ऊस बेणे मळ्याने दिली आर्थिक ताकद

९०५७ ऊस बेण्याची झालेली जोमदार वाढ दाखविताना जगन्नाथ माने.
९०५७ ऊस बेण्याची झालेली जोमदार वाढ दाखविताना जगन्नाथ माने.

काशीळ (जि. सातारा) येथील जगन्नाथ संपत माने यांनी शेतकऱ्यांकडून दर्जेदार ऊस बेण्याची मागणी लक्षात घेत पारंपरिक पद्धतीने ऊस लागवड करण्यापेक्षा बेणे मळ्यावर लक्ष केंद्रित केले. प्रयोगशील शेतकरी आणि तज्ज्ञांच्या सल्ला घेत दरवर्षी बेणे मळा वाढवत नेला. याचबरोबरीने भाजीपाला, आले, पपई लागवडीतूनही आर्थिक उत्पन्न वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

सातारा जिल्ह्यातील काशीळ हे महामार्गालगत असलेले गाव. येथील जगन्नाथ संपत माने हे प्रयोगशील शेतकरी. माने यांना घरची साडेसात एकर शेती. यामधील लागवडीखाली अवघी चार एकर शेती. त्यांचे वडील पांरपरिक पद्धतीने शेती करत होती. तीन वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांनी वडिलांच्या बरोबरीने शेती करण्यास सुरवात केली. घरखर्च चालावा यासाठी काशीळ येथे कृषी सेवा केंद्र सुरू केले. बारमाही शेतीसाठी कर्ज काढून विहीर खोदली. परंतु पाणी कमी  लागले.

उपलब्ध पाण्यात भाजीपाला लागवडीला सुरवात केली. यातून पैसे आल्यावर दुसऱ्या ३० गुंठे क्षेत्रातील तीन कूपनलिकांना पाणी चांगले लागले. यातील एका कूपनलिकेचे पाणी पाइपलाइनने विहिरीत आणून सोडले. उर्वरित कूपनलिकेचे पाणी दोन एकर शेतीस देण्यास सुरवात केली. बागायती क्षेत्रात वाढ झाल्याने टप्प्याटप्प्याने  आर्थिक मिळकतीमधून तीन एकर पडीक जमीन लागवडीखाली आणली. ऊस पिकांबरोबर टोमॅटो, वांगी लागवड करत पैसा खेळता ठेवला.

बेणे मळ्यास केली सुरवात  ऊस बेणे मळ्याबाबत जगन्नाथ माने म्हणाले, की मी दरवर्षी प्रयोगशील शेतकऱ्यांच्या सल्ल्याने ऊसपीक व्यवस्थापन करत होतो. याच दरम्यान अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी नेताजी पवार यांनी मला ऊस बेणे मळा करण्याचा सल्ला दिला.  त्यांनी २०१०-११ मध्ये व्हीएसआय-३१०२ या ऊस जातीचे बियाणे दिले. मी सुरू हंगामात ३० गुंठे क्षेत्राची योग्य मशागत करून साडेतीन फूट सरी तर दोन कांडीतील अंतर एक फूट ठेऊन लागवड केली. पिकाचे चांगले व्यवस्थापन ठेवले. पीक दहा महिन्याचे झाल्यावर मी वीस उसांची एक मोळी बांधून एक हजार मोळ्या विकल्या. या जातीस त्या वेळी चांगली मागणी असल्याने मला प्रतिमोळी ३५० ते ४०० रुपये दर मिळाला. खर्च वजा जाता दीड लाखाचा नफा बेणे मळ्यातून मिळाला.

कारखान्याच्या दरापेक्षा दुपटीने नफा मिळाल्याने उत्साह वाढला. मग टप्प्याटप्प्याने ऊस बेणे मळा वाढवत नेला. सध्या मी आडसाली, पूर्वहंगामी व सुरू हंगामात बेणे मळ्याचे नियोजन करतो. सध्या मी स्वतःची १४.५ एकर आणि ९.५ एकर शेती खंडाने करीत आहे. बहुतांश ऊस लागवड बेण्यासाठी करतो, समजा मागणी कमी असेल तर तो ऊस गाळपासाठी कारखान्याला पाठवितो. दरवर्षी माझा नऊ एकरांवर बेणे मळा      असतो. प्रयोगशील शेतकरी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन  बेणे नियोजनात जगन्नाथ माने यांना व्हीएसआयमधील ऊस तज्ज्ञ डॉ. रमेश हापसे यांचे चांगले मार्गदर्शन मिळते. याचबरोबरीने प्रयोगशील शेतकरी बापूराव माने, जयसिंग चव्हाण, मानसिंग चव्हाण, संजीव माने, नेताजी पवार, एच. ए. माने यांचे पीक नियोजनात सहकार्य असते. त्यामुळे उत्पादनवाढीचे लक्ष त्यांना गाठता आले.

माने यांचा मोठा मुलगा विनय कंपनीत नोकरी करतो. मुलगी वर्षा हिचे बी.ई.चे, तर लहान मुलगा अाशिष हा बी.एसस्सी (कृषी) शिक्षण घेत आहे. अाशिषला शेतीची आवड असल्याने कृषी प्रक्रिया उद्योग करण्याची इच्छा आहे. माने यांना पीक नियोजनात पत्नी कमल यांचेही चांगले सहकार्य मिळते.

