Agriculture stories in Marathi, crop protection on sugarcane , AGROWON, Maharashtra | Agrowon

उस पिकावरील कीड - रोगांचे नियंत्रण
सुरज नलावडे, देवेंद्र इंडी, मंगेश बडगुजर
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

कीड नियंत्रण : 
खोड कीड :

 • किडीचा प्रादुर्भाव ऊस लावणीपासून ते मोठ्या बांधणीपर्यंत दिसून येतो.
 • हलकी जमीन, कमी पाणी व जास्त तापमान यामुळे किडीचा प्रादुर्भाव वाढतो. वाळलेल्या पोंग्यावरून, तसेच बुडख्याजवळ असलेल्या लहान लहान छिद्रांवरून ही कीड ताबडतोब ओळखता येते.

कांडी कीड :

कीड नियंत्रण : 
खोड कीड :

 • किडीचा प्रादुर्भाव ऊस लावणीपासून ते मोठ्या बांधणीपर्यंत दिसून येतो.
 • हलकी जमीन, कमी पाणी व जास्त तापमान यामुळे किडीचा प्रादुर्भाव वाढतो. वाळलेल्या पोंग्यावरून, तसेच बुडख्याजवळ असलेल्या लहान लहान छिद्रांवरून ही कीड ताबडतोब ओळखता येते.

कांडी कीड :

 • किडीचा प्रादुर्भाव मे ते सप्टेंबर या कालावधीत जास्त आढळतो. 
 • जास्त तापमान, कमी आर्द्रता आणि कमी पाऊस यामुळे किडीचा प्रादुर्भाव वाढतो.
 • उसाची वाढ कमी होते, कांड्या लहान राहतात, पांगशा फुटतात, पाचट काढले असता त्यात किडीची विष्ठा व भुसा आढळून येतो.

शेंडे कीड :

 • किडीचा प्रादुर्भाव उसाच्या उगवतीपासून तोडणीपर्यंत दिसून येतो. 
 • ऑक्‍टोबर महिन्यात जास्त प्रादुर्भाव आढळून येतो.
 • हवेतील भरपूर आर्द्रता, मध्यम तापमान आणि उशिरा व जास्त येणारा पाऊस यांमुळे या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. 
 • त्यामुळे उसाचा शेंडा वाळतो, पानावर लहान लहान छिद्रे दिसतात. असा शेंडा सहजासहजी उपसून येत नाही. शेंडा वाळल्यामुळे बाजूचे डोळे फुटतात. उसाचा खराट्यासारखा आकार तयार होतो.

मूळ कुरतडणारी अळी :

 • प्रादुर्भावामुळे शेंड्याची पाने वाळलेली दिसतात. इतर पाने पिवळी होतात. वाळलेला ऊस ओढल्यानंतर तो बुडख्यातून मोडून निघतो. 
 • जमिनीलगतच्या खोडात पांढरट रंगाची अळी दिसून येते.

खवले कीड :

 • लावणी उसापेक्षा खोडवा पिकात जास्त प्रादुर्भाव दिसून येतो. 
 • राखाडी, तपकिरी अशा गोल आकाराचे थर उसाच्या कांड्यावर दिसून येतात.
 • हलकी जमीन, पाण्याच्या पाळ्यांतील जास्त अंतर व व्यवस्थापनाकडे केलेले दुर्लक्ष, यामुळे या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढतो.

पिठ्या ठेकूण (मिली बग) :

 • कांडीवर पाचटाखाली लांबट गोल  आकाराची लालसर रंगाची व अंगावर मेणचट आवरण  असलेली पिठ्या ढेकणाची पिल्ले दिसतात. 
 • किडीच्या प्रादुर्भावामुळे उसाची वाढ मंदावते. ऊस उत्पादन, साखर उताऱ्यात घट येते.

पाकोळी (पायरिला) :

 • पाठीमागे चिमट्यासारख्या दोन शेपट्या असणारी पिल्ले, तसेच तपकिरी रंगाच्या प्रौढावस्था पानावर दिसतात.
 • किडीच्या प्रादुर्भावामुळे पाने पिवळी पडतात. प्रादुर्भाव जास्त असल्यास पानावर काळी बुरशी वाढते. उसाचे वजन, साखर उताऱ्यात घट येते.

पांढरी माशी :

 • दलदलीच्या ठिकाणी, दुर्लक्षित ऊस पिकात/ खोडवा पिकात, उन्हाळ्यात पाण्याचा ताण  पडल्यास या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो.
 • पानाच्या खालच्या बाजूस गोल, नाजूक, पांढरट पिले व कोष दिसतात. ती पानातील रस शोषून घेतात. त्यामुळे ऊस उत्पादन व साखर उताऱ्यात घट येते.

