मिळून साऱ्या जणींनी घेतला प्रगतीचा ध्यास

गोवर्धन (ता. जि. नाशिक) गावातील स्वस्त धान्य दुकान महिला बचत गटातील सर्व जणी एकत्र येऊन चालवीत आहेत.
गोवर्धन (ता. जि. नाशिक) गावातील स्वस्त धान्य दुकान महिला बचत गटातील सर्व जणी एकत्र येऊन चालवीत आहेत.

गोवर्धन (ता. जि. नाशिक) गावातील सौ. कांता लांबे, सौ. तारा क्षीरसागर या दोघी गृहिणी. २००५ मध्ये बचत गट प्रशिक्षणातून त्यांनी गावात महिला बचत गट स्थापन केला. मिरची ठेचा, शिलाई काम, शेतीपासून ते स्वस्त धान्य दुकानापर्यंत विविध व्यवसाय करीत त्यांनी स्वत:च्या घरासोबतच गटातील महिलांनाही प्रगतीची दिशा दाखवली. 

नाशिक शहरापासून साधारण दहा किलोमीटरवर गंगापूर धरणाच्या दिशेने गेल्यास गोवर्धन गाव लागते. या गावात पठाडे गल्लीत प्रवेश करताना श्री स्वामी समर्थ स्वयंसहाय्यता महिला बचत गटाचे स्वस्त धान्य दुकान आहे. सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत या दुकानात ग्राहकांची गर्दी असते. रेशन कार्ड नोंदणीनुसार धान्य विक्रीचे काम सौ. कांता लांबे, सौ. तारा क्षीरसागर यांच्यासह गटातील महिला करताना दिसतात. गोवर्धन गावातील हे एकमेव महिला बचत गटाचे स्वस्त धान्य दुकान. महिला बचत गटामार्फत २०११ पासून हे दुकान चालविण्यात येते. इथली व्यवस्था, सुविधा, उत्पादनांच्या गुणवत्तेमुळे ग्राहकांकडून नेहमीच या दुकानाला प्राधान्य मिळते. गटात महिलांच्या चरितार्थाला हातभार लागेल असे विविध व्यवसाय केले जातात. त्यातील रेशन दुकान हे ठळक उदाहरण. सौ. कांता दिनकर लांबे या बचत गटाच्या अध्यक्षा, तर सौ. तारा विष्णू क्षीरसागर या बचत गटाच्या उपाध्यक्षा आहेत.  सौ. कांता लांबे यांचे पती पूरक व्यवसाय करतात. कुटुंबात उत्पन्न आणि खर्चाचा मेळ बसत नव्हता. मात्र त्या काटकसरीनं संसाराचा गाडा हाकीत होत्या. दहा वर्षे गृहिणी म्हणून जबाबदारी पेलत असताना त्यांचा कोणत्याही पुरक व्यवसायाशी संबंध आलेला नव्हता. सौ. तारा क्षीरसागर यांची कहाणीदेखील कांताताईंच्या कहाणीशी मिळतीजुळती. २००५ मध्ये नाशिकच्या लोकभारती संस्थेने गिरणारे (ता. नाशिक) गावात महिलांच्या बचत गट उभारणीचे काम हाती घेतले होते. या संस्थेच्या नीलिमा साठे, विलास शिंदे यांनी महिलांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. कुणाच्या तरी आग्रहावरून कांता व तारा या प्रशिक्षणाला उपस्थित राहिल्या. प्रशिक्षणानंतर आपण महिला बचत गट केला पाहिजे, पूरक व्यवसाय केला पाहिजे, हे दोघींनी ठरवलं. 

