सेंद्रिय शेतीत जहागीरदारवाडीने घेतली आघाडी

मुंबईची नोकरी सोडून शेती स्थानिक शेतकरी पोपटराव घोडे मुंबईतील नोकरी सोडून गावी शेती करू लागले आहेत. ते देशी गाईंचे संगोपन आणि त्यावर आधारित सेंद्रिय शेती करतात. नाचणीच्या कुकीज तयार करण्यापर्यंत त्यांनी प्रगती केली आहे. ते म्हणाले की, पूर्वी रासायनिक खतांचा अवलंब करायचो. आता त्याच शेतीतून सेंद्रिय उत्पादन घेऊ लागलो. उत्पादनाचे मूल्यवर्धन आणि उपलब्ध झालेली बाजारपेठ यामुळे उत्पन्नात फरक झाला आहे. सेंद्रिय मालाला अजून चांगली बाजारपेठ मिळेल.
नगर जिल्ह्यात कळसूबाईच्या पायथ्याला वसलेली जहागीरदारवाडी.
नगर जिल्ह्यात कळसूबाईच्या पायथ्याला वसलेली जहागीरदारवाडी.

नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात महाराष्ट्राचे सर्वांत उंच शिखर असलेल्या कळसूबाईच्या पोटाशी जहागीरदारवाडी वसली आहे. सुमारे २५८ लोकवस्तीचे या टुमदार खेड्यातील ग्रामस्थांना पूर्वी रोजगारासाठी भटकंती करून आपली उपजीविका भागवावी लागे. आता सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून येथील महिला तसेच तरुणांना विकासाच्या वाटा मिळाल्या आहेत. तुकड्यातुकड्यांत असलेल्या आपल्या शेतीत कष्ट करून जिद्दीने त्यांनी आर्थिक सक्षमतेकडे व पर्यायाने ग्रामविकासाकडे वाटचाल केली आहे. शेतीमालाचे मूल्यवर्धन करून त्याला शहरी बाजारपेठ मिळवण्यात इथले ग्रामस्थ यशस्वी झाले आहेत. 

कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर. याच शिखराच्या पायथ्याशी बारी जहागीरदारवाडी हे सुमारे १५० घरे असलेले गाव आहे. गावातील शेतकरी पिढ्यान् पिढ्या शेतीबरोबरच वन्यआधारित उपजीविका करतात. पावसाच्या पाण्यावरच इथली शेती अवलंबून असते. नागली, वरई, भात पिकांबरोबरच गहू, हरभरा, कडू वाल आदी पिके इथले शेतकरी घेतात. बहुतांश शेती सेंद्रिय पद्धतीनेच केली जाते.  तुकड्या- तुकड्यांची व डोंगर उतारावरील शेती हे इथले वैशिष्ट्य. उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करून शेतीतून उत्पादन ते घेतात. आपल्या शेतीमालास पुणे, मुंबई, नगर, नाशिक येथील बाजारपेठ मिळविण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. व्यापाऱ्याला न देता थेट ग्राहकांना विक्री केल्याने नफा वाढवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. शाश्वत शेती हे ध्येय ठेवून चालताना आरोग्य आणि पर्यावरणाची हमीच जणू इथल्या ग्रामस्थांनी दिली आहे. स्वावलंबी शेती करताना बाजारातून बियाणे विकत आणण्यापेक्षा घरचेच बियाणे राखून ठेवून बाजारपेठेतील अवलंबित्व त्यांनी कमी केले आहे. 

भरडधान्ये, कडधान्यांचे महत्त्व पुन्हा पटले

मध्यंतरीच्या काळात संकरित भाताचेही काही प्रयोग झाले. संख्यात्मक वाढ उत्पन्नात दिसल्यामुळे तुकड्यांत असलेल्या भात-खाचरांचा वापर फक्त भात उत्पादनासाठी होऊ लागला. याचा परिणाम भरडधान्ये व कडधान्ये पिकांच्या लागवडीवर झाला. ही पिके झपाट्याने कमी होऊ लागली. काहींचे बियाणे मिळणेही दुरापास्त झाले. त्यानंतर मात्र या पिकांचे संवर्धन आवश्यक असल्याचे लक्षात आले. आज जिथे ठराविक डोंगरउतारावर भात घेऊ शकत नाही तिथे वरई घेतली जाते. मोठ्या मेहनतीने पिकविलेल्या भात आणि वरईची बाजारात विक्री करून वर्षभराचा कुटुंबाचा खर्च भागवला जाणे हे अपरिहार्यच आहे. मात्र शेतकरी जितके कष्ट करतो त्या तुलनेत त्याला दर मिळत नाहीत. व्यापाऱ्याचा फायदा जास्त होतो हे लक्षात आले. 

