Agriculture stories in Marathi, agrowon ,success story of sunjay Masute, Uchgaon, Kolhapur | Agrowon

शेतीमध्येही गिरविले प्रयोगशीलतेचे धडे
अभिजित डाके
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण, संस्कारांची शिरोदी देण्याचं काम शिक्षक करतातच. याचपैकी एक आहेत सांगली येथील संजय मसुटे. शिक्षकी पेशा सांभाळून परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांकडून पीक व्यवस्थापनाचे धडे गिरवत त्यांनी स्वतःच्या शेतीत सुधारणा केली आहे.  

विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण, संस्कारांची शिरोदी देण्याचं काम शिक्षक करतातच. याचपैकी एक आहेत सांगली येथील संजय मसुटे. शिक्षकी पेशा सांभाळून परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांकडून पीक व्यवस्थापनाचे धडे गिरवत त्यांनी स्वतःच्या शेतीत सुधारणा केली आहे.  

संजय बाबासो मसुटे यांचे मूळ गाव उचगाव (जि. कोल्हापूर). सध्या संजय मसुटे हे तारदाळ (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील श्री बाहुबली विद्यापीठाच्या सन्मती विद्यालयात शिक्षक आहेत. त्यांची पत्नी सौ. सारिका या मिरज येथील शाळेमध्ये माध्यमिक शिक्षिका आहेत. यामुळे मसुटे कुटुंबीय सांगलीमध्येच राहातात. सांगलीमध्ये राहूनदेखील त्यांनी वडिलोपार्जित शेतीची आवड जोपासली आहे. याबाबत संजय मसुटे म्हणाले की, माझी वडिलोपार्जित शेती दोन एकर. चार बहिणी, आम्ही दोघ भाऊ, आई आणि वडील असं कुटुंब. पूर्वी माझे वडील सगळी शेती बघायचे. पारंपरिक पद्धतीनेच शेती केली जायची.

लागवड क्षेत्र कमी असल्याने आमची आर्थिक परिस्थिती बेताचीच. कसातरी उदरनिर्वाह व्हायचा. लहानपणापासूनच मी शेतीमध्ये मजुरांच्याबरोबर काम करायचो. वडिलांकडून मिळालेले पैसे शिक्षणासाठी साठवायचो. दावणीला बैलजोडी होती. इतरांच्या शेतात बैलजोडीने मशागतीची कामे करून आर्थिक बाजू भक्कम करायची, असा वडिलांचा प्रयत्न असायचा. शेती कमी असल्याने मुलांनी चांगले शिक्षण घेऊन नोकरी करावी, अशी वडिलांची जिद्द होती. वडिलांनी आम्हाला शिक्षणासाठी काही कमी पडू दिले नाही. मी शिक्षकी पेशात गेली तेरा वर्षे कार्यरत आहे.

टप्प्याटप्प्याने शेतीमध्ये केला बदल 
 शेतीनियोजनाबाबत संजय मसुटे म्हणाले की, मी लहानपणापासून वडिलांना दोन एकर शेती नियोजनात मदत करायचो. त्यामुळे पीक हंगाम, खतांचा वापर, पाणी नियोजन, हंगामानुसार पेरणी पद्धतीची माहिती होत गेली. वडील उसामध्ये आंतरपीक म्हणून भाजीपाला पिकांची लागवड करायचे. हा भाजीपाला मी आठवडे बाजारात विकायचो. त्यामुळे उत्पादन ते विक्री असा अनुभव मिळत गेला. 

मी शेतीच्या आवडीने २०१३ मध्ये  समडोळी (जि. सांगली) येथे तीन एकर शेती खरेदी केली. सध्या माझे बंधू संदीप हे उचगाव येथील वडिलोपार्जित शेतीचे व्यवस्थापन पहातात. मी समडोळी येथील शेतीचे नियोजन बघतो. समडोळी भागात क्षारपड शेती मोठ्या प्रमाणात आहे. तुम्ही या भागातील शेती विकत घेऊ नका, असे सल्ले इतरांनी दिले, परंतु मी परिसरातील संपूर्ण शेतीचा अभ्यास  केला.