अडचणींवर केली मात  महिला बचत गट स्थापन करता येणं हे जितकं सोपं असतं तितका तो टिकविणं सोपं नसतं. याचा अनुभव कांता, तारा यांना पदोपदी येत होता. २००५ नंतरची पहिली पाच वर्ष खडतर संघर्षाची होती. छोटे छोटे व्यवसाय सुरू करीत असताना त्यातून अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. ‘हे काम सोडून द्या'' असेही सल्ले लोक देत होते. मात्र गटातील अकराही जणींचा निर्धार पक्का होता. महिला बचत गटाला रेशन दुकान मिळविणं हे मोठं आव्हान होतं. दुकानाचा परवाना मिळविण्यासाठी दोघींनी तब्बल वर्षभर तहसील कार्यालयात हेलपाटे मारले. रेशन दुकान सुरू झाल्यानंतरही त्यातील तांत्रिक आणि व्यावहारिक बाबींची माहिती नसल्याने सुरवातीचे काही महिने अडचणीचे होते. मात्र नंतर लवकरच त्यातील बारकावे त्यांनी समजून घेतले. सामूहिक शेतीचा प्रयोग  वर्ष २०११ ते २०१४ या काळात श्री स्वामी समर्थ स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या महिलांनी गोवर्धन गावातील पडीक जमीन भाडेतत्त्वावर घेऊन पीक लागवडीस सुरवात केली. बहुतांश शेतकऱ्यांशी निम्म्या वाट्याने गटाने कांदे, गहू, भुईमूग पिकांची सामूहिक शेती केली. गटातील महिलांना शेतीतून चांगले उत्पन्न मिळू लागले होते. नंतर मात्र काही शेतकऱ्यांनी या महिलांना जमीन लागवडीसाठी न देता स्वत:च पीक लागवडीस सुरवात केली. त्यामुळे बचत गटाच्या सदस्यांनी पुन्हा दुसऱ्या व्यवसायाकडे मोर्चा वळविला. या प्रत्येक प्रयोगातून अनुभवांची शिदोरी मिळाल्याचे गटातील महिला सांगतात. साबूदाणा वडा विक्रीतून झाली सुरवात  गोवर्धन गावालगत सोमेश्‍वर हे तीर्थक्षेत्र आहे. दर महाशिवरात्रीला इथे मोठी जत्रा भरते. कांताताईंनी जत्रेमध्ये बचत गटाचा साबूदाणा वडा विक्रीचा स्टॉल सुरू करण्याचा प्रस्ताव सर्वांसमोर मांडला. सर्व जणींनी यास लगेच होकार दिला. एका दिवसासाठी पाच हजार रुपये खर्च आला. दिवसअखेर हिशेब केल्यानंतर खर्च वजा जाता निव्वळ पाच हजार रुपये नफा साबूदाणा वडा विक्रीतून मिळाला. हा नफा सर्वजणींनी वाटून घेतला. हा पहिला अनुभव उत्साह वाढविणारा ठरला. त्यानंतर प्रत्येक महाशिवरात्रीला गटातर्फे साबूदाणा वड्याचा स्टॉल उभारला जातो. या शिवाय नाशिक शहरातील शासकीय, खासगी प्रदर्शने, धान्य बाजार या ठिकाणी स्टॉल उभारला जातो. गटातील सर्व सदस्य त्यात हिरिरीने जबाबदारी उचलतात.  ‘सकाळ ॲग्रोवन' च्या पुढाकाराने २००९ मध्ये ‘थेट धान्य व भाजीपाला बाजार' भरविण्यात आला होता. यामध्ये बचत गटाच्या महिलांनी मिरची ठेचा, बाजरीची भाकरी, पिठलं हा मेनू ठेवला. दगडी चुलीवर केलेल्या या पदार्थांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. खर्चाच्या तुलनेत चांगले उत्पन्न मिळाले, या अनुभवाने गटाचा उत्साह वाढला.

