शिवापूर (जि. अकोला) येथील शेतीमध्ये कपाशी पिकाची पाहणी करताना विष्णू ढोरे.
शिवापूर (जि. अकोला) येथील शेतीमध्ये कपाशी पिकाची पाहणी करताना विष्णू ढोरे.

शेतीतही जपली पोलिस खात्याची शिस्त

एकदा नोकरी लागली, घरदार स्थिरस्थावर झाले की अनेकजण वडिलोपार्जित शेतीकडे दुर्लक्ष करतात. काही मोजकेच मात्र मातीशी नाळ टिकवून ठेवतात. शेतीत नवीन प्रयोग करतात. यापैकीच एक आहेत अकोला जिल्ह्यामध्ये पोलिस नाईक पदावर कार्यरत असलेले विष्णू ढोरे. परिसरातील शेतकरी, कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्यांनी योग्य पीक व्यवस्थापन करत उत्पादनवाढीवर लक्ष केंद्रित केले आहे.

अकोला जिल्ह्यामध्ये पोलिस खात्यात नाईक पदावर कार्यरत असलेले विष्णू वसंतराव ढोरे यांची शिवापूर (जि. अकोला) येथे वडिलोपार्जित पंधरा एकर शेती आहे. ढोरे यांना अाई व एक लहान भाऊ अाहे. पत्नी, मुलगा, मुलगी असे कुटुंब अाहे. वडिलोपार्जित पंधरा एकर शेती त्यांच्यासह भाऊ व अाईच्या नावावर प्रत्येकी पाच एकर विभागून अाली. विष्णू ढोरे हे बीए.बीपीएडपर्यंत शिकलेले अाहेत. १९९७ मध्ये ते पोलिस खात्यामध्ये रुजू झाले. सध्या त्यांची नोकरी अकोल्यापासून सोळा किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात आहे. त्यांचे कुटुंब अकोला शहरात वास्तव्यास अाहे.  पोलिसांची नोकरी ही २४ तास म्हटली जाते. त्यामुळे या खात्यात काम करून शेती करणे कठीणच असते. परंतु विष्णू ढोरे यांना पहिल्यापासून शेतीची अावड असल्याने त्यांच्या वाट्याला अालेल्या पाच एकर शेतीत केवळ पारंपरिक पिके घेऊन ते थांबलेले नाहीत. सुधारित तंत्राचा अवलंब करीत सोयाबीन, कापूस, हरभरा, कांदा बीजोत्पादनातून शेती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. दरवर्षी अधिकाधिक पीक उत्पादन कसे मिळेल यादृष्टीने ते व्यवस्थापन करतात. पोलिस खात्यातील नोकरीमुळे प्रत्यक्ष शेतीत काम करणे शक्य नसल्याने साप्ताहिक सुटीच्या दिवशी (बुधवारी) ते शेतातील कामांचे नियोजन करतात. शेतातील कामे करण्यासाठी त्यांच्याकडे वर्षभर नियमितपणे मजूर असतात. 

शेतीला कुंपण, विहीर खोदली  भटक्या जनावरांच्या त्रासापासून पिकांना वाचविण्यासाठी विष्णू ढोरे यांनी शेताला कुंपण केले. सन २००२ मध्ये शेतात विहीर खोदली. अवघ्या ३५ फुटांवर विहिरीला पाणी लागले. इतरांच्या विहिरी उन्हाळ्यात तळ गाठत असताना या विहिरीतून त्यांना पुरेसे पाणी मिळते. पाण्याची पुरेशी उपलब्धता असल्याने पिकांचे चांगले उत्पादन मिळते. पाण्याचे मोल जाणून ते ठिबक सिंचन, तुषार सिंचनाने  पाणी देतात.   सुटीच्या दिवशी शेतीचे व्यवस्थापन विष्णू ढोरे यांना बुधवारी साप्ताहिक सुटी असते. इतर दिवशी शेताकडे जाणे शक्य होत नाही. त्यामुळे या सुटीच्या दिवशी दर अाठवड्याला किंवा महिन्यातून दोन ते तीन वेळेस शेतावर जाऊन ते पिकांची पाहणी करतात.  पिकाला कशाची गरज अाहे, मशागत व इतर बाबींची पाहणी करून पुढील अाठवडाभर मजुरांकडून ही कामे करून घेतात. या कामात त्यांचा लहान भाऊ श्रीकृष्ण यांचे सहकार्य मिळते. मोबाईलवरून मजुरांशी संपर्कात राहून गरज असलेली कामे करण्याची सूचना ते देतात. अाजवर एक मजूर महिन्याने कामाला होता. अाता तो सुटल्याने रोजंदारीने मजूर सांगून पीक व्यवस्थापन केले जाते. कृषी विभागातील तज्ज्ञांच्या संपर्कात राहून त्यांनी उत्पादनवाढीचे प्रयत्न सुरू ठेवले  अाहेत. 

