महिला सन्मान, सबलीकरणातून ‘विटनेर`ने मिळविला देशात लौकिक

गावाची सत्ता महिलांकडे विटनेरमध्ये १९८९ मध्ये गावातील सर्व घरे महिलांच्या नावावर करण्यासाठी सर्वच ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. गावातील सत्तेमध्ये मोठे महिलांचे योगदान आहे. - भानुदास पाटील
विटनेर (जि. जळगाव) गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावर उभारलेली ग्रामपंचायतीची आकर्षक  इमारत.
विटनेर (जि. जळगाव) गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावर उभारलेली ग्रामपंचायतीची आकर्षक इमारत.

ग्रामपंचायतीचा कारभार महिलांकडे सोपविणारे गाव म्हणून विटनेर (ता. चोपडा, जि. जळगाव) गावाची ओळख आहे. ग्रामपंचायतीच्या ५१ वर्षांच्या इतिहासात तब्बल ३० वर्षे महिलांच्या हाती सत्ता राहिलेली आहे. १९८९ मध्ये घरे आणि शेतजमिनींवर महिलांचे नाव लावणारे गाव म्हणून विटनेरने वेगळी ओळख जपली आहे.

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुका हा शेतीप्रधान. केळी, कापूस पिकविण्यात आघाडीवर असलेला हा परिसर आहे. सातपुड्याच्या कुशीत आणि तापी, अनेर नदीकाठावर या तालुक्‍यातील अनेक गावे वसली असून, सिंचनासंबंधीच्या सुविधा पूर्वीपासून बऱ्यापैकी आहेत. तापी, अनेरकाठावरील शिवारांमध्ये काळी कसदार जमीन असल्याने पिकेही जोमदार येतात. या परिसरातील विटनेर (ता.चोपडा, जि.जळगाव) गावाने सिंचनाच्या पुरेपूर सुविधा घेत केळी, कपाशी उत्पादनात आघाडी घेतली आहे. टोलेजंग घरे, वेगवेगळ्या सुविधा पाहूनच गाव विकासाची दिशा स्पष्ट होते.   चोपडा शहरापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर हे गाव असून, तापी काठावर वसले आहे. २९ फेब्रुवारी १९५६ मध्ये विटनेर ग्रामपंचायतीची स्थापना झाली. निम्नतापी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रामध्ये या गावाचा काही भाग आहे. लोकसंख्या सुमारे २,०१८ एवढी आहे. गावाचे क्षेत्रफळ ७७ हजार ८३५ चौरस किलोमीटर एवढे असून, एकूण शेतशिवार १०६.३९ हेक्‍टर एवढे आहे. सातवीपर्यंत जिल्हा परिषदेची गावात शाळा आहे.  पुढील शिक्षणासाठी गावानजीक वाळकी (ता.चोपडा) येथे विद्यार्थी        जातात. 

ग्रामविकासाच्या दिशेने 

    विटनेर गावातील भानुदास पाटील त्यांची पत्नी इंदिराताई पाटील या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्या. शेतकरी संघटनेच्या चांदवड (जि. नाशिक) आणि हिंगोली येथे झालेल्या महिला अधिवेशनात त्यांचा सहभाग होता. या अधिवेशनात गावातील घरे, शेतजमीन घरातील कर्त्या मंडळींचा होकार असेल तर महिलांच्या नावे केली जावी, गावातील सत्ता महिलांच्या हाती असावी, गावात लक्ष्मीमुक्ती योजना राबविली जावी, असा ठराव झाला. या ठरावाची विटनेर गावात अंमलबजावणी व्हावी म्हणून अभ्यासू मंडळींनी पुढाकार घेऊन गावातील सर्व घरांच्या नमुना क्रमांक आठमध्ये महिलांची नावे समाविष्ट केली. सातबारा उताऱ्यावर आपल्या कुटुंबातील महिलांची नावे लावून शेतजमिनीही महिलांच्या मालकीच्या केल्या. यानंतर १९८९ मध्ये गावात निवडणूक न घेता महिलांना सरपंच व सदस्यपद दिले जावे, असा प्रस्ताव भानुदास पाटील व इतर ग्रामस्थांनी मांडला. त्याला पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अखेर दोन पॅनलमध्ये सरळ लढत झाली. नऊ सदस्यीय ग्रामपंचायतीत सर्व जागांवर गावाने महिलांना निवडून दिले. विशेष म्हणजे त्या वेळी महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण नव्हते. राजकारणात महिलांचा सहभाग अतिशय मर्यादित होता. त्या वेळी ही घटना घडल्याने राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज, विचारवंतांनी विटनेरचे कौतुक केले होते. यावेळी सुभाबाई दशरथ कोळी यांना सरपंचपद मिळाले. तर इंदिराताई भानुदास पाटील या उपसरपंच झाल्या.  विटनेरने लक्ष्मी मुक्ती योजनेच्या दिशेने दमदार पाऊल टाकले म्हणून शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांनी विटनेरला भेट दिली होती. गावाची महिलांच्या हाती सत्ता व मालमत्तांमध्ये वाटा देण्याच्या धाडसी निर्णयासंबंधी गावातील भानुदास पाटील यांच्यासह डी.के.चावडा, कै.दशरथ लहानू कोळी, कै.भाऊलाल वामन पाटील, पांडुरंग वामन पाटील, हरी शंकर पाटील, छगन झावरू कोळी, घनःश्‍याम पाटील यांनी मोठे काम केले होते.