हुमणी :

 • किडीमुळे पानाची शीर व पाने पिवळी होतात. ऊस सहजासहजी उपसून येतो. मुळे खाल्लेली दिसून येतात. 
 • ऊस उपटला असता हुमणीच्या सी आकाराच्या पिवळसर रंगाच्या अळ्या दिसून येतात. 
 • दुर्लक्षित ऊस पिकामध्ये ८० ते १०० टक्के नुकसान होऊ शकते.

लोकरी मावा :

 • लोकरी माव्याचा प्रादुर्भाव लागणीपासून तोडणीपर्यंत आढळून येतो. माद्यांची संख्या जास्त असते. त्या समागमाशिवाय प्रजनन करतात.
 • पंखी माव्यास पारदर्शी पंख असून, पंखाच्या कडेस दोन आयताकृती काळे ठिपके दिसून येतात. पंखाच्या मादीपासून जन्मलेल्या पिलांचा रंग फिक्कट हिरवट पांढरा दिसतो. तर बिनपंखी माव्याची पिले फिक्कट पिवळसर पांढरी असतात.
 • बाल्यावस्थेत चार वेळा कात टाकतात. तिसऱ्या  बाल्यावस्थेपासून त्यांच्या पाठीवर लोकरीसारखे मेणतंतू दिसतात.

वाळवी :
हलक्‍या जमिनीत या किडीचा प्रादुर्भाव जास्त होतो. ही कीड उसाचे डोळे कुरतडून खात असल्याने, उगवणीवर परिणाम होतो. उसाच्या कांड्यांचा आतील  गर खाल्ल्यामुळे उसाचे नुकसान होते.

लोकरी मावा नियंत्रणाचे उपाय

उपाययोजना व 
फवारणीची वेळ
कीडनाशकाचे नाव    कीडनाशकाचे
प्रति हेक्टरी प्रमाण    
लागणारे पाणी प्रति
हेक्टरी, नॅपसॅक पंपासाठी (लि.)    
६ महिन्यांपर्यंत फोरेट (१० टक्के दाणेदार) १५ कि.ग्रॅ. शेतामध्ये हे 
कीटकनाशक समप्रमाणात 
पसरण्यासाठी फोरेट बरोबर
माती अथवा चांगले 
कुजलेले शेणखत
(१ः३) मिसळावे.
६-९ महिन्यांपर्यंत वापसा आल्यानंतर जमिनीत
वापरावे
फोरेट (१० टक्के दाणेदार) २० कि.ग्रॅ. शेतामध्ये हे 
कीटकनाशक समप्रमाणात 
पसरण्यासाठी फोरेट बरोबर
माती अथवा चांगले 
कुजलेले शेणखत
(१ः३) मिसळावे.
किडीचा प्रादुर्भाव 
आढळल्यास पहिली
फवारणी, त्यानंतर १
महिन्याने किंवा जास्त
प्रादुर्भाव दिसून आल्यास
वापरलेल्या व्यतिरिक्त 
उर्वरित दोन 
कीटकनाशकांची दुसरी
फवारणी करावी.
१.ऑक्सीडिमेटॉन मिथाईल
(२५ टक्के प्रवाही)
किंवा
२. डायमेथोएट
(३० टक्के प्रवाही)
किंवा
३. मॅलॅथिऑन
(५० टक्के प्रवाही)
६०० मि.ली.
१०५० मि.ली.
१५०० मि.ली.
६०० मि.ली.
१०५० मि.ली.
१५०० मि.ली.
८०० मि.ली.
१४०० मि.ली.
२००० मि.ली.
४०० (लहान ऊस) 
७०० (मध्यम ऊस) 
१००० (मोठा ऊस) 
४०० (लहान ऊस) 
७०० (मध्यम ऊस) 
१००० (मोठा ऊस) 
४०० (लहान ऊस) 
७०० (मध्यम ऊस) 
१००० (मोठा ऊस)    