प्रयोगशील शेतकऱ्यांचा सल्ला उपयुक्त  विष्णू ढोरे हे पोलिस खात्यामध्ये नोकरीला असल्यामुळे दररोज पीक व्यवस्थापनावर लक्ष देणे शक्य होत नाही. परंतु गरजेनुसार प्रयोगशील शेतकरी आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने ते पीक व्यवस्थापन करतात. गावामध्ये दोन शेतकरी गट आहेत. तसेच त्यांचा भाऊदेखील शेतकरी गटाचा सदस्य आहे. त्याने कुक्कुटपालनाचे प्रशिक्षण घेतले आहे. गटातील शेतकऱ्यांच्याकडून सातत्याने ते नवीन माहिती घेतात. पोलिस खात्यामधील काही जणांची शेती आहे. त्यामुळे या सहकाऱ्यांकडून नवीन पीक प्रयोगांची माहिती मिळते. गरजेनुसार डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांचा ते सल्ला घेतात. ॲग्रोवनचादेखील शेती व्यवस्थापनात त्यांना फायदा होतो. येत्या काळात एक एकर डाळिंब लागवडीचे त्यांनी नियोजन केले आहे.

विविध पिकांची लागवड

अकोला तालुक्यातील शिवापूर गावशिवार असलेल्या शेतीत विष्णू ढोरे एकच पीक न घेता विविध पिकांची लागवड करतात. याबाबत ते म्हणाले की, दरवर्षी दोन एकरावर बीटी कपाशी आणि तीन एकरावर सोयाबीन लागवड करतो. सोयाबीनमध्ये तुरीचे अंतरपीक घेतो. प्रयोगशील शेतकरी आणि कृषी विभागातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने दरवर्षी चांगले उत्पादन देणाऱ्या जातींची निवड करतो. मी माती परीक्षण करून घेतले आहे. त्यामुळे परीक्षण अहवालानुसार खतमात्रांचा वापर करतो. त्यामुळे खत वापरात बचत झाली. रब्बी हंगामामध्ये दोन एकर क्षेत्रात हरभरा लागवड असते.  दरवर्षी पीक व्यवस्थापनाचा खर्च वाढत चालला अाहे. यामुळे मी नगदी पिकांचे काटेकोर व्यवस्थापन करतो. गेल्या आठ वर्षांपासून मी एक एकरावर कांदा बीजोत्पादन घेतो. गावामध्ये कांदा बीजोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचा एक गट तयार झाला आहे. त्यामुळे दरवर्षी दर्जेदार बियाणे उत्पादनावर आमचे लक्ष असते. तसेच सामूहिक पद्धतीने खत खरेदी, पीक व्यवस्थापन आणि बियाणे विक्री केली जाते. त्यामुळे खर्चात बचत होते. कांदा बियाणास चांगला दर मिळतो. पिकांचे चांगले व्यवस्थापन असल्याने मला कपाशीचे एकरी १५ क्विंटलच्या पुढे उत्पादन मिळते. सोयाबीनचे एकरी १० क्विंटल, हरभऱ्याचे सहा क्विंटल आणि कांदा बियाणाचे चार क्विंटल उत्पादन मिळते. दरवर्षी पीक फेरपालट आणि अधिक उत्पादनक्षम जातींची लागवड केल्याने उत्पादकता टिकून अाहे. 

संपर्क ः विष्णू ढोरे ९६५७३०७५९४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com