महिला बचत गटांमुळे सावरले संसार

बचत गटाच्या माध्यमातून सुरेगावातील महिला एकत्र येऊन कामाचे नियोजन करतात.
बचत गटाच्या माध्यमातून सुरेगावातील महिला एकत्र येऊन कामाचे नियोजन करतात.

मजुरी करून संसार बळकट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुरेगावातील (ता. कोपरगाव, जि. नगर) महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून एकमेकांनी पाठबळ दिले. त्यातूनच रोजगार उपलब्ध झाला. बचत गटातून विश्‍वास मिळाल्यामुळे सुरेगावातील ११९ महिलांना अकरा बचत गटांतून प्रगती साधली. महिला आर्थिक विकास महामंडळाने गावातील महिला गटांना तेजस्विनी योजनेतून सहा लाखांचे कर्जही दिले आहे.  

नगर जिल्ह्याच्या कोपरगाव तालुक्‍यात सुमारे बारा हजार ४४३ लोकसंख्येचे सुरेगाव तसे विभागलेले. शेतशिवारात मजुरी करून येथील महिलांचा संसार सावरण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू होता. मात्र महिलांच्या जीवनात खरा बदल झाला तो बचत गटांमुळे. गावामध्ये सर्वप्रथम अलका कदम यांनी २००८ मध्ये तुळजाभवानी हा महिला बचत गट सुरू केला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सुरेगावात अकरा महिला बचत गटांतून सुमारे ११९ महिला एकत्र आल्या. गटातून मिळालेल्या आर्थिक पाठबळावर एकमेकींच्या साह्याने संसार सावरण्याला मदत झाल्याचा आनंद आता प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतो. महिला आर्थिक विकास महामंडळाने सुरेगावात सुरू असलेल्या बचत गटांना सहा लाखांचे कर्जही दिले आहे. 

स्वप्न झाले साकार  बचत गटाच्या माध्यमातून सामान्य महिला एकत्र आल्यावर किती बदल होतो, हे गावातील महिलांनी दाखवून दिले आहे. मजुरी करणाऱ्या भारती जिऱ्हे यांना राहायला घर नव्हते. दोन वर्षांपासून घराचा पाया बांधून ठेवला; पण पैसे नसल्याने काम सुरू करता येत नव्हते. यंदा गटाने एक लाखाचा हातभार दिला. आता भारती यांनी घराचे काम पूर्ण करत आणले आहे. सुशीला भागवत यांनाही घराचे बांधकाम करण्याला मदत मिळाली. त्यांनी  दूध व्यवसाय सुरू केला, तसेच शेळीपालनदेखील सुरू केले आहे.  अलका कदम यांनी कपड्याचे दुकान सुरू केले. संगीता गिरी यांनी बेकरी व्यवसाय सुरू केला तसेच वाहतुकीसाठी मुलाला गाडी घेऊन दिली. सातत्याने मजुरी करणाऱ्या सुनीता सोनवणे आता गणपती मूर्ती तयार करतात. त्यामुळे आता त्यांची मजुरी बंद झाली. पूनम सोनवणे यांनी सुरवातीला शेळीपालन सुरू केले. आता त्या गाईपालनातून दूध व्यवसाय करत आहेत.

शेतीमध्ये सुधारणा  संगीता सोनवणे यांचे भूमिहीन कुटुंब. मजुरी करून संसार सावरण्याची धडपड. बचत गटात सहभागी झाल्यावर गटाला मिळालेल्या कर्जातून पंचवीस हजार रुपये घेऊन त्यांनी एक एकर शेती कराराने घेतली. पाच वर्षांपासून त्या शेतीत विविध पिके घेतात. त्यातून चांगला फायदा झाला.  बचत गटाच्या आधारामुळेच कविता मेहरखांब यांनी साठ हजार रुपये भरून गहाण असलेली जमीन सोडवून स्वतः लागवडीखाली आणली.

सामाजिक कामात सहभाग  महिला बचत गटाच्या माध्यमातून सामान्य महिला एकत्र आल्या, चर्चा करू लागल्या, कर्ज मिळाले, रोजगार मिळाला. आता त्यांच्यामध्ये बोलण्याची हिंमत आली. महिला आर्थिक विकास महामंडळाने नेतृत्व आणि व्यवसाय याचे महिलांना प्रशिक्षण दिले आहे. आता या महिला एकत्र येऊन गावांत दरवर्षी होणाऱ्या सप्ताहात एक दिवसाच्या जेवणाचा खर्च करतात. महिलांनी एकत्र येऊन गाव अंतर्गत रस्त्यावर मुरुम टाकला. महिला आर्थिक विकास महामंडळ, ग्रामपंचायत व महिला बचत गट यांच्या पुढाकारातून ‘कबाडकष्ट` संकल्पनेतून पाण्याची टाकी बांधली. गटाला आता ग्रामपंचातीने जागा दिली आहे. ‘घर दोघांचे' या अभियानांतर्गत गटातील महिलांच्या नावे घरे झाली. संतोषी निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली सावित्रीबाई फुले ग्रामसमिती कार्यरत असून, गटातील कामांचे एकत्र येऊन नियोजन केले जाते. महिला बचत गटाच्या सदस्य शामा भागवत कदम या गावाच्या सरपंच झाल्या आहेत.

