द्राक्षमण्यांची गळ, जळीच्या समस्येवर उपाययोजना

द्राक्ष मणी गळ,मणीजळ आणि द्राक्ष घडाच्या कॉयलिंगची लक्षणे
द्राक्ष मणी गळ,मणीजळ आणि द्राक्ष घडाच्या कॉयलिंगची लक्षणे

सध्या नाशिक व इतर विभागांत पाऊस झालेला आहे. त्यामुळे सध्या मणी गळ, मणी कुजणे ही परिस्थिती दिसून येत आहे. दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. 

मणी जळ ः  

  •  द्राक्ष बागेत प्रामुख्याने येणारी समस्या म्हणजे फुलोरा अवस्थेआधी किंवा फुलोऱ्यादरम्यान होणारी मण्यांची गळ. मण्यांची जळ म्हणजे मणी रात्रीतून जळून जातात. 
  • ही विकृती जेव्हा बागेत जास्त आर्द्रता निर्माण होते तेव्हा दिसून येते. मणी जळण्यास सुरवात होते. 
  • उपाययोजना : 

  • घडाची जळ दिसून आल्यास सर्वप्रथम बागेत हवा खेळती कशी राहील याचा विचार करावा. त्यासाठी कॅनॉपी कमी करावी. काडीवरील सुरवातीची पाने काढून टाकावीत. वांझ फुटी काढून घ्याव्यात. 
  •  या दरम्यान संजीवकांचा वापर तसेच अन्य फवारण्या बंद कराव्यात. डाऊनी मिल्ड्युच्या नियंत्रणासाठी तज्ञांच्या शिफारशीनुसार बुरशीनाशकाची फवारणी घ्यावी. 
  •  फेल फुटी लवकर काढाव्यात. कॅनॉपी लवकर कमी करावी. त्यामुळे घडांची होणारी जळ थांबेल. निर्धारित घडांची संख्या वेलीवर ठेवता येईल. 
  • मणी गळ ः 

  • अलीकडच्या काळात ही विकृती सांगली व नाशिक या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात दिसून येते. ही विकृती फुलोराअवस्था सुरू होण्याआधी ते फुलोरा अवस्थेत आढळून येते. 
  • थोडा जरी घडाला धक्का दिला किंवा टिचकी मारली तरी न फुललेले किंवा फुललेले मणी गळून पडताना दिसतात. पूर्ण घड रिकामा झाल्यासारखा दिसतो. त्यामुळे उत्पादनात घट येते. 
  •  ही विकृती वातावरणातील तापमान, वेलीवरील ताण, पाण्याचा ताण, फॉस्फरस या अन्नद्रव्यांचे जमिनीतील अतिजास्त प्रमाण, जास्त क्षारता व पोटॅशिअमसारख्या अन्नद्रव्यांचे कमी प्रमाण इत्यादी बाबींमुळे असू शकते.   
  • वेलीवरील ताण : 
  • वेल विस्तारामध्ये जर कॅनॉपी खूप जास्त असल्यास तसेच जास्त वेलींवर जास्त उत्पादन घेतल्याने ही विकृती दिसून येते. वेलवाढीच्या कोणत्याही स्थितीत मण्यांची गळ होते. 
  •  गळ अधिक झाल्यास संपूर्ण घड मोकळा होतो किंवा त्याचा सांगाडा शिल्लक राहतो. 
  • वातावरणातील तापमान ः      दिवस रात्रीच्या तापमानात जास्त बदल होऊन दिवसाचे तापमान जास्त झाल्यास सुद्धा ही विकृती निर्माण होऊ शकते. कमी थंडीमुळे रात्रीचे तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असेल, तसेच दिवसाचे तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असेल अशा वेळी मण्यांच्या वाढीस लागणारा कालावधी बदलतो. विकृती येण्याचे प्रमाण वाढू शकते. 

    पाण्याचा ताण :  मणी वाढीच्या अवस्थेत आकार ६ ते ७ मि.मी. किंवा त्यापेक्षा मोठा झाल्यानंतर वेलीस पाण्याचा ताण पडू देऊ नये. पाण्याचा ताण पडल्यामुळे सुद्धा ही विकृती येऊ शकते.  अन्नद्रव्यांची कमतरता ः  अन्नद्रव्यांचा संतुलीत वापर व व्यवस्थापन महत्वाचे असते. पोटॅशिअमची कमतरता किंवा कमी प्रमाण तसेच फॉस्फरसचे जमिनीतील अति जास्त प्रमाण यामुळे ही विकृती दिसते. 