या शेत जमिनीतून पाण्याचा निचरा होण्यासाठी मी सछिद्र निचरा प्रणालीचा वापर केला. हे पाणी शेताजवळील नाल्यामध्ये सोडून दिले. त्यामुळे जमिनीतील साठणाऱ्या पाण्याचा चांगल्या प्रकारे निचरा होऊ लागला. या उपाययोजना करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागला. या शेतीमध्ये मी ऊस लागवडीचे नियोजन केले. परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार मी पहिल्यांदा अडीच एकरावर फुले-२६५ जातीच्या उसाची सुधारित पद्धतीने लागवड केली. नोकरी करत शेतीचे नियोजन करायचे असल्याने पहिल्यांदा ऊस लागवड करणेच मला फायदेशीर ठरणार होते. या शेतीसाठी उदय पाणीपुरवठा योजनेतून पाणी घेतो. सध्या पाटपाणी देण्याची सोय आहे. पुढील वर्षी ठिबक सिंचन करणार आहे. यामुळे कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्यासाठी फायदा होईल.

 सध्या समडोळी येथील शेतीमध्ये तीन एकर क्षेत्रावर को-८६०३२ या ऊस जातीची लागवड केली आहे. याचबरोबरीने हंगामानुसार काही क्षेत्रावर स्वीट कॉर्न, सोयाबीनची लागवड करतो. पहिल्यापासून शेती पद्धतीची माहिती असल्यामुळे शेती करणे सोपे गेले. मी पारंपरिक शेतीला सुधारित तंत्रज्ञानाची जोड देण्यास सुरुवात केली आहे. मी पहिल्यांदा गावाकडील शेतीमध्ये पांरपारिक पद्धतीनेच ऊस, भुईमूग, सोयाबीन लागवड करायचो. त्या वेळी मला  को-८६०३२ जातीचे एकरी ६० टन उत्पादन मिळत होते. ही शेती करताना मी परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांच्याकडून  ऊस उत्पादनवाढीचे सल्ले घेत गेलो. शेतीच्या नियोजनात माझी आई श्रीमती अक्काताई आणि पत्नी सौ. सारिका यांची चांगली मदत होते.

प्रयोगशील शेतकऱ्यांचे  मिळाले मार्गदर्शन
प्रयोगशील शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनाबाबत संजय मसुटे म्हणाले की, समडोळी भागातील काही प्रयोगशील शेतकरी एकरी शंभर टन ऊस उत्पादन घेतात. या शेतकऱ्यांच्या शेतीला मी भेट देण्यास सुरवात केली. माझ्या पत्नीचे मामा नेमिनाथ शिरोटे हे कृषी विभागामधून निवृत्त झाले आहेत. पीक व्यवस्थापनामध्ये त्यांचा सल्ला मला फायदेशीर ठरतो. ऊस शेतीसाठी महावीर पाटील, मजले (जि. कोल्हापूर) महावीर चव्हाण, रमेश खोत, आदगोंडा पाटील यांचे मार्गदर्शन मिळते. या शेतकऱ्यांनी मला जमिनीची सुपीकता, लागवड पद्धत, पीक व्यवस्थापनाबाबत चांगले मार्गदर्शन मिळू लागले. तसेच वेळोवेळी कृषी विभागातील अधिकाऱ्यांचेही मी मार्गदर्शन घेतो. गेल्या दोन वर्षांत उचगाव येथील वडिलोपार्जित दोन एकर शेती संपूर्ण ठिबक सिंचनाखाली आणली आहे.

ऊस व्यवस्थापनाबाबत संजय मसुटे म्हणाले की, पूर्वी मी अडीच फुटी सरी काढून दोन डोळा पद्धतीने लागवड करायचो; परंतु आता प्रयोगशील शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार साडेतीन फूट सरी सोडून दोन रोपांतील अंतर दीड फूट ठेवतो. जातिवंत बेणे निवडतो. बेणे प्रक्रियाकरूनच लागवड केली जाते. मातीपरीक्षणानुसार रासायनिक खतांचा २५ टक्के वापर आणि सेंद्रिय खतांचा ७५ टक्के वापर  करतो. याचबरोबरीने  पाचट आच्छादन केले जाते.

जमिनीची सुपीकता जपण्यासाठी हिरवळीच्या पिकांची लागवड करतो. मी रासायनिक कीटकनाशकांची कमीत कमी फवारणी करतो. गेल्या वर्षी मला क्षारपड जमिनीतून फुले -२६५ जातीचे एकरी ५० टन आणि खोडव्याचे उत्पादन ४० टन उत्पादन मिळाले. यंदा वर्षी  को-८६०३२ जातीची लागवड केली आहे. एकरी ८० टनाचे टार्गेट ठेवले आहे. यंदाच्या वर्षी सोयाबीनचे दोन एकरात २८ क्विंटल उत्पादन मिळाले आहे. घरी लागणाऱ्या भाजीपाल्याची लागवड उसात मेथी, कोथिंबीर, लालमाठ, कांदा यांची आंतरपीक म्हणून लागवड करतो. त्यामुळे घरासाठी लागणाऱ्या भाजीपाल्याची पूर्तता होते.  