एकात्मिक कीड नियंत्रण व्यवस्थापन

 • कीडग्रस्त बेणे वापरू नये.
 • उसाची पट्टा अथवा रुंद सरी पद्धतीने लागवड करावी. जेणेकरून पीक संरक्षण उपाययोजना करणे सोईस्कर होईल. नत्र खताची प्रमाणित मात्रा द्यावी. 
 • सुरवातीस कमी प्रादुर्भाव असलेल्या शेतातील कीडग्रस्त पाने काढून जाळून टाकावीत.
 • डिफा ॲफिडीव्होरा/मायक्रोमस हे परभक्षी मित्र कीटक १००० अळ्या किंवा कोषप्रती हेक्टरी सोडावेत.
 • जैविक मित्र किडी शेतात सोडल्यावर कीडनाशकाची फवारणी ३ ते ४ आठवडेपर्यंत टाळावी. 
 • फोरेट हे कीटकनाशक ऊस तोडणीपूर्वी ३ महिने वापरू नये. 
 • शेतात कीटकनाशकाचा वापर करताना योग्य खबरदारी घ्यावी.
 • फवारणीनंतर १० ते १५ दिवस ऊस किंवा उसाचे वाढे जनावरांना खाऊ घालू नये.

रोग नियंत्रण :
प्रसारानुसार होणारे रोग :

 • बेण्याद्वारे पसरणारे रोग ः चाबूक काणी, गवताळ वाढ, खोड कूज, पांगशा फुटणे, मोझॅक, लाल कूज.
 • हवेद्वारे पसरणारे रोग ः पोक्का बोइंग, तांबेरा,  पानावरील ठिपके
 • जमिनीतून पसरणारे रोग ः अननस रोग, कांडी कूज, मूळ कूज, मर, लाल कूज.
 • किडीद्वारे पसरणारे रोग ः मोझॅक, गवताळ वाढ.

चाबूक काणी :
पीकवाढीच्या कोणत्याही अवस्थेत होणारा चाबूक काणी हा रोग युस्टिलॅगो स्किटॅमिनी नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगामुळे लागवडीच्या पिकामध्ये २९ टक्के; तर खोडवा पिकात ७० टक्‍क्‍यांपर्यंत उत्पादनामध्ये नुकसान होते. को-८६०३२, फुले २६५ यासारख्या प्रतिकारक जाती उपलब्ध झाल्या आहेत. 

लक्षणे :
या रोगामुळे रोगग्रस्त उसाच्या पोंग्यामधून चंदेरी आवरण असणारा चाबकासारखा लांब साधारण १-१.५ मीटर लांबीचा पट्टा बाहेर पडतो. या लांब पट्ट्यामुळे हा रोग सहज ओळखता येतो. पट्ट्यात असलेली काळी भुकटी म्हणजेच या बुरशीचे बीजाणू होय. साधारणतः १० ते १२ सें.मी. लांब पट्ट्यात ५० ते ५५ कोटी बीजाणू असतात. या बीजाणूचा प्रसार बेणे, हवा व जमीन यातून होतो. रोगाच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती मिळाल्यावर बीजाणू रुजून बुरशीची वाढ होते. अशी बुरशी खोडाच्या अंतर्भागात प्रवेश करून कार्यरत राहून चाबूक काणीयुक्त स्वरूपात दिसते. 

 • रोगट ऊसबेणे वापरू नये. नवीन पिकात रोगनिर्मिती होऊन त्याचा ९० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त प्रसार होतो. 
 • रोगग्रस्त उसाची पाने अरुंद व लहान असतात. उसाची जाडी वाढत नाही. कालांतराने असे ऊस आतून पोकळ होऊन वजनात घट येते. अशा उसाचा रस निकृष्ट दर्जाचा व साखरेचे प्रमाण कमी असलेला असतो.

गवताळ वाढ :
गवताळ वाढ हा फायटोप्लाझ्मा या अतिसूक्ष्म जीवाणूमुळे 
होणारा रोग आहे. भारतामध्ये हा रोग सर्व राज्यांत सध्या लागवडीसाठी असलेल्या सर्वच जातींमध्ये दिसून येतो. महाराष्ट्रात लावणीपेक्षा खोडवा पिकावर मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो.
लक्षणे :
फायटोप्लाझ्मामुळे लागण झालेल्या उसाच्या पानांमध्ये हरितद्रव्ये कमी होतात. पाने पांढरी अथवा पिवळसर पडलेली दिसून येतात. अशा ऊस बेटामध्ये असंख्य फुटवे येऊन ती खुरटी राहतात. हे फुटवे निव्वळ पांढरट अथवा पिवळसर असून त्यांची पाने अरुंद, लहान, टोकाकडे निमुळती होत गेलेली दिसतात व त्यास गवताच्या ठोंबांचे स्वरूप येते. काही वेळेस नुसतेच हिरव्या रंगाचे असंख्य फुटवे आलेले दिसून येतात.