रासायनिक अंशमुक्त शेतीचा वापर 

कळसूबाईची भगर ग्राहकांच्या पसंतीला उतरू लागली. पर्यटन वा अन्य निमित्ताने आलेले ग्राहक उत्कृष्ट चवीच्या पारंपरिक भाताची मागणी करू लागले. नाचणी, राळा यांचाही मागणी करू लागले. मग वाडीतील तरुण महिला एकत्र आल्या. गटांचे नियोजन झाले. सर्वांनी ठरवून पारंपारिक बियाणे घ्यायचे ठरवले. यासोबतच रासायनिक अंशमुक्त शेती करणेही आवश्यक होते. त्यासाठी सेंद्रिय शेतीचे प्रयोग सुरू झाले. जिवामृत, सेंद्रिय खते यांचा वापर वाढला. अजूनही शंभर टक्के शेती सेंद्रिय झाली असे म्हणता येणार नाही, मात्र या पद्धतीचा बहुतांश वापर सुरू मात्र झाला. शेतकऱ्यांनी यात सातत्य ठेवले. जिवामृत, माती आणि गोमूत्र यापासून बनवलेल्या गोळ्या, शेणखत यांचा जास्तीत जास्त वापर करण्यात आला.  

शेतीमालाचे मूल्यवर्धन

पारंपरिक बियाणे आणि सेंद्रिय पद्धतीचा अवलंब यामुळे आलेल्या उत्पादनाचा दर्जा अप्रतिम होता. जुन्या वयस्कर लोकांना त्यांच्या लहानपणीची चव यामुळे आठवली. काळभाताचा घमघमाट नुसत्या त्याच्या घरात ठेवल्यानेही येऊ लागला. गावातील पोपट घोडे यांनी वरई प्रक्रिया यंत्राद्वारे शेतीमाल मूल्यवर्धन केले होतेच. त्याचसोबत चकली, पीठ यांचीही निर्मिती केली. या शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळाले ते नीलिमा जोरवर यांचे. एका संस्थेच्या माध्यमातून कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसरात शेती, पर्यावरण हे विषय केंद्रस्थानी ठेवून त्या येथे कार्यरत अाहेत. नुकतेच त्यांचे मिलेट-जादुई धान्य हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. भंडारदरा परिसरातील जैवविविधतेचा अभ्यास, विद्यार्थी व युवकांसाठी पर्यावरण शिक्षण, निसर्ग संवाद शिबिरांचे आयोजन, अभयारण्यातील गावकऱ्यांना वन्य आधारित शाश्वत उपजीविका मिळवून देण्यात संस्था व जोरवर आघाडीवर आहेत.

ग्राहकांची मने जिंकली    नागपूर, मुंबई, औरंगाबाद, पुणे आदी ठिकाणचा ग्राहक आता या शेतकऱ्यांशी जोडला गेला आहे. भीमथडीसारख्या मोठ्या खाद्यजत्रेतून गावातील ‘मिलेट थाळी’, वरई वडा, बाजरी-वरईची भजी, वरी पुलाव, खीर अशा नावीन्यपूर्ण पदार्थांनी ग्राहकांची मने जिंकली. आता हेच जहागीरदारवाडी गाव रानभाज्या, सेंद्रिय शेती, पारंपरिक वाण बँक यासाठी पुढे आले आहे. 

मागणीनुसार शेतीचे नियोजन

आज गावातील प्रक्रिया यंत्र महिला शेतकरी अक्काबाई घोडे चालवतात. शेतात काय पेरायचे या निर्णय प्रक्रियेत घरातील महिलेचा सहभाग असतो. बाळू व विमल या घोडे दांपत्याने पारंपरिक भात व भरडधान्यांचे बियाणे परिसरातून गोळा करून त्याची लागवड करण्यास सुरवात केली आहे. यात २१ प्रकारची भरडधान्यांचीच बियाणे आहेत. एकेवेळी रोजगारासाठी भटकंती करणारा आदिवासी शेतकरी आज गावात राहूनच अर्थार्जन करीत आहेत. गाव लाखो रुपयांची उलाढाल करीत  आहे. 