असे आहे शेती नियोजन  
शेती नियोजनाबाबत संजय मसुटे म्हणाले की, दर शनिवारी शाळा सुटल्यानंतर दुपारी तीन वाजता समडोळी येथील शेतीवर जातो. तेथे गेल्यावर  गेल्या आठवड्यात मजुरांना दिलेली कामे पूर्ण झाली का, याची याची पाहणी करतो. त्यानंतर कोणते काम शिल्लक राहिले आहे याची खात्री करून पीक व्यवस्थापनाचे पुढील नियोजन केले जाते. मला परिसरातील मजुरांची चांगली साथ मिळते. उचगाव येथील शेतीत महिन्यातून एकदा जातो; परंतु बंधूशी दर दोन दिवसांतून एकदा फोनद्वारे शेतीतील कामांचा आढावा घेतो. यामुळे पुढील नियोजन करण्यास सोपे जाते.

गटचर्चेतून शेतीविकास
संजय मसुटे यांच्या शाळेत शेती असणाऱ्या आठ शिक्षकांचा गट तयार झाला आहे. हे शिक्षक शेतीमधील प्रयोगांबाबत चर्चा करतात. नवीन माहिती देतात. काही शिक्षकांच्या शेतीवर शिवारफेरीचेदेखील आयोजन केले जाते. त्यामुळे नवीन प्रयोग पाहायला मिळतात. या गटात ‘ॲग्रोवन’मध्ये प्रसिद्ध होणारे पीक सल्ले, लेख, शेतकऱ्यांनी शेतात केलेले विविध प्रयोग याविषयी चर्चा होते. नवीन शेती तंत्रज्ञानाचा अभ्यास करत शेतीमध्ये बदलाचा सर्वांचा प्रयत्न आहे.

संपर्क ः  संजय मसुटे, ९५९५९५१६५४
 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
नेमका गरजेवेळी युरिया जातो कुठे?जळगाव  ः जिल्ह्यात मागील काही दिवसांत चांगला...
केरळमध्ये युद्धपातळीवर मदतकार्य तिरुअनंतपुरम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीर...
मोसंबीची फळगळ वाढलीऔरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट...
पाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का?झळा दुष्काळाच्याः जिल्हा जालना जालना जिल्ह्यात...
कोल्हापूर जिल्ह्यातील ५२ बंधारे...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा...
कमी दाब क्षेत्राची निर्मिती; पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. १९) कमी...
राज्यात मुबलक युरियापुणे: राज्याच्या काही भागात अपेक्षित पाऊस...
केरळात साडेतीन लाखावर लोक विस्थापित ;...तिरुअनंतपुरम : केरळ राज्यात अतिवृष्टी...
खरिपात खर्चही निघेल असं वाटत नाहीझळा दुष्काळाच्या ः जिल्हा नगर मागचे पाच-...
डाळिंबावर फुलगळीचा प्रादुर्भावसांगली ः राज्यात मृग हंगामात ८० ते ९० हजार हेक्‍...
अतिपावसाचा खरिपाला फटकापुणे : दीर्घ खंडानंतर बुधवार (ता.१५) ते शुक्रवार...
लष्करी अळीमुळे अन्नसुरक्षेला धोकायुरोपीयन संघ ः आफ्रिका खंडात कहर केल्यानंतर...
पीक बदलातून शेती केली किफायतशीरकोठारी येथील माध्यमिक शाळेमधील शिक्षकाची नोकरी...
अन्नपूर्णा उद्योगातून स्वयंपूर्णतेकडेआवडीचं क्षेत्र जेव्हा आपल्या व्यवसायाचा आधार बनते...
चंद्रपूर : पोडसा पूल पाण्याखाली; पाच...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : दोन...
केरळमध्ये पुरामुळे २४७ जणांचा मृत्यूतिरुअनंतपुरम : मागील आठवडाभर चालू असलेल्या...
कधी ढग, तर कधी पावसाची नुसती भुरभुरझळा दुष्काळाच्याः जिल्हा सांगली पहिल्या पावसावर...
मराठवाड्यात दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ महसूल मंडळांपैकी...
ग्लायफोसेटला परवान्यातूनच वगळण्याचा...नागपूर ः चहा वगळता इतर पिकांसाठी ग्लायफोसेट...
कोल्हापूर जिल्ह्यात अतिपावसाने पिके...कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या...