शेतीला मिळाली पूरक उद्योगांची जोड

पॉलिहाउसमध्ये कारली लागवड
पॉलिहाउसमध्ये कारली लागवड

अमरावती शहरातील ॲड. झिया खान यांनी भविष्याची सोय म्हणून शेती आणि पूरक उद्योगांकडे लक्ष देण्यास सुरवात केली. गेल्या चार वर्षांत टप्प्याटप्प्याने पीक उत्पादनात होत असलेल्या वाढीमुळे त्यांचा शेतीमधील हुरूप वाढला. केवळ पीक उत्पादनावर अवलंबून न राहता त्यांनी मत्स्यपालन, कुक्‍कुटपालन आणि शेळीपालनास सुरवात केली आहे.  

अमरावती शहरातील ॲड. झिया खान यांचे वडील अजीजोद्दीन खान हे मध्य प्रदेशात कृषी विभागात नोकरीला होते. खान कुटुंबीयांचे मूळ गाव अचलपूर. आईदेखील शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे झिया खान यांना लहानपणापासून शेतीची आवड होती. शेतीच्या आवडीपोटी झिया खान यांनी २००६ मध्ये अमरावतीपासून २६ किलोमीटर अंतरावरील भातकुली शिवारात सहा एकर पडीक जमीन खरेदी केली. पहिल्यांदा जमिनीचे सपाटीकरण केले. शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी विहीर खोदली. टप्प्याटप्प्याने हंगामी पिकांची लागवड सुरू केली. 

शेतीच्या दैनंदिन नियोजनासाठी त्यांनी गावातील मित्राकडे शेती व्यवस्थापनाची जबाबदारी दिली. शेती कामासाठी दोन मजूर ठेवले. शेती कामाच्या गरजेनुसार हंगामी मजूर घेतले जातात. २००९ मध्ये शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी खान यांनी १०० बाय १०० बाय ३ मीटर आकारमानाचे शेततळे खोदले. २०१६ मध्ये खान यांनी शेतापासून सव्वा किलोमीटर अंतरावरील पेढी नदीवरून पाइपलाइन केली. हे पाणी शेततळ्यात सोडले. वर्षभर पाण्याची सोय झाल्याने खान यांनी बाजारपेठेच्या मागणीनुसार पालेभाज्या, कारले, काकडी, वांगी, मिरची लागवडीवर भर दिला आहे.

असे आहे नियोजन 

  • अर्धा एकरावर पॉलिहाउस. त्यामध्ये मे ते आॅगस्ट या कालावधीत पालेभाज्यांची टप्प्याटप्प्याने लागवड. स्थानिक बाजारपेठेत विक्रीचे नियोजन. यातून खर्च वजा जाता पंधरा हजारांचे उत्पन्न.
  • पॉलिहाउसमध्ये कारले, काकडी लागवडीचे नियोजन. दरवर्षी आलटून पालटून वेलवर्गीय भाजीपाला घेतला जातो. जानेवारीमध्ये काकडीची लागवड. उत्पादन मार्चपासून सुरू. या काळात दर चांगला मिळतो. अमरावती बाजारपेठेत विक्रीचे नियोजन. खर्च वजा जाता वेलवर्गीय भाजीपाल्यातून एक लाखापर्यंतचे उत्पन्न.
  • सध्या एक एकरात नुकतीच मिरची लागवड.
  • चार वर्षांपूर्वी एक एकरात लिंबू लागवड. त्यामध्ये हंगामी चाऱ्याचे आंतरपीक. लिंबू बाग व्यापाऱ्याला दिली जाते. यातून वर्षाला सत्तर हजारांचे उत्पन्न मिळते.
  • शेळीपालन सुरू केल्याने एक एकरावर दशरथ गवत, लसूण घास, शेवरीची लागवड. त्यामुळे वर्षभर हिरवा चारा पुरतो. 
  • कुक्कुटपालन आणि शेळीपालनामुळे कोंबडीखत, लेंडीखताची उपलब्धता. सर्व खत शेतीमध्ये वापरले जाते. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढत आहे. 
  • जैविक कीडनाशकांच्या वापरावर भर. प्रयोगशील शेतकरी आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने पीक व्यवस्थापनात बदल. 
  • कोंबडी खाद्य आणि शेळी खाद्यनिर्मितीसाठी छोट्या गिरणीची सोय. त्यामुळे खाद्य खरेदीमध्ये बचत.
  • वकिली व्यवसायामुळे दैनंदिन शेतीकडे वेळ देता येत नाही. दर शनिवार, रविवारी शेतीला भेट. दैनंदिन शिवारातील घाडमोडींवर लक्ष ठेवण्यासाठी संपूर्ण क्षेत्रावर सीसीटीव्ही कॅमेरे. मोबाईलच्या माध्यमातून थेट चित्रीकरण पाहाण्याची सोय. 
  • थेट भाजीपाला विक्रीवर भर  अमरावती शहरातील रहिवासी कॉलनी, तसेच कार्यालयीन विभागामध्ये खान यांनी भाजीपाला विक्रीचे नियोजन केले आहे. भाजीपाला वाहतुकीसाठी छोटे मालवाहू वाहन खरेदी केले. दर दिवसाआड शहरात तसेच परिसरातील आठवडी बाजारात भाजीपाला विक्री केली जाते. यामुळे थेट ग्राहक जोडले गेले आहेत. भाजीपाल्याचे उत्पादन जास्त झाले, तर व्यापाऱ्यांना विक्री केली जाते. येत्या काळात ग्राहकांचे व्हॉट्सॲप गट करून थेट भाजीपाला, फळे, कोंबडी आणि माशांच्या विक्रीचे नियोजन केले आहे.

