नागापूरने घडवली धवलक्रांती

श्रीराम मगर यांच्या गोठ्यातील दुधाळ गाई.
श्रीराम मगर यांच्या गोठ्यातील दुधाळ गाई.

नागापूर (जि. वर्धा) ग्रामस्थांनी दुग्ध व्यवसायात गेली ७० वर्षे सातत्य ठेवत आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल केली आहे. एेकेकाळी दैनंदिन चाळीस लिटर दूध संकलन असलेल्या या गावाने तीन हजार लिटरचा टप्पा गाठला आहे. दुग्धोत्पादनाच्या बरोबरीने शेतीलाही नवी दिशा ग्रामस्थांनी दिली आहे.

वर्धा जिल्ह्यातील शेतीची परिस्थिती पाहता दोन ते दहा एकर जमीनधारणा, कपाशी, सोयाबीन ही पारंपरिक पिके. अजूनही काही गावांमध्ये सिंचन सुविधांचा अभाव आहे. यामुळे पीक उत्पादकताही जेमतेम. शेतीपूरक व्यवसायांचा अभावामुळे शेती आणि ग्रामविकासावरही परिणाम झाला आहे. मात्र वर्धा शहरापासून बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या नागापूरने मात्र सातत्यपूर्ण पशुपालनाच्या माध्यमातून आत्मनिर्भरतेचा संदेश दिला आहे.  

  पशुपालनाला झाली सुरवात 

एकेकाळी सिंचन सुविधांचा अभाव असल्याच्या नागापूर गावशिवारात पारंपरिक पीकपद्धती असल्याने ग्रामस्थांना जेमतेम उत्पन्नावर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे ग्रामस्थांची मजुरीसाठी भटकंती सुरू झाली. काही जण सेवाग्राम आश्रमामध्ये रोजंदारी करू लागले. आश्रमामधील मुन्ना साहू यांनी रोजंदारी करणाऱ्यांना पशुपालनाचा सल्ला दिला. साहू यांच्याकडून मिळालेल्या पैशातून चौघांनी चार गाईंची खरेदी केली. या गाईंचे दूध पहाटे आश्रमावर पोचविण्याचे काम सुरू झाले. वीस वर्षांपर्यंत हे कार्य अविरत सुरू होते. १९३९ साली वर्धा शहरात गोरस भांडाराची स्थापना झाली. वर्धा जिल्हा व परिसरातील दुधाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा गोरस भांडार स्थापनेमागील हेतू होता. टप्प्याटप्प्याने नागापूरवरून पहाटे सहा वाजता व संध्याकाळी पाच वाजता दूध गोरस भांडारामध्ये येऊ लागले. गावातील लोकांनी शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड देत आर्थिक सक्षमतेचा पर्याय शोधला.

सहकारी दुग्ध संघाची स्थापना

१९६५ साली नागापूर गो दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेची स्थापन झाली. याबाबत माहिती देताना गावातील पशुपालक विठ्ठल कारामोरे म्हणाले, की गोरस भांडाराला दुधाचा पुरवठा, त्यांच्याकडून मिळालेल्या पैशाचे महिन्याकाठी धनादेशाद्वारे गावातील पशुपालकांना वितरण, सभासदांना गाय आणि चारा खरेदीसाठी कर्जाच्या माध्यमातून पैशाची उपलब्धता ही कामे सहकारी संस्थेमार्फत सुरू झाली. सुरवातीच्या काळात केवळ ४० लिटर त्यानंतर ८० लिटर दूध वर्धा शहरात जाऊ लागले. सात वर्षे असेच सुरू होते. मध्यंतरीच्या काळात काही कारणांमुळे संस्था बंद पडली. त्यामुळे गोरस भांडाराऐवजी करंजी भोगे येथे शासकीय दुग्ध योजनेला दुधाचा पुरवठा गावातील पशुपालक शेतकरी करू लागले. परंतु गोरस भांडाराच्या तुलनेत शासकीय दुग्ध योजनेचे अनेक निकष आणि नियमांच्या परिणामी दुधाला दर कमी मिळू लागला. हे लक्षात घेऊन वर्धेतील डॉ. उल्हास जाजू यांनी १९८२ साली नागापूर गो दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेचे पुनरुज्जीवन केले. संस्थेचा कारभार सुरळीत होण्यासाठी नियमावली तयार केली. जनावरांसाठी वैद्यकीय सुवेधेचीदेखील सोय केली. नागापूर ते वर्धा दूध वाहतुकीसाठी संस्थेने भाडेतत्त्वावर वाहन घेतले. योग्य नियोजनामुळे पुन्हा एकदा पशुपालकांच्या नफ्यात वाढ होऊ  लागली. एखाद्या पशुपालकाच्या चुकीचा फटका साऱ्यांना बसू नये याकरिता गावातील ९० दुग्ध उत्पादकांपैकी प्रत्येकी नऊ जणांचा समावेश असलेले दहा गट तयार करण्यात आले. संबंधित गटाचे दूध एकत्रित केले जाते. दुधाचा दर्जा चांगला राहण्यासाठी प्रत्येक गटप्रमुखावर जबाबदारी निश्‍चित केली आहे. यातून उत्तम दर्जाच्या दुधाचा पुरवठा गोरस भांडारला केला जातो. संस्थेद्वारे गाय खरेदीसाठी तीस हजार रुपये कर्ज दिले जाते. सध्या नारायण रेवडे हे संस्थेचे अध्यक्ष आहेत. 

पशुपालनाला मिळाली गती दुग्ध व्यवसायाच्या फायद्याबाबत विठ्ठल कारामोरे म्हणाले, की आमच्याकडे जमीन क्षेत्र कमी असले तरी पशुपालनामुळे आम्हाला आर्थिक फायदा होतो. शेतकऱ्यांनी आता शाश्वत पाणी उपलब्धतेसाठी विहीर, कूपनलिका घेतली आहे. जमिनीची सुपीकता जपण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त शेणखताचा वापर करतो. सेवाग्राम येथे पशुवैद्यकीय दवाखान्याच्या प्रक्षेत्रावर चारा बॅंक आहे. त्या ठिकाणावरून शेतकऱ्यांचा चाऱ्याचे ठोंब पुरविले जातात. गोरस भांडाराने दर्जेदार पशुखाद्य तयार केले आहे. ढेप आणि इतर पशुखाद्य खरेदी केल्यानंतर दूध बिलातून याचे पैसे वळते होतात. माझ्याकडे १२ संकरित गाई आहेत. सध्या या गाई दररोज सरासरी १२ ते १५ लिटर दूध देतात. दरमहा मला दुग्ध व्यवसायातून अठरा हजारांचा नफा होतो. विदर्भातील अनेक गावांतील शेतकरी आमच्या गावाला भेटी देतात.

कृषी सहायक उदय राठोड म्हणाले, की गावातील शेतकरी ज्वारी, कपाशी, सोयाबीन, हरभरा लागवडीमध्ये सुधारित तंत्राचा अवलंब करीत आहेत. बहुतांश पशुपालकांनी वर्षभर चाऱ्याच्या उपलब्धतेसाठी यशवंत, जयवंत, धारवाड हायब्रीड नेपीयर या चारा पिकांची लागवड केली आहे. कृषी विभागाने चारापीक लागवडीला प्रोत्साहन दिले आहे.

नागापूरचा दुग्ध व्यवसाय

सध्या गावात सुमारे १२६ कुटुंबे आहेत. गावातील बहुतांश कुटुंबांकडे संकरित गाई आहेत. गावात गाईंची संख्या सुमारे एक हजारावर आहे. पहाटे चार वाजता दूध काढणे आणि साडेपाच वाजता गावामध्ये संकलित झालेल्या दुधाचे कॅन गोरस भांडारात पोचविणे, हा ग्रामस्थांचा नित्यक्रम आहे. गोरस भांडारातर्फे दूध तपासणी होते. दुधामध्ये सरासरी ८.५ एस.एन.एफ., चार फॅट गरजेचे आहे. ही प्रत नसल्यास दुधाला दर कमी मिळतो. सध्या दुधाला ३५ रुपये लिटर दर मिळतो.

  •  सत्तर वर्षांपासून दूध व्यवसायात ग्रामस्थांचे सातत्य.
  •   होल्स्टीन फ्रिजियन, जर्सी गाईंचा सांभाळ. गावात सध्या दुधाळ ३०० गाई. 
  •  एका गाईपासून सरासरी दहा लिटर दुग्धोत्पादन. याप्रमाणे गावात दररोज तीन हजार लिटर दुधाचे संकलन.
  •  दुध वाहतुकीकरिता गावातील  संस्थेची वाहतूक व्यवस्था, ६० पैसे प्रतिलिटरचा खर्च.
  •  पशुपालकांचा मुक्‍त संचार गोठे उभारणीवर भर.
  •  पशुपालकांचा गवळाऊ या देशी गोवंश संवर्धनाकरिता पुढाकार.
  • लसीकरण, खाद्य व्यवस्थापनावर भर  गाईंच्या व्यवस्थापनाबाबत माहिती देताना सेवाग्राम येथे पशुधन विकास अधिकारी डॉ. राजेंद्र निखाते म्हणाले, की या गावात बहुतांश पशुपालकांच्याकडे एच.एफ. आणि जर्सी गाई आहेत. गोठ्यातच दुधाळ कालवडी तयार करण्यावर पशुपालकांचा भर आहे. दरवर्षी दोनदा गाईंचे नियमित लसीकरण होते. गोचीड निर्मूलनाकरिता सामूहिकपणे मोहीम राबवली जाते. पशुवैद्यकीय दवाखान्यातर्फे सुधारित चारा लागवड, खाद्य व्यवस्थापन, रेतमात्रांबाबत पशुपालकांना माहिती दिली जाते.  

    संपर्क - विठ्ठल कारामोरे, ९५२७८६३३४५ संपर्क - डॉ. राजेश निखाते, ९९२१०७८८६५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com