प्रक्रिया उद्योगाची वाट   नफ्याचे मार्जीन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी आपण पिकविलेल्या धान्यावर स्वतःच प्रक्रिया करावी असे ठरविण्यात आले. चार वर्षांपूर्वी प्रवास सुरू झाला तो भरडधान्य प्रक्रिया करणाऱ्या छोट्या उद्योगाचा. मग त्यासाठी यंत्र शोधले गेले. अर्थात, या पिकांच्या उद्देशाने महाराष्ट्रात कुठे ते उपलब्ध नव्हते. राज्याबाहेरून ते मागवले गेले. त्यानंतर सुरू झाले कळसूबाईचे ‘वरई प्रक्रिया युनिट’. स्वतः पिकविलेल्या धान्यावर प्रक्रिया करून हा शेतीमाल प्रत्यक्ष ग्राहकांना विकला जाऊ लागला. त्यातून योग्य तो मोबदला मिळू लागला. ज्यांच्याकडे वरी पिकते, ते आता स्वतः घरी खाण्यासाठी त्याची भगर तयार करून नेऊ लागले. बाजारातून विकत आणलेला साबुदाणा खाण्यापेक्षा पौष्टिक, घरी तयार केलेली भगर खाल्ली जाऊ लागली. 

प्रक्रिया पदार्थांना बाजारपेठ   आणखी काही गटांच्या माध्यमातून गावात नाचणीवर प्रक्रिया करण्यास सुरवात झाली. सामूहिक प्रयत्नांतून नाचणी, ज्वारी, बाजरी शेवया, ज्वारीची शेव, नाचणी-ज्वारी पापड, वरई चकली आणि गावठी तुपातील नाचणी कुकीज असे पदार्थ तयार झाले आहेत. या उत्पादनांना योग्य बाजारपेठ व दरही मिळणे आवश्यक होते. त्यासाठी मदत झाली ती विविध महोत्सव व प्रदर्शनांमुळे. नुकत्याच पार पडलेल्या प्रजासत्ताक दिनाचे निमित्त साधून जहागीरदारवाडी-बारी गावात भरडधान्ये, रानभाज्या व आदिवासी सांकृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यात सौरभ प्रतिष्ठान, अकोले, कळसूबाई मिलेट उत्पादक व प्रक्रिया गट, जहागीरदारवाडी आणि सहजा समृद्ध, बंगळूर आदींनी एकत्रितपणे त्याचे आयोजन केले. 

महिलांनी फुलविली शेती 

जहागीरदारवाडी येथे लग्न होऊन आले. येथे महिला बचत गटाची माहिती मिळाली. त्या माध्यमातून सेंद्रिय शेती, गोपालन आदी उपक्रम राबवू लागलो. प्रक्रियायुक्त मालाला महोत्सवांच्या माध्यमातून बाजारपेठ मिळविली आहे असे महिला शेतकरी दुर्गा खाडे म्हणाल्या. याच वाडीतील विमल घोडे, अक्काबाई घोडे, सावित्री घोडे, सुलोचना घोडे, पद्मा घरे, मंगल खाडे आदी ५० महिलांनी एकत्र येऊन आपले गावशिवार फुलविले आहे. भंडारदरा जलाशयातून पाणी आणून ते शेतीला वापरून शेती फुलविली आहे. 

शेतीमालाचा खप वाढला

ग्रामीण भागातील शेतीचा पारंपरिक ठेवा व ज्ञान यांना योग्य दिशेने पुढे नेले, तर निसर्गाचा हा ठेवा पुढच्या पिढीला सुपूर्त करता येईल. यासाठी शहरी आणि ग्रामीण अशा दोन्हीही पातळ्यांवर काम व्हायला हवे. संवाद शिबिर, वेगवेगळे महोत्सव यांच्या माध्यमातून शहरातील लोकांचे आपल्या अन्नदात्याशी बंध जुळवत आम्ही आलो. परिणामी, शेतीमालाचा खप वाढला. मागील वर्षी व यंदाही मागणी जास्त होती. - नीलिमा जोरवर

संपर्क ः पोपटराव घोडे, ९५५२१७५७१४

संपर्क ःविमल घोडे,९६५७१९०४१९

संपर्क ः नीलिमा जोरवर, ९४२३७८५४३६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com