 • केवडा या सूक्ष्म मूलद्रव्याच्या कमतरतेने होणाऱ्या रोगामध्ये उसाची पाने पांढरट अथवा पिवळसर होत असली तरी पानांच्या शिरा मात्र हिरव्या असतात; परंतु गवताळ वाढ या रोगात पानांच्या शिराही पांढऱ्या झालेल्या दिसतात. 
 • मूलगुणी बियाणे, मूलभूत बियाणे, पायाभूत बियाणे, प्रमाणित बियाणे यांचा वापर करून दर तीन-चार वर्षांनी शेतकऱ्यांनी बेणे बदल करावेत; तसेच उष्ण बाष्प किंवा उष्ण जलप्रक्रिया करूनच पायाभूत बियाणे वापरले पाहिजे. 

पोक्का बोंग :
हा रोग फ्युजारियम बुरशीमुळे होतो. तीन-सात महिन्यांच्या उसामध्ये मॉन्सूनपूर्व वळीव पाऊस व मॉन्सूनमुळे वाढलेल्या हवेतील आर्द्रतेमुळे हा रोग पानांवर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. 
लक्षणे  :
सुरवातीस बुरशीची लागण शेंड्यातून येणाऱ्या तिसऱ्या वा चौथ्या कोवळ्या पानावर दिसून येते. पानाच्या खालच्या भागात सुरवातीस फिक्कट हिरवट, पिवळसर, पांढरट पट्टे अथवा ठिपके दिसतात. अशा पानांचा आकार बदलतो. लांबी कमी होते व खोडाकडील भाग अरुंद होऊन पाने एकमेकांत गुंफली जातात. त्यामुळे ती पूर्णपणे उघडली जात नाहीत. प्रादुर्भावग्रस्त जुन्या पानावर पिवळसर पट्ट्याच्या जागेवर वर्तुळाकार, लांब अरुंद वेगवेगळ्या आकारांचे लालसर ते तपकिरी ठिपके अथवा रेषा दिसतात. रोगाची तीव्रता वाढल्यास शेंडे कूज व काडी कापाची लक्षणे दिसतात.

तांबेरा :
हा रोग पक्‍सिनिया कुहनाय या बुरशीमुळे होतो. मागील काही वर्षांपासून या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यांतील नदीकाठाच्या क्षेत्रात दिसून येतो. 
लक्षणे:
पानांवर हवेद्वारे प्रसारित होणारा हा महत्त्वाचा रोग आहे. सुरवातीस बुरशीची लागण पानाच्या दोन्ही बाजूंस होऊन पानांवर लहान, लांबट आकाराचे पिवळे ठिपके दिसतात. कालांतराने ठिपक्‍याची लांबी वाढून त्यांचा रंग लालसर तपकिरी होतो. ठिपक्‍याच्या भोवती फिक्कट पिवळसर, हिरवी कडा तयार होऊन, पानाच्या खालच्या बाजूस ठिपक्‍यांच्या जागेवर उंचवटे तयार होतात. असे ठिपके फुटून नारंगी किंवा तांबूस तपकिरी रंगाचे बीजाणू बाहेर पडतात. हवेद्वारे बीजाणूंचा प्रसार होऊन रोगाचा प्रसार होतो. पानांवरील ठिपक्‍याची संख्या वाढून शेजारील ठिपके एकमेकांत मिसळून मोठे ठिपके तयार होतात. या रोगग्रस्त ठिपक्‍यातील पेशी मरून जाऊन पाने करपलेली दिसून येतात. प्रकाश संश्‍लेषण क्रियेत व्यत्यय आल्याने उसाचे उत्पादन घटते. 

लाल कूज :
कॉलेटोट्रीकम फलकॅटम या बुरशीमुळे होणारा हा रोग प्रामुख्याने अमेरिका, भारतात आढळून आलेला आहे. महाराष्ट्रात या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत नाही.