गटाच्या व्यवसायाला आधार  महिला बचत गटाच्या अकरा महिला एकत्र येऊन खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्याचा व्यवसाय करीत असल्या तरी प्रत्येकीचे स्वत:चे शिलाई मशिन, गिरणी, शेती आदी व्यवसाय आहेत. त्यासाठी त्या गरजेप्रमाणे बचत गटाकडूनच कर्ज घेतात आणि वेळेवर फेडतात. गटाच्या पतपुरवठ्यामुळे सुशीला कोंडाजी गांगुर्डे यांनी पतीच्या रिक्षा व्यवसायाला मदत केली. सिंधू सुरेश चहाळे यांनी शेतीसाठी आठ किलो मीटर अंतरावर पाइपलाइन केली. या पाइपलाइनच्या खर्चासाठी गटाकडून अर्थसाहाय्य मिळाले. संगीता बाळू करंजकर यांचा टेलरिंग व्यवसाय गटाच्या मदतीमुळेच  वाढला.

बचत गटामध्ये  आर्थिक शिस्त   सन २००५ मध्ये महिलांना एकत्र करीत कांता व तारा यांनी श्री स्वामी समर्थ स्वयंसहाय्यता महिला बचत गटाची स्थापना केली. गटातील महिला शेतमजुरी करीत होत्या. दरमहा १०० रुपये निधी जमा करायचं ठरलं. हा नियम मागील बारा वर्षांपासून सुरू आहे. आतापर्यंत बचत गटाने दोन लाख रुपयांची मुदत ठेव जमा केली आहे. महिलांना व्यवसायातील खेळत्या भांडवलासाठी एक लाख रुपये कर्ज दिले आहे. गटाची सेंट्रल बॅंकेत चांगली पत तयार झाली आहे. या बॅंकेकडून बचत गटाने २०१२ मध्ये ३ लाख ३० हजार रुपयांचे कर्ज घेतले. या कर्जाला पाच वर्षाची मुदत असताना गटाने हे कर्ज अवघ्या अडीच वर्षात सव्याज फेडले. ‘थेंबे थेंबे तळे साचे' ही उक्ती आर्थिक शिस्तीच्या जोरावर या महिलांनी प्रत्यक्षात उतरवली आहे.

डॉ. स्वामिनाथन यांच्याकडून गौरव  डॉ. एम. एस. स्वामिनाथन फाउंडेशनतर्फे नुकताच देशभरात विविध क्षेत्रांत उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा चेन्नई येथे जाहीर कार्यक्रमात सत्कार झाला. यावेळी श्री स्वामी समर्थ स्वयंसहाय्यता महिला बचत गटातील सदस्यांचा गौरव करण्यात आला. ग्रामीण भागातील महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहत असताना त्या समाजविकासाचेही कार्य करीत आहेत, असे गौरवोदगार डॉ. स्वामिनाथन यांनी या महिलांच्या योगदानाविषयी काढले. डॉ. स्वामिनाथन यांच्याकडून मिळालेला सन्मान हा अविस्मरणीय असल्याचे कांताताई सांगतात. या शिवाय कृषी विभाग तसेच विविध संस्थांनी पुरस्कार देऊन बचत गटाला गौरविले आहे.

कृषी विज्ञान केंद्रातून मिळाले प्रशिक्षण  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कृषी विज्ञान केंद्र हे गोवर्धन गावशिवारातच आहे. केंद्राचे प्रमुख रावसाहेब पाटील, विशेषज्ञ अर्चना देशमुख यांनी या महिलांना सोयाबीन पासून होणारे खाद्यपदार्थ, आवळा कॅन्डी, आंबा ज्यूस उत्पादनाबाबत प्रशिक्षण दिले आहे. गटातील महिला आता विविध प्रक्रिया उत्पादने करून त्याची स्टॉलद्वारे विक्री करतात. नगरसेवक दिनकर पाटील, गोवर्धनचे माजी सरपंच पी. के. जाधव यांनी बचत गटाच्या महिलांना प्रत्येक टप्प्यावर मोलाचे सहकार्य केले आहे. 

संपर्क ः  सौ. कांता लांबे, ९६२३२८६६६५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com