    शेळीपालन 

  • बाजारपेठेचा अभ्यास करून खान यांनी चार वर्षांपूर्वी शेळीपालनाला सुरवात केली. सुरवातीला ३० उस्मानाबादी आणि गावरान शेळ्या आणि एक जमनापारी बोकडाची खरेदी केली.
  • शेळ्यांसाठी मुक्त संचार गोठा. त्यामुळे शेळ्यांना व्यायाम मिळतो, आरोग्य चांगले राहते. 
  • हिरव्या चाऱ्याच्या उपलब्धतेसाठी एक एकरावर विविध चारापिकांची लागवड. शेळ्यांचे योग्य वेळी लसीकरण, खाद्य व्यवस्थापनावर भर. 
  • सध्या ११० शेळ्या. यामध्ये उस्मानाबादी, गावरान शेळ्या. जमनापारी आणि उस्मानाबादी बोकड.
  • दरवर्षी सरासरी दहा ते पंधरा बोकडांची ईदसाठी अमरावती बाजारपेठेत विक्री. व्यापारी तसेच थेट ग्राहकांना विक्रीवर भर. आता ईदपूर्वी आणि त्यासोबतच लागेल त्या वेळी ग्राहक थेट फार्मवर येऊन बोकडाची मागणी नोंदवितात. २५ ते ५० किलो वजनाच्या बोकडाची विक्री सरासरी ५ हजार ते २० हजार रुपयांपर्यंत होते.
  • शेततळ्यात मत्स्यपालन 

  • सन २०१४ पासून शेततळ्यात मत्स्यपालनास सुरवात. मत्स्य विभागाच्या मदतीने शेततळ्यात रोहू, कटला, मृगळ माशांचे पाच हजार मत्स्यबीज सोडले.
  • पाण्यात माशांसाठी पुरेसा आॅक्सिजन मिळत राहावा, यासाठी शेततळ्यात शॉवर तोटीच्या माध्यमातून पाणी फिरविले जाते. त्यामुळे पाण्यात योग्य आॅक्सिजनचे प्रमाण राहते. 
  • रोहू दोन किलो, मृगल दीड किलो आणि कटला ६०० ग्रॅम ते १ किलोपर्यंत वाढतो. 
  • जून, जुलै महिन्यांत माशांची अमरावती, तसेच परिसरातील आठवडी बाजारात थेट ग्राहकांना विक्री. सरासरी प्रतिकिलो १६० ते २०० रुपये दर. मत्स्यपालनातून सरासरी ७० हजारांचे उत्पन्न. 
  • गावरान कोंबड्यांचे संगोपन  

  • खान यांनी २०१२ मध्ये ब्रॉयलर कोबड्यांची पोल्ट्री सुरू केली. परंतु कोंबडी पिलांचे वाढते दर आणि वजन वाढलेल्या कोंबड्यांना मिळणारा कमी दर, यामुळे काही महिन्यांनी पोल्ट्री बंद केली. 
  • बाजारपेठेतील गावरान कोंबड्यांची मागणी लक्षात घेऊन पुन्हा पोल्ट्रीला सुरवात. नगर येथून पिलांची खरेदी. सध्या एक हजार कोंबड्यांचे संगोपन. कोंबडीच्या बरोबरीने अंडी विक्रीवर भर. सध्या १२० रुपये प्रतिकिलो दराने कोंबडीची विक्री. तसेच एक अंडे दहा रुपये दराने थेट ग्राहकांना विक्री.    
  • ॲग्रोवन ठरला दिशादर्शक  ॲड. झिया खान हे ॲग्रोवनचे पहिल्यापासूनचे वाचक. विषयानुसार त्यांनी ॲग्रोवनमधील लेख आणि यशोगाथांची फाइल तयार केली. यातील माहितीचा पीक व्यवस्थापन तसेच कुक्कुटपालन, शेळीपालनाच्या नियोजनात उपयोग केला जातो. तीन वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या अमरावतीमधील कार्यालयातदेखील ॲग्रोवन सुरू केला. त्यामुळे त्यांच्याकडे वकिली सल्ला घेण्यासाठी येणारे शेतकरीदेखील ॲग्रोवन वाचतात. त्यातील माहिती लिहून घेतात किंवा झेरॉक्स काढून घेऊन जातात. कृषी विभागातर्फे शेतकरी गट तसेच परिसरातील शाळेतील विद्यार्थी अभ्यास सहलीसाठी ॲड. खान यांच्या शेतीला भेट देतात. या वेळी शेतकरी व विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शनदेखील करतात.  

    -  ॲड. झिया खान, ९२७१२६००९६  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com