उपक्रमांचा झाला अभ्यास  महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मदतीने सुरू झालेल्या बचत गटामुळे सुरेगावचा नाव लौकिक सर्वत्र झाला आहे. आतापर्यत गावात आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी कार्यालयाच्या गिरिजा निवासन, मीरा मिश्रा, महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक महेश कोकरे यांच्यासह नाशिक, जालना, परभणी, धुळे, नंदुरबार, वाशीम, लातूर, हिंगोली येथील तीनशेपेक्षा अधिक महिलांनी गावातील बचत गटांना भेट देऊन माहिती घेतली. तमिळनाडू, गुजरात, पुणे येथील अभ्यासकांनीही सुरेगावात येऊन महिलांनी सुरू केलेल्या उपक्रमांचा अभ्यास केला आहे, अशी माहिती पूनम सोनवणे, अलका पंडोरे यांनी दिली.

देशभर पोचला सुरेगावचा मसाला  सुरेगावात महिला बचत गटांनी मसाले बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीपासून सुरवात केली. आता हा मसाला उद्योग चांगलाच वाढला आहे.  नगर, शिर्डीसह राज्यात अनेक ठिकाणी बचत गट प्रदर्शनात गावातील महिला मसाल्यांची विक्री करतात. २०१७ मध्ये दिल्लीमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सुरेगावातील महिला बचत गटाच्या सदस्या अलका कदम, संतोषी निंबाळकर सहभागी झाल्या होत्या. या प्रदर्शनात एक लाख रुपयांचा मसाला विकला. मुंबई, पंजाब, गोवा, ओडिशा या राज्यांसह पंधरा ठिकाणी झालेल्या प्रदर्शनात येथील महिला गटाने मसाला विक्री केली आहे.

महिला बचत गट  तुळजाभवानी, संत शिरोमणी, सहारा, श्री महालक्ष्मी, साईकृपा, जोगेश्‍वरी, जिजामाता, पंचशील, भीमज्योत, शिवराज, रेणुकामाता.

पूरक  व्यवसाय   मसालेनिर्मिती ः १०, कुंभारकाम ः ३, शेळीपालन ः १५, शेती सुधारणा ः ३५, बेकरी ः १, शिवणकाम ः १५, वीटभट्टी ः ४, दूध व्यवसाय ः १०, पीठ गिरणी ः १, कुक्कुटपालन ः १ , घर कामाला मदत ः ४

गटातून साधली प्रगती  

  •  महिलांसाठी पूरक उद्योगांचे  प्रशिक्षण.
  •  सरकारी योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न.
  •  ग्रामस्वच्छता अभियान, मुलीच्या जन्माचे स्वागत.
  •  ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुकन्या विमा.
  •  साठ महिलांचा उतरविला विमा.
  •  मुला-मुलींचे शिक्षण, लग्नकार्यासाठी आर्थिक मदत.
  •  महिलांची हिमोग्लोबीन तपासणी.
  •   करारावर घेतली शेती  आमचे हातावरचे पोट, जमीन नाही. आम्ही मजुरी करत होतो. सातत्याने आर्थिक अडचणी यायच्या. आता मात्र बचत गटातून पैसे मिळाले, त्यामुळे मी एक एकर शेती करारावर घेतली. त्याचा फायदा झाला. पाच वर्षापासून  वेगवेगळ्या पिकांची लागवड आम्ही करीत आहोत. - संगीता सोनवणे

    बचत गटाचा मिळाला आधार आमची परिस्थिती साधारण, राहायला घर नव्हते, पैसे नसल्याने घराचे काम अर्धवट पडून होते. गटातील महिलांनी एक लाखाचे कर्ज दिले. त्यामुळे घराचे बांधकाम करता आले. बचत गटामुळे आधार मिळाला. - भारती जिऱ्हे

    पूरक व्यवसायाला मिळाली गती बचत गटामुळे गावातील महिला एकत्र आल्या. महिला एकमेकींना साह्य करत असल्यामुळे प्रगती होत आहे. आमच्या गटाने तयार केलेला मसाला देशभरात पोचला आहे. आर्थिक आधार मिळाल्यावर महिलांनी पूरक व्यवसायामध्ये स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहे.  - अलका कदम, ९५६१०४११७६

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com