मागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.
अॅग्रो विशेष
कोबीवर्गीय भाज्यांमध्ये कोबी, फुलकोबी, नवलकोल, ब्रोकोली, ब्रुसेल्स स्प्राउट या पिकांचा प्रामुख्याने समावेश होतो. ही पिके थंड हवामानात येणारी असून, सुधारित तसेच संकरित जातींच्या उपलब्धतेमुळे त्यांची लागवड समशीतोष्ण आणि उष्ण हवामानात यशस्वीपणे करता येते.
कोबी
जमीन : लागवडीसाठी मध्यम ते भारी पोयट्याची सुपीक आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६-६.५ असावा.
कोबीवर्गीय भाज्यांमध्ये कोबी, फुलकोबी, नवलकोल, ब्रोकोली, ब्रुसेल्स स्प्राउट या पिकांचा प्रामुख्याने समावेश होतो. ही पिके थंड हवामानात येणारी असून, सुधारित तसेच संकरित जातींच्या उपलब्धतेमुळे त्यांची लागवड समशीतोष्ण आणि उष्ण हवामानात यशस्वीपणे करता येते.
कोबी
जमीन : लागवडीसाठी मध्यम ते भारी पोयट्याची सुपीक आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६-६.५ असावा.
हवामान : पिकाच्या वाढीसाठी तसेच गड्डा पोसण्यासाठी १५ ते २५ अंश सेल्सिअस तापमान गरजेचे असते. कोबीचा गड्डा भरत असताना तापमान वाढले तर पानांची वाढ होऊन गड्डे पोकळ राहतात, तसेच शून्य अंश सेल्सिअसच्या खाली तापमान गेल्यास झाडांची वाढ खुंटते.
जाती :
- कोबीच्या जातींमध्ये हळव्या किंवा लवकर येणाऱ्या जाती व गरव्या किंवा उशीरा येणाऱ्या जाती असे दोन प्रकार आहेत. हळव्या किंवा लवकर येणाऱ्या जातीचे गड्डे लागवडीनंतर ६० ते ७० दिवसांत तयार होतात.
- गरव्या किंवा उशीरा येणाऱ्या जातीचे गड्डे लागवडीनंतर १०० ते ११० दिवसांत तयार होतात.
लागवड पद्धत
मुख्य शेतात लागवडीपूर्वी रोपे रोपवाटिकेत गादीवाफ्यावर तयार करावीत. ६००-७५० ग्रॅम बियाणे प्रतिहेक्टरी लागते. संकरित जातीचे २०० ते २५० ग्रॅम बियाणे लागते.
रोपवाटिका व्यवस्थापन :
कोबी पिकावर घाण्या (ब्लॅकरॉट) या अतिशय नुकसानकारक रोगाचा प्रादुर्भाव होतो. तो टाळण्यासाठी पेरणीपूर्वी स्ट्रेप्टोमायसीन दोन ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात बियाणे ३० मिनिटे भिजत ठेवावे. त्यानंतर बियाणे सावलीत सुकवून पेरणीसाठी वापरावे. साधारणपणे तीन ते पाच आठवड्यांत रोपे लागवडीसाठी तयार होतात. त्यानंतर मुख्य शेतात रोपांची ४५ बाय ३० सेंमी अंतरावर लागवड करावी.
अन्नद्रव्य व्यवस्थापन :
लागवडीपूर्वी प्रतिहेक्टरी २० टन (४० बैलगाड्या) शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळावे. ॲझोटोबॅक्टर व पीएसबी प्रत्येकी २५० ग्रॅम प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून रोपांची मुळे बुडवून लागवड करावी. हेक्टरी १६०ः८०ः८० नत्र- स्फुरद-पालाश द्यावे. शिफारस केलेल्या खतमात्रेपैकी ५० टक्के नत्र व संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळी द्यावे. उर्वरित ५० टक्के नत्र लागवडीनंतर एक महिन्याने द्यावे.
