वांगी लागवड तंत्रज्ञान
वांगी लागवड तंत्रज्ञान

वांगी लागवड तंत्रज्ञान

वांगी पिकाबाबत महत्त्वाचे : 

  • वांग्यामध्ये खनिजे तसेच अ, ब, क ही जीवनसत्वे, लोह व प्रथिने यांचे प्रमाण पुरेसे आहे.
  • वांग्याचे मूळस्थान भारत असून, बहुतेक सर्व राज्यांत त्याची लागवड केली जाते.
  • भारतात सन २००७- ०८ या वर्षात वांगी पिकाखाली सुमारे ५.६६ लाख हेक्‍टर क्षेत्र तर उत्पादन ९५९५.८ मे. टन तर उत्पादकता १६.९ टन प्रति हेक्‍टर होती. भारतात प्रामुख्याने पश्‍चिम बंगाल, ओरिसा, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश व अन्य राज्यांत वांग्याची लागवड केली जाते. महाराष्ट्रात या पिकाखाली सुमारे २९ हजार ४०० हेक्‍टर क्षेत्र असून, उत्पादन ४७९.२ मे. टन व उत्पादकता १६.३ प्रतिहेक्‍टर आहे. 
  • महाराष्ट्रात विविध भागांत आवडीनुसार वांग्याच्या विविध जाती आहेत. सांगली, सातारा भागात कृष्णाकाठची चविष्ट वांगी प्रसिद्ध आहेत. अहमदनगर, पुणे व सोलापूर भागात काटेरी किंवा डोरली वांगी जास्त पसंत केली जातात. खानदेशात भरताची वांगी हा प्रकार अधिक लोकप्रिय असून विदर्भात कमी काटे असलेली वांगीच सर्वांना आवडतात. 
  • जातींची निवड करताना :   प्रामुख्याने त्या त्या परिसरातील ग्राहकांची मागणी असणारा तसेच बाजारपेठेत हमखास चांगला भाव मिळणारा वाण निवडणे गरजेचे असते. हा वाण भरपूर उत्पादन देणारा, रोग-कीड यांना कमी प्रमाणात बळी पडणारा, तेथील हवामानाशी मिळते-जुळते घेणारा असावा. लागवड करताना प्रामुख्याने सुधारित व संकरित जातीची निवड, रोपवाटिका व्यवस्थापन, लागवड पद्धत, खत व पाणी व्यवस्थापन व पीकसंरक्षण या बाबी महत्त्वाच्या आहेत. 

    जाती : 

  • मांजरी गोटा - फळ मध्यम ते मोठ्या आकाराचे, गोल, जांभळट गुलाबी रंगाचे. त्यावर पांढरे पट्टे असतात. फळांच्या देठावर काटे असतात. ही जात चवीला रूचकर असून फळे चार ते पाच दिवस टिकू शकतात. सरासरी उत्पादन हेक्‍टरी २५० ते ३०० क्विंटल मिळू शकते.
  • कृष्णा - संकरित जात असून झाडे काटक असतात. फळांचा आकार अंडाकृती, रंग आकर्षक जांभळा असून त्यावर पांढरे पट्टे असतात. फळांच्या देठावर व पानांवर काटे असतात. सरासरी ४०० ते ४५० क्विंटल प्रतिहेक्‍टरी उत्पादन मिळते.
  • फुले हरित - फळे मोठ्या आकाराची. ही जात भरीत करण्यासाठी चांगली आहे. फळांचा रंग फिकट हिरवा व टोकाकडे पांढरे पट्टे असतात. खरीप हंगामासाठी चांगली जात. सरासरी २०० ते ४८० क्विंटल प्रतिहेक्‍टरी उत्पादनक्षमता. 
  • फुले अर्जुन - संकरित जात. फळे मध्यम आकाराची. फळांचा रंग हिरवा. त्यावर जांभळे व पांढरे पट्टे असतात. फळांचा आकार गोलाकार व थोडासा लांब. देठावर भरपूर काटे. ही जात खरीप व उन्हाळी हंगामासाठी उपयुक्त आहे. उत्पादन ४५० क्विंटल प्रतिहेक्‍टरी मिळू शकते. याशिवाय अन्य संस्था व खासगी कंपन्यांनी जाती विकसित केल्या आहेत. 
  • हवामान :  या पिकाला कोरडे आणि थंड हवामान चांगले मानवते. ढगाळ हवा आणि एकसारखा पडणारा पाऊस पिकाला अनुकूल नाही. अशा हवामानात कीडी-रोगांचा फारच उपद्रव होतो. सरासरी १३ ते २१ अंश सेल्सियस तापमानात हे पीक चांगले येते. महाराष्ट्रातील हवामानात जवळपास वर्षभर वांग्याचे पीक घेता येऊ शकते. जमीन :  चांगला निचरा असलेली मध्यम काळी कसदार जमीन या पिकासाठी उत्तम समजली जाते. नदीकाठच्या गाळवट जमिनीत वांग्याचे भरपूर उत्पादन येते, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

