ग्रामरोजगाराला गती देणारी ‘निवेदिता निलयम'

साटोडा (जि. वर्धा) येथे संस्थेच्या मार्गदर्शनाखाली कापूस ते कापड प्रकल्प कार्यान्‍वित करण्यात आला आहे.
साटोडा (जि. वर्धा) येथे संस्थेच्या मार्गदर्शनाखाली कापूस ते कापड प्रकल्प कार्यान्‍वित करण्यात आला आहे.

महात्मा गांधी, विनोबा भावे यांच्यापासून प्रेरणा घेत प्रविणा देसाई यांनी वर्धा शहरात ग्रामविकासाला दिशा देणाऱ्या निवेदिता निलयम या  स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. संस्थेने प्रामुख्याने ग्रामीण भागात रोजगाराभिमुख उद्योग उभारणीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यासोबतच देशभरातील युवकांमध्ये निस्वार्थ समाजसेवेचे बीज रोवण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.  

निवेदिता निलयम या संस्थेच्या संस्थापिका प्रविणाताई देसाई यांचा बराच काळ विनोबा भावे यांच्याबरोबरीने विविध सामाजिक प्रकल्प आखणीत गेला. सध्या प्रविणाताई या पवनार (वर्धा) येथील विनोबांच्या आश्रमात राहतात. विनोबांकडूनच सामाजिक कार्याची प्रेरणा घेत त्यांनी ‘निवेदिता निलयम` या संस्थेची उभारणी केली. साटोडा (ता. जि. वर्धा) येथील स्वातंत्र्य सेनानी सुकाभाऊ चौधरी यांनी १९९० मध्ये नागपूर-मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील बावीस एकर जागा संस्थेच्या कार्यासाठी दान केली. त्याच जागेवर आज संस्थेची इमारत उभी आहे. प्रविणाताई देसाई, भाविनीताई पारेख, मैथीलीताई, दयाताई, मयुरेश देशपांडे, रामभाऊ मस्कर, किशोरभाई यांचा संस्थेच्या ट्रस्टीमध्ये समावेश आहे. गांधी आणि विनोबा यांच्या विचाराने या संस्थेचे कार्य चालते.  

  युवकांचे होते प्रबोधन  स्वामी विवेकानंद यांच्या भगिनी निवेदिता यांच्या नावाने ही संस्था कार्यरत आहे. निवेदिता या शब्दाचा अर्थ समर्पित आणि निलयम या शब्दाचा अर्थ परिवार होतो, असे या संस्थेचे प्रवर्तक किशोरभाई सांगतात. त्यामुळे समर्पित युवकांचा परिवार असा संस्थेच्या कार्याचा अर्थ आहे. युवकांमध्ये समाजाप्रती बांधिलकी वाढावी असा संस्थेचा उद्देश आहे.  चारित्र्यवान युवकांची समाजनिर्मिती आणि या चारित्र्यवान युवकांच्या शक्तीचा देशासाठी उपयोग व्हावा, अशा प्रकारची शिकवण संस्थेमध्ये दिली जाते. देशभरातील युवक या संस्थेमध्ये प्रशिक्षणासाठी येतात. पहाटे साडेचार ते रात्री नऊ या वेळात युवकांना प्रशिक्षण मिळते. या ठिकाणी कोणीच गुरू किंवा शिष्य नाही. समानतावादी तत्त्वाने येथे प्रशिक्षण मिळते. स्वावलंबन, अहिंसा, सत्य, ब्रम्हचर्य यांसह अकरा मूल्यांची शिकवण येथे दिली जाते. अशासकीय संस्था न उभारता किंवा कोणताही शासकीय निधी न घेता येथे प्रशिक्षण घेऊन परतलेले युवक निस्सीम सेवाभावाने आपापल्या भागात सेवाकार्य करतात. त्यामध्ये मुख्यत्वे गावस्तरावरील समस्यांच्या सोडवणुकीचा समावेश आहे.

  हातमागाच्या माध्यमातून रोजगार  संस्थेत प्रशिक्षणार्थी म्हणून असलेल्या युवकांसाठी ग्रामीण भागातील समस्या जाणून घेण्यासाठी कार्यानुभवाचे आयोजन केले जाते.  ग्रामीण भागात रोजगारांच्या समस्या आहेत. हातमागाच्या माध्यमातून नजीकच्या काळात परिसरातील गावांमध्ये रोजगार उपलब्ध होण्यासाठी संस्थेने पुढाकार घेतला. आजपर्यंत सुमारे साठ हातमाग संच तयार करून बारा गावांमध्ये त्याचे वितरण करण्यात आले. येत्या काळात बजाज फाउंडेशनच्या माध्यमातून २०० आणि सरकारकडून अनुदानावर देण्यासाठी २०० याप्रमाणे ४०० हातमाग संचाचा पुरवठा  विविध गावांमध्ये करण्यात येणार आहे. बॉबीन भरण्यासाठी चरखा आणि  हातमाग असे साहित्य २५ हजार ५०० रुपयांमध्ये दिले जाते. हातमाग तयार करण्यासोबतच ते वापरण्यासंबंधीचे प्रशिक्षणदेखील या  संस्थेत मिळते, असे किशोरभाई यांनी सांगितले. 

