Agriculture stories in Marathi, agrowon special story of Vijay Wagh, Kajegaon,Dist.Buldhana | Agrowon

संडे फार्मर : अभियंत्याने दिली शेतीला पूरक उद्योगाची जोड
गोपाल हागे
रविवार, 28 जानेवारी 2018

पुणे शहरातील माहिती तंत्रज्ञान कंपनीत कार्यरत असणाऱ्या विजय वाघ यांनी काजेगाव (जि. बुलडाणा) येथील वडिलोपार्जित शेतीला शेळी, कुक्कुटपालन आणि दुग्ध व्यवसायाची जोड दिली. शेती आणि पूरक व्यवसायाच्या नियोजनासाठी त्यांना व्यवस्थापक आणि मजुरांची चांगली साथ मिळाली. परिसरातील युवकांसाठी हा प्रकल्प नवी दिशा देत आहे.

पुणे शहरातील माहिती तंत्रज्ञान कंपनीत कार्यरत असणाऱ्या विजय वाघ यांनी काजेगाव (जि. बुलडाणा) येथील वडिलोपार्जित शेतीला शेळी, कुक्कुटपालन आणि दुग्ध व्यवसायाची जोड दिली. शेती आणि पूरक व्यवसायाच्या नियोजनासाठी त्यांना व्यवस्थापक आणि मजुरांची चांगली साथ मिळाली. परिसरातील युवकांसाठी हा प्रकल्प नवी दिशा देत आहे.

बुलडाणा जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी असलेला जळगाव जामोद तालुका. येथील बहुतांश शेती जिरायती. या तालुक्यातील काजेगावमध्ये विजय गोंदू वाघ यांची सात एकर जिरायती आणि दीड एकर बागायती शेती. विजय यांचे वडील वीज कंपनीतून सेवानिवृत्त झाले असून गावीच राहतात. भाऊ व्यवसायाच्या निमित्ताने अमरावतीला स्थायिक झाला आहे. गोंदू वाघ यांची दोन्ही मुले बाहेरगावी असल्याने सात एकर शेतीत सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, तूर अशा पारंपरिक पिकांच्या लागवडीवर भर होता. यातून जेमतेम उत्पादन मिळायचे. कधी खर्च अधिक आणि उत्पादन कमी अशी परिस्थिती. मात्र त्यांचा मुलगा विजय याने ही परिस्थिती बदलण्यासाठी पुढाकार घेतला. 

      सध्या विजय वाघ हे पुणे शहरात माहिती तंत्रज्ञान कंपनीमध्ये कार्यरत आहेत. त्यांची पत्नी सौ. योगिता पुणे शहरातील एका महाविद्यालयात प्राध्यापिका आहे. विजय वाघ यांनी शेतीबरोबरीने स्थानिक संसाधनांचा वापर कसा करता येईल याचा विचार करून शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्याचा निश्‍चय केला. बाजारपेठेचा अभ्यास करून वाघ यांनी डिसेंबर, २०१४ मध्ये शेळीपालनाचा निर्णय घेतला. शेती विकास आणि पूरक उद्योग सुरू करण्याच्या निर्णयाला योगिता यांनी चांगली साथ दिली. पूरक उद्योगाच्या उभारणीसाठी दोघांनी आर्थिक भांडवल उभे केले. याचबरोबरीने विजय यांना कंपनीतील मित्रांनीही आर्थिक मदत केली. पुणे येथे नोकरी असल्याने शेती आणि पूरक व्यवसायाकडे दैनंदिन लक्ष ठेवण्यासाठी वाघ यांनी सिद्धार्थ धंदर यांचे व्यवस्थापनासाठी सहकार्य घेतले. तसेच दोन कायम स्वरूपी मजूर ठेवले आहेत. 

शेळीपालन 
 शेळीपालन सुरू करण्यासाठी विजय वाघ यांनी जळगाव जामोद येथील कृषी विज्ञान केंद्र तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले. त्यांची घराजवळ दीड एकर बागायती शेती आणि विहीर आहे. त्यामुळे तेथेच त्यांनी शेळ्यांच्या गोठ्याचे नियोजन केले. एक एकरावर मका, गजराज,ज्वारी या चारा पिकांची लागवड केली. अभियंता असलेल्या भावाने उपलब्ध साधनसामुग्रीत शेळ्यांसाठी बंदिस्त गोठा तयार करून दिला. शेळीपालनाबाबत विजय वाघ म्हणाले की, मी आमच्या भागात मिळणाऱ्या स्थानिक जातीच्या वीस शेळ्या विकत घेतल्या. व्यवस्थापनाबाबत प्रयोगशील शेळीपालकांशी चर्चा केली. मजुरांच्या सहाय्याने हळूहळू व्यवस्थापन जमल्याने शेळ्यांची संख्या वाढवली. तज्ज्ञांशी चर्चा करून शेळ्यांचे खाद्य, आरोग्य व्यवस्थापन, लसीकरण केले जाते. सध्या गावरान आणि बेरारी जातीच्या साठ शेळ्या आहेत. गाव परिसरातील शेतकरी, व्यापारी गोठ्यात येऊन शेळ्या विकत घेतात. दोन वर्षांच्यापुढील शेळीच्या गुणवत्तेप्रमाणे ७,५०० ते बारा हजारांच्यापर्यंत दर मिळतो. थेट ग्राहकांना विक्री केली जाते.