    संजीवकाचे जास्त प्रमाण : 

  •  दिवस रात्रीच्या तापमान बदलामुळे मण्यांच्या वाढीस लागणारा कालावधी बदलतो. परिणामी संजीवकांच्या मात्रेमध्ये बदल करणे आवश्‍यक ठरते. 
  • जर संजीवकांचे प्रमाण जास्त असेल तर घडातील मणी गळ होऊ शकते. 
  • उपाययोजना ः 

  • वेल विस्तार व्यवस्थापन योग्य असल्यास वेलींना भरपूर सूर्यप्रकाश, पुरेसा अन्नसाठा मिळतो. कॅनॉपीनुसार घडांची संख्या निर्धारित करता येते. यामुळे द्राक्षमण्यांची गळीवर नियंत्रण मिळवता येते. 
  • वेलीच्या क्षमतेनुसार घडांची संख्या व घडातील मणी ठेवावेत. त्यामुळे प्रत्येक मण्याचे व्यवस्थित पोषण होते. 
  •  पाणी व अन्नद्रव्यांचे विशेषतः पोटॅशचे योग्य व्यवस्थापन करावे. अन्नद्रव्यांच्या निर्धारीत मात्रा योग्य वेळी नियमित द्याव्यात. 
  • तापमान आणि शिफारशीनुसार संजीवकांचा वापर करावा. तीव्रता, मात्रा निर्धारित व मर्यादित ठेवाव्यात. 
  •  अनेक संजीवके एकत्र मिसळून वापरू नयेत. 
  •  तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार जीएचा योग्य प्रमाणात वापर करावा. 
  •  ६ ते१० मि.ली. नॅप्थील ॲसिटीक ॲसिड प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्याने मणी गळ थांबते. परंतु, घडाचे कॉयलिंग होऊ शकते. परंतु, घाबरून जाऊ नये. कारण मणी सेट झाल्यानंतर कॉयलिंग झालेले घड सरळ होतात.  थोडक्‍यात पण महत्त्वाचे : 
  • सध्या काही विभागात पाऊस सुरू आहे. त्यामुळे रोगप्रतिकारक फवारण्या बऱ्याच प्रमाणात सुरू आहेत. अशा वातावरणात जीएच्या वापरास प्राधान्य देण्यात येत नाही. जीए दिल्यानंतर पाऊस झाला तर ते विरघळते. त्यामुळे इच्छित परिणाम साधता येत नाहीत. म्हणूनच बऱ्याच बागांमध्ये मणी गळ होते किंवा पाणी घडात साचून राहिल्याने मणीकुज होते किंवा सतत जीए देत राहिल्याने घडाचे कॉयलिंग होते. पावसाळी परिस्थितीमध्ये ट्रॅक्‍टरचा फवारणीसाठी वापर न करता शक्‍यतो पाठीवरच्या पंपाने फवारणी करावा. जेणेकरून वेलींचे नुकसान होणार नाही. तसेच बोधही घट्ट होणार नाही. परिस्थितीमध्ये पुढीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात. त्यामुळे बऱ्याच अंशी मणीगळ व कॉयलिंगची समस्या सुटेल. 
  • पावसाळी हवामानात जीए देऊ नये. पावसाने उघडीप दिल्यानंतरच जीए देण्याचे नियोजन करावे. 
  •  त्यानंतर हवेचा ब्लोअर सुरू करावा. त्यामुळे घडातील तसेच पानावरील पाणी पूर्णतः निघून जाईल. परंतु, त्याआधी वेली हलवून पाणी झटकून घ्यावे. 
  • यानंतर शिफारशीत बुरशीनाशकाचा वापर डस्टिंगच्या माध्यमातून करावा. त्यानंतर जीएच्या फवारणीविषयी विचार करावा. यामुळे आपल्याला विकृतीवर मात करता येईल.   
  • बागेत पाणी साचले असल्यास करावयाच्या उपाययोजना 

  • प्रत्येक बागेत पावसाचे अतिरिक्त पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करावी. 
  •  नवीन द्राक्ष लागवड करताना एका बाजूला उतार ठेवावा. म्हणजे बागेत पाणी साचणार नाही. 
  •   बोद हे सेंद्रिय पदार्थांपासून तयार केलेले असावे. यात काळ्या कसदार मातीचे जास्त प्रमाण नसावे. बोद नेहमी त्रिकोणी आकाराचे करावेत. त्यामुळे बोदात पाणी साचून राहणार नाही. मुळाचे कार्य सतत सुरू राहील. मणीगळ होणार नाही. 
  • द्राक्ष घडात पाणी साचून राहू नये, यासाठी करावयाच्या उपाययोजना 

  • वेली हलवून घ्याव्यात. 
  •  वेलीवरील पाणी निघून जाण्यासाठी बागेत ब्लोअरने हवा फवारावी. त्यामुळे घडात पाणी साठणार नाही. यानंतर शिफारशीत बुरशीनाशकाचे डस्टिंग करावे. 
  •   तातडीने उपाययोजना केल्यास फळकूज किंवा मणीकुज होणार नाही. जीएचा योग्य वापर आणि नियंत्रित ठेवल्यास कॉयलिंग होणार नाही.   
  •  संपर्क - ०२० - २६९५६०७५  राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र,  मांजरी, जि. पुणे 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com