निर्मल ग्राम पुरस्काराने सन्मान

गावातील ९५ टक्के अंतर्गत रस्त्यांचे कॉंक्रीटिकरण झाले आहे. तसेच काही प्रमुख शेतरस्त्यांचे खडीकरणही ग्रामपंचायतीने विविध संस्थांच्या मदतीने करून घेतले आहे. दहा लाख रुपये निधी त्यासाठी उभारण्यात ग्रामपंचायतीला यश आले. यासोबत ग्रामविकासाच्या योजना राबविण्यासंबंधी गावाचा पुढाकार असतो. गावाने स्वच्छतेवर भर दिला आहे. गावात मुख्य प्रवेशद्वारावर ग्रामपंचायतीची टुमदार इमारत असून, या इमारतीची पाहणी जिल्हा परिषदेचे अनेक सदस्य, पदाधिकारी यांनी करून आपापल्या भागातही, अशीच ग्रामपंचायतीची इमारत तयार करून घेतली आहे. गावात ब्रिटिशकालीन चावडीदेखील आहे. गावाच्या विकासात्मक उपक्रमांची दखल शासनाने घेतली असून, २००९-१० मध्ये गावाला तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला आहे.

ग्रामस्वच्छतेमध्ये बचत गटांचा सहभाग 

ग्रामस्वच्छतेसाठी महर्षी वाल्मीक मित्र मंडळ, श्रावणबाबा भजनी मंडळ हेदेखील पुढाकार घेतात. यासोबत गावात रोज सायंकाळी श्रावणबाबा मंदिर व हनुमान मंदिरात हरिपाठाचा कार्यक्रम घेतला जातो. गावात चार मंदिरे आहेत. दरवर्षी कीर्तन सप्ताहाचे आयोजन केले जाते. संत मुक्ताई महिला बचत गट व श्रावणबाबा महिला बचत गटही गावात स्थापन झाले आहेत. तालुक्याच्या राजकारणातही गावाचा दबदबा 

विटनेरने सत्तेत महिलांचा सहभाग वाढविण्याची मुहूर्तमेढ रोवल्याने या गावाला तालुक्‍याच्या राजकारणातही महत्त्वाचे स्थान आहे. नवल हरी पाटील, सदाशिव बाबूराव पाटील यांनी शेतकरी खरेदी विक्री सहकारी संघात अध्यक्ष म्हणून काम       पाहिले.  सुभाष लोटन कोळी हे पंचायत समितीचे माजी उपसभापती आहे. नंदकिशोर भानुदास पाटील हे चोपडा बाजार समितीचे उपसभापती आहे. इंदिराताई भानुदास पाटील यांनी जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्षपद, जिल्हा परिषद सदस्य ही पदे भूषविली असून, त्या चोपडा सहकारी साखर कारखान्याच्या माजी संचालिका  आहेत.

सरपंचांनी दिली गावाला दिशा 

नारायण मोतीराम पाटील हे पहिले सरपंच होते. यानंतर दामू भगा पाटील, रुपसिंग तुकडू पाटील, छगन झावरू कोळी, लोटन दयाराम कोळी, पांडुरंग वामन पाटील, नवल पाटील, रामदास पाटील, सुभाबाई दशरथ कोळी (गावाच्या पहिल्या महिला सरपंच), कांतीलाल रामचंद्र कोळी, सुभाष लोटन कोळी, इंदिराताई पाटील, पंढरीनाथ नागो कोळी, लताबाई सदाशीव पाटील, सरस्वतीबाई निंबा कोळी, प्रभाबाई भरत कोळी यांनी सरपंच पदाचा पदभार पाहिला आहे. 

