचे योग्य प्रमाण घेऊन खाद्य मिश्रणाचा फॉर्मुला तयार केला आहे. त्यामुळे शेतकरी घरच्याघरी उपलब्ध घटकांच्यानुसार खाद्यमिश्रण तयार करू शकतात. परसबागेतील कुक्कुटपालनासाठी ग्रामप्रिया, श्रीनिधी या सुधारित जातीच्या कोंबड्यांचा प्रसार करत आहोत. ग्रामप्रिया कोंबडी वर्षभरात २०० ते २५० अंडी देते. श्रीनिधी कोंबडी अंडी आणि मांसासाठी फायदेशीर आहे. ही कोंबडी वर्षभरात १५० अंडी देते. दरही चांगला मिळतो. संस्था लसीकरण केलेल्या एक महिन्याच्या पिल्लांची विक्री करते. आम्ही अगोंदा गोवन या स्थानिक वराह जातीची नोंदणी केली आहे. स्थानिक जातीबरोबरीने यॉर्कशायर जातीचे संकरिकरण यशस्वी झाले आहे. वराहांतील कृत्रिम रेतनाबाबत पशूतज्ज्ञांना प्रशिक्षणाची सोय केली आहे. आम्ही संकरिकरण केलेल्या वराह जातीच्या तीन पिढ्या तयार झालेल्या आहेत. या संकरित जातीचीही नोंदणी करत आहोत. हे वराह दहा महिन्यांत ९० किलोपर्यंत वाढतात.

माहिती तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने फायदेशीर ठरतो आहे ? संस्थेच्या वेबसाईटवर हवामान अाधारित पीक व्यवस्थापन सल्ला दिला जातो. संस्थेच्या ट्विटर आणि फेसबुक वरूनही माहिती देण्यास सुरवात करत आहोत. गरजेनुसार मोबाईलवर पीक सल्ला दिला जातो. योग्य खत वापराबाबत ‘फर्टिलायझर कॅल्यूलेटर ॲप` तयार केले. जमिनीचे क्षेत्र, पीक आणि माती परीक्षण अहवालाची माहिती ॲपमध्ये भरली की पिकाला नेमकी किती खत मात्रा द्यावी लागेल याची माहिती मिळते. हे ॲप पीकनिहाय खतमात्रेची माहिती देते. ‘डिसीजन सपोर्ट सिस्टिम` तयार केली आहे.  संकेतस्थळावर विविध पिकांची लागवड ते काढणीपर्यंत माहिती आणि छायाचित्रे दिली आहेत. पशूपालन, कुक्कटपालन आणि वराह पालनाची माहिती दिली आहे. जनावरांतील रोग प्रसार तात्काळ कळण्यासाठी ‘डिसीज मॉनिटरींग सिस्टिम` कार्यरत आहे. संस्थेमध्ये ३ डिसेंबर हा कृषी शिक्षण दिवस साजरा केला जातो. गोवा राज्यातील विविध शाळांमध्ये संस्थेचे तज्ज्ञ शेती संशोधनाबाबत माहिती देण्यासाठी जातात. 

महत्त्वाचे संशोधन भात  

  • किनारपट्टीभागातील खार जमिनीत चांगले उत्पादन देणारी कोरगुट या स्थानिक जातीतून गोवा धान-१ आणि गोवा धान -२ या सुधारित भात जाती विकसित. गोवा राज्यासाठी प्रसारित.
  • गोवा धान - १ जातीचा तांदूळ पांढरा तर गोवा धान - २ या जातीचा तांदूळ लाल.
  • खार जमिनीत या जातींचे प्रति हेक्टरी उत्पादन २.५ ते ३ टन.
  •  काजू 

  • गोवा काजू १ ते ४ या जाती प्रसारीत. काजू आणि फळ देखील मध्यम ते मोठ्या आकाराचे.
  •  दहा वर्षांच्या एका झाडापासून १० ते १८ किलो उत्पादन. 
  • प्रक्षेत्रावर काजूच्या ७० जातींचे संकलन.
  • आंबा  

  • प्रक्षेत्रावर आंब्याच्या १०८ जातींचे संकलन, त्यातील ९० जाती स्थानिक.
  • गोवातील मानकुराद आंब्याला चांगली मागणी. संस्थेतर्फे कार्डाजो मानकुराद या जातीची नोंदणी. येत्या दोन वर्षांत ही जात प्रसारित होणार.
  • कार्डाजो मानकुराद आंबा चवीला उत्तम, गरात धाग्याचे प्रमाण कमी. फेब्रुवारी- मार्चमध्ये फळे बाजारात, त्यामुळे दरही चांगला मिळतो. 
  • कोकम 

  •  चांगले उत्पादन देणाऱ्या दोन जाती पुढील वर्षी प्रसारित होणार.
  • मत्स्यपालन 

  • गोड्या आणि खाऱ्या पाण्यातील मत्स्यपालनाबाबत विशेष संशोधन.
  • जेथे नदी समुद्राला मिळते त्याठिकाणी माशांच्या प्रजननाच्या जागा आहेत. या ठिकाणी विविध माशांच्या जातीचे प्रजनन वाढण्यासाठी कृत्रिम निवाऱ्याच्या रचना केल्या आहेत. तेथे माशांना पुरेसे खाद्य उपलब्ध होते, प्रजननास सुरक्षित जागाही तयार होते. यातून व्यावसायिकदृष्ट्या कोणत्या जाती वाढविण्यास योग्य आहेत याबाबत संशोधनाला चालना.
  • प्रक्रिया तंत्र 

  • ताज्या खोबऱ्याचे दूध काढून त्यावर प्रक्रिया करून तेल निर्मितीचे तंत्र उपलब्ध. औषधनिर्मितीमध्ये या तेलास चांगली मागणी.नारळ  उत्पादकांना प्रशिक्षणाची सोय. 
  • ताज्या काजू बोंडापासून ‘कॅश्यू ॲपल क्रंच` आणि जायफळाच्या सालीची कॅंन्डी निर्मिती. या तंत्रज्ञानाच्या पेटंटसाठी अर्ज. लवकरच हे तंत्र प्रक्रियादारांना उपलब्ध होणार.  
  • संपर्क ः ०८३२- २२८४६७७ संकेत स्थळ ः  www.ccari.res.in

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com