लक्षणे :
हा रोग उसाच्या सर्व भागांवर येतो. या रोगाची प्राथमिक लक्षणे पानांच्या मध्य शिरेवर रंगहीन ठिपके अथवा रेषांच्या स्वरूपात दिसतात. यामध्ये नवीन पाने शेंड्यापासून पिवळी पडलेली व वाळत आलेली दिसतात. खोडकीड किंवा मुळे पोखरणाऱ्या अळीने केलेल्या छिद्राद्वारे अथवा दोन कांड्यांच्या जोडातून या बुरशीचा शिरकाव उसाच्या अंतर्भागात होतो. सुरवातीस रोगाची बाह्य लक्षणे खोडावर दिसत नाहीत; परंतु रोगग्रस्त उसाचे उभे दोन काप केले असता आलटून पालटून तांबडे व पांढरे रंगांचे पट्टे दिसतात. रोगग्रस्त उसाचा आंबूस वास येऊन वाढ खुंटलेली दिसून येते. यामुळे असे ऊस पिवळे पडून उसाचा शेंड्याकडील भाग वाळून गेलेला दिसतो. 
सतत पडणारा पाऊस, थंड हवामान व गरजेपेक्षा जास्त पाणी देणे, शिवाय रोगाला बळी पडणाऱ्या जातींची लागवड आदी घटक रोगाच्या वाढीसाठी पोषक ठरतात. बेणे, हवा व रोगग्रस्त पिकातून वाहणाऱ्या पाण्यामार्फत रोगाचा प्रसार होतो. रोगप्रतिकारक जातींची लागवड (उदा. को-८६०३२, फुले २६५) करावी.

मर :
फ्युजॅरियम सॅकॅरी नावाच्या बुरशीमुळे मर हा रोग होतो. 
लक्षणे:
ऊस तीन-चार महिन्यांचा होईपर्यंत या रोगाची लक्षणे दिसून येत नाहीत. रोगग्रस्त उसाची पाने प्रथम पिवळसर पडून निस्तेज झालेली दिसतात. त्यानंतर अशी पाने शेंड्याकडून कडेने आत वाळत जाण्यास सुरवात होते. असे ऊस मलूल होऊन त्यांची वाढ खुंटते. पाण्याचा ताण पडल्याप्रमाणे ऊस पूर्ण वाळून जातो. रोगग्रस्त उसाच्या आतील भागात बुरशी वाढून गाभा सलगपणे अंधूक गुलाबी किंवा तांबडा दिसतो. 

 •  रोगग्रस्त बेण्यापासून उसाची लागवड केली असता मुळांची पूर्ण वाढ होत नाही. डोळे उगवत नाहीत, उगवल्यास नंतर मृत पावतात. 
 •  रोगप्रतिकारक जातींची लागवड (को. ८६०३२, फुले २६५)

रोगांचे एकात्मिक नियंत्रण :
प्रतिबंधक उपायांमध्ये प्रामुख्याने रोगांच्या प्रसारासाठी कारणीभूत बाबीं टाळाव्यात. 
जमीन :

 • योग्य निचरा होणाऱ्या जमिनीत ऊस लागवड करावी.
 • लागवड उशिरा म्हणजे एप्रिल-मेमध्ये करू नये.
 • ऊस तुटून गेलेल्या जमिनीत पुनर्लागवड करावयाची असल्यास पूर्वी तुटून  गेलेल्या उसाचे रोगग्रस्त अवशेष गोळा करून त्याचा नायनाट करावा. 
 • लावण करताना उसाच्या टिपऱ्या खोलवर दाबू नये.
 • रासायनिक खतांच्या मात्रा शिफारशीप्रमाणे द्याव्यात.

बेणे निवड :

 • रोगप्रतिकारक्षम अथवा रोगास कमी बळी पडणाऱ्या जातींचा (उदा. को-८६०३२ आणि फुले ०२६५) वापर करावा. 
 • रोगमुक्‍त बेणेमळ्याची निवड करावी. दर तीन वर्षांतून बेणे बदलून प्रमाणित बेणे वापरावे.
 • काणी व गवताळ वाढ जास्त प्रमाणात असल्यास अशा उसाचा खोडवा घेऊ नये अथवा त्यामधील ऊस बेणे म्हणून वापरू नये. अशी बेटे उपटून जाळून नष्ट करावीत. त्या ठिकाणी निरोगी ऊस बेण्याची लागण करावी.

बेणे प्रक्रिया :

 • जमिनीद्वारे उद्‌भवणाऱ्या बुरशीजन्य रोगांपासून वाढणाऱ्या कोवळ्या अंकुरांचे व लहान रोपांचे संरक्षण करण्यासाठी बीजप्रक्रिया उपयुक्त ठरते. बेणे कार्बेन्डाझिम १०० ग्रॅम प्रति १०० लि. पाणी या प्रमाणात १० मिनिटे बुडवावे.
 • बेण्याची उष्ण जलप्रक्रिया (५० अंश से. एक-दोन तास) अथवा बाष्पयुक्त उष्ण हवेत (५४ अंश से. तापमान - तीन ते चार तास) प्रक्रिया करून लागवड करावी.

