बचत, व्यवसायातून मिळवली आर्थिक सक्षमता

पूरक व्यवसायातून प्रगती बचत गटामुळे महिलांना आर्थिक बचतीची सवय लागली. महिलांना घरातील काम पाहत शेतमाल विक्री तसेच गोवऱ्यांचा व्यवसायही उपयुक्त ठरला अाहे. - सुचिता नानगुडे ः ९५४५९३४८६८ (अध्यक्ष, ऋचा महिला शेतकरी भात व भाजीपाला उत्पादक गट)
गोऱ्हे बु. (जि. पुणे) गावामधील  ऋचा स्वयंसहायता महिला बचत  गटातील सदस्या.
गोऱ्हे बु. (जि. पुणे) गावामधील ऋचा स्वयंसहायता महिला बचत गटातील सदस्या.

गोऱ्हे बु. (ता. हवेली, जि. पुणे) गावामधील महिलांनी एकत्र येत बचत गटाची सुरवात केली. गटाच्या माध्यमातून महिलांनी सामाजिक बांधिलकी तसेच घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळत शेतमालाची थेट विक्री, गोवऱ्या निर्मितीतून आर्थिक बाजू भक्कम केली अाहे.    

पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरणापासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या गोऱ्हे बु. (ता. हवेली) गावातील महिलांनी एकत्र येत बचत गटाची सुरवात केली. गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा वसा जपत आर्थिक सक्षमता मिळवली. याच गावातील सुचिता नानगुडे यांना २००३ मध्ये महिला बचत गटाविषयी माहिती मिळाली. बचतीचे महत्त्व कळल्याने सुचिताताईंनी गावातील महिलांना बचतगटाचे महत्त्व समजावून सांगितले. हळूहळू गावातील महिला गटामध्ये सहभागी होण्यासाठी तयार झाल्या. 

महिला बचत गटाची सुरवात  सुचिताताईंनी २००६ मध्ये गावातील नऊ महिलांना सोबत घेत ऋचा स्वयंसहायता महिला बचत गटाची स्थापना केली. दरमहा १०० रुपये बचत करण्यास सुरवात केली. त्याच वर्षी गटाला गावातील अंगणवाडीतील वीस मुलांचा पोषण अाहार बनविण्याचे काम मिळाले. प्रत्येक सदस्याला पोषक आहार बनविण्याची संधी मिळेल या पद्धतीने गटाने नियोजन केले. त्यातून मिळणाऱ्या आर्थिक फायद्याची समान पद्धतीने वाटणी केली. बचतीचे महत्त्व पटल्यामुळे २०१२ मध्ये सुचिताताईंनी अकरा महिलांना एकत्र करत ऋचा महिला शेतकरी भात व भाजीपाला उत्पादक गटाची स्थापना केली. दर महिन्याला गटाची बैठक होते. त्यामध्ये येणाऱ्या अडचणी अाणि बचतीबद्दल चर्चा केली जाते.  

