Agriculture stories in Marathi, agrowon special story of Sushilkumar Deshmukh,Parbhani | Agrowon

शेती सांभाळली, विक्री व्यवस्थाही उभारली
माणिक रासवे
रविवार, 17 डिसेंबर 2017

परभणी शहरातील शाळेमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत असलेले सुशीलकुमार देशमुख यांनी शिक्षकीपेशाबरोबरीने झाडगावमधील वडिलोपार्जित शेती चांगल्या प्रकारे सांभाळली. पीक उत्पादनाबरोबरीने त्यांनी शेतीमालाची थेट विक्री व्यवस्था उभारली. शेतकरी गट स्थापन करून रेशीम शेतीस सुरवात केली आहे. 

परभणी शहरातील शाळेमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत असलेले सुशीलकुमार देशमुख यांनी शिक्षकीपेशाबरोबरीने झाडगावमधील वडिलोपार्जित शेती चांगल्या प्रकारे सांभाळली. पीक उत्पादनाबरोबरीने त्यांनी शेतीमालाची थेट विक्री व्यवस्था उभारली. शेतकरी गट स्थापन करून रेशीम शेतीस सुरवात केली आहे. 

सुशीलकुमार ज्ञानोबाराव देशमुख यांचे मूळ गाव परभणी जिल्ह्यातील झाडगाव. १९९३ पासून देशमुख हे परभणी शहरातील सावित्रीबाई फुले मुलींच्या शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. क्रीडा शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतरही त्यांची शेतीची आवड कायम आहे. परभणी शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावरील झाडगाव शिवारात देशमुख कुटुंबाची पंचवीस एकर शेती आहे. त्यांचे बंधू नांदेड येथे नोकरीला असल्यामुळे शेतीची जबाबदारी सुशीलकुमार यांच्याकडे आहे. नोकरीमुळे त्यांना दररोज शेतीवर जाणे शक्य नसल्याने दोन कायम स्वरूपी मजूर शेती व्यवस्थापनासाठी आहेत. दर शनिवार, रविवार शेतीवर जाऊन ते नियोजन करतात. तसेच दररोज संध्याकाळी मजुरांशी मोबाईलवर संपर्क साधून पीक व्यवस्थापनाची माहिती घेतात.

  देशमुख यांची जमीन हलक्या ते मध्यम स्वरुपाची आहे. सिंचनासाठी विहीर तसेच कूपनलिका आहे. जेव्हा पाण्याची चांगली उपलब्धता होती, त्या वेळी देशमुख ऊस, केळी लागवड करत होते. परंतु गेल्या पाच वर्षांत पाणी उपलब्धता कमी झाल्याने पीक पद्धतीमध्ये बदल केला. खरिपात मूग, सोयाबीन, तूर आणि रब्बीमध्ये ज्वारी, गहू, हरभरा लागवड करतात. प्रारंभीच्या काळात ते रासायनिक निविष्ठांचा वापर करत असत. परंतु, दरवर्षी खर्च-उत्पन्नाचा मेळ बसत नव्हता. त्यामुळे खर्च कमी करण्यासाठी त्यांनी सेंद्रिय खतांच्या जास्तीत जास्त वापरावर भर दिला आहे. 

शेती नियोजनात केला बदल 
 देशमुख म्हणाले की, शेतकऱ्यांच्याबरोबरीने चर्चा करताना नैसर्गिक शेतीपद्धतीची माहिती मिळाली. गेल्या चार वर्षांपासून मी रासायनिक निविष्ठांचा वापर पूर्णपणे बंद केला. देशी गायीचे शेण, गोमूत्र प्रमुख घटक असलेले जीवामृत, घन जीवामृत तसेच दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, मिश्र पीकपद्धती, सापळा पीक लागवडीवर भर दिला.
सुरवातीची काही वर्षे तुलनेने कमी उत्पादन मिळाले परंतु आता चांगले उत्पादन मिळते.  दरवर्षी पंधरा एकर सोयाबीन, मूग दीड एकर, तूर पाच एकरांवर असते. रब्बीमध्ये हरभरा चार एकर, गहू दोन एकर आणि ज्वारी दोन एकरांवर असते. दरवर्षी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार जातींची निवड करतो. शक्यतो घरचेच दर्जेदार बियाणे वापरतो. पेरणी करताना एकरी ३०० किलो घन जीवामृत जमिनीत मिसळून देतो. त्यानंतर पिकाला पाणी देताना जीवामृताची मात्रा दिली जाते. गरजेनुसार निंबोळी अर्क, दशपर्णी अर्काची फवारणी करतो. सापळा पिके, मिश्र पिकांमुळे कीड नियंत्रणास मदत होते. पीक सशक्त असल्याने प्रतिकारक्षमता वाढली आहे. माझ्याकडे लालकंधारी जातीचे दोन बैल, एक गाय आणि दोन वारसे आहेत. त्यांचे शेण, मूत्र जीवामृत तयार करण्यासाठी वापरतो. शेतात जनावरे बसवितो. मला सोयाबीनचे एकरी आठ क्विंटल, मुगाचे पाच क्विंटल, तुरीचे चार क्विंटल, रब्बी ज्वारीचे सहा क्विंटल, गव्हाचे सहा क्विंटल, हरभऱ्याचे सहा क्विंटल उत्पादन मिळते. यंदा खपली गव्हाची लागवड केली आहे. यंदाच्यावर्षी १० मीटर रूंद,१५ मीटर लांब आणि ४ मीटर खोलीचे शेततळे खोदले. शेतातील मातीचा सुपीक थर वाहून जाऊ नये यासाठी बांधबंदिस्ती केली.

