जनावरांच्या चांगल्या अारोग्यासाठी मुक्त संचार गोठा

मुक्त संचार गोठ्याची रचना
मुक्त संचार गोठ्याची रचना

मुक्त संचार गोठा तयार करताना योग्य निवारा, कायमस्वरुपी पाण्याची उपलब्धता अाणि चारा खाण्यासाठी गव्हाण अावश्यक अाहे. जनावराला रवंथ करण्यासाठी गोठ्यात अारामदायी परिस्थिती असावी, यामुळे खाद्याचे चांगले पचन होऊन दूध उत्पादनात वाढ होते. 

बंदिस्त गोठा पद्धतीमध्ये जनावरे रात्रंदिवस गोठ्यामध्ये एकाच जागेवर बंदिस्त ठेवली जातात. चारा, पाणी, औषधोपचार गोठ्यात केला जातो. बंदिस्त गोठे बांधण्याकरिता मोठ्या प्रमाणात भांडवल आवश्यक असते. गोठा व्यवस्थापन, औषधोपचार व मजूर यावर जास्त खर्च होतो. बंदिस्त गोठ्यामुळे उद्‌भवणाऱ्या समस्या टाळण्याकरिता मुक्त हवेशीर गोठे हा चांगला पर्याय आहे.

मुक्त संचार गोठ्याची उभारणी

  • जमिनीच्या पातळीपासून थोडासा (०.३-०-५ मीटर) उंचवटा आणि पुरेसा आडोसा तयार करून जनावरांना निवाऱ्याची सोय करावी. त्याच्या बाहेरील (लांबीला समांतर) १/३ भाग छताने झाकलेला आणि मध्यभागी २/३ भाग उघडा ठेवला जातो. थंडी, सूर्यप्रकाश, पाऊस व वाऱ्यापासून संरक्षण होण्यासाठी जनावरे छताने झाकलेल्या भागाखाली येऊन थांबतात. इतर वेळी जनावरे मोकळ्या जागेवर विश्रांती घेतात.
  • लांबीला समांतर, बाहेरील दोन्ही बाजूला छताखाली चारा टाकण्यासाठी जागा व गव्हाण करावी. रुंदीला समांतर दोन्ही बाजूंनी छताखाली निम्म्या उंचीची भिंत (१.५ मीटर उंच) लोखंडी पाइप किंवा तारेच्या सहाय्याने कुंपण करावे. अशा गोठ्यात जनावरे दोर, साखळीने बांधली जात नाहीत. रात्रंदिवस मुक्त असतात. पाणी पिणे आणि क्षार चाटण्याची गोठ्यामध्ये वेगळी सोय केलेली असते. दोहनगृहामध्ये गाई, म्हशींचे दूध काढले जाते.
  • गोठ्यांची रचना 

  • जनावरांच्या गोठ्याची लांबी, रुंदी पूर्व-पश्चिम असावी. त्यामुळे गोठ्यात सतत दिवसभर सावली रहाते. परंतु, पश्चिम बाजूला उंच झाडे असतील तर लांबीची दिशा दक्षिण-उत्तर ठेवण्यास हरकत नाही. गोठ्याच्या लांबी रुंदीचे प्रमाण ३ः२ किंवा ५ः४ असे असावे.
  • गोठ्यामध्ये जनावरांना उभे राहण्यासाठी लागणाऱ्या जागेपेक्षा हालचाल करण्यासाठी दुप्पट जागा लागते. शिंगाचा आकार पसरट असल्यामुळे गोठ्यात प्रत्येक गायीपेक्षा (४० चौ. फूट/३-५ चौ. मीटर किंवा १.५ x १.०७ मीटर) म्हशीला (४५ चौ. फूट/४ चौ. मीटर किंवा १.७ x १.३ मीटर) अधिक जागा लागते. उघडी जागा त्यापेक्षा दुप्पट लागते. परंतु, मुक्त व्यवस्थापनामध्ये गायी, म्हशी दिवसभर चरावयास जात असतील तर मुक्त हवेशीर गोठ्यातील मोकळ्या जागेची आवश्यकता भासत नाही. परंतु, बंदिस्त व्यवस्थापनामध्ये २० x ३० मीटर आकाराचा दुतर्फी 
  • गोठा ४० म्हशी किंवा ५० गायींना पुरेसा होतो.
  • गोठ्यातील जमीन टणक, सपाट, खडबडीत स्वच्छता करण्यास सुलभ असावी. मुरुम भाजलेल्या विटा किंवा विटांचा चुरा बसवून तयार केलेली असावी. जमीन गुळगुळीत, निसरडी नसावी. दगडी शहाबादी फरशीचा वापर करू नये. सिमेंट कोबा केल्यास आडव्या उभ्या (४-५ मि.मी.) खोल रेषा माराव्यात. मुरुम टाकून तयार केलेली तळजमीन उष्णतेची मंदवाहक आहे, ही जमीन पाणी देखील शोषून घेते.
  • मुक्त हवेशीर गोठ्यामध्ये लांबीला समांतर प्रत्येक तीन मीटर अंतरावर उभे लोखंडी पाईप, लाकडी खांब (१० सें. मी. व्यास) किंवा विटांचे बांधकाम (३०x३० सें. मी.) सिमेंट कॉंक्रीटचे खांब व खांबावर लोखंडी ॲंगलचा आधार द्यावा. लोखंडी ॲंगलवर नटबोल्टच्या सहाय्याने छत बसवावे.
  • छत सर्व हंगामात आरामदायक व आर्थिक दृष्टीने परवडण्यासारखे ठरते. छताची उंची आतल्या बाजूला तीन मीटर व बाहेरच्या (गव्हाणीची बाजू) बाजूला दोन मीटर ठेवावी. छताला २५ ते ३५ अंशाचा बाहेरच्या बाजूला उतार द्यावा. त्यामुळे पावसाचे पाणी गोठ्यात किंवा गव्हाणीत येणार नाही. पत्र्याचे छत असल्यास पत्र्याच्या आतील बाजूस काळा रंग लावावा किंवा बारदान, ताडपत्रीचे अस्तर लावावे. त्यामुळे उन्हाळ्यात उष्णतेपासून संरक्षण होते. उन्हाळ्यात छतावर वाळलेली वैरण पसरावी. पाण्याचे फवारे मारावेत किंवा पांढरा रंग लावावा. त्यामुळे सूर्यकिरण परावर्तित होऊन पत्र्याचे छत गरम होणार नाही.
  • गव्हाण लांबीला समांतर बाहेरच्या बाजूला असावी. गव्हाणीची उंची ०.६ मीटर, रुंदी ०.७५ मीटर व खोली ०.५ मीटर ठेवावी.
  • गव्हाणीच्या बाहेरील बाजूस लांबीला समांतर ०.७५ ते १.० मीटर रुंद छताने झाकलेली जागा चारा टाकण्याची असावी.
  • गोठ्याच्या लांबीला समांतर, जनावरांच्या मागच्या बाजूला ०.३ मीटर रुंद व ५ ते १० सें. मी. खोल गटार बांधावे. गटाराला २.५ ते ३ टक्के उतार द्यावा.
  • संपर्क -  डॉ. गणेश गादेगांवकर : ९८६९१५८७६० (पशुपोषणशास्र विभाग, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com