    लागवडीचा हंगाम :  महाराष्ट्रातील हवामानात तिन्ही हंगामात लागवड करता येते. खरीप हंगामासाठी पेरणी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात आणि रोपांची लागवड जुलै-ऑगस्टमध्ये केली जाते. रब्बी किंवा हिवाळी हंगामात पेरणी सप्टेंबरअखेर करतात आणि रोपे ऑक्‍टोबर- नोव्हेंबरमध्ये लावतात. उन्हाळी हंगामासाठी बी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात पेरून रोपांची लागवड फेब्रुवारीत केली जाते.

    बियाणे प्रमाण : कमी वाढणाऱ्या जातीसाठी हेक्‍टरी ४०० ते ५०० ग्रॅम बी पुरेसे होते. जास्त वाढणाऱ्या किंवा संकरित जातीसाठी हेक्‍टरी १२० ते १५० ग्रॅम बी पुरेसे होते. पेरणीपूर्वी बियाण्यास प्रति किलो ३ ग्रॅम थायरम चोळावे.

    रोपवाटिका  : 

  • वांग्याची रोपे तयार करण्यासाठी गादीवाफे साधारणतः ३ बाय २ मीटर आकाराचे करून गादी एक मीटर रुंद व १५ सेंमी उंच करावी. प्रति वाफ्यात चांगले कुजलेले शेणखत दोन पाट्या टाकावे व २०० ग्रॅम संयुक्त रासायनिक खत द्यावे. खत व माती यांचे मिश्रण करून गादीवाफ्यात समप्रमाणात पाणी मिळेल असे पाहावे. प्रति वाफ्यात मर रोगाच्या नियंत्रणासाठी ३० ते ४० ग्रॅम कॉपर ऑक्‍सिक्‍लोराइड वापरावे.
  • वाफ्याच्या रुंदीस समांतर १० सेंमी अंतरावर खुरप्याने १ ते २ सेंमी खोलीच्या ओळी करून त्यात पातळ बी पेरावे. सुरवातीस वाफ्यांना झारीने पाणी द्यावे. त्यानंतर पाटाने पाणी द्यावे. रोपाच्या जोमदार वाढीसाठी उगवणीनंतर १० ते १५ दिवसांनी प्रत्येक वाफ्यास ५० ग्रॅम युरिया आणि १५ ते २० ग्रॅम फोरेट दोन ओळींमध्ये काकरी पाहून द्यावे. त्यानंतर हलके पाणी द्यावे. किडी- रोगांच्या नियंत्रणासाठी १० दिवसांच्या अंतराने शिफारसीनुसार कीडनाशकांची फवारणी करावी.
  • लागवडीपूर्वी रोपांना थोडा पाण्याचा ताण द्यावा म्हणजे रोप कणखर होईल. लागवड करण्याआधी एक दिवस रोपांना पाणी द्यावे. रोप लागवडीसाठी ५ ते ६ आठवड्यांत तयार होते. रोपे १२ ते १५ सेंमी उंचीची झाल्यावर लागवड करावी.
  • रोपांची लागवड : लागवडीपूर्वी जमिनीची नांगरट करून चांगली मशागत करावी व शेणखत मिसळावे. जमिनीच्या मगदुराप्रमाणे योग्य अंतरावर सऱ्या वरंबे पाडावेत. हलक्‍या जमिनीत ७५ बाय ७५ सेंमी लागवडीचे अंतर तर जास्त वाढणाऱ्या किंवा संकरित जातींसाठी ९० बाय ९० सेंमी अंतर ठेवावे. मध्यम किंवा काळ्या कसदार जमिनीत कमी वाढणाऱ्या जातींसाठी ९० बाय ७५ सेंमी व जास्त वाढणाऱ्या जातींसाठी १०० बाय ९० सेमी अंतर ठेवावे.