माती परीक्षणानुसार गंधकाची कमतरता असल्यास गंधक असलेल्या रासायनिक खतांचा उदा. सिंगल सुपर फॉस्फेट, अमोनिअम सल्फेट यांचा वापर करावा. जस्त कमतरतेसाठी लागवडीच्या वेळी हेक्टरी २० किलो झिंक सल्फेट तर लोह कमतरतेसाठी हेक्टरी २५ किलो फेरस सल्फेट शेणखताबरोबर अथवा निंबोळी पेंडीसोबत द्यावे. फवारणीद्वारे द्यावयाची अन्नद्रव्ये देताना चिलेटेड जस्त अथवा चिलेटेड लोह १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून लागवडीनंतर ३० दिवसानंतर आठ दिवसांच्या अंतराने दोनदा फवारणी करावी.
आंतरमशागत आणि पाणीव्यवस्थापन :
गड्डे भरू लागल्यानंतर भर द्यावी. म्हणजे गड्ड्याच्या ओझ्याने रोपे कोलमडणार नाहीत. १५ ते २० दिवसांच्या अंतराने नियमीत खुरपणी करावी. जमिनीच्या गरजेप्रमाणे ८ ते १० दिवसांच्या अंतराने व गरजेनुसार पाणी द्यावे.
काढणी व्यवस्थापन :
रोपांच्या लागवडीपासून हळव्या जातींची काढणी ६० ते ७० दिवसांनी सुरू होते. दोन ते तीन आठवड्यांत काढणी पूर्ण होते. संकरित जातीचे सर्व गड्डे एकाच वेळी तयार होत असल्याने संपूर्ण काढणी ८ ते १० दिवसांतच पूर्ण होते. निमगरव्या म्हणजे मध्यम कालावधीच्या जातीचे गड्डे ८० ते ९० दिवसांनी काढणीसाठी तयार होतात, तर गरव्या जातींत लागवडीनंतर १०० ते ११५ दिवसांनी गड्डे काढणीस तयार होतात. कोबीचे तयार गड्डे अंगठ्यांनी किंवा तळहाताने दाबल्यास घट्ट लागतात. असे घट्ट आणि पूर्ण तयार गड्डे बाहेरच्या ३-४ पानांसकट कापून काढावेत.
उत्पादन :
लवकर येणाऱ्या जातींचे २५० ते ३०० क्विंटल तर उशिरा येणाऱ्या जातींचे ३०० ते ३५० क्विंटल प्रतिहेक्टरी उत्पादन मिळते.
फुलकोबी (फ्लॉवर) :
जमीन : लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी, मध्यम ते भारी सुपीक जमीन निवडावी. जमिनीचा सामू ५.५ ते ६.६ असावा.
हवामान : पानकोबीप्रमाणेच फुलकोबी हे थंड हवामानात वाढणारे पीक आहे. मात्र, तापमानाच्या बाबतीत हे पीक अत्यंत संवेदनशील आहे. ठराविक तापमानाला येणाऱ्या फुलकोबीच्या जातींची त्या ठराविक हंगामात लागवड केली तरच त्या जातीपासून अपेक्षित उत्पादन मिळू शकते. हळव्या किंवा लवकर येणाऱ्या जातींना उष्ण हवामान (गड्डा धरताना २५ ते २७ अंश सेल्सिअस) आणि दीर्घकाळ सूर्यप्रकाश (मोठे दिवस) पोषक ठरतो. पिकाच्या वाढीच्या काळात तापमान खाली गेल्यास गड्डा अतिशय लहान (बटनिंग आणि कमी प्रतीचा) तयार होतो. गरव्या किंवा उशिरा तयार होणाऱ्या स्नोबॉलसारख्या जातींसाठी सुरवातीपासूनच थंड हवामान (१० ते १६ अंश सेल्सिअस) आणि छोटे दिवस मानवतात.