विटनेरची वैशिष्ट्ये

  • महिलांचा सत्तेत सहभाग वाढविण्यासाठी ग्रामपंचायत व सोसायटीत १०० टक्के महिलाराज. 
  • केळी व कपाशीसाठी सूक्ष्मसिंचनाचा वापर.
  • तत्कालीन पंतप्रधान विश्‍वनाथ प्रतापसिंह यांच्या हस्ते गौरव, 
  • निर्मल ग्राम पुरस्कार. 
  •  ग्रामपंचायतीची इमारत मुख्य प्रवेशद्वारावर उभारण्याचा प्रयोग.
  • ग्रामपंचायत, सोसायटीत १०० टक्के महिलाराज विटनेर ग्रामपंचायतीची निवडणूक २०१६ मध्ये झाली, तेव्हा १०० टक्के महिला सदस्यांची बिनविरोध निवड झाली. प्रभाबाई भरत कोळी या सरपंच असून, शोभाबाई मनोहर पाटील या उपसरपंच आहेत. निर्मलाबाई उत्तम कोळी, संगीताबाई जगन कोळी, विद्याबाई प्रभाकर पाटील, सुरेखा प्रवीण कोळी, सरस्वतीबाई निंबा कोळी, जनाबाई बाबूलाल कोळी, यमुनाबाई रुपसिंग चौधरी या सदस्या आहेत.  विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सर्व १३ महिला सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्षपदी इंदिराताई पाटील व उपाध्यक्षपदी सुपाबाई जानकीराम पाटील आहेत. सोसायटीत प्रगतिशील शेतकरी हुकूमचंद पाटील हे सलग २५ वर्षे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. पोलिस पाटील म्हणून आनंदराव दत्तू पाटील, बाबूराव गिरधर पाटील, निंबा सुपडू पाटील, छोटू निंबा पाटील यांनी कामकाज पाहिले आहे.

    विश्‍वनाथ प्रतापसिंह यांच्या हस्ते गौरव  २८ जानेवारी १९९० मध्ये नागपुरात शेतकरी संघटनेच्या  महात्मा फुले, आंबेडकर विचार यात्रेचा समारोप होता. या कार्यक्रमाला तत्कालीन पंतप्रधान विश्‍वनाथ प्रतापसिंह, तत्कालीन केंद्रीय मंत्री रामविलास पासवान, शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी आदी दिग्गजांची उपस्थिती होती. यावेळी शेतकरी संघटनेने जाहीर केलेल्या लक्ष्मी मुक्ती योजनेची चांगली अंमलबजावणी केल्याने ज्योतिबा ग्राम पुरस्काराने विटनेर ग्रामपंचायतीचा गौरव  झाला होता. 

    ग्रामस्थांचे चांगले सहकार्य  आमच्या गावाचे नाव महिला सक्षमीकरण, सबलीकरण व ग्रामविकासाच्या मुद्यांमध्ये अग्रभागी आहे. याचा आम्हाला अभिमान असून, सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने हे शक्‍य झाले. - इंदिराताई पाटील, अध्यक्षा,  विविध कार्यकारी सहकारी सोसायटी

    शेतीविकासासाठी प्रयत्न आम्ही ग्रामपंचायतीत सर्व महिला सदस्या कार्यरत आहोत. आमचे गाव हे शेतीप्रधान आहे. शेती व गावातील शेतकरी कसा पुढे जाईल यासाठी सर्वांचे प्रयत्न असतात. - प्रभाबाई कोळी, सरपंच

    सामूहिक निर्णयातून प्रगती  गावातील प्रमुख मुद्दे म्हणजे शिक्षण व पाणी. या सुविधा गावातील सर्व ग्रामस्थांना चांगल्या रितीने कशा दिल्या जातील यासाठी सर्वांचे प्रयत्न असतात. निर्णय घेताना सर्व ग्रामस्थांचा सहभाग असतो. - शोभाबाई पाटील, उपसरपंच

    पूरक उद्योगाला चालना गावात दोन महिला बचत गट स्थापन झाले असून, उद्योग, शेतीपूरक उपक्रम कसे सुरू होतील याबाबत काम सुरू आहे. शासनाच्या मदतीने आम्ही चांगले काम करून दाखविण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. - सरस्वती कोळी, ग्रामपंचायत सदस्य 

     संपर्क ः  भानुदास पाटील, ९५४५१३३२१५  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com