रोगनिवारण :

 • लागवडीनंतर किंवा खोडव्यामध्ये गवताळ वाढीची बेटे आढळल्यास ती मुळासकट काढून जाळून नष्ट करावीत.
 • ऊस पिकात काणी रोगाचे प्रमाण तीन टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असल्यास अशा पिकाचा खोडवा घेऊ नये.
 • काणी रोग दिसताच संपूर्ण बेट उपटून त्याचा नायनाट करावा.

रासायनिक उपाययोजना :

 • पानांवरील तपकिरी ठिपके या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम अथवा मॅन्कोझेब अथवा कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड यापैकी कोणतेही बुरशीनाशक तीन ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी घ्यावी. पुढील फवारण्या १५ दिवसांच्या अंतराने कराव्यात.
 • ऊस पिकावर आढळणाऱ्या रसशोषण करणाऱ्या किडींमार्फत गवताळ वाढ या रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार होऊ शकतो. त्यामुळे त्यांचे योग्य वेळी नियंत्रण करण्याकडे लक्ष द्यावे. 
 • उसावर पोक्का बोंग व शेंडा कूज रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यावर नियंत्रणासाठी एक ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रतिलिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. 
 • उसावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसल्यास तीन ग्रॅम मॅन्कोझेब प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारावे.

संपर्क :  ०२१६९- २६५२३३
( लेखक मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, जि. सातारा येथे कार्यरत आहेत.)

इतर अॅग्रो विशेष
कौशल्य विकास कार्यक्रमातून मिळतोय एकीचा...राज्यात गेल्या दीड दशकामध्ये गटशेतीचे मूळ...
कौशल्य विकासातून गटशेतीसाठी शेतकरी...मुंबई ः शेतीतून उत्पन्न वाढवायचे असेल तर...
पोषणमूल्यावर आधारित कृषी प्रकल्पास...पुणे : राज्यातील कृषी विज्ञान केंद्रांच्या मदतीने...
हमीभाव न देणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने...सोलापूर : हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी...
खानदेशात कापूस लागवड वाढण्याचा अंदाजजळगाव : खानदेशात आगामी खरिपात कापूस लागवड किंचित...
अाॅनलाइन नोंदणी न झाल्यास शेतकरीच...अकोला ः शासनाच्या आधारभूत किमतीने तूर खरेदीसाठी...
संपूर्ण शेतीमाल नियमनमुक्त करावापुणे ः राज्य सरकारने संपूर्ण शेतीमाल...
कोरडवाहू फळ संशोधन कार्याला गती...परभणी: पोषण मूल्यांच्या सुरक्षिततेसाठी...
राज्यातील सत्तावीस कृषी महाविद्यालयांचे...पुणे : भारतीय कृषी संशोधन परिषदेची आदर्श...
दुष्काळग्रस्त १५१ तालुक्यांसाठी दोन...मुंबई : राज्यातील खरीप हंगाम २०१८ मध्ये...
विदर्भात उद्यापर्यंत पावसाचा अंदाजपुणे : राज्याच्या कमाल तापमानात सातत्याने वाढ होत...
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी फेरोमोन...रासायनिक कीडनाशकांना किटक प्रतिकारक होत असून,...
परागकणांचा मागोवा घेण्याची कार्यक्षम...दक्षिण आफ्रिकेतील स्टेल्लेनबाऊच विद्यापीठातील...
खानदेशात पाणीटंचाईच्या प्रस्तावात वाढजळगाव : खानदेशात पाणीटंचाईचे प्रस्ताव वाढत आहेत....
कडाक्याच्या थंडीने गव्हाच्या विविध...सातारा ः येथील वेण्णा तलाव परिसरात असलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठाचा दर्जा घसरलापुणे: राहुरी येथील महात्मा फुले कृषी...
कणेरी मठावर देशातील पहिले डिव्हाइन...कोल्हापूर : हजारो फुलझाडांसह विविध प्रकारची...
आंध्र प्रदेशातील एका कंपनीचा परवाना `...नागपूर ः आंध्र प्रदेशातील एका बियाणे कंपनीच्या...
आणखी साडेचार हजार गावांमध्ये दुष्काळी...मुंबई : खरीप हंगाम २०१८ मध्ये राज्यातील ५०...
मराठवाड्यात आज पावसाचा अंदाजपुणे : कमाल तापमानात वाढ झाल्याने राज्यात...