    खत व्यवस्थापन :

  • जमिनीच्या मगदुराप्रमाणे खतमात्रांचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते. मध्यम काळ्या जमिनीसाठी हेक्‍टरी १५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश द्यावे. संपूर्ण स्फुरद व पालाश व अर्धे नत्र लागवडीच्या वेळी द्यावे. उरलेले अर्धे नत्र लागवडीनंतर तीन समान हप्त्यांत विभागून द्यावे.
  • पहिला हप्ता लागवडीनंतर एक महिन्याने, दुसरा हप्ता त्यानंतर एक महिन्याने आणि तिसरा शेवटचा हप्ता लागवडीनंतर तीन ते साडेतीन महिन्यांनी द्यावा. खतांची मात्रा दिल्यानंतर लगेच पाणी द्यावे.
  • आंतरमशागत : 

    खुरपणी करून पिकातील तण काढून टाकावे. लागवडीनंतर ३० ते ४० दिवसांनी रोपांना मातीची भर द्यावी. वेळोवेळी खुरपणी करावी. पाणी नियोजन जमीन व हवामानानुसार करावे. खरिपातील पिकास १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. रब्बी आणि उन्हाळी पिकांस रोपलावणीनंतर त्वरित पाणी द्यावे. दुसरे पाणी ३ ते ४ दिवसांनी द्यावे. हिवाळ्यात आठ दिवसांच्या अंतराने आणि उन्हाळ्यात ५ ते ६ दिवसांनी पाणी द्यावे. फुले येण्याचा काळ व फळे पोसण्याच्या काळात पाण्याचा ताण देऊ नये. वेळच्या वेळी पिकास गरजेनुसार पाणी द्यावे. 

    संजीवकांचा वापर :  संजीवकांचा वापर करून फळधारणा वाढविण्यासाठी २, ४- डी आणि एनएए (नॅप्थिल ॲसिटीक ॲसिड) ही दोन संजीवके उपयुक्त आढळली आहेत. वांग्याचे बी २, ४- डी च्या पाच पीपीएम द्रावणात २४ तास भिजवून मगच पेरावे. किंवा २, ४- डी चे दोन पीपीएम द्रावण फुले येणे सुरू झाल्यावर ६० ते ७० दिवसांपर्यंत एक आठवड्याच्या अंतराने संपूर्ण झाडावर फवारावे. 

    पीक संरक्षण : 

    किडी :  तुडतुडे, मावा, पांढरीमाशी, कोळी, शेंडा व फळे पोखरणारी अळी आदी. रोग : विषाणुजन्य रोग किंवा पर्णगुच्छ, मर आदी.  काही लक्षणेः तुडतुडे पानातील रस शोषून घेतात. त्यामुळे पाने वाकडी होतात. हे कीटक पर्णगुच्छ या विषाणुजन्य रोगाचा प्रसार करतात. मावा किडीमुळे पाने पिवळी पडतात व चिकट होऊन काळी पडतात. लाल कोळी या किडीमुळे पाने पांढरट पडतात. तसेच पानावर जाळे तयार होते आणि झाडाची वाढ खुंटते. 

    एकात्मिक कीड नियंत्रण : 

  • लागवडीपूर्वी शेताची खोल नांगरट करावी. ज्या शेतात अगोदर टोमॅटो, मिरची, भेंडी, वेलवर्गीय भाज्या या पिकांची लागवड केली असल्यास तेथे वांगी पिकाची लागवड करू नये. कारण या शेतात सूत्रकृमीची वाढ झालेली असू शकते. 
  • रोपासाठी तयार केलेल्या वाफ्यात फोरेट १० ग्रॅम टाकावे. (१ बाय १ मीटर वाफा). तसेच रोपांवर डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) १० मिली किंवा कॉर्बोसल्फान १० मिली प्रति १० लिटर पाण्यातून वापरावे.
  • पुनर्लागवड करण्याआधी रोपे इमिडाक्‍लोप्रीड १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून तीन तास बुडवून ठेवावीत व नंतर लावावीत.
  • लागवडीनंतर ४५ दिवसांनी तुडतुडे, मावा, पांढरी माशी या किडी आढळल्यास डायमिथोएट १० मिली किंवा डेल्टामेथ्रीन अधिक ट्रायझोफॉस हे संयुक्त कीटकनाशक १० मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे.
  • लागवडीनंतर दोन महिन्यांनी किडलेले शेंडे व फळे आढळल्यास ती गोळा करून नष्ट करावीत. तसेच चार टक्के निंबोळी अर्क किंवा सायपरमेथ्रिन (२५ टक्के प्रवाही) ५ मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे. 
  • वांगी पिकावर कोळी आढळल्यास पाण्यात मिसळणारे गंधक ३० ग्रॅम किंवा डायकोफॉल २० मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे.
  • काही महत्त्वाच्या किडी :

