वाया शेतमालापासून स्वस्तात इथेनॉल निर्मिती

 वाया शेतमालापासून इथेनॉल
वाया शेतमालापासून इथेनॉल

उत्तराखंडमधील काशीपूर येथे नुकतीच शेतीमधील वाया जाणाऱ्या पदार्थांपासून जैविक इंधन निर्मिती करू शकणाऱ्या प्रकल्पाची सुरवात करण्यात आली. रसायन तंत्रज्ञान संस्था व भारतीय जैवतंत्रज्ञान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. अत्यंत स्वस्तात निर्मित हे जैविक इंधन पेट्रोलबरोबर मिश्रण करून गाड्यांमध्ये वापरता येईल असा दावा केला आहे.  प्रकल्प उभारण्यासाठी ३५ कोटी रुपयांचा खर्च आला आहे. दररोज १० टन वाया शेतमालाचा वापर करता येतो. प्रतिटन वाया शेतमालापासून ३०० लिटर जैविक इंधनाची निर्मिती करता येते. वाया शेतमालापासून जैवइंधन निर्मिती करणारा हा जगातील सर्वात यशस्वी प्रकल्प आहे असे सांगण्यात आले.  इथेनाॅलनिर्मितीसाठी उसाचे पाचट , बगॅसचाही वापर होतो. त्यापासून तयार होणाऱ्या जैवइंधनाला जनरेशन-१ या प्रकारचे जैवइंधन म्हणतात. वाया शेतमालापासून तयार होणाऱ्या जैवइंधनाला जनरेशन-२ इंधन असे म्हणतात.  सद्यस्थितीत देशात उसापासून इथेनॉल निर्मितीची प्रस्थापित क्षमता २.५ अब्ज लिटर एवढी आहे. मात्र देशाची गरज त्याच्या दुप्पट म्हणजे ५ अब्ज लिटर एवढी आहे. उस पाचटाचा शेतकरी जनावरांसाठी चारा म्हणून वापर करतात. त्यामुळे उसापासून इथेनॉल निर्मितीला मर्यादा आहेत. दुसरीकडे भारतात दरवर्षी १०० दशलक्ष टन इतका वाया जाणारा शेतमाल जाळून टाकला जातो. जर या सर्व मालाचा वापर केला तर जनरेशन - २ प्रकारचेे १०० अब्ज लिटर इथेनॉल बनविले जाऊ शकते. काशीपूर येथील प्रकल्पात कापूस व बांबू यांचे खोड, लाकडाचे तुकडे आदींचाही वापर इथेनाॅलनिर्मितीसाठी करता येऊ शकतो. 

तंत्रज्ञान :  काशीपूरमधील प्रकल्पात बसविलेल्या बायोरिअॅक्टर्समध्ये गव्हाचे काड व बगॅस आदी वाया शेतमालाचा वापर केला जातो. प्रथम तो शेतमाल रिअॅक्टरमध्ये घेऊन काही रसायनांची प्रक्रिया करून स्लरी केली जाते. त्या स्लरीवर सेल्युलोज इंझाइम्सची क्रिया करून शेतमालात असलेल्या सेल्युलोजचे साखरेमध्ये रुपांतरण केले जाते. नंतर त्या साखरेवर यिस्टची प्रक्रिया करून इथेनॉल बनविले जाते.

प्रतिक्रिया :  जनरेशन २ प्रकारच्या इथेनॉलनिर्मितीबाबत जगात उपलब्ध विविध तंत्रज्ञानापैकी हे सर्वात चांगले व जास्त इथेनॉल निर्मिती करणारे तंत्रज्ञान आहे. इतर पद्धतीत इथेेनॉल निर्मितीसाठी ५ दिवस लागतात तर या पद्धतीनुसार केवळ एका दिवसात ते तयार करता येते. इतर पद्धतीत पिकात असलेले एन्जाईम्स व पाणी यांचे विघटन करून ते सेल्युलोजमध्ये परावर्तित करण्यासाठी अत्यंत महागडी रसायने वापरावी लागतात. मात्र या पद्धतीत अशा महागड्या रसायनांचा वापर न करताही इथेनॉल निर्मिती करता येते. त्यामुळे त्याचा उत्पादनखर्चही खूपच कमी आहे. या इथेनॉलचा उत्पादनखर्च केवळ २५ रुपये प्रतिलिटर एवढा असून उसापासून बनविलेल्या इथेनॉलची किंमत ५० रुपये प्रतिलिटर असते.  अरविंद लल्ली, प्रमुख, जैविक ऊर्जा संशोधन केंद्र, मुंबई 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com