  एकत्र येतात समर्पीत युवक  देशभरात सेवाभावी कामात कार्यरत असलेल्या व्यक्‍तींच्या माध्यमातून संस्थेशी संपर्क साधून प्रशिक्षणाकरिता युवक या ठिकाणी येतात. एका गटामध्ये सरासरी दहा युवकांचा समावेश राहतो. गरजेनुसार काहीवेळा तीन युवकांची देखील गट तयार केला जातो. सध्या आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, केरळ, बिहार, ओदिशा या राज्यातील युवक येथे प्रशिक्षणासाठी येतात. गांधी, विनोबा विचारधारेतून आलेल्या अकरा व्रतांचे या युवकांनी पालन करावे, असा एकमेव निकष आहे. याशिवाय या युवकांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. प्रवेशासाठी कोणताही अर्ज भरुन घेतला जात नाही. किती वर्ष किंवा महिने त्या युवकाने येथे राहावे यावरही कोणतेच निर्बंध नाहीत.

संस्था आहे स्वावलंबी  संस्थेच्या परिसरातील चौदा क्षेत्रावर भाजीपाला, संत्रा, लिंबू, मोसंबी, पेरू, पपई, डाळिंब लागवड करण्यात आलेली आहे.  संस्थेत प्रशिक्षणाकरिता येणाऱ्यांच्या आहारात या सेंद्रिय शेतमालाचा प्रामुख्याने वापर केला जातो. सध्या संस्थेच्या गोठ्यामध्ये २२  गवळाऊ गाई आहेत. या देशी गाईंचे संवर्धन आणि प्रसारावर संस्थेने भर दिला आहे.    

साटोडा गाव झाले ‘हॅन्डलूम हब` निवेदिता निलयम या संस्थेच्या माध्यमातून सोळा हातमाग(हॅन्डलूम) संचांचा पुरवठा साटोडा (जि. वर्धा) या गावात करण्यात आला आहे. महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प (केम) तसेच वंदना फाउंडेशन यांच्या माध्यमातून हा पुरवठा करण्यात आला. केमद्वारे बारा तर वंदना फाउंडेशनने चार हातमाग संच अनुदानावर दिले. या हातमागाचा वापर करीत या गावात कापूस ते कापड ही संकल्पना प्रत्यक्षात आली आहे. आर्थिक स्वावलंनाची दिशा या माध्यमातून या गावाला मिळण्यास मदत झाली आहे. साटोडा गावात उत्पादित कापडाची थेट ग्राहकांना विक्री केली जाते. गावात मोठ्या प्रमाणावर या माध्यमातून रोजगाराची निर्मिती होण्यास मदत झाली आहे. विशेष म्हणजे गावात उत्पादित कापसाचे मूल्यवर्धन होण्यास देखील यामुळे मदत झाली. अकोला येथील पल्लवी कुळकर्णी यांनी देखील हातमाग खरेदी केला आहे. श्रीमती कुळकर्णी यांची अकोल्यात शैक्षणिक संस्था आहे. शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन वाढीस लागावे या उद्देशाने त्यांनी हातमाग खरेदी केला. विद्यार्थ्यांना सूत ते कापड निर्मितीचे प्रशिक्षण त्या देतात. अशाप्रकारे अनेकांकडून हातमाग संचाला मागणी वाढल्याची माहिती किशोरभाई यांनी दिली. 

पॅडल चरख्याची निर्मिती  सध्या बाजारपेठेत सोलर तसेच विजेवर चालणारे चरखे आहेत. परंतु विजेची उपलब्धता किंवा काही वेळा सौर उर्जेसाठी पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही. त्यामुळे हाताने चरखा चालविताना मर्यादा येतात. त्याला पर्याय म्हणून नव्याने पायडल चरख्यावर संशोधन केले जात आहे. सायकल पॅडलचा यासाठी उपयोग केला जात आहे. वीस हजार रुपयांत हा चरखा उपलब्ध होईल, अशी माहिती किशोरभाईंनी दिली. 

- निवेदिता निलयम कार्यालय,  ७५८८३१५२०४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com