केळी पीक सल्ला

केळी पीक सल्ला
केळी पीक सल्ला

सद्यस्थितीत राज्यात सर्वत्र कोरडे व उष्ण हवामान आहे. काही भागामध्ये ढगाळ वातावरण आहे. केळी पिकावर कीड, रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यासाठी हे अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बागेचे योग्य व्यवस्थापन करावे. 

मृगबाग लागवड : 

  • मृगबाग लागवडीची केळी सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. रोपे लहान असल्यामुळे त्यांच्यावर कीड- रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे प्रादुर्भाव लक्षात घेऊन नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.   
  • बागेमध्ये उभी - आडवी वखरणी करून बाग तणमुक्त ठेवावी. झाडालगतचे गवत काढून घ्यावे. 
  • पावसामुळे बांधावर वाढलेली विशेषतः वेलवर्गीय तणे उपटून त्यांचा नायनाट करावा. पुढील काळात होणारा विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव त्यामुळे टाळता येईल. 
  • ठिबक संचाची तपासणी करून तो व्यवस्थित अंथरून घेऊन पाणी द्यावे.
  • लागवडीनंतर १२० दिवसांनी द्यावयाची रासायनिक खत मात्रा युरिया ८२ ग्रॅम प्रतिझाड बांगडी पद्धतीने द्यावी. खते दिल्यानंतर लगेच ठिबकने हलके पाणी द्यावे.
  • ठिबक संचाद्वारे विद्राव्य खते द्यावयाची झाल्यास १९ः१९ः१९ हे विद्राव्य खत ७५ किलो व युरिया १५० किलो प्रतिएकर याप्रमाणे ७१ ते १४६ दिवसांदरम्यान टप्प्याटप्प्याने द्यावे. सोबत कॅल्शियम नायट्रेट १० किलो प्रतिएकरी ५ किलो अशी मात्रा दोन वेळा द्यावी. 
  • बागेचे वेळोवेळी निरीक्षण करून रोगग्रस्त विषाणूजन्य झाडे मुळासकट उपटून टाकावीत. त्यांची बागेबाहेर विल्हेवाट लावावी.
  • करपा रोगाच्या नियंत्रणासाठी प्रोपीकोनॅझॉल (२५ इ.सी.) १ मि.लि. किंवा कार्बेन्डाझिम(५० डब्ल्यु.पी.) १ ग्रॅम अधिक स्टीकर १ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणात संपुर्ण बागेवर फवारणी करावी. 
  • बागेच्या चारी बाजूंनी गजराज गवत, शेवरी या वनस्पतींची दाट लागवड करावी. त्यामुळे बागेचे थंड तसेच उष्ण वाऱ्यापासून संरक्षण होते. 
  • सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे शेतात अतिरिक्त पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे रोपांची मर झाली असल्यास त्वरित नांगे भरून घ्यावेत. तसेच अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. 
  • कांदेबाग लागवड : 

  • कांदेबाग लागवडीची केळी सध्या फण्यांच्या तसेच फळांच्या वाढीच्या अवस्थेत आहे. त्यामुळे योग्य खत-पाणी नियोजन व घड पोषण या बाबींवर भर द्यावा. 
  • बागेतील पिवळी, रोगग्रस्त, वाळलेली पाने तसेच नरफूले कापून टाकावीत. बागेबाहेर खोदलेल्या खड्ड्यांमध्ये त्यांची विल्हेवाट लावावी. बाग कायम स्वच्छ ठेवावी. 
  • केळी घड ६ टक्के सच्छिद्र असलेल्या अर्धपारदर्शक निळ्या रंगाच्या स्कर्टिंग बॅगने झाकून घ्यावा. केळी फळांची गुणवत्ता वाढण्यास त्यामुळे मदत होते.
  • लागवडीस ३०० दिवस पूर्ण झाले असतील तर प्रतिझाड युरिया ३६ ग्रॅम, म्युरेट ऑफ पोटॅश ८३ ग्रॅम अशी खतमात्रा द्यावी. खते देताना बांगडी पद्धतीने देऊन ती लगेच मातीआड करावीत. 
  • बहुतांश शेतकरी बागेस ठिबकद्वारे विद्राव्य खते देतात. त्यासाठी ०ः०ः५० हे विद्राव्य खत ७५ किलो प्रतिएकर याप्रमाणे २७३ ते ३०६ दिवसांदरम्यान टप्प्याटप्प्याने द्यावे. 
  • घडाच्या पोषणासाठी पोटॅशियम डाय हायड्रोजन फॉस्फेट ५ ग्रॅम अधिक युरिया १० ग्रॅम अधिक स्टीकर १ मि.लि. या प्रमाणात संपूर्ण घडावर फवारणी करावी. घडाच्या वजनात त्यामुळे वाढ होते. तसेच घडातील केळी फळाला आकर्षक रंग प्राप्त होतो. फळाला बाजारात चांगला भाव मिळतो.
  • संपर्क :  आर. व्ही. देशमुख, ९४२१५६८६७४ (केळी संशोधन केंद्र, नांदेड)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com