रेशीम शेतीला सुरवात 
यंदा देशमुख यांनी दोन एकर तुती लागवड केली. रेशीम कीटक संगोपनगृहाची उभारणी करून ७५ अंडिपुंजाच्या पहिल्या बॅच पासून कोश उत्पादन घेतले. पहिल्या टप्प्यात त्यांना ६५ किलो कोष उत्पादन मिळाले. व्यापाऱ्यांनी जागेवर ४७० रुपये प्रति किलो दर दिला. रेशीम शेतीच्या व्यवस्थापनासाठी एक मजूर ठेवला आहे. गावातील रेशीम शेतकऱ्यांचा गट तयार केला.

देशी गाईंचे संगोपन, दूध विक्रीचे नियोजन 
देशमुख यांनी गाव परिसरात वास्तव्यास असलेल्या गुजराथी पशुपालकांच्या मदतीने देशी गाईंचे संगोपन सुरू केले. क्रांक्रेज जातीच्या वीस गायी या पशुपालकांना सांभाळण्यास दिल्या आहेत. तसेच पशुपालकांच्याकडे चाळीस देशी गाई आहेत. शिवारामध्ये दिवसभर चराई केल्यानंतर या गायी रात्रीच्या वेळी परिसरातील  शेतकऱ्यांच्या मोकळ्या शेतामध्ये मुक्कामास असतात. शेतामध्ये शेण, गोमूत्र पडते. त्याचे चांगले खत होते. त्या मोबदल्यात शेतकरी या पशुपालकांना चारा, धान्य तसेच काही रक्कम देतात. परिसरातील पाच, सहा गावात हे पशुपालक फिरत असतात. देशमुख या पशुपालकांच्याकडून दररोज ८० लिटर दूध घेतात. स्वतः सुशीलकुमार आणि त्यांचा एक सहकारी दररोज दुचाकीवरून गायींच्या मुक्कामाच्या ठिकाणाहून दूध घेऊन येतात. परभणी शहरामध्ये रतीब लावलेल्या नागरिकांच्या घरपोच दूध पोचविण्यासाठी दोन कामगार ठेवलेले आहेत. प्रति लिटर ५० रुपये या दराने दूध विक्री केली जाते.  

 

महत्त्वाचे मुद्दे 

  • प्रयोगशील शेतकरी, कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने पीक व्यवस्थापन.
  • जमीन सुपिकतेवर भर. सापळा पिके, मिश्र पिके, वनस्पतीजन्य कीडनाशकांचा वापर.
  • सहा एकरावर तुषार सिंचन, ठिबक सिंचनाचा वापर.
  • कृषी स्वराज शेतकरी गटाचे सदस्य. गटाची शिवारफेरी, शासनाच्या योजनांची माहिती, पीक सल्ला देवाण घेवाण.
  • पेरणी, निंदणी आणि काढणीसाठी मजुरांना कंत्राटी पद्धतीने काम, त्यामुळे वेळ वाचतो. 
  • परिसरातील शेतकरी मित्र पीक व्यवस्थापनासाठी मदतीस येतात, त्यामुळे फारशी अडचण येत नाही. 
  • थेट ग्राहकांना धान्य विक्री, त्यातून उत्पन्न वाढीचे ध्येय.