बियाणे पेरणी | जाती | गड्ड्यांच्या वाढीसाठी पोषक तापमान |
लवकर येणाऱ्या जाती एप्रिल-मे ते जून-जुलै |
पंजाब कवारी, अर्ली कुवारी, फर्स्ट क्रॉप, पुसा दिपाली, पुसा केतकी | २०-२२ अंश सेल्सिअस |
मुख्य हंगाम ऑगस्ट-सप्टेंबर |
इमप्रुव्हड जापनीज, पंत शुभ्रा, हिस्सार-, पाटणा, मिडसिझन, पुसा सिंथेटिक, पुसा शुभ्रा | १४-१९ अंश सेल्सिअस |
उशिरा येणाऱ्या जाती | पुसा स्नोबॉल-, पुसा स्नोबॉल-, स्नोबॉल | १०-१६ अंश सेल्सिअस |
लागवड पद्धत : एक हेक्टर लागवडीसाठी हळव्या, निमगरव्या जातीचे ६००-७५० ग्रॅम बी लागते, तर गरव्या आणि स्नोबॉल गटातील जातीचे हेक्टरी ३७५ ते ४०० ग्रॅम बी पुरेसे होते. संकरित वाणांचे बी २५० ते ३०० ग्रॅम लागते. सर्वसाधारणपणे तीन ते पाच आठवड्यांत रोपे तयार झाल्यानंतर मुख्य शेतात खरीप हंगामात सरी-वरंब्यांवर
तर रब्बी व उन्हाळी हंगामात सपाट वाफा पद्धतीने ४५ बाय ४५ सेंमी. अंतरावर रोपांची लागवड करावी. रोपांची पुनर्लागवड संध्याकाळच्या वेळी करावी. लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे.
अन्नद्रव्य व्यवस्थापन : हेक्टरी २० टन शेणखत तसेच १५०ः७५ः७५ किलो नत्र ः स्फुरद ः पालाश (प्रति हेक्टरी). द्यावे. यापैकी ५० टक्के नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडीच्या वेळी तर उर्वरित ५० टक्के नत्र लागवडीनंतर एक महिन्याने द्यावे.
आंतरमशागत आणि पाणी व्यवस्थापन : १५ ते २० दिवसांच्या अंतराने नियमित खुरपणी करावी, तसेच आठ ते १० दिवसांच्या अंतराने व गरजेनुसार पिकाला पाणी द्यावे. फुलकोबीची मुळे उथळ असल्यामुळे खोलवर खुरपणी किंवा खांदणी करू नये. गड्डा धरू लागल्यानंतर रोपांना भर द्यावी. त्यामुळे गड्ड्याच्या ओझ्याने रोपे कोलमडणार नाहीत. गड्ड्यांचा रंग पांढरा राहण्यासाठी गड्डे धरण्यास सुरवात झाल्यानंतर त्याभोवतालच्या पानांनी गड्डे झाकून घ्यावेत. त्यामुळे प्रत्यक्ष सूर्यप्रकाश गड्ड्यावर पडून ते पिवळे न पडता दुधाळ, पांढऱ्या रंगाचे व आकर्षक राहतात.
काढणी आणि उत्पादन : हळव्या जाती लागवडीपासून ६० ते ९० दिवसांत काढणीस तयार होतात, तर निमगरव्या जाती ९० ते १२० दिवसांत तयार होतात. लवकर येणाऱ्या जातींचे १५० ते २०० क्विंटल तर उशिरा येणाऱ्या जातींचे २०० ते २५० क्विंटल प्रतिहेक्टरी उत्पादन मिळते.
- डॉ. श्रीमती एम. बी. कदम, ए. एस. पाटील, डॉ. एस. बी. गुरव
संपर्क: ०२०-२५६९३७५०
(लेखक महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प गणेशखिंड, पुणे येथे कार्यरत आहेत.)
- 1 of 129
- ››