 गाई, म्हशीपालन 
 दररोज काही प्रमाणात पैसे मिळावेत यासाठी विजय यांनी दीड वर्षापूर्वी गाय, म्हैस पालनास सुरवात केली. साध्या पद्धतीचा गोठा तयार केला. पहिल्यांदा दोन गीर गाई आणि पाच मुऱ्हा म्हशी घेतल्या. घराजवळच गोठा बांधला. जनावरांच्या व्यवस्थापनासाठी एक कायमस्वरूपी मजूर ठेवला. वर्षभर शेतातील हिरवा चारा उपलब्ध होतो.  पोषक आहारासाठी दहा वाफ्यांमध्ये ॲझोलाचे उत्पादन घेण्यास सुरवात केली. पशूतज्ज्ञांच्या सल्याने गाई, म्हशींना पशूखाद्य दिले जाते. वेळेवर औषधोपचार केले जातात. यामुळे गाई, म्हशींचे आरोग्य चांगले राहिले आहे.  

   गोठ्यामध्ये चार गीर गाई आणि सोळा मुऱ्हा म्हशी आहेत. सध्या दोन गाई दुधात आहेत. एक गाय दररोज दहा लिटर दूध देते. गाईच्या दुधापासून तूप केले जाते. पुणे शहरात प्रति किलो दोन हजार रुपये दराने तुपाची विक्री होते. दहा म्हशींपासून दररोज ७० लिटर दूध संकलन होते. संग्रामपूर येथे सकाळ-संध्याकाळ थेट ग्राहकांना पन्नास रुपये लिटर या दराने दूध विक्री केली जाते. दूध वाहतुकीसाठी छोटे वाहन खरेदी केले अाहे. पशूपालनामुळे शेतीला पुरेसे शेणखत उपलब्ध होते. यामुळे जमिनीची सुपीकता आणि पीक उत्पादनवाढीस मदत झाली आहे. 

 कडकनाथ कोंबडीपालन  
विजय वाघ यांनी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन दीड वर्षांपूर्वी कडकनाथ कोंबडीपालन सुरू केले. संगोपनासाठी शेड तयार केली. मध्य प्रदेशातून २६ कोंबड्या आणि तीन कोंबडे आणले. हळूहळू पिल्लांचे संगोपन सुरू केले. वेळेवर खाद्य, लसीकरणावर भर दिल्याने कोंबड्यांची चांगली वाढ होते. सध्या त्यांच्याकडे ३०० कोंबड्या आहेत. यातील २५ टक्के कोंबड्यांची विक्री केली जाते. बाकीच्या कोंबड्यांचे संगोपन करून मागणीनुसार थेट ग्राहकांना अंडी आणि पिल्लांची विक्री केली जाते. कडकनाथ कोंबडीला चांगली मागणी असल्याने चांगला नफा मिळतो. 

 श्वान संगोपन 
विजय वाघ यांनी शेतीच्या राखणीसाठी रॉटविलर, जर्मन शेपर्ड, डॉबरमॅन श्वानांचे संगोपन केले आहे. या श्वानांच्या पिल्लांना परिसरातील शेतकऱ्यांकडून मागणी आहे. त्यामुळे श्वान पिल्लांचे संगोपन हादेखील पूरक व्यवसाय तयार झाला आहे. 

काटेकोर नियोजनावर भर 
विजय वाघ हे पुण्यामध्ये माहिती तंत्रज्ञान कंपनीत नोकरीला आहेत. त्यामुळे शेती, पूरक व्यवसायाच्या दैनंदिन नियोजनासाठी एक व्यवस्थापक आणि दोन कायम स्वरूपी मजूर ठेवले आहेत. नियोजनाबाबत विजय वाघ म्हणाले की, प्रकल्पाला मी माझ्या मुलीचे म्हणजेच मंत्रा हे नाव दिले आहे. प्रकल्पासाठी माझी आजपर्यंत दहा लाखांची गुंतवणूक झाली आहे. मी महिन्यातून एक किंवा दोन वेळा गावी येताे. तसेच अमरावतीहून बंधू दोन वेळा गावी येतात. या वेळी पुढील काळातील नियोजनाबाबत चर्चा होते. प्रकल्पात सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत. दोन महिन्यांचा डाटा सामावेल अशा क्षमतेची यंत्रणा बसविली आहे. माझे आई-वडील प्रकल्पाच्या ठिकाणीच राहतात. ते दररोजच्या कामकाजावर देखरेख ठेवतात. काही अडचण आली तर मोबाईलद्वारे माझ्याशी संपर्क साधून निर्णय घेतात.

माझ्या प्रकल्पाला परिसरातील बेरोजगार तरुण तसेच शेतकरी भेटी देऊन माहिती घेत असतात. त्यांच्याकडूनही मला पीक व्यवस्थापनाच्या नवीन गोष्टी शिकायला मिळतात. त्याचा मी शेती आणि पूरक उद्योगांच्या सुधारणेसाठी वापर करतो. चर्चा आणि अभ्यासातून माझा शेती विकासाचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे.

संपर्क ः विजय वाघ, ७३८७१०६५४४

 

 

 

 

 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...