शेतमालाला मिळविले मार्केट गोऱ्हे बु. हे गाव खडकवासला धरणापासून जवळ असल्यामुळे शेतीसाठी बारमाही पाण्याची उपलब्धता असते. गावशिवारात भाजीपाला, भात पिकासोबतच गहू, हरभरा, ज्वारी ही हंगामी पिके अाणि अांबा, चिकू, सीताफळाच्या बागा आहेत. गटातील प्रत्येक महिला सदस्याकडे अडीच ते तीन एकर शेती अाहे. शासनातर्फे आयोजित विविध प्रदर्शने, धान्य महोत्सवाच्या माध्यमातून या महिला स्वतःच्या शेतीतील धान्य, भाजीपाल्याची विक्री करतात. यामध्ये प्रामुख्याने इंद्रायणी तांदळाची विक्री जास्त प्रमाणात होते. खडकवासला धरणाच्या परिसरात पर्यटकांची वर्दळ असते. या पर्यटकांना महिला गटातर्फे तांदूळ अाणि भाजीपाल्याची शेतावरच थेट विक्री केली जाते. पुण्यातील सोसायट्यांमध्ये उत्पादक ते ग्राहक थेट भाजीपाला विक्री योजने अंतर्गत अधिकृत परवानगीने भाजीपाला अाणि फळांची विक्री केली जाते. गटाने दोन वर्षांपूर्वी पुण्यातील निगडी, चिंचवड भागातील अाठवडे बाजारात सहभाग घेत भाजीपाल्याच्या विक्री केली होती. थेट विक्रीमुळे धान्य, फळे अाणि भाजीपाल्यास चांगला दर मिळतोच, शिवाय हक्काचे मार्केटही मिळाले.  सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग ः  गावातील महिलांचे सक्षमीकरण आणि आर्थिक विकास कसा होईल यावर महिला गटाचा भर आहे. गटातर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमातून मिळणाऱ्या नफ्यातून प्रत्येक महिला स्वखुशीने ठराविक रक्कम गावातील सामाजिक उपक्रमासाठी राखून ठेवते. यामध्ये गरजू मुलींच्या लग्नासाठी मदत, महिलांसाठी रोजगार मार्गदर्शन शिबीर, महिलांची अारोग्य तपासणी, शालेय विद्यार्थ्यांसाठी गणवेश वाटप, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा असे उपक्रम राबविले जातात. सर्व उपक्रम गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये होतात. विविध उपक्रमांसाठी प्रशांत नानगुडे, अनिल नानगुडे, प्रकाश नानगुडे तसेच गावातील सर्व नागरिकांचे सहकार्य मिळते. विविध उपक्रमांच्यामध्ये गावकरी अाणि गावातील तरुण मुलांचा चांगला सहभाग असतो. त्यामुळे गावात साैहार्दाचे वातावरण तयार झाले अाहे. याचबरोबरीने स्टेज, फ्लेक्स इत्यादी वर वायफळ खर्च न करता अन्नदान करण्यावर गटाचा भर अाहे. यामुळे गटाच्या माध्यमातून गावात महिलांचे मोठे संघटन तयार झाले. त्याचा फायदा ग्रामविकासाला होतो. गटाचे कामकाज पाहण्यासाठी २०१२ मध्ये खासदार सुप्रियाताई सुळे यांनी महिला बचत गटाला भेट दिली होती. गावात ऋचा महिला भजनी मंडळाचीही स्थापना गटाने केली अाहे.

पॅकेटमध्ये गोवऱ्यांची विक्री    ऋचा महिला शेतकरी भात व भाजीपाला उत्पादक गटातील सदस्यांनी गेल्या दोन वर्षांपासून खिलार, गावरान  गायीच्या शेणापासून गोवऱ्या बनविण्यास सुरवात केली. पहिल्यांदा पुणे शहरातील पूजेच्या साहित्याची दुकाने, मंदिरांचे सर्व्हेक्षण करून गोवऱ्यांची गरज लक्षात घेतली. मागणीनुसार १ इंच बाय १ इंच अाकाराच्या गोवऱ्या बनविण्यास सुरवात केली. एका पॅकेटमध्ये ५० गोवऱ्या असतात. एका पॅकेटची किंमत १५ रुपये आहे. गटाच्या नावाने पॅकेटची विक्री केली जाते. प्रत्येक महिलेला त्यांनी बनविलेल्या गोवऱ्यांच्या पॅकेटनुसार आर्थिक फायदा मिळतो. साचे तयार केले असल्यामुळे कमी वेळात गोवऱ्या तयार होतात. धार्मिक कार्यासाठी गोवऱ्यांची मागणी वाढत आहे. गटाला नुकतीच ४०० गोवऱ्यांच्या पॅकेटची मागणी मिळाली अाहे. गटात सहभागी नसलेल्या गावातील महिलांकडूनदेखील गोवऱ्या खरेदी करून विक्री केली जाते.

विद्यार्थ्यांसाठी पोषण अाहार   सध्या ऋचा स्वयंसहायता महिला बचत गटाअंतर्गत दोन महिला अधिकृत परवाना घेऊन शालेय पोषण अाहार तयार करतात. त्यासाठी गटाने दोन वर्षांपूर्वी आधुनिक पद्धतीचा स्टीम कुकर खरेदी केला. या कुकरमध्ये एकाच वेळी जिल्हा परिषदेच्या शाळेतील २००० विद्यार्थ्यांचा भात खिचडी हा आहार शिजविता येतो. आहारासाठी अावश्‍यक भाज्या, मसाले गटातील महिला स्वतः खरेदी करतात. शाळेतर्फे तांदूळ दिला जातो. भाज्या परिसरातील शेतकरी तसेच पुण्यातील मार्केट यार्ड मधून खरेदी केल्या जातात.  

आर्थिक हातभार लागला... शेतमालाला हक्काचे मार्केट अाणि चांगला दर मिळत असल्यामुळे कुटुंबाला अार्थिक हातभार लागला अाहे. त्यामुळे शेतीमध्ये नवीन उपक्रम करण्यास गटातील महिलांना प्रोत्साहन मिळत आहे. - अाशा नानगुडे, (अध्यक्ष, ऋचा स्वयंसहायता महिला बचत गट)  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com