ग्राहकांना थेट विक्री 
नैसर्गिक पद्धतीने पिकविलेला गहू,ज्वारी तसेच तूर, मूग, हरभरा डाळीला ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन देशमुख यांनी डाळ निर्मितीसाठी छोटी गिरणी घेतली. देशमुख यांच्या पत्नी अंजलीताई डाळ निर्मिती तसेच गहू, ज्वारीचे पॅकिंग करण्यास मदत करतात. घरातून गहू, ज्वारी तसेच डाळीची वर्षभर विक्री होते. डाळीचे एक किलो, पाच किलो मध्ये पॅकिंग केले आहे. सरासरी ८० ते १२० रुपये किलो दराने डाळीची विक्री होते. गहू ४० रुपये किलो आणि ज्वारी ३० रुपये किलो दराने थेट विक्री होते. त्यामुळे नफ्यात वाढ झाली.

धान्य महोत्सवाचे आयोजन
सुशीलकुमार देशमुख यांच्यासह नैसर्गिक पद्धतीने पीक उत्पादन घेणारे प्रदीप केंद्रेकर, अॅड.दीपक देशमुख, डी. एस. कुलकर्णी, गणेश रुद्रवार यांनी एकत्र येत प्रभावती नैसर्गिक शेती उत्पादक शेतकरी समूह स्थापन केला. दरवर्षी एप्रिल महिन्यात परभणी शहरात तीन दिवस धान्य महोत्सवाचे आयोजन केले जाते. नागरिक गहू, ज्वारी, डाळीची खरेदी करतात. या महोत्सवात ३५ शेतकरी सामिल होतात. शेतकऱ्यांना मार्केटपेक्षा अधिक दर मिळतो. समुहाच्या नावाने पॅकिंग करून धान्य विक्री केली जाते.  

संपर्क ः  सुशीलकुमार देशमुख, ९५११२२१६९८.

 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
जैवइंधन, जैवखते, ठिबक उपकरणांच्या...२९ वस्तू आणि ५३ सेवांच्या जीएसटी दरामध्ये कपात...
प्रगतीच्या दिशेने पाऊलराज्यात कृषी विद्यापीठांच्या स्थापनेपासून ते १९९०...
सहकारी बॅंका डिजिटाइज केव्हा होणार?डिजिटल बॅंकिंग याचा अर्थ आधुनिक तंत्रज्ञानाच्या...
कारखाने, ऊस उत्पादकांचे नुकसान...नवी दिल्ली : साखरेच्या घाऊक दरात घसरण होऊनही...
इंडोनेशिया, चीनला द्राक्ष निर्यातीत...नाशिक : रशिया, चीन, इंडोनेशिया अशा काही देशांनी...
किमान तापमानाचा पारा वाढू लागलापुणे : दक्षिण कर्नाटकाच्या परिसरात चक्राकार...
कृषी संजीवनी प्रकल्पाची मंजुरी अंतिम...मुंबई : दुष्काळापासून शेतीचे संरक्षण आणि खारपाण...
प्रतीक्षा संपली... आजपासून जालन्यात ॲ...जालना : सर्वांना उत्सुकता लागून असेलल्या सकाळ -ॲ...
मोसंबीवर मावा चिकटा वाढलाऔरंगाबाद  : मोसंबीवर मावा व चिकटाचा...
विमा योजनेत हवामान केंद्रांचा घोळजळगाव ः यंदा जाहीर झालेल्या फळ पीक विमा योजनेतही...
राज्यात कांदा प्रतिक्विंटल १००० ते ३३००...राज्यातील बाजार समित्यांमध्ये मागील महिनाभरापासून...
मराठवाड्यातील दुष्काळावर ‘इस्राईल’ची...मुंबई ः अपुऱ्या आणि अनियमित पर्जन्यमानामुळे...
अल्पभूधारक दांपत्याची प्रेरणादायी शेतीकोकण म्हटलं की भात, आंबा, काजू, नारळ आदींनी...
कपाशीसाठी नाव कमावलेली अकोटची बाजारपेठअलीकडील काही वर्षांत अकोला जिल्ह्यातील अकोट बाजार...
राज्यातील ३४ हजार गावे हागणदारीमुक्तमुंबई : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत देशात...
अडचणीत आठवते शेतीआर्थिक महासत्ता, सर्वसमावेशक विकास अशा गप्पा...
रास्त दर मिळू न देणे हे षड्‌यंत्रच इसेन्शियल कमोडिटी ॲक्‍टचे भाषांतर करताना आवश्‍यक...
सार्वजनिक हेतूसाठी संपादित ग्रामीण...मुंबई : सार्वजनिक हेतूसाठी राज्यात भूसंपादन...
राज्यात कृषी पदवीसाठी ‘सीईटी’लागूपुणे : वैद्यकीय, अभियांत्रिकीप्रमाणेच राज्यातील...
कृषी तंत्रनिकेतनचा नवा अभ्यासक्रम रखडलापुणे : राज्यातील कृषी तंत्रनिकेतनचा नवा...