  • वांग्यावर विशेषतः शेंडा व फळे पोखरणारी अळी जास्त प्रमाणात दिसून येते. अळी प्रथमतः झाडावर फळे नसताना कोवळ्या शेंड्यात शिरून आतील भाग खाते. त्यामुळे शेंडे वाळतात. फळे लागल्यावर त्यात शिरून आतील भाग खाते. अशा फळांना बाजारात किंमत मिळत नाही. या किडीमुळे फळांचे ४० ते ५० टक्के नुकसान होऊ शकते. जून ते सप्टेंबर या कालावधीत किडीचे प्रमाण ५० ते ७० टक्के असू शकते. 
  • वांग्यावरील पर्णगुच्छ रोगामुळे पानाची वाढ खुंटते. ती लहान आणि स्थानिक भाषेत बोकडल्यासारखी दिसतात. हा रोग अतिसूक्ष्म अशा सूक्ष्मजीवामुळे (मायकोप्लाझ्मा) होतो. त्याचा प्रसार तुडतुड्यांमुळे होतो. काही वेळा विशेषतः पावसाळी हंगामात हा रोग नुकसानकारक ठरतो. 
  • विशेष नियोजन : 

  • रोपवाटिकेतच रोपांची काळजी घ्यावी. तसेच तुडतुड्यांचे नियंत्रण करावे म्हणजे या रोगाचा प्रसार होणार नाही.
  • कार्बारिल (५० टक्के) ३० ग्रॅम आणि १० ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
  • १० ते १५ दिवसांच्या अंतराने गरजेनुसार व सल्ल्याने पुढील फवारण्या घ्याव्यात. 
  • रोगट झाडे दिसताच ती उपटून नष्ट करावीत. 
  • सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी झेंडू, कांदा अशा प्रतिकारक पिकांची फेरपालट करावी. उन्हाळ्यात दोन- तीन वेळा जमिनीची नांगरट करून जमीन तापू द्यावी. तसेच रोगप्रतिकारक जातींची लागवड करावी. 
  • मर रोग जमिनीतील फ्युजारीयम बुरशीमुळे होतो. झाडाची खालची पाने पिवळी पडून गळून जातात व रोगट झाडांची वाढ खुंटते. हा रोग जमिनीतील बुरशीपासून होत असल्यामुळे पीक फेरपालट करणे, निरोगी झाडांचे बी वापरणे तसेच कॉपर ऑक्‍सी क्‍लोराइडसारख्या बुरशीनाशकाचे ड्रेचींग करणे यासारखे उपाय योजावेत.
  • काढणी :  योग्य बाजारभाव मिळण्यासाठी फळांची तोडणी योग्य वेळी होणे आवश्‍यक आहे. फळे पूर्ण वाढून त्यांना आकर्षक रंग आल्यावर काढणी करावी. फार कोवळी फळे काढल्यास उत्पादनात घट येते आणि जून झालेली फळे ग्राहकांच्या पसंतीस उतरत नाहीत. चार ते पाच दिवसांच्या अंतराने तोडणी करावी. किडलेली वांगी बाजूला काढावीत. वांग्याचा आकार आणि रंगानुसार प्रतवारी करावी. तोडणीनंतर फळे बाजारात पोहचेपर्यंत त्यांचा चमकदारपणा टिकून राहील अशा पद्धतीने पॅकिंग करावे. 

    उत्पादन : जातीपरत्वे सरासरी उत्पादन हेक्‍टरी २०० ते ३०० क्विंटलपर्यंत मिळू शकते. काही संकरित जातींचे ४०० ते ५०० क्विंटलपर्यंतही उत्पादन मिळू शकते. दर्जेदार आणि अधिक उत्पादनासाठी रोपवाटिका ते काढणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर व्यवस्थित काळजी घेतल्यास खात्रीशीर उत्पादन मिळू शकते.

    साठवणूक :  सर्वसाधारण तापमानात हिवाळ्यात काढलेली फळे तीन-चार दिवस चांगली राहू शकतात. मात्र उन्हाळ्यात एक-दोन दिवसांपेक्षा ती जास्त चांगली राहू शकत नाहीत. शीतगृहात ७.२ ते १० अंश सेल्सियस तापमान आणि ८५ ते ९५ टक्के आर्द्रता असल्यास वांगी एक आठवडाभर चांगल्या स्थितीत साठवून ठेवता येतात.

    - डॉ. कैलास शिंदे,  डॉ. मधुकर भालेकर, डॉ. भरत पाटील  संपर्क : ०२४२६- २४३३४२  (लेखक अखिल भारतीय समन्वित भाजीपाला सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर येथे कार्यरत आहेत.) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com