   ऊस बेणे मळ्याचे नियोजन

  • आडसाली लागवड १५ जून ते १५ आॅगस्ट (जातीः को.८६०३२, को.एम.०२६५, व्हीएसआय.०८००५), पूर्वहंगामी १५ अॅाक्टोबर ते १५ नोव्हेंबर (जाती ः  एम.एस.१०००१, को.९०५७, व्हीएसआय.०८००५) तसेच सुरू हंगामासाठी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारीत लागवड (जाती ः     एम.एस.१०००१,  को.९०५७)
  • प्रयोगशील शेतकरी आणि ऊस तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार पीक नियोजन.
  • अाजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून मध्यवर्ती ऊस     संशोधन केंद्र, पाडेगाव आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने विकसित केलेल्या ऊस जातींचे बेणे मिळते.
  • जमिनीची योग्य मशागत, माती परीक्षणानुसार ६० टक्के सेंद्रिय खते ( शेणखत, कोंबडी खत, कंपोस्ट खत) आणि ४० टक्के रासायनिक खतांच्या वापरावर भर.
  • दर्जेदार बेणे निवड, बेणे प्रक्रियेवर भर. दोन सरीत साडेचार फूट अंतर व दोन कांडीत एक फूट अंतर ठेऊन दोन डोळ्यांच्या कांडीची लागवड.
  •  लागवडीपासून ८० ते ९० व्या दिवशी बाळभरणी आणि १२० ते १४० दिवशी खतमात्रा देऊन मोठी भरणी.
  • चौदा एकराला ठिबक सिंचन. ठिबकद्वारे पीकवाढीच्या टप्प्यानुसार  विद्राव्य खतांचा वापर.
  • आंतरमशागत आणि शिफारशीत तणनाशकाच्या वापरातून तण नियंत्रणावर भर.
  • खो़डवा ठेवत नाही. गाळपासाठी ऊस पाठवल्यास एकरी उत्पादन ७० ते ८५ टन.
  • यंदा नऊ एकर क्षेत्रावर बेणे मळ्याचे नियोजन. एकरात २० उसाच्या सरासरी १३०० ते १५०० पर्यंत मोळ्या मिळतात. प्रतिमोळीस ऊस जातीनुसार सध्या १४० ते २०० रुपये दर. खर्च वजा जाता एकरी दीड लाखाचे उत्पन्न.
  •     राज्यभरातून बेण्याला मागणी जगन्नाथ माने पहिली दोन वर्षे स्थानिक परिसरात ऊस बेण्याची विक्री करत होते. त्यानंतर बेणे मळ्याचे क्षेत्र वाढविल्याने ॲग्रोवनमध्ये बेणे उपलब्धतेबाबत जाहिरात देण्यास त्यांनी सुरवात केली. त्यामुळे राज्यभरातून ऊस बेण्याची मागणी वाढली.

    सध्या नगर, परभणी, बीड, नांदेड, सोलापूर, सांगली जिल्ह्यांतील शेतकरी बेणे नेतात. बेण्याबाबत खात्री झाल्यामुळे अनेक शेतकरी माने यांच्या बॅंक खात्यावर पैसे पाठवतात. पैसे जमा झाल्यावर माने संबंधित शेतकऱ्यांना बेणे पाठवितात.

       आले पिकाने दिले स्थैर्य    ऊस लागवडीच्या बरोबरीने जगन्नाथ माने यांनी आले लागवडीस सुरवात केली. याबाबत ते म्हणाले, की ऊस बेण्यातून पैसे मिळू लागल्याने पाण्याची शाश्वतता असावी यासाठी शिरगाव येथील तारळी नदीतून सहा इंची पाइपलाइन करून बहुतांश क्षेत्र बागायती केले. माझ्या शेतालगत असलेली सात एकर शेतजमीन खंडाने घेतली. यंदाच्या वर्षी मी स्वतःच्या दोन एकरांत आणि खंडाने केलेल्या दोन एकरांत मे महिन्याच्या शेवटी चार फुटांचा गादीवाफा करून आल्याच्या सातारी जातीची लागवड केली.  चारपैकी तीन एकरांतील आल्यामध्ये पपईचे आंतरपीक घेतले. पपईच्या दोन ओळीत आठ फूट आणि रोपांत सहा फूट अंतर ठेवले आहे. यंदा रमजान मेमध्ये आहे. त्यामुळे एप्रिल महिन्याचा अखेरीस पपईचा तोडा सुरू होईल यादृष्टीने जुलैमध्ये लागवड केली. यावर्षी पपईस चांगला दर मिळेल अशी आशा आहे. २०१२-१३ मध्ये सातारा जिल्ह्यातील आले लागवडीच्या पट्ट्यात उत्पादन घटले होते. मला दोन एकरांत २२ टन उत्पादन मिळाले. उत्पादन कमी आणि मागणीत प्रचंड वाढ यामुळे मला त्यावर्षी प्रति ५०० किलोस ४८ हजार रुपये दर मिळाला होता. या पैशातून मी पूर्वी घेतलेले बॅंक कर्ज फेडत ट्रॅक्टर, चारचाकी गाडी आणि काही शेतजमीन खरेदी केली.

    संपर्क ः जगन्नाथ